Leading International Marathi News Daily                                  गुरुवार, १५ जानेवारी २००९

(सविस्तर वृत्त)

‘नाटय़कला’ ही महाराष्ट्राची अस्मिता - सुलभा देशपांडे
 
ठाणे/प्रतिनिधी : ‘नाटय़कला’ ही महाराष्ट्राची अस्मिता आहे. म्हणूनच लहान मुलांनी नाटक करणे याला विशेष महत्त्व आहे. नाटक ही मिश्रकला आहे. त्यामुळे नाटकाच्या निमित्ताने मुले अभिनयाची भाषा शिकतात, त्यांची कल्पकता जागी होते, त्यांचा उत्तम साहित्याशी परिचय होतो, त्यांचे व्यक्तिमत्त्व विकसित होते, अशा शब्दांत ज्येष्ठ अभिनेत्री सुलभा देशपांडे यांनी लहान मुलांना नाटकाची ओळख का करून दिली पाहिजे हे सांगितले. शशी जोशी स्मृतिदिनाच्या पारितोषिक वितरण सोहळ्यात त्या बोलत होत्या.
नाटय़ाभिमानी आणि समन्वय युवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने शशी जोशी स्मृती वैयक्तिक अभिनय स्पर्धा दरवर्षी घेण्यात येते. यंदा स्पर्धेचे दहावे वर्ष होते. यावर्षी खुल्या आणि शालेय गटात प्रत्येकी २५ स्पर्धकांनी भाग घेतला होता. दशकपूर्तीनिमित्त यंदा खुल्या गटातील स्पर्धकांसाठी अभिनय मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेची अंतिम फेरी गडकरी रंगायतन येथे झाली. संपदा कुलकर्णी, राजन ताम्हाणे, विनायक दिवेकर या मान्यवरांनी अंतिम फेरीचे परीक्षण केले.
पारितोषिक वितरण समारंभासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून ज्येष्ठ अभिनेत्री सुलभा देशपांडे उपस्थित होत्या, तसेच याप्रसंगी व्यासपीठावर समन्वय युवा प्रतिष्ठानचे निरंजन डावखरे, नाटय़ाभिमानीचे अध्यक्ष शशिकांत कोनकर, स्पर्धेचे समन्वयक मकरंद जोशी उपस्थित होते. शशी जोशींचे जिवलग स्नेही, नाटककार शशिकांत कोनकर यांनी याप्रसंगी शशी जोशींच्या स्वभाव विशेषावर प्रकाश टाकणाऱ्या हृद्य आठवणी सांगितल्या.
निरंजन डावखरे यांनी शशी जोशी यांचे नाटय़स्वप्न संस्थेच्या निमित्ताने जिवंत ठेवल्याबद्दल मकरंद जोशी, तसेच नाटय़ाभिमानीच्या अन्य कलावंतांचे कौतुक केले. प्रमुख पाहुण्या सुलभा देशपांडे यांना बालरंगभूमीविषयी नाटणारा अकृत्रिम जिव्हाळा त्यांच्या शब्दा-शब्दांतून व्यक्त झाला. स्पर्धेत सादरीकरण केलेल्या बालकलाकारांचे कौतुक करून त्यांनी या मुलांना अधिक योग्य मार्गदर्शन मिळायला हवे, तसा प्रयत्न नाटय़ाभिमानीने जरूर करावा, असे सुचविले. शासनाने शालेय अभ्यासक्रमात नाटय़विषयासाठी तास राखून ठेवला आहे, पण अनेक शाळांमध्ये या तासाचा वापर त्यासाठी होत नाही याविषयी खंत व्यक्त केली.
नाटय़ाभिमानीचे कार्यवाह, शशी जोशींचे चिरंजीव मकरंद जोशी यांनी दहा वर्षे झाल्यानंतर स्पर्धा थांबविण्याचा विचार होता, पण सुलभाताईंच्या मार्गदर्शनामुळे स्पर्धा न थांबविता, वेगळ्या स्वरूपात ती पुढे सुरू ठेवण्याचा मनोदय व्यक्त केला. यानिमित्ताने ही स्पर्धा दहा वर्षे सातत्याने सुरू ठेवण्यासाठी मन:पूर्वक परिश्रम करणाऱ्या नाटय़ाभिमानीच्या कार्यकर्त्यांचा गौरव करण्यात आला.
शशी जोशी स्मृती अभिनय स्पर्धेचा निर्णय पुढीलप्रमाणे- शालेय गट (इयत्ता पाचवी ते सातवी) : सोनाली सावंत-प्रथम, आकांक्षा जांभळे-द्वितीय, भूमिका वीरा-तृतीय व कश्मिरा गुजर-उत्तेजनार्थ.
शालेय गट दुसरा (इयत्ता आठवी ते दहावी) : श्रद्धा गायकवाड-प्रथम, सिमरन भांगले- द्वितीय, ऐश्वर्या दळवी- तृतीय.
खुला गट : मनोज सावंत-प्रथम, संदेश बोऱ्हाडे- द्वितीय, श्रीनिवास ओक- तृतीय.
प्रेक्षक पसंतीचे पारितोषिक शालेय गटातील आकांक्षा जांभळेला देण्यात आले. राजेंद्र पाटणकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.