Leading International Marathi News Daily

गुरुवार, १५ जानेवारी २००९

संधी
शाल्मली :
नेहा, शाल्मली बोलतेय.
नेहा : पण मला नाही बोलायचं तुझ्याशी. तुझ्याशी नाही. स्वप्ना, श्वेता, अवनी, राधिका.. कोण्णा कोण्णाशी बोलायचं नाहीये मला.
शाल्मली : रागावली आहेस ना आमच्या सगळ्यांवर? अग, तुझा राग काढायलाच तर फोन केलाय आता मी!
नेहा : हे बरंय. आधी राग येण्यासारखं वागायचं आणि मग राग काढण्यासाठी प्रयत्न करायचा. आता सगळ्याजणी ‘सॉरी सॉरी’ करत फोन करताहेत आणि काल? काल एकजण फिरकली नाही. मी किती वाट बघत होते..
शाल्मली : तुम रूठी रहो, मैं मनाती रहूँ.. सॉरी सॉरी. आता यावर खरं तर हक्क आशीषचा. पण आम्हालाही अधूनमधून अशी संधी मिळू दे म्हटलं..

 


नेहा : शाल्मली, चावटपणा बास हं! आणि अशी लाडीगोडी लावून तुझी सुटका नाही, हे लक्षात ठेव.
शाल्मली : बरं बाई, किती रागावशील? अग, तुला मनापासून ‘सॉरी’ म्हणायलाच फोन केलाय. बघ इकडे उठाबशाही काढत्येय. गाणंही म्हणत्येय, अच्छाजी, मैं हारी चलो मान जाओ ना..
नेहा : शाल्मली, समोरच्याला कसं घोळात घ्यायचं ना ते तुझ्याकडून शिकावं, अच्छा चलो, हमने भी आपको माफ कर दिया.
शाल्मली : ये हुई ना बात.. पण नेहा, आई सांगत होती हळदीकुंकवाला तू एकदम ‘चिकनी’ दिसत होतीस. विहिणी विहिणींनी मिळून तुला हलव्याच्या दागिन्यांनी अगदी मढवून टाकलं होतं.
नेहा : काही विचारू नकोस. दोघींच्यात जशी कॉम्पिटिशन लागली होती. शेवटी इतके दागिने झाले ना, काही विचारू नकोस.
शाल्मली : तुला सासरही अगदी तोडीस तोड मिळालंय. तुझ्या सासूबाईही नंदिनीकाकूएवढय़ाच हौशी आहेत ना!
नेहा : अगदी.. तशी मलाही हौस आहे ग, पण हौस आहे, प्रथा आहे, रीत आहे असं म्हणत काहीही करावं असं नाही मला वाटत.
शाल्मली : म्हणजे?
नेहा : अग, हे हळदीकुंकू, ते हलव्याचे दागिने वगैरे बिलकुल मला पटत नव्हतं.
शाल्मली : मग सांगायचस ना स्पष्टपणे.
नेहा : शाल्मली, तुला आमच्या घरातली परिस्थिती माहितीच नाहीये जशी. माझी आजी कशी आहे, ते तर तुला माहितीच आहे. ती प्रत्येक बाबतीत इतकी आग्रही असते ना की, ती सक्तीच होऊन जाते.
शाल्मली : संक्रांत सण हा त्यांचाच आग्रह असेल मग.
नेहा : तर काय! आणि आधी माझी आजी होती फक्त. आता तिच्या जोडीला आशीषची आजी आलीये. एक से भले दो, असं झालंय. अर्थात आशीषची आजी माझ्या आजीइतकी हट्टी नाहीय. म्हणजे दगडापेक्षा वीट मऊ म्हण. ही म्हातारी माणसं सगळीकडे सारखीच असतात का ग?
शाल्मली : असं काही नाही. वयाबरोबरच विचारांनी वाढणारी, प्रगल्भ होणारीही भेटतातच की. पण तुझ्या दोन्ही आज्या मात्र सारख्याला वारख्या. तुम्हा दोघांचा रजिस्टर मॅरेज करण्याचा बेत याच दोघींनी अगदी मस्त उधळून लावला होता ना?
नेहा : अग, ते सुद्धा आम्ही मान्य केलं होतं. रजिस्टर लग्नाच्या बाबतीत आम्ही फार आग्रही होतो, अशातला भाग नाही. पण given the chance, we would have gone for registered marriage. पण तेव्हा आम्ही फार ताणून धरलं नाही. त्यामुळं त्यांचंही मन राखलं गेलं, पण प्रत्येकच बाबतीत त्यांनी अशी भूमिका घेतली तर ते त्रासदायक होतं.
शाल्मली : खरंच बाई. माझ्यावर तर त्यांचा राग आहेच. त्यांनी ना आयडियल बिहेवियरची एक चौकट आखून घेतली आहे. त्या चौकटीत बसणारी मुलगी ती आदर्श आणि त्या चौकटीबाहेरच्या मुली वाया गेलेल्या. तुझ्या आजीची सगळी मतं मला माहिती आहेत. त्यामुळेच मी त्यांच्या वाऱ्यालाही उभी राहत नाही.
नेहा : ते तर आहेच ग. तुम्ही लोकं हे जमवू शकता, पण आम्हा घरात राहणाऱ्यांना नाही ना तसं वागता येत.
शाल्मली : तुझी आजी म्हणजे त्या बालिका वधूतल्या दादीसासारखी आहे.
नेहा : नाही ग. ती दादीसा म्हणजे अख्ख्या कुटुंबाला कायम धारेवरच धरते. तितकी वाईट नाहीये माझी आजी..
शाल्मली : नेहा, अग गंमत केली मी. किती सीरियसली घेते आहेस.
नेहा : वाटलं होतं, लग्न झाल्यानंतर तरी थोडी मोकळीक मिळेल, पण कसचं काय! आशीषच्या आजी म्हणजे माझ्या आजीचाच नमुना.
शाल्मली : नेहा, एक सांगू, माहेरी केलेली चूक सासरी करू नकोस.
नेहा : म्हणजे?
शाल्मली : अग, सासरी तू अजून नवी आहेस. तू कशी आहेस, काय आहेस, तुला काय आवडतं, काय नावडतं, हे अजून कोणालाच नीट माहिती नाहीये. थोडक्यात काय तर तुझी पाटी कोरी आहे. त्यामुळे या पाटीवर तू लिहिशील ती अक्षरं उमटणार आहेत..
नेहा : ए शाल्मली, अग, तू काय शिबिरात व्याख्यान देते आहेस का?
शाल्मली : हो ग. सॉरी सॉरी. सारखी शिबिरं घेऊन आणि त्यात बोलून सवयच लागलीये. केव्हा ऑफ ट्रॅक जाते कळतच नाही. तर तुला काय सांगत होते नेहा की, जी काय स्टँडर्डस् सेट करायची आहेत ना, ती आताच कर. पुन्हा एकदा आदर्शवादाच्या चौकटीत सापडलीस ना तर नंतर ती चौकट झुगारणं फार कठीण असतं. कारण सगळेजण त्याच चौकटीतून तुमच्याकडे बघतात आणि अपेक्षा करतात.
नेहा : पटतंय ग सगळं तुझं. पण मला नाही ना असं तडकफडक बोलणं आणि वागणं जमत.
शाल्मली : कोणी सांगितलं तुला की, त्यासाठी तडकफडकच वागायला लागतं! अग, आरडाओरडा करून किंवा आक्रस्ताळेपणानेच सगळ्या गोष्टी साध्य कराव्या लागत नाहीत. ज्यांचे मुद्दे कमकुवत असतात, त्यांना या गोष्टींचा आधार घ्यावा लागतो. उलट मुद्दा सशक्त असेल, त्यात दम असेल ना तर अगदी साध्या, सोप्या, सरळ भाषेत शांतपणे मांडता येतो आणि तसाच मांडावा. ज्या गोष्टी तुला पटत नाहीत, त्याबद्दलची तुझी मतं स्पष्टपणे मांड, मोकळेपणानं सांग. काही पर्यायी पद्धतीनं तीच गोष्ट करता येते का, जुन्या रीतीरिवाजांना कालसुसंगत बनवता येतं का, ते बघ. त्यांना पटव.
नेहा : बाप रे शाल्मली, किती पर्याय एकदम मांडले आहेस. जमेल मला हे सारं?
शाल्मली : का नाही जमणार? हे बघ, मनात आणलंस तर जमेल. मनातच नाही आणलंस तर नाही जमणार. यातली कुठली वाट निवडायची, हे तू ठरवायचं आहेस. आणि नेहा, या आधीही हे खूप वेळा मी तुला सांगितलं आहे.
नेहा : हो ग. मला पटतं. तुझं म्हणणं कळतंही, पण वळत नाही. भीती वाटते. आजीला दुखवावंसंही नाही वाटत.
शाल्मली : नाही. आजीला, सॉरी, ‘आज्यांना’ दुखवावस असं मलाही नाही वाटत. पण त्यांचा दृष्टिकोन बदलायचा तर प्रयत्न कर.
नेहा : दोघीही पंचाहत्तरीच्या पुढच्या. आता या वयात कसले दृष्टिकोन बदलणार आहेत?
शाल्मली : प्रयत्न तर करून बघ. त्या दोघी कदाचित बदलणारही नाहीत, पण तुला निदान मोकळेपणानं तुझे विचार त्यांच्यापर्यंत पोचवल्याचं तर समाधान मिळेल. तुला काय आवडतं, काय पटतं, कुठल्या गोष्टींना विरोध असतो, हे तरी त्यांना कळेल. तुझीही घुसमट कमी होईल आणि तू मोकळेपणानं काही सांगतच नाहीस तोपर्यंत त्या तुला गृहीतच धरणार ना की, ‘नेहा आमच्या शब्दाबाहेर नाही’ म्हणून. त्यापेक्षा नवीन आयुष्याला सुरुवात करताना तुला एक संधी मिळते आहे, असं समज आणि त्या संधीचा फायदा घे.
नेहा : येस मॅडम.
shubhadey@gmail.com