Leading International Marathi News Daily                                  गुरुवार, १५ जानेवारी २००९
व्यक्तिवेध
व्यक्तिवेध
अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष बराक ओबामा यांनी आपल्या मंत्रिमंडळाची, तसेच आपल्या सहकाऱ्यांची निवड आता पूर्ण करत आणली आहे. त्यांच्या प्रशासनामध्ये भारतीय वंशाच्या अनेक व्यक्तींचा समावेश झाला आहे . तो अर्थातच त्या व्यक्तींच्या गुणवत्तेवर आधारित आहे. या गुणवंतांमध्येच समावेश आहे तो डॉ. संजय गुप्ता यांचा. डॉ. संजय गुप्ता हे वैद्यकीय पत्रकारितेच्या क्षेत्रातील नावाजलेले व्यक्तिमत्व. जॉर्जिया राज्यातील अटलांटास्थित सीएनएन दूरचित्रवाहिनीचे मुख्य वैद्यकीय प्रतिनिधी असलेले डॉ. संजय गुप्ता यांना अमेरिकेचे सर्जन जनरल म्हणून बराक ओबामा यांनी पसंती दिली आहे. ‘एमोरी युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिन’मध्ये न्युरोसर्जरी या विषयाचे सहाय्यक प्राध्यापक असलेले डॉ. गुप्ता यांनी सीएनएनवरील वैद्यक विषयक लोकप्रिय कार्यक्रमामध्ये आपल्या बुद्धिमत्तेची चमक दाखवली आहे. ‘अ‍ॅण्डरसन कूपर ३६० डिग्री’ या कार्यक्रमामध्ये बहुतेकवेळा पाहुणे म्हणून झळकणारे डॉ. गुप्ता ‘हाऊस कॉल विथ डॉ. संजय गुप्ता’ या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत. त्यांनी २००६ मध्ये सादर केलेल्या ‘चॅरिटी
 
हॉस्पिटल’ या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाला एमी पुरस्कार मिळाला होता. १९९७-९८ मध्ये व्हाइट हाऊसच्या १५ जणांच्या वैद्यकीय पथकात असलेले डॉ. गुप्ता तत्कालीन फर्स्ट लेडी हिलरी क्लिंटन यांचे वैद्यकीय सल्लागार होते. सध्या ‘टाइम’ या नियतकालिकात त्यांचे सदर प्रसिद्ध होत असते. डॉ. गुप्ता यांनी लिहिलेले पुस्तक सध्या न्यूयॉर्क टाइम्सच्या बेस्टसेलरच्या यादीत अग्रक्रमावर आहे. डेट्रॉइटचे उपनगर असलेल्या मिशिगन शहराच्या नोव्ही भागात लहानाचे मोठे झालेले डॉ. गुप्ता यांचे आई-वडील १९६०च्या दशकात भारतातून अमेरिकेत मिशिगन येथे स्थलांतरित झाले. दमयंती आणि सुभाष गुप्ता हे दाम्पत्य फोर्ड डिअरबॉर्न प्लान्टमध्ये अभियंते म्हणून नोकरीसाठी येथे आले आणि स्थायिक झाले. संजय यांनी आपले शिक्षण मिशिगनच्याच अ‍ॅन अबरेर येथील विद्यापीठात पूर्ण केले. मेंदूवरील उपचारांमध्ये त्यांनी प्रावीण्य मिळविले. २००३ मध्ये इराकवर अमेरिकेने केलेल्या चढाईच्या वेळी तेथील वैद्यकीय सोयी-सुविधांची पाहणी करण्यासाठी डॉ. गुप्ता इराकमध्ये गेले होते. तेथे असलेल्या अमेरिकन सैनिक तसेच इराकी नागरिकांवर त्यांनी तातडीच्या शस्त्रक्रियाही केल्या होत्या. जेस्युस विदाना या नौसैनिकाच्या डोक्याला जबर दुखापत झाली होती. डॉ. गुप्ता यांना अमेरिकन नौदलाने तातडीने पाचारण केले आणि त्यांनी केलेल्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेनंतर विदाना याचे प्राण वाचले. डॉ. गुप्ता यांनी आतापर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या अनेक कठीण शस्त्रक्रिया पार पाडल्या आहेत. मज्जारज्जूमधील व्यंग, मेंदूतील रक्ताच्या गाठी किंवा टय़ूमर काढण्यासारख्या अनेक शस्त्रक्रिया करण्यात त्यांचा हातखंडा आहे. डॉ. गुप्ता केवळ प्रसिद्ध न्युरोसर्जन नाहीत तर त्यांना लोकांनी एका वेगळ्या प्रकारे नावाजले आहे. अर्थात हे नावाजणे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला शोभूनही दिसते. डॉ. गुप्ता यांची निवड पीपल्स मॅगेझिनने २००३ मध्ये ‘सर्वाधिक सेक्सी पुरुष’ म्हणून केली होती. त्यांच्या या निवडीचे वैद्यकीय क्षेत्रात तसेच पत्रकारितेच्या क्षेत्रातही स्वागत करण्यात आले आहे. अर्थात काही पत्रकारांनी नाकेदेखील मुरडली आहेत. त्यांच्या मते डॉ. गुप्ता हे काही फार मोठे न्युरोसर्जन नाहीत. उलट ते नेहमी प्रसिद्धीच्या झोतात राहून आपले ईप्सित साध्य करीत असतात आणि त्यासाठी ते विमा क्षेत्रातील आकडेवारीचा आधार घेत असतात. पण सीएनएन वाहिनीने आपल्या या पत्रकाराची पाठराखण केली आहे. शिवाय बराक ओबामा यांनी त्यांची केलेली निवड ही डॉ. गुप्ता यांच्या गुणवत्तेची पावतीच म्हणावी लागेल.