Leading International Marathi News Daily                                  गुरुवार, १५ जानेवारी २००९

(सविस्तर वृत्त)

आत्मविश्वास हेच व्यावसायिक यशाचे मुख्य भांडवल - वीणा पाटील
ठाणे/प्रतिनिधी

 
कोणताही व्यवसाय आत्मविश्वासावर चालतो. येणारा काळ हा स्पर्धेचा आहे. पर्यटनाच्या व्यवसायात जर पर्यटकांशी बांधिलकी जपली तर या व्यवसायाचे मोठय़ा उद्योगातही रूपांतर करता येते. मात्र त्यासाठी जिद्द-चिकाटी आणि कोणतेही काम करण्याची तयारी हवी, असे मत केसरी टूर्सच्या संचालिका वीणा पाटील यांनी येथे मांडले.
येथील सरस्वती शाळेच्या प्रांगणात सुरू असलेल्या २३ व्या रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानमालेत ‘व्यवस्थापन पर्यटनाचे’ या विषयावरील प्रकट मुलाखतीत पाटील यांनी हे मत मांडले. माधुरी ताम्हणे यांनी ही मुलाखत घेतली.
आज पर्यटन व्यवसायात ब्रँडनेम म्हणून केसरीकडे पाहिले जाते. मात्र हे गेल्या २५ वर्षांतील तपश्चर्येचे फळ आहे. हा व्यवसाय मोठा करण्यासाठी सर्वानीच जीवापाड मेहनत घेतली. मात्र अजूनही खूप काही करायचे आहे, असे प्रारंभीच सांगून पाटील पुढे म्हणाल्या, आमचे वडील हीच आमची इन्स्टिटय़ूट होती. कसल्याही कामाची लाज न बाळगण्याची, जिद्दीने काम करण्याची शिकवण त्यांनीच दिली. कोणताही व्यवसाय गटफिलिंगवर चालतो. येणाऱ्या काळात बिझनेस कॉलेजमधून मिळणाऱ्या ज्ञानाला अनुभवातून मिळणाऱ्या ज्ञानाची जोड दिली तरच व्यवसायात यशस्वी होता येईल, असे अनुभवाचे बोल त्यांनी यावेळी मांडले.
पर्यटन व्यवसायात चुका खूप होतात. मात्र चुकांमधूनच शिकता येते. आपल्या चुका झाल्या तरी त्याचा त्रास पर्यटकांना होऊ न देण्याची खबरदारी घ्यायला हवी. चुकांमुळे फायदेच होतात, असेही त्यांनी सांगितले. पर्यटन हे दृश्यमान नसलेले उत्पादन आहे. आम्ही स्वप्न विकतो. त्यामुळे या व्यवसायात कंपनीच्या विश्वासार्हतेचा कस लागतो. इतर व्यवसाय पिढय़ान्पिढय़ा चालतात. मात्र पर्यटन व्यवसाय मुख्य व्यक्तीबरोबरच संपतो. हा ‘शाप’ दूर करण्याची आपली आंतरिक इच्छा असून पर्यटन हा सुद्धा मोठा उद्योग होऊ शकतो, हे आपल्याला दाखवून द्यायचे आहे, असेही पाटील यांनी यावेळी आवर्जून सांगितले.
तुम्ही स्त्री, त्यातही मराठी असून बिझनेस कसा करता आणि मराठी भाषा कशी वाचवायची या तीन प्रश्नांचा आपल्याला खूप राग येतो. आजच्या काळात ‘मल्टीटास्किंग’ व्हायला हवे. पर्यटकांना आनंद मिळावा यासाठी जे जे काही करता येईल, ते करण्याची आमची धडपड असते. म्हणूनच केसरीकडे आदर्श संस्था म्हणून पाहिले जाते, असेही पाटील यांनी शेवटी सांगितले.