Leading International Marathi News Daily                                  गुरुवार, १५ जानेवारी २००९
विविध

भारतीय बटाटय़ावर पाकिस्तानात २५ टक्के नियमन शुल्क
इस्लामाबाद १४ जानेवारी/पी.टी.आय.

भारतातून आयात केल्या जाणाऱ्या बटाटय़ांवर पाकिस्तानने २५ टक्के नियमन शुल्क आकारले असून देशातील शेतकऱ्यांनी बटाटय़ाचे उत्पादन वाढवावे यासाठी त्यांच्या सरकारने प्रोत्साहन देण्याचे धोरण ठेवले आहे. पाकिस्तानच्या फेडरल कॅबिनेटच्या आर्थिक समन्वय समितीची बैठक काल झाली त्यात भारतीय बटाटय़ावर शुल्क लादण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी पंतप्रधान गिलानी यांचे आर्थिक सल्लागार शौकत तरीन होते. समन्वय समितीने सांगितले की, पाकिस्तानी शेतकऱ्यांनी बटाटय़ाचे उत्पादन वाढवावे यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. पाकिस्तान हा बटाटा उत्पादनात स्वयंपूर्ण असून १.३ दशलक्ष हेक्टर जमिनीवर २.५ दशलक्ष टन इतके बटाटा उत्पादन होते. गेल्या महिन्यात भारताची पाकिस्तानला होणारी बटाटा निर्यात खूपच वाढली होती. दोन्ही देशांत तणाव असतानाही ही निर्यात वाढली आहे. प्रत्येकी १५ टन बटाटे असलेले किमान ९० ट्रक रोज सीमा ओलांडून येत आहेत. २००७-०८ मध्ये असे १०-२० ट्रक रोज येत असत. मुंबईतील हल्ल्यांच्या काही काळ अगोदर म्हणजे नोव्हेंबरच्या मध्यावधीत भारतातील बटाटय़ाची निर्यात फारच जास्त झाली. भारतात सध्या बटाटय़ाचे बंपर पीक आले असून भावही पडले आहेत. पाकिस्तानी आयातदारांनी चांगले भाव दिल्याने भारतीय व्यापाऱ्यांनी बटाटय़ाची निर्यात वाढवली आहे.

मातेच्या मृत्यूनंतर दोन दिवसांनी झाला अर्भकाचा जन्म!
लंडन, १४ जानेवारी/वृत्तसंस्था

ब्रिटनमधील नाणावलेली आईस-स्केटर व साडेसहा महिन्यांची गरोदर असलेली जेने सोलीमन ही गेल्या आठवडय़ात बुधवारी आईस स्केटिंग करुन आल्यानंतर ती घरी परतली व तिथेच अचानक जमिनीवर कोसळली. या घटनेनंतर तिला रूग्णालयात दाखल करण्यात आले. ब्रेन हॅमरेज झाल्याने तिची प्रकृती अधिकच गंभीर बनली व रुग्णालयातील उपचारांना ती प्रतिसाद देईनाशी झाली. डॉक्टरांनी जेने ‘ब्रेन डेड’ झाल्याचे जाहीर केले मात्र त्याचबरोबर तिच्या गर्भातील चिमुकल्या जीवाला वाचविण्याचे आव्हान डॉक्टरांनी स्वीकारायचे ठरविले. जेने सोलीमनची 'दयक्रिया लाईफ सपोर्ट मशिनच्या सहाय्याने सुरू ठेवण्यात आली. जेने ‘ब्रेन डेड’ झाल्यानंतर तब्बल दोन दिवसांनी तिच्या बाळाला सिझेरियन शस्त्रक्रियेव्दारे जन्म देण्यात डॉक्टरांना यश आले. वैद्यकीय इतिहासातील आगळीवेगळी ठरावी अशीच ही घटना आहे. जेने सोलीमनने मुलीला जन्म दिला. तिच्या मुलीचे नामकरण ‘आया जेनी’ असे करण्यात आले आहे. आया जेनीला तिच्या ‘ब्रेन डेड’ आईसमवेत काही क्षण ठेवण्यात आले. मात्र आया जेने ही अगदीच नाजूक प्रकृतीची निपजल्याने तिला त्वरित अतिदक्षता विभागात उपचारांसाठी हलविण्यात आले. जेने सोलीमन हिचे वय ४१ वर्षांचे होते व तिची प्रकृतीही ठणठणीत होती. आईस-स्केटिंग करून आल्यानंतर जेनी घरात कोसळली. तिचे ब्रेन हॅमरेज झाले होते. नंतरच्या वैद्यकीय तपासणीत असे उघड झाले की, जेनेला ब्रेन टय़ूमर होता. तिच्या शरीरातील महत्त्वाच्या रक्तवाहिनीला धक्का पोहोचला होता. प्रकृती अधिकच गंभीर बनलेली जेने काही काळाने उपचारांना काहीही प्रतिसाद देईनाशी झाली. त्यानंतर तिला ‘ब्रेन डेड’ म्हणून घोषित करण्यात आले. ही बर्कशायर येथील बर्कनेल येथील रहिवासी होती. आईस-स्केटिंग या क्रिडा प्रकारामध्ये नैपुण्य मिळविलेल्या जेने सोलीमनने १९८९ साली जगातील सवरेत्कृष्ट सातव्या क्रमांकाची आईस-स्केटर म्हणून स्थान पटकाविले होते. गेल्या आठवडय़ात बुधवारी आईस-स्केटिंग करून घरी परतल्यावर ती खाली कोसळली. तरीही तिने स्वत:ला सावरले व ती घरी आली. मात्र तिने आपले डोके दुखते आहे अशी तक्रार केली. थोडय़ा वेळाने जेने बेडरुममध्ये अचानक कोसळली. तिला तातडीने विमानाने ऑक्सफर्ड येथील जॉन रॅडक्लिफ रुग्णालयात दाखल करण्यात आले. अथक उपचारांचा काही उपयोग न होऊन ‘ब्रेन डेड’ अवस्थेला पोहोचलेल्या जेनेला लाईफ सपोर्ट मशीनव्दारे दोन दिवस ‘जिवंत’ ठेवून तिच्या गर्भातील बाळाला सिझेरियन शस्त्रक्रियेव्दारे गेल्या ९ जानेवारी रोजी दुपारी २.३४ वाजता जन्माला घातले गेले. जेने सोलीमनचा पती महमूद सोलीमन याने सांगितले की,जेने ब्रेन डेड झाल्यानंतरचे दोन दिवस मी अशा विचित्र स्थितीत घालविले की, एका बाजूला माझ्या प्रिय पत्नीच्या निधनामुळे माझे मन व्याकुळ झाले होते तर दुसऱ्या बाजूला माझी मुलगी आया जेनेचा जन्म झाला होता ही सुखद घटना होती. जेने सोलीमनच्या या आगळ्यावेग़ळया प्रकरणामुळे वैद्यकीय क्षेत्रामध्ये या पद्धतीचे रुग्ण पुढे आले तर उपचार पद्धती कशी अधिक प्रगत करता येईल याची चर्चा सुरू झाली आहे.

अण्वस्त्रसज्ज पाकिस्तान हा गुंतागुंतीचा प्रश्न- हिलरी क्लिंटन
वॉशिंग्टन १४ जानेवारी/पीटीआय

पाकिस्तान हा एक जटील प्रश्न आहे, कारण त्या देशाकडे अण्वस्त्रे आहेत. त्यांना आम्ही इतर मदत जरूर देणार आहोत पण ती दहशतवादविरोधी लढाईतील वचनबद्धतेशी निगडित राहील. मुंबईतील दहशतवादी हल्ला हा अमेरिकेच्या राजनैतिक शिष्टाईला आव्हान देणारा आहे. त्यामुळे भारताशी राजकीय व आर्थिक भागीदारीत अमेरिकेला मोठे स्वारस्य आहे. जगावर प्रभाव वाढत असलेला भारत हा एक मोठा देश आहे, अशा शब्दांत त्यांनी भारताचे महत्त्व अधोरेखित केले. पाकिस्तान हे ओबामा प्रशासनापुढे आव्हान असल्याची कबुली त्यांनी दिली. त्या म्हणाल्या की, पाकिस्तानचा प्रश्न गुंतागुंतीचा आहे कारण त्या देशाकडे अण्वस्त्र क्षमता आहे.

मुंबई हल्ल्याच्या सूत्रधारांवर पाकिस्तानमध्येच खटले चालवा - ब्रिटन
नवी दिल्ली, १४ जानेवारी/पीटीआय

मुंबईमध्ये झालेल्या भीषण हल्ल्याच्या कटात सहभागी असलेल्या संशयित आरोपींवर पाकिस्तानमध्येच खटले चालविण्यात येतील या पाकिस्तानने घेतलेल्या भूमिकेला ब्रिटनने पाठिंबा दिला. ब्रिटनचे परराष्ट्रमंत्री डेव्हिड मिलिबँड हे भारताच्या दौऱ्यावर आले आहेत. आज त्यांनी भारतीय नेत्यांशी दहशतवादी हल्ल्यांसंदर्भात चर्चा केली. मिलिबॅंड यांनी एनडीटीव्ही या वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, भारत व पाकिस्तान या देशांमध्ये गुन्हेगार हस्तांतरण करार झालेला नाही. त्यामुळे मुंबई दहशतवादी हल्ल्यामध्ये सहभागी असलेल्या संशयित आरोपींना पाकिस्तान भारताच्या हवाली करणे शक्य नाही. या संशयित आरोपींना आमच्या हवाली करा ही भारताची मागणी मान्य करता येणार नाही असे सांगून मिलिबँड म्हणाले की, पाकिस्तानमधील न्याययंत्रणेमार्फत या आरोपींवर योग्य कारवाई होईल. गुन्हेगार हस्तांतरण करार केलेला नसला तरी मुंबई हल्ल्याच्या कटातील सहभागी संशयित आरोपींना भारताच्या हवाली करण्यास पाकिस्तानला कोणतीही अडचण येणार नाही अशी भूमिका भारताने घेतली आहे. कारण दहशतवाद्यांना परस्परांकडे हस्तांतरित करण्याचे सार्क गटातील देशांनी ठरविले असून त्या अन्वये पाकिस्तान या संशयितांना भारताच्या हवाली करू शकतो असे भारताचे म्हणणे आहे. मात्र भारताच्या हस्तांतरणाविषयीच्या भूमिकेचे समर्थन करणे मिलिबॅंड यांनी नाकारले. मुंबई हल्ल्याच्या कटामध्ये सहभागी असलेल्या आरोपींना कडक शासन होणे आवश्यक आहे. दहशतवादाचा बीमोड करण्याच्या प्रयत्नांत भारत व पाकिस्तानला ब्रिटनचे नेहमीच सहकार्य लाभेल असेही मिलिबँड म्हणाले.

कुख्यात दहशतवादी मोहम्मद अहसान दर याला काश्मीरमध्ये अटक
बारामुल्ला, १४ जानेवारी/पीटीआय

हिजबुल मुजाहिदीनच्या संस्थापकांपैकी एक कुख्यात दहशतवादी मोहम्मद अहसान दर याला पकडण्यात बारामुल्ला पोलिसांना आज यश आले. हिजबुल मुजाहिदीनचा प्रमुख सय्यद सलाउद्दिन याचा निकटचा सहकारी असलेला मोहम्मद अहसान दर हा लष्कर-ए-तय्यबा, हिजबुल, जैश-ए-मोहम्मद, हरकत-उल-मुजाहिदीन या संघटनांच्या कारवायांची सूत्रे हलवित होता. उत्तर काश्मीरचे पोलीस उपमहानिरीक्षक अब्दुल गनी मीर यांनी सांगितले की, मोहम्मद अहसान दर हा नुकताच पाकिस्तानातून काश्मीरमध्ये परतला होता. तो पट्टण येथून सुम्बल भागात निसटून जाण्याच्या प्रयत्नात असतानाच आज पहाटे जम्मू-काश्मीर पोलिसांनी त्याला अटक केली. हिजबुल मुजाहिदीनच्या नेतृत्वाशी काही मतभेद झाल्याने तो या संघटनेपासून दूर झाला होता व त्याने १९९२ साली मुस्लिम मुजाहिदीन ही संघटना स्थापन केली होती. सय्यद सलाउद्दिन याच्याशी असलेली त्याची जवळीक मात्र कायम राहिली. मोहम्मद अहसान दर हा ५० वर्षे वयाचा असून त्याला १९९३ मध्ये अटक करण्यात आली होती.

कर्नाटक विधानसभेचे अधिवेशन उद्यापासून बेळगावात
बंगलोर, १४ जानेवारी/पी.टी.आय.

येत्या १६ जानेवारीपासून कर्नाटक विधानसभेचे अधिवेशन बेळगाव येथे होणार असून महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांना सीमा प्रश्न मांडण्याची ही सोन्याची संधी आहे असे मानले जात आहे. महाराष्ट्र एकीकरण समिती व उपमुख्यमंत्री छगन भुजबळ तसेच इतर काही नेत्यांनी सीमा प्रश्न सोडवण्यासाठी वेळोवेळी प्रयत्न केले आहेत. कर्नाटकातील मराठी भाषकांचे बाहुल्य असलेली ८५६ गावे महाराष्ट्राला द्यावीत अशी मागणी आहे, त्यात बेळगाव, कारवार, निपाणी यांचा समावेश आहे. गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीत एकीकरण समितीला एकही जागा मिळाली नव्हती. समितीने कर्नाटकातील मराठी भाषक तरुण पिढीशी संपर्क गमावला असल्याचे एक कारण त्यात आहे. छगन भुजबळ म्हणाले की, सीमा चळवळ कालबाह्य झालेली नाही. गेल्यावेळी बेळगाव पालिकेत एकीकरण समिती पराभूत झाली व विधानसभेतही त्यांना प्रतिनिधीत्व नाही म्हणून सीमावादाची चळवळ संपली असे नाही. याआधी २५ सप्टेंबर २००६ रोजी कर्नाटक विधानसभेचे पाच दिवसांचे अधिवेशन बेळगावात झाले होते.