Leading International Marathi News Daily                                  गुरुवार, १५ जानेवारी २००९
विशेष लेख
दोन मिनिटांचे मौन, श्रद्धांजलीचे फलक , समरगीतांचे कार्यक्रम यातून शहीदांच्या कुटुंबीयांचे पुनर्वसन कितपत साध्य होते? आदरांजलीच्या देखाव्यापेक्षा पुनर्वसनाचे ठोस प्रयत्न करीत त्यांना ताबडतोबीची आर्थिक व भावनात्मक मदत दिल्यास फार भरीव काम होईल. राष्ट्रीय एकात्मतेचा खरा प्रत्यय त्यातून येईल..
अतिरेक्यांनी पाकिस्तानातून समुद्रमार्गे येऊन मुंबईवर भ्याड हल्ला केला आणि यात जवळजवळ ३०० निरपराध भारतीयांचे प्राण गेले. शेकडो जण गंभीर जखमी झाले. मुंबईत व भारतभर त्याचे गंभीर प्रतिसाद उमटले. केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे तर पूर्ण देशातील जनतेने त्याबद्दल तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. तर सरकारनेही काही राजकीय व्यक्तींना जबाबदार धरून, त्यांना राजीनामे देण्यास भाग पाडून आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. राजकारण्यांनी आपल्या पक्षाच्या देशप्रेमाची साक्ष जनतेपुढे देण्यासाठी मोठमोठे फलक लावले. काही पक्षांनी एकात्मतेची मॅरेथॉन घेतली तर काहींनी आपले वाढदिवस साधेपणाने (म्हणजे धांगडधिंगा तोच पण ‘ऐ मेरे वतन के लोगों’ वगैरे समरगीते गाऊन) केले. एके ठिकाणी नाचगाण्याचा कार्यक्रम होता; त्या वेळी एकाने २६/११ च्या महासंहाराची आठवण करून देऊन तो कार्यक्रम करू नये, असे सुचविले तर त्याला ‘शहीदांसाठी दोन मिनिटे शांतता पाळू व नंतर कार्यक्रम सुरू करू’, असे उत्तर मिळाले. श्रद्धांजली वाहण्यामागे प्रखर राष्ट्रवाद नव्हता तर ती एक औपचारिकता म्हणून पाळली गेली.. हे सर्व प्रकार पाहता राजकीय व्यक्तींनी या घटनेचा निषेध आपल्या राजकीय फायद्याकरिता वळवून घेतल्याचे दिसते.
कारगिल युद्धात ५०० भारतीय जवान व अधिकारी मारले गेले व हजारहून अधिक जखमी झाले; परंतु तेव्हा ‘तयांचे व्यर्थ न हो बलिदान शहीदांना कोटी कोटी प्रणाम’ हे फलक लागलेले दिसले नाहीत, हे का झाले? प्रत्येक अप्रिय घटनेनंतर आपण व आपल्या पक्षाचे पद कसे टिकून राहील, याचा प्रामुख्याने विचार केला जातो. अशात मृत व जखमी व्यक्तींच्या नातेवाईकांपुढे प्रश्न उपस्थित होतात- घरची कर्ती व्यक्ती हरपल्याने (वा अपंग झाल्याने) संसार कसा चालवायचा? हॉस्पिटलची लाखो रुपयांची बिले कशी भरायची? मुलांचे पुढचे शिक्षण कसे चालू ठेवायचे वगैरे वगैरे. त्यांना लागतो भावनिक आधार व आयुष्यात पुढची वाटचाल करण्यासाठी आर्थिक पाठबळ. या सर्व गोष्टींकडे सर्वानी पाठ फिरवलेली दिसते. अशा वेळी प्रत्येकाने ही माणसे आपल्याच कुटुंबातील आहेत, असे समजून त्यांना यथाशक्ती मदत तातडीने करून त्यांचा भार हलका करणे निकडीचे असते.
या संदर्भात प्रामुख्याने सी.एस.टी.वर झालेल्या गोळीबारात उत्तर प्रदेशच्या अन्सारी कुटुंबाची आठवण झाली. एकाच कुटुंबाची अशी दैना होणे दु:खद आहे. त्या कुटुंबाची जवळजवळ १५ माणसे अतिरेक्यांच्या गोळीबारात मरण पावली. अशा वेळी आपण सर्वानी यांना व इतर मरण पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना भरघोस आर्थिक मदत करून जातीयवाद, प्रांतीयवाद बाजूला ‘आम्ही एक आहोत’ याची प्रचीती दिली पाहिजे.
सरकार लाखो रुपयांची मदत करण्याचे आश्वासन देते, पण ते मिळविण्यासाठी अर्ज करणे, इतर कायदेशीर बाबी पूर्ण करणे, असा जीवघेणा प्रकार चालू होतो व तातडीने मदत मिळण्यासाठी कित्येक वर्षे लागतात. सर्वसामान्य नागरिकही, ‘सरकार देतेच आहे, मग मी का देऊ?’ असा विचार करतात. हे बदलले पाहिजे.
टॅक्सीतील बॉम्बस्फोटात मरण पावलेल्या ड्रायव्हरच्या पत्नीची मुलाखत टी.व्ही.वर पाहिली. आतापर्यंत एकही व्यक्ती मदतीसाठी घराकडे फिरकली नाही किंवा कसलीच आर्थिक मदत आली नाही, हा तिचा अनुभव.
हे सर्व पाहिल्यावर वाटते, ‘कोटी कोटी प्रणाम’चे फलक लावण्याऐवजी मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांना ताबडतोब आर्थिक व भावनात्मक मदत दिल्यास फार भरीव काम होईल. काही मोठय़ा उद्योजकांनी एकत्र येऊन जवळजवळ चार कोटी रुपये जमवले व प्रत्येक शहीद (लष्कर व पोलीस दलातील) जवानांच्या कुटुंबीयांना दरमहा ३० ते ४० हजार रुपये देऊ केले. या कृतीचा भारतीयांनी अभिमान बाळगावा.
आपणा सर्वानाही या बाबतीत खूप काही करता येईल. सर्व पक्षीय मतभेद बाजूला ठेवून तातडीने आपल्या आर्थिक परिस्थितीनुसार पैसे जमा करावेत. प्रत्येकाने १०-१५ रुपये जमा केले तरी लाखो रुपये एका दिवसांत जमा होतील. त्यातून संबंधित कुटुंबीयाच्या नावावर बँकेमध्ये ठेव ठेवून त्यांना महिन्याला ३० ते ४० हजार रुपये मिळतील याची तरतूद करावी. जखमी किंवा मृतांची परिस्थिती गरिबीची असेल तर त्यांना एखादा फ्लॅट घेऊन द्यावा. अघटित घटना घडलीच तर सर्व समाज माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील हा आत्मविश्वास यातून प्रत्येकाच्या मनात रुजला पाहिजे. घटना घडल्यावर शहीदांच्या कुटुंबीयांकडे सांत्वनासाठी मंडळी जातात, पण नंतर त्यांच्याकडे कुणीही फिरकत नाही. याची पुनरावृत्ती होऊ नये.
आपण भारताशी समोरासमोर लढूच शकत नाहीत याची पाकिस्तानला जाणीव आहे. १९६५, १९७१ च्या युद्धानंतर कारगिल येथे त्यांची भारतीय सैन्याने धूळधाण उडविली. मात्र अतिरेकी कारवाया करून देशात अस्थिरता निर्माण करून भारताचे खच्चीकरण करण्याचा त्यांचा कुरापतखोर उद्योग चालूच आहे. या वेळी भारतीयांनी राष्ट्रीय एकात्मतेचा प्रत्यय आणून दिला. असे हल्ले पूर्वी झाले, त्यापासून शिकण्याच्या प्रयत्नात प्रत्येकाने प्रथमोपचार व आपत्कालीन व्यवस्थापन याचे शिक्षण घेतले पाहिजे. या हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमध्ये युद्धकालीन परिस्थिती निर्माण झाली आहे. युद्धाबाबतचा निर्णय सारासार विचार, दूरगामी परिणाम, आंतरराष्ट्रीय दबाव वगैरे करून घ्यायचा असतो. हे युद्ध झालेच तर ते सरहद्दीवर न राहता भारतातील प्रमुख शहरांपर्यंत पोहोचेल. बॉम्बहल्ला झाल्यास नेमके काय करावे, आग कशी विझवावी, जखमींना प्रथमोपचार करून रुग्णालयात कसे न्यावे याचे प्रशिक्षण आपण सिव्हिल डिफेन्स किंवा होमगार्ड यांना दिले आहे. हे शिक्षण प्रत्येक व्यक्तीने घेणे गरजेचे आहे.
सर्व संघटनांनी, शाळांनी नागरी सुरक्षा दलाशी संपर्क साधून आपल्या प्रथमोपचार, आपत्कालीन व्यवस्थापन प्रशिक्षण घ्यावे. नागरी सुरक्षा दलांतील अधिकारी हे शिक्षण विनामूल्य देतील. प्रत्येक पालिका प्रभागांत कमीत कमी दहा स्ट्रेचर्स, १०० प्रशिक्षित स्वयंसेवक रुग्णवाहिका, प्रथमोपचारपेटय़ा व हॉस्पिटलची नामावली व तेथील दूरध्वनी क्रमांक व तेथे असणारी सुविधा याची माहिती तसेच आपत्तीप्रसंगी नियंत्रण ठेवणारी व्यक्ती व प्रत्येकाची जबाबदारी वगैरे याचा तपशील ठेवावा व त्यासंबंधी जास्तीत जास्त तरुणांना प्रशिक्षित करून त्यांची दर दोन-तीन महिन्यांनी रंगीत तालीम करून घ्यावी. त्यामध्ये वेळोवेळी सुधारणा घडवून आणाव्यात. प्रत्येक नागरिकाने जागरूक राहाणे हाच चांगला उपाय आहे.
मेजर सुभाष गावंड
(निवृत्त)