Leading International Marathi News Daily                                  गुरुवार, १५ जानेवारी २००९

(सविस्तर वृत्त)

गोंधळात पार पडली शिक्षण मंडळाची निवडणूक
सभापतीपदी महादेव राय्ांभोळे, उपसभापतीपदी संजय गुंजाळ

 
कल्याण/प्रतिनिधी - सतत गोंधळाच्या बाजारात अडकलेल्या पालिका शिक्षण मंडळाच्या सभापतीपदाची निवडणूक आज बेशिस्तपणा, गोंधळाच्या वातावरणात पार पडली. शिवसेनेत नव्याने दाखल झालेल्या काँग्रेस आघाडीतील तीन सदस्यांच्या बळावर युतीने सभापतीपद पटकावण्यात बाजी मारून काँग्रेस आघाडीला पालिकेत दुसऱ्यांदा चपराक लगावली. सभापतीपदी सतत तळ्यात मळयातच्या भूमिकेत राहणारे महादेव रायभोळे यांची तर उपसभापतीपदी संजय गुंजाळ यांची निवड झाली. सभापतीपदासाठी काँग्रेसचे उमेश भोईर, शिवसेनेतर्फे समीर काटे व महादेव रायभोळे यांनी अर्ज दाखल केले होते.
सभागृहात एकूण १५ सदस्य आहेत. रायभोळे यांना युतीची दहा मते पडली. भोईर यांना काँग्रेस आघाडीची चार मते पडली. एक मत बाद झाले. शिवसेनेने काँग्रेस आघाडीकडून पालिकेतील सत्ता खेचून महापौरपद पटकावले. आता शिक्षण मंडळाचे सभापतीपद मिळवून काँग्रेस आघाडीला दणका दिला आहे. शिवसेनेच्या या खेळीने पालिकेवरील भगवा आणखी डौलदार झाला आहे.
शासनाचा प्रतिनिधी म्हणून शिक्षणाधिकाऱ्यांना मतदानाचा अधिकार असतो. शासनाचा प्रतिनिधी म्हणून उपशिक्षणाधिकारी नरेंद्र पाटील यांनी सभागृहात दीड तास उशिरा हजेरी लावली. पण त्यांच्याजवळ मतदान करण्यासंबंधी अधिकृत पत्र नव्हते. त्यामुळे पीठासन अधिकारी महापौर रमेश जाधव यांनी पाटील यांना मतदान करू दिले नाही. आपणास शिक्षणाधिकाऱ्यांनी सकाळी दूरध्वनी करून या ठिकाणी येण्यास सांगितले, त्यामुळे माझे पत्र ठाणे कार्यालयात राहिले, असे स्पष्टीकरण पाटील यांनी दिले. ते अमान्य करण्यात आले. शिक्षणाधिकाऱ्यांच्या या निष्क्रियतेबद्दल त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे रमाकांत देशमुख यांनी केली.
निवडणूक प्रक्रिया सुरू होईपर्यंत सभापती कोण होणार हे गुलदस्त्यात होते. सभागृहात यापूर्वी काँग्रेस आघाडीची सत्ता होती. आघाडीतील अपक्ष सदस्य महादेव रायभोळे, राष्ट्रवादी काँग्रेसमधील संतोष तळाशिलकर, रेखा पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. तळाशिलकर हे पुंडलिक म्हात्रे यांचे समर्थक, तर पाटील या वामन म्हात्रे यांच्या समर्थक आहेत.
शिवसेनेमधून गणेश जाधव यांचे नाव सभापतीपदासाठी घेण्यात येत होते. परंतु, शिवसेनेत जाऊन आपणास सभापतीपद मिळाले नाही तर आपण तात्काळ काँग्रेस आघाडीत दाखल होऊ, अशी भूमिका रायभोळे यांनी घेतली होती. शिवसेनेने केवळ आपलेच घोडे पुढे दामटण्याचा प्रयत्न करून भाजपला उपसभापतीपद देण्यास टाळाटाळ केली तर भाजपने टीका झाली तरी सभागृहात काँग्रेसबरोबर गुळपीठ करण्याची तयारी केली होती, असे पालिकेतील चर्चेतून समजते. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे आव्हान न स्वीकारता शिवसेनेने स्वपक्षातील उमेदवारांना शांत राहण्यास सांगून रायभोळे यांना सभापतीपद देण्याचा निर्णय घेतला. वाद नको म्हणून उपसभापतीपद भाजपला दिले. याचवेळी शिवसेनेत नव्याने दाखल झालेल्या रेखा पाटील यांना उपसभापतीपद देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्यामुळे आज त्या नाराज होत्या. त्यांची उपजिल्हाप्रमुख म्हस्के, गोपाळ लांडगे यांनी समजूत काढली, त्यामुळे त्या शांत झाल्या.