Leading International Marathi News Daily                                  गुरुवार, १५ जानेवारी २००९

(सविस्तर वृत्त)

‘ग्रंथालयांनी जास्तीत जास्त उपक्रमशील होणे आवश्यक’
 
भिवंडी/वार्ताहर : अलीकडच्या काळात ग्रंथालयांचे बदलते क्षेत्र लक्षात घेता ग्रंथालयाने मर्यादित क्षेत्रात काम न करता जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. त्यासाठी ग्रंथालयाने त्यांची चाकोरीबद्ध कामे सोडून जास्तीत जास्त उपक्रम राबवून उपक्रमशील राहणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष गंगाधर पटणे यांनी जिल्हा ग्रंथालय संघाच्या समारोपप्रसंगी केले.
ठाणे जिल्हा ग्रंथालय संघाचे ४० वे अधिवेशन भिवंडीच्या स्वामी विवेकानंद वाचनालयाच्या वतीने आयोजित करण्यात आले होते. त्या अधिवेशनाच्या समारोपप्रसंगी पटणे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य विनोद नंद होते. ग्रंथालय चळवळीला सध्या चांगले दिवस आले आहेत. अनेक ग्रंथालये सध्या चांगली कामे करीत आहेत. ग्रंथालयीन कार्यकर्त्यांनी समाजशील उपक्रम राबवीत राहिल्यास ग्रंथालये लोकांपर्यंत पोहोचतील. त्यामुळे आपोआपच ग्रंथालय चळवळ वाढविण्यात मदत होईल. ग्रंथालयीन चळवळीतील त्रिस्तर म्हणजेच राज्य, विभाग व जिल्हा यांची चांगल्याप्रकारे साखळी तयार होणे आवश्यक आहे, असे पटणे यांनी नमूद केले.
सकाळच्या सत्रास विरोधी पक्षनेते मनोज काटेकर, पद्मश्री अण्णासाहेब जाधव शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष विजय जाधव, सरचिटणीस आर. एन. पिंजारी, ग्रंथालय संघाचे अध्यक्ष पद्माकर शिरवाडकर, वाचन मंदिर भिवंडीचे अध्यक्ष सुधीर सिंगासणे व्यासपीठावर उपस्थित होते. महापौर जावेद दळवी यांनी सर्व ग्रंथप्रेमी व ग्रंथालयीन कार्यकर्त्यांचे स्वागत केले व ग्रंथालयीन उपक्रमात जे काही शक्य होईल, ते महानगरपालिकेतर्फे देण्यात येईल, असे आश्वासन दिले. तर विरोधी पक्षनेते मनोज काटेकर यांनी कामतघर भागात विवेकानंद वाचनालयाची चांगली इमारत बांधण्याचे आश्वासन या निमित्ताने दिले.
अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्रात राज्य पटणे यांच्या प्रमुख उपस्थितीत ग्रंथालयीन कार्यकर्त्यांच्या कामात येणाऱ्या अडचणी व त्यावर करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती दिली. याप्रसंगी मुंबई विभागीय ग्रंथालय सहाय्यक संचालक मनोहर देशपांडे तसेच त्यांचे सहकारी उपस्थित होते.
या अधिवेशनाची सुरुवात ग्रंथदिंडीने झाली. स्वामी विवेकानंद वाचनालय येथून ग्रंथदिंडी कार्यक्रमाच्या स्थळी आणण्यात आली. या ग्रंथदिंडीत येथील स्थानिक कार्यकर्ते विरोधी पक्षनेते मनोज काटेकर, पत्रकार विजय आंद्रेकर, प्राचार्य विनोद नंद, ठाणे जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष व पदाधिकारी, विजय जाधव, आर. एन. पिंजारी सामील झाले होते.
या अधिवेशनात दोन व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते. त्यात प्रा. शेखर कुलकर्णी यांचे ग्रामीण व शहरी वाचकांची अभिरुची यावर व्याख्यान झाले, तर रविप्रकाश कुलकर्णी यांचे दिवाळी अंकाची शताब्दी व ग्रंथालये यावर व्याख्यान झाले.