Leading International Marathi News Daily                                  गुरुवार, १५ जानेवारी २००९

आदिवासी विद्यार्थ्यांसाठी जिल्हा परिषदेची ज्ञानगंगा
ठाणे/प्रतिनिधी
सध्याच्या स्पर्धेच्या युगात ग्रामीण विशेषत: आदिवासी विभागातील विद्यार्थी गुणवत्तेच्या बाबतीत कुठेही मागे पडू नयेत, यासाठी त्यांना सक्षम बनविण्याचा निर्णय ठाणे जिल्हा परिषदेने घेतला आहे. जिल्ह्यात एकाच वेळी २६६ सार्वजनिक वाचनालये सुरू करून ग्रंथालयाच्या माध्यमातून ‘ज्ञानगंगा’ थेट गावपातळीवर पोहोचविण्यात येणार आहे. महिनाभरात हा अभिनव उपक्रम कार्यान्वित होणार आहे. स्पर्धेच्या युगात शहरी भागातील विद्यार्थ्यांना विविध साधनांची उपलब्धता असते. इंटरनेट स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांच्या ज्ञानात सतत भरच पडत असते. मात्र ग्रामीण भागातील विशेषत: आदिवासी विद्यार्थ्यांना आजही अशा प्रकारच्या सुविधांपासून वंचित राहावे लागते. परिणामी सर्वच स्पर्धांमध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थी मागे पडल्याची खंत व्यक्त होत असते.

महापौर निवासाच्या तंबूत आर्ट गॅलरीचा उंट
दिलीप शिंदे

उपवन येथील नवीन महापौर निवासाच्या आरक्षित भूखंडावर आर्ट गॅलरी बांधण्यास माजी महापौर अनंत तरे यांनी घेतलेली हरकत फेटाळून लावत ठाणे महापालिकेने आरक्षणात फेरबदल करण्यासाठी जय्यत तयारी केली आहे. आरक्षित जागेवरील महापौर निवास तोडून आर्ट गॅलरी बांधली जात नसल्याची भूमिका सभागृह नेते पांडुरंग पाटील यांनी घेतली असताना तरे यांनी त्या ठिकाणी गॅलरी बांधण्यास विरोध केला आहे, तर शिवसेना उपजिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे यांनी विरोध असल्यास गॅलरी इतरत्र बांधण्यास सहमती दर्शविली आहे. उपवन येथील निर्जन स्थळी असलेल्या महापौर निवासाचा नेहमी राहण्यासाठी वापर केला जात नाही.

भिवंडीत क्रीडासंकुलाचा राजकीय वापर
महापौर प्रशासनावर संतापले!

सोपान बोंगाणे

भिवंडीतील परशुराम टावरे क्रीडा संकुलाचा राजकीय वापर करण्यास बंदी असताना राष्ट्रवादी काँग्रेसला पक्षाच्या बॅनरखाली टेनिस क्रिकेटचे सामने आयोजित करण्यास पालिका प्रशासनाने परस्पर संमती दिल्यावरून महापौर जावेद दळवी कमालीचे संतप्त झाले आहेत. महापालिकेच्या हितसंबंधाविरुद्ध मनमानी कारभार करणाऱ्या निष्क्रिय आयुक्तांची त्वरित उचलबांगडी करावी, अशी त्यांनी राज्य सरकारकडे मागणी केली आहे. महापालिकेच्या कै. परशुराम टावरे क्रीडा संकुलाचा वापर कोण-कोणत्या कारणासाठी केला जावा, यासाठी महापालिका सभागृहाच्या संमतीने एक नियमावली तयार करण्यात आली असून, त्यातील नियम क्र. ७ (१) अनुसार यात क्रीडा संकुलाचा कोणत्याही प्रकारे राजकीय वापर करण्यास बंदी आहे.

गोंधळात पार पडली शिक्षण मंडळाची निवडणूक
सभापतीपदी महादेव राय्ांभोळे, उपसभापतीपदी संजय गुंजाळ

कल्याण/प्रतिनिधी - सतत गोंधळाच्या बाजारात अडकलेल्या पालिका शिक्षण मंडळाच्या सभापतीपदाची निवडणूक आज बेशिस्तपणा, गोंधळाच्या वातावरणात पार पडली. शिवसेनेत नव्याने दाखल झालेल्या काँग्रेस आघाडीतील तीन सदस्यांच्या बळावर युतीने सभापतीपद पटकावण्यात बाजी मारून काँग्रेस आघाडीला पालिकेत दुसऱ्यांदा चपराक लगावली. सभापतीपदी सतत तळ्यात मळयातच्या भूमिकेत राहणारे महादेव रायभोळे यांची तर उपसभापतीपदी संजय गुंजाळ यांची निवड झाली. सभापतीपदासाठी काँग्रेसचे उमेश भोईर, शिवसेनेतर्फे समीर काटे व महादेव रायभोळे यांनी अर्ज दाखल केले होते.

‘नाटय़कला’ ही महाराष्ट्राची अस्मिता - सुलभा देशपांडे
ठाणे/प्रतिनिधी : ‘नाटय़कला’ ही महाराष्ट्राची अस्मिता आहे. म्हणूनच लहान मुलांनी नाटक करणे याला विशेष महत्त्व आहे. नाटक ही मिश्रकला आहे. त्यामुळे नाटकाच्या निमित्ताने मुले अभिनयाची भाषा शिकतात, त्यांची कल्पकता जागी होते, त्यांचा उत्तम साहित्याशी परिचय होतो, त्यांचे व्यक्तिमत्त्व विकसित होते, अशा शब्दांत ज्येष्ठ अभिनेत्री सुलभा देशपांडे यांनी लहान मुलांना नाटकाची ओळख का करून दिली पाहिजे हे सांगितले. शशी जोशी स्मृतिदिनाच्या पारितोषिक वितरण सोहळ्यात त्या बोलत होत्या. नाटय़ाभिमानी आणि समन्वय युवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने शशी जोशी स्मृती वैयक्तिक अभिनय स्पर्धा दरवर्षी घेण्यात येते.

‘ग्रंथालयांनी जास्तीत जास्त उपक्रमशील होणे आवश्यक’
भिवंडी/वार्ताहर : अलीकडच्या काळात ग्रंथालयांचे बदलते क्षेत्र लक्षात घेता ग्रंथालयाने मर्यादित क्षेत्रात काम न करता जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. त्यासाठी ग्रंथालयाने त्यांची चाकोरीबद्ध कामे सोडून जास्तीत जास्त उपक्रम राबवून उपक्रमशील राहणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष गंगाधर पटणे यांनी जिल्हा ग्रंथालय संघाच्या समारोपप्रसंगी केले. ठाणे जिल्हा ग्रंथालय संघाचे ४० वे अधिवेशन भिवंडीच्या स्वामी विवेकानंद वाचनालयाच्या वतीने आयोजित करण्यात आले होते. त्या अधिवेशनाच्या समारोपप्रसंगी पटणे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य विनोद नंद होते. ग्रंथालय चळवळीला सध्या चांगले दिवस आले आहेत. अनेक ग्रंथालये सध्या चांगली कामे करीत आहेत.

वडवली पोटनिवडणूक: एनआरसी कामगारांची भूमिका निर्णायक
कल्याण/वार्ताहर : कल्याण- डोंबिवली महापालिकेच्या वडवली प्रभाग क्रमांक ११ च्या पोटनिवडणुकीत नॅशनल रेयॉन कंपनीच्या कामगारांची भूमिका निर्णायक ठरेल, असा राजकीय अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. ही पोटनिवडणूक रविवारी होणार आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे रोहिणी पाटील, शिवसेनेतर्फे वनिता पाटील हे दोन राजकीय पक्षांचे उमेदवार रिंगणात आहेत.

आत्मविश्वास हेच व्यावसायिक यशाचे मुख्य भांडवल - वीणा पाटील
ठाणे/प्रतिनिधी
कोणताही व्यवसाय आत्मविश्वासावर चालतो. येणारा काळ हा स्पर्धेचा आहे. पर्यटनाच्या व्यवसायात जर पर्यटकांशी बांधिलकी जपली तर या व्यवसायाचे मोठय़ा उद्योगातही रूपांतर करता येते. मात्र त्यासाठी जिद्द-चिकाटी आणि कोणतेही काम करण्याची तयारी हवी, असे मत केसरी टूर्सच्या संचालिका वीणा पाटील यांनी येथे मांडले. येथील सरस्वती शाळेच्या प्रांगणात सुरू असलेल्या २३ व्या रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानमालेत ‘व्यवस्थापन पर्यटनाचे’ या विषयावरील प्रकट मुलाखतीत पाटील यांनी हे मत मांडले. माधुरी ताम्हणे यांनी ही मुलाखत घेतली.

पोलिसांनी ठाणेकरांना दिली संक्रांतीची अनोखी भेट
ठाणे/प्रतिनिधी : विविध गुन्ह्यांमध्ये चोरीस गेलेला सुमारे सव्वा कोटी रुपयांचा मुद्देमाल परत मिळवून देऊन ठाणे पोलिसांनी नागरिकांना संक्रांतीची अनोखी भेट दिली. पोलिसांनी काल आयोजित केलेल्या कार्यक्रमात पोलीस आयुक्त अनिल ढेरे यांच्या हस्ते या मुद्देमालाचे वितरण करण्यात आले. १४४ नागरिकांना त्यांचा चोरीस गेलेला मुद्देमाल परत मिळाला. त्यात महिलांचे मंगळसूत्र, चैन यांचा मोठय़ा प्रमाणात समावेश होता. यावेळी चोरटय़ांशी दोन हात करणारे गाला बंधू, दोन चोरटय़ांना पकडून पोलिसांच्या हवाली करणारे नारायण पाटील, बँकेतून दागिने घेऊन जाताना ते लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना विरोध करणाऱ्या पारुल वेलजी यांचा अनिल ढेरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास गुन्हे शाखेचे अप्पर आयुक्त प्रशांत बुरडे, परिक्षेत्राचे अप्पर आयुक्त तुकाराम जाधव व इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. पोलिसांनी राबविलेल्या विविध अभियानामध्ये पोलिसांना सहकार्य करणाऱ्या पाच जणांचा यावेळी आयुक्तांच्या हस्ते सत्कार करण्यात आला . यात टिकूजिनीवाडी येथील सान्वा मोटर्सचे संजीव मिस्त्री यांचाही समावेश होता. नुकत्याच संपलेल्या रस्ता सुरक्षा सप्ताह यशस्वी होण्यासाठी मिस्त्री यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली होती.

देशभक्तीपर गीतांनी शहिदांना आदरांजली
ठाणे/प्रतिनिधी : माजिवडा येथील ग्रामीण शिक्षण संस्थेच्या वतीने मुंबईतील अतिरेक्यांच्या हल्ल्यातील शहीद जवान तसेच नागरिकांना ‘हम हिंदुस्थानी’ या देशभक्तीपर स्फूर्तिदायी गीतांनी नुकतीच भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमासाठी मेजर सुभाष गावंड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूर्यकांत गायकवाड, रेणगुटवार आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. संस्थेचे सचिव रमेश वाडेकर, अध्यक्ष रामचंद्र मुलुंडकर, कार्याध्यक्ष नारायण पाटील, उपप्राचार्य सामंत, मुख्याध्यापिका देशपांडे, प्राचार्य स्मिता कर्वे, अलका खाडे आदी मान्यवर उपस्थित होते. मुंबईवरील हल्ल्यात धारातीर्थी पडलेले अधिकारी, जवान व बळी गेलेल्या निरपराध नागरिकांचे बलिदान व्यर्थ न व्हावे व देशभक्ती विद्यार्थ्यांमध्ये कायम तेवत राहावी, याकरिता हा प्रेरणादायी कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचे वाडेकर यांनी सांगितले. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध चित्तथरारक प्रात्यक्षिकासह देशभक्तीपर गीते सादर केली.

डॉ. सुजाता पवार यांना नवउद्योजिका पुरस्कार
ठाणे/प्रतिनिधी : महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अ‍ॅण्ड अ‍ॅग्रीकल्चरतर्फे देण्यात येणाऱ्या वार्षिक पुरस्कार सोहळ्यात ठाण्यातील डॉ. सुजाता सुनील पवार यांना दादासाहेब रावल यशस्वी नवउद्योजिका पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नरेंद्र जाधव यांच्या हस्ते व महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या अध्यक्षा मीनल मोहाडीकर, भारत रेडिएटर्सच्या मुख्य व्यवस्थापकीय संचालिका शरयू दप्तरी यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार देण्यात आला. डॉ. सुजाता पवार यांना अपघातामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागल्याने त्यांचे पती सुनील पवार यांनी हा पुरस्कार स्वीकारला. अत्यंत खडतर परिस्थितीत स्वत: संशोधन करून पारंपरिक वारसा असलेल्या मेंढय़ांच्या लोकरीपासून तयार केलेली निद्रा क्रिएशनची ‘सुजलाम मॅट्रेस’ २००४ साली बाजारात आली. अनेक शारीरिक व्याधींवर उपयुक्त असलेली टी मॅट्रेस बघता बघता मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, गोवा व संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचली. आता तर तिला परदेशातून मागणी वाढली आहे. या पुरस्कारामुळे समाजातील सर्व स्तरातील नागरिकांनी डॉ. सुजाता पवार यांचे अभिनंदन केले आहे.

डोळखांब परिसरात विचित्र आजाराची साथ;२० जनावरांचा मृत्यू
शहापूर/वार्ताहर : तालुक्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या डोळखांब परिसरातील शेतकऱ्यांच्या पाळीव जनावरांना विचित्र आजाराच्या साथीने ग्रासले असून, आतापर्यंत २० जनावरांचा या साथीत मृत्यू झाला आहे. या साथीमुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे.डोळखांब परिसरातील हेदवली, बांधनपाडा, जांभुळवाड, चिल्लारवाडी, रानविहीर या आदिवासी पठारावर जनावरांना विचित्र आजाराने ग्रासले आहे. शेतकऱ्यांच्या दुभत्या गाई, बैलांचा तडफडून मृत्यू होत असल्याने शेतकरी धास्तावला आहे. शेकडो जनावरांना या रोगाची लागण झाली आहे.गुरांना ताप येऊन मान वाकडी होणे, हातपाय जमिनीवर टाकून जीभ बाहेर येणे ही या आजाराची लक्षणे असून, जनावरे तात्काळ मरण पावत आहेत. याबाबत जांभूळवाडचे उपसरपंच बारकू वाघ यांनी पशुसंवर्धन अधिकारी, तहसीलदार यांना कळवून शेतकऱ्यांची जनावरे वाचविण्याची मागणी केली आहे. गुरे मरण पावलेल्या शेतकऱ्यांना आदिवासी विभागामार्फत नुकसानभरपाई देण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

दुर्गाडी ते शिवनेरी; विद्यार्थ्यांची स्केटिंग मोहीम
कल्याण/प्रतिनिधी : वरप येथील सेक्रेड हार्ट स्कूलमधील सह्य़ाद्री एक्सप्लोर युनिटने दुर्गाडी ते शिवनेरी हे दोनशे किलोमीटरचे अंतर स्केटिंगने पार करण्याची मोहीम आखली आहे. आजपासून ही मोहीम सुरू झाली असून, ती १६ जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये साहस वृत्ती वाढविणे, जनजागृतीचा संदेश देणे आणि दहशतवादी हल्ल्यातील शहीद जवानांना एक आगळी आदरांजली हा कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. आज सकाळी दुर्गाडी येथून या मोहिमेला सुरुवात झाली. या उपक्रमात सन्नी नारायनी, सुमित काम्रा, नितीन वाधवा, पवन मिडवारी, आशीष पंजाली, आकाश खानचंदानी, सोनु वाधवा, निरव नेगी, क्षितिज गुरुसाळे सहभागी झाले. शाळेचे संचालक अ‍ॅल्बीन अ‍ॅन्थोनी यांच्या पुढाकाराने आयोजित सहभागी विद्यार्थ्यांना स्वराज संस्थेचे अ‍ॅड. श्रीपाद भोसले, योगेश सावंत सहकार्य करणार आहेत.

चोरीप्रकरणी मनसेच्या पदाधिकाऱ्यास अटक
शहापूर/वार्ताहर : घोटीजवळील खंबाळे गावातील एका इसमाच्या मोटारसायकल चोरीप्रकरणी मनसेचे मुरबाड तालुका उपाध्यक्ष विशाल बांगर यास मुरबाड पोलिसांनी नुकतीच अटक केली. घोटी (इगतपुरी) वरून शहापूर- मुरबाडमार्गे एक इसम येत असताना मुरबाडजवळील पवाळे गावाजवळ मोटारसायकलमधील पेट्रोल संपल्याने तो गाडी उभी करून मुरबाडला पेट्रोल आणायला गेला होता. मात्र तो पुन्हा त्या ठिकाणी आला असता त्याची गाडी गायब झाल्याने मुरबाड पोलीस ठाण्यात त्याने तक्रार केली. त्यानंतर तपासाअंती ही मोटारसायकल विनानंबर मनसेचे उपाध्यक्ष विशाल बांगर यांच्याकडे सापडली. पोलिसांनी मनसेचे तालुका उपाध्यक्ष विशाल बांगर यास गाडीसह अटक केली आहे. दुसऱ्या एका गुन्ह्याच्या तपासासाठी बांगर याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

एकोपा निर्माण होण्यासाठी गावाच्या वेशीबाहेर स्नेहभोजन!
वाडा/वार्ताहर : तालुक्यातील एक हजाराहून अधिक लोकवस्ती असलेल्या मेट गावातील सुज्ञ मंडळींनी एकत्र येऊन गावातील किरकोळ स्वरूपाचे मतभेद गावातच मिटावेत व एकोपा निर्माण व्हावा, या उद्देशाने वर्षांतून एकदा संपूर्ण गावाचे स्नेहभोजन गाव वेशीबाहेर आयोजित केले होते. रविवारी झालेल्या या स्नेहभोजनामध्ये गावातील सर्व जातीपातीतील नागरिकांबरोबर उच्चशिक्षित तरुण, उद्योजक तसेच नोकरी, व्यवसायानिमित्त गावाबाहेर गेलेले गावातील मूळ रहिवासी सहभागी झाले होते.
रविवारी झालेल्या स्नेहभोजनानंतर सोमवारी गावामध्ये सत्यनारायणाची महापूजा आयोजित केली होती. मेट गावाच्या या आगळ्या वेगळ्या परंपरेबाबत माहिती देताना या गावचे रहिवासी व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हाप्रमुख अ‍ॅड. दीपक भोईर यांनी सांगितले की, यापाठीमागे कुठलीही अंधश्रद्धा नसून यानिमित्ताने सर्व ग्रामस्थ एकत्र येतात. गावाच्या विकासाविषयी अदानप्रदान होते व चर्चा होऊन गावातील किरकोळ मतभेद गावातच मिटविले जातात, तसेच सर्व नातेवाईकांच्या भेटीगाठी होऊन आपुलकीची भावना वाढीस लागते. या सर्व गोष्टींमुळे आम्ही दरवर्षी हा कार्यक्रम करीत असतो.

ठाण्यात गृहोपयोगी वस्तूंची खरेदी यात्रा
ठाणे/प्रतिनिधी : श्री हनुमान व्यायामशाळा, गडकरी रंगायतनसमोर, ठाणे येथे गृहोपयोगी व गृहसजावटींच्या वस्तूंचे भव्य प्रदर्शन ‘खरेदी यात्रा’ या नावाने भरले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन महापौर स्मिता इंदुलकर यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अ‍ॅड. सुभाष काळे, आयडीबीआय बँकेचे शाखाव्यवस्थापक नीलम, समर्थ सेवक मंडळाचे प्रधान आदी मान्यवर उपस्थित होते.अमृतांजन, पिडीलाईट, फ्लेमिंगो, प्रेस्टिज, एअरटेल, युनोव्हा, युरेका फोर्ब्स लि., स्मार्ट किड्स, टाटा स्काय, होली लामा, पिडीलाईट, प्रवीण मसालेवाले, परिपूर्ण, रंगत चहा, गिट्स, केप्र, लिंक हर्बल, उषा इंटरनॅशनल, गणेश पापड, पितांबरी, सुंदरम निद्रा, नोव्हेल, भारत मॅट्रीमोनी आदी नामांकित कंपन्यांचा सहभाग असून यामध्ये मोठय़ा कंपन्यांबरोबर महिला व लघुउद्योजकही सहभागी झाले आहेत. पाच दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनात सुईंग मशिन, प्रेशर कुकर, मोबाइल्स, आटा चक्की, फर्निचर, सोफा कम बेड, सौंदर्य प्रसाधने, आयुर्वेदिक साबण, लहान मुलांचे कपडे, ज्वेलरी, साडय़ा, बॅग्ज, पर्सेस, खाद्यपदार्थ, गाऊन्स आदी अनेक प्रकारच्या वस्तू आपणास पाहावयास मिळतील. अशा या नावीन्यपूर्ण ‘खरेदी यात्रा’ प्रदर्शनाला ठाणेकरांनी भेट देऊन खरेदीचा आनंद लुटावा, असे आवाहन या प्रदर्शनाच्या संयोजिका गार्गी भंडारे यांनी केले आहे. प्रदर्शन १८ जानेवारीपर्यंत सकाळी १० ते रात्री ९ पर्यंत सर्वाना विनामूल्य खुले आहे.

वाडा येथील शहीद स्मारकाचे आज भूमिपूजन
ठाणे/प्रतिनिधी : मुंबईवरील २६/११ च्या हल्ल्यात अतिरेक्यांशी लढताना शहीद झालेले पोलीस अधिकारी, कमांडो व कर्मचाऱ्यांच्या स्मृती कायम राहाव्यात, यासाठी वाडा येथे उभारण्यात येणाऱ्या भव्य शहीद स्मारकाचा कोनशिला समारंभ गुरुवार, १५ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता संपन्न होणार आहे. याप्रसंगी खासदार दामू शिंगडा, आमदार विष्णू सवरा, जिल्हा पोलीस अधीक्षक नवल बजाज, शिक्षणतज्ज्ञ सु. पा. कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. ठाणे जिल्हा शहीद स्मारक समितीचे अध्यक्ष ओमप्रकाश शर्मा यांनी ही माहिती दिली. वाडा येथील स्वामी विवेकानंद महाविद्यालयाच्या मैदानावर संस्थेने स्मारकासाठी जमीन देऊ केली आहे. संस्थेचे संमतीपत्र मिळाल्याने शहीद स्मारकाचा भूमिपूजन समारंभ गुरुवारी करण्याचा निर्णय घेण्यात आला. राजस्थानमधील प्रसिध्द धोलपुरी व संगमरवरी दगडामध्ये कोरीव बांधकामात हे देखणे स्मारक उभारण्याची तयारी सुरू आहे. फेब्रुवारीअखेपर्यंत त्याचे काम पूर्ण होईल, अशी अपेक्षा असल्याचे शर्मा यांनी सांगितले. भूमिपूजन समारंभाला राष्ट्रप्रेमी नागरिकांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शहीद स्मारक समितीने केले आहे.

खोणीमध्ये शुक्रवारी राममंदिराचे भूमीपूजन
प्रतिनिधी : येथून जवळच अंबरनाथ रस्त्यावरील खोणी गावात श्री महाभागवत सेवक मंडळ ट्रस्टतर्फे उभारण्यात येत असलेल्या राममंदिर, वृद्धाश्रम, बाल संस्कार केंद्र, शाळा आणि हॉस्पिटलच्या संकल्पित कामाचा भूमीपूजन समारंभ शुक्रवार, १६ जानेवारी रोजी सकाळी बाळकृष्ण महाराजांच्या हस्ते संपन्न होत आहे. या कामासाठी आजदे गावातील एक रहिवासी एकनाथ बाळाराम पाटील यांनी २१ गुंठे जमीन देणगी रुपात देऊ केली आहे. या भूमीपूजनानिमित्ताने होणाऱ्या कार्यक्रमानंतर भंडारा व महाप्रसाद असून त्याचा लाभ नागरिकांनी घ्यावा असे आवाहन संस्थेचे कार्याध्यक्ष पद्माकर काळे, कोषाध्यक्ष गंगाराम भगत यांनी केले आहे.