Leading International Marathi News Daily                                  गुरुवार, १५ जानेवारी २००९

(सविस्तर वृत्त)

वडवली पोटनिवडणूक: एनआरसी कामगारांची भूमिका निर्णायक
 
कल्याण/वार्ताहर : कल्याण- डोंबिवली महापालिकेच्या वडवली प्रभाग क्रमांक ११ च्या पोटनिवडणुकीत नॅशनल रेयॉन कंपनीच्या कामगारांची भूमिका निर्णायक ठरेल, असा राजकीय अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
ही पोटनिवडणूक रविवारी होणार आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे रोहिणी पाटील, शिवसेनेतर्फे वनिता पाटील हे दोन राजकीय पक्षांचे उमेदवार रिंगणात आहेत. रेखा पाटील यांनी काँग्रेसच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र पक्षाचा एबी फॉर्म वेळेत सादर न झाल्याने त्यांना अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याची वेळ आली आहे. आशा पाटील, कविता पाटील व कविता कोट अपक्ष म्हणून निवडणूक लढवीत आहेत. माजी नगरसेवक गणेश कोट हे त्यांचे दीर आहेत. १९९५ ते २००५ पर्यंत या प्रभागाचे नेतृत्व कोट यांनी केले होते. एकंदरीत पाटील विरुद्ध कोट अशीच खरी लढत आहे.
या प्रभागात नॅशनल रेयॉन कंपनीचे कामगार मोठय़ा प्रमाणावर राहतात. कारखान्यात राष्ट्रवादी काँग्रेसची युनियन, तर नेते शिवसेनेचे अशी परिस्थिती आहे. या नेत्यांमुळे आपली अशी परिस्थिती झाली, अशी भावना कामगार व कामगारांच्या महिला वर्गात झाली आहे. कंपनी सुरू राहण्याची खात्री नाही. त्यामुळे कामगार शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसवर नाराज आहेत. शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांबद्दल कमालीची नाराजी आहे. त्यामुळे या निवडणुकीत एन. आर. सी. कंपनीच्या कामगारांची भूमिका निर्णायक ठरणार आहे.
या प्रभागात शहाडचा बंदरपाडा परिसर, अंबिवली स्टेशन परिसर व वडवली गावाचा समावेश आहे. या प्रभागाची मतदारसंख्या सात हजाराच्या आसपास आहे. एन. आर. सी. कामगार मोठय़ा संख्येने आहेत. उत्तर भारतीय जवळजवळ ६५०, तर इराणी ४५० च्या आसपास आहेत, उर्वरित मराठी आहेत. नॅशनल रेयॉन कंपनी जवळजवळ बंद झाली असून कामगारांची देणी व्यवस्थापनाने अद्याप दिलेली नाही.