Leading International Marathi News Daily
रविवार, ११ जानेवारी २००९

सफलता व्यापक होईल
दशमात गुरू, पंचमात शनी ही कर्म-धर्म यांच्या समन्वयातून सफलता देणारी ग्रहस्थिती. प्रसन्न बुध-शुक्र त्यात व्यापकता, आकर्षकता निर्माण करतील. संक्रांतीपासून मेष व्यक्ती कार्यप्रांतात वेगळ्या यशाने झगमगू लागतील. दूरदर्शन, वृत्तपत्रीय प्रसिद्धी त्यात समाविष्ट होऊ शकेल. नवा उद्योग उभा करू शकाल. दूरचे प्रवास होतील. मंगलकार्य ठरावे. जागेचा प्रश्न सुटेल. वाहनखरेदी संभवते. रवी-शनी नवपंचमयोग बढती-बदलीसाठी शुभकारक असतो. शनिवारचा चंद्र-नेपच्यून नवपंचमयोग उपासना सत्कारणी लावतो.
दिनांक : १३, १४, १५ शुभकाळ
महिलांना : अपेक्षित यशाचा टप्पा गाठता येईल.

समस्या वेगाने सुटतील
भाग्यात गुरू, राहू आणि सहकार्य करीत असलेले बुध, शुक्र, मकर संक्रमणापासून वृषभ व्यक्तींच्या समस्या वेगाने सुटू लागतील. त्यातूनच आर्थिक, व्यावसायिक, सामाजिक दडपणे कमी होऊ लागतील. तरीही अनिष्ट शनी-मंगळाशी सामना सुरू ठेवून व्यवहारातले महत्त्वाचे बुरूज सांभाळावे लागणार आहेत. त्यामुळे चुका टाळा. स्पर्धा नको. प्रकृतीची पथ्ये मोडू नका. गोड बोलून कार्यभाग साधणारे तंत्र यावेळी अधिक उपयुक्त ठरणार आहे.
दिनांक : १२, १३, १६, १७ शुभकाळ
महिलांना : प्रभाव प्रस्थापित होईल.

दुष्परिणाम तीव्र होतील
अष्टमातील गुरू-राहूचे दुष्परिणाम मंगळवारच्या रवी राश्यांतरापासून अधिक तीव्र होणार असल्याने मिथुन व्यक्तींनी महत्त्वाच्या आघाडय़ांवर बारकाईने लक्ष ठेवावे. अशा ग्रहकाळात संयम आणि सत्य हीच अस्त्रे प्रपंचापासून प्रतिष्ठेपर्यंतच्या सर्व वर्तुळांमध्ये उपयुक्त ठरतात. त्यात शनी, मंगळाच्या सहकार्याने व्यापार, राजकारण सांभाळता येणार आहे. दुसऱ्यांवर विश्वासून अपूर्ण माहितीवर निर्णय घेऊन कृती करू नका. तसेच वादग्रस्त प्रसंगावर भाष्य करू नका. प्रवास होतील. चौकशी करून मंगलकार्य निश्चित करायला हरकत नाही.
दिनांक : १२ ते १५ शुभकाळ.
महिलांना : घाईगर्दी नको. संधी निसटायला नको अशा बेताने कृती करा.

प्रकरणे मार्गी लागतील
साडेसातीच्या कुरबुरी सुरूच राहणार आहेत. परंतु अविश्रांत परिश्रम, दूरदर्शी निर्णय, कृती यांना गुरूचे आशीर्वाद मिळतील. रवी राश्यांतरामुळे प्रतिष्ठितांची साथ मिळेल. यातून कर्क व्यक्तींना यश सोपे होईल. प्रपंच, प्राप्ती, प्रतिष्ठा यासंबंधातील प्रकरणे मार्गी लावता येतील. चळवळीमधून समाजाला न्याय मिळवून देता येईल. अचूक अंदाज व्यापारात पैसा देतील. मारुतीची उपासना-आराधना मन:शांतीची ठरणार आहे. नोकरीचे प्रश्न सुटतील. भागीदारीतल्या वादावर मार्ग सापडतील. निर्धास्त असा.
दिनांक : १४ ते १७ शुभकाळ.
महिलांना : अवघड जबाबदाऱ्या कष्टानेच पार पाडाव्या लागतील.

नाराजी तीव्र होईल
गुरू, राहूची नाराजी मंगळवारच्या रवी राश्यांतरापासून तीव्र होत राहील. त्यामध्ये छोटी-मोठी प्रकरणे अडकतील. सिंह व्यक्तींची काही व्यवहारांत त्यामुळे कोंडी होईल. साडेसाती असल्याने धोका स्वीकारता येणार नाही. ‘अशुभस्य कालहरणम्’ हाच मंत्र सिंह व्यक्तींना उपयुक्त ठरणार आहे. पंचमातील मंगळ इभ्रतीची शक्ती कमी होऊ देणार नाही. प्रकृती सांभाळा. शत्रूंवर लक्ष ठेवा. शासकीय प्रकरणात सतर्क राहणे आवश्यक राहील. पूर्ण माहिती मिळेपर्यंत आश्वासन आणि लिखापढी कटाक्षाने टाळा.
दिनांक : १४ ते १७ शुभकाळ.
महिलांना : घोटाळे होतील असं काही करू नका. त्यापेक्षा स्वस्थ बसा.

कोडी उलगडू लागतील
पंचमात गुरू, राहू. बुधवारी सकाळी त्यात रवीचा प्रवेश होईल आणि मग व्यवहाराची कोडी उलगडू लागतील. त्यातून निर्णय घेणे, कृती करणे, यश मिळवणे या प्रक्रिया सोप्या होतील. साडेसाती आहे. मंगळ चतुर्थात आहे. त्यामुळे शत्रू आणि समस्या याकडे सफलता पूर्ण होईपर्यंत दुर्लक्ष करताच येणार नाही. त्यात गुप्तता हा केंद्रबिंदू करावा लागणार आहे. परिचितांचे सहकार्य मिळेल. धंदा पैसा देईल. नोकरीत अधिकार मिळतील. प्रवास कराल. साहित्यविषयाला प्रतिसाद मिळेल. अवास्तव साहस नको.
दिनांक : १२, १३, १६, १७ शुभकाळ.
महिलांना : प्रयत्नाने कार्यभाग साधता येईल. प्रपंच प्रसन्न कराल.

उपक्रम मजबूत करा
गुरू, राहूची खडतरता, त्यात बुधवारी सकाळपासून रवी राश्यांतरातील तक्रारी सुरू होतील. त्यामुळे विचारांत संशय, कृतीस विलंब आणि यश अवघड असे प्रकार नजीकच्या काळात घडू लागतील. पंचमातील शुक्र निराश होऊ देणार नाही. पराक्रमी मंगळ प्रयत्नांत अडचणी येऊ देत नाही आणि लाभातील शनी जिद्द कमी करीत नाही. याचमुळे शनिवारच्या चंद्र-नेपच्यून नवपंचम योगापर्यंत विचित्र प्रकारांपासून प्रतिष्ठेचा बचाव करणाऱ्या उपक्रमांना मजबूत करता येईल. भक्तिमार्ग त्यात महत्त्वाचा ठरेल.
दिनांक : ११ ते १५ शुभकाळ.
महिलांना : शुभवार्ता समजतील. सांस्कृतिक कार्यात यश. प्रवास कराल.

प्रवासाला वेग येईल
पराक्रमी गुरू, राहू, दशमात शनी. मकर संक्रांतीपासून प्रयत्न व यशाच्या आकर्षक समन्वयातून वृश्चिक व्यक्तींचा प्रवास वेगवान होत राहील. सामाजिक कार्ये, सांस्कृतिक कार्यक्रम, संशोधनाचे विषय प्रवास आकर्षक करणार आहे. शनिवारच्या चंद्र-नेपच्यून नवपंचम योगाच्या आसपास उपासना- आराधना नवी दृष्टी देणारी ठरू शकेल. प्रसन्न शुक्र प्रपंचातील समस्या सोडवील.. आर्थिक दडपण दूर करील. बुध-गुरू सहयोगात व्यापार भरभराटीला आणता येतो.
दिनांक : १२ ते १६ हा काळ त्यासाठी शुभ.
महिलांना : श्रेष्ठत्व सिद्ध करणारी सफलता आपणास मिळणार आहे.

मार्ग निर्वेध होतील
गुरूची कृपा, शनीचे सहकार्य, मंगळाची अनुकूलता, शुक्राचा उत्साह.. ग्रहांची अशी बैठक राशिकुंडलीत फार वर्षांनी जमलेली आहे. यात धनू व्यक्तींचे कल्याणमार्ग निर्वेध करणाऱ्या अनेक ठरावांचा समावेश होऊ शकेल. रविवारच्या रवी-शनी नवपंचम योगापासून त्याच्या प्रत्ययास प्रारंभ होईल. त्यात अधिकार, अर्थप्राप्ती, बौद्धिक प्रांत, कलाविष्कार यांचा समावेश होईल. व्यापारपेठेतही प्रभाव वाढेल. शनिवारचा चंद्र-नेपच्यून नवपंचमयोग प्रार्थना सत्कारणी लावील.
दिनांक : १४ ते १७ शुभकाळ.
महिलांना : निर्धाराने पुढे चला, यश मिळेल.

धोका स्वीकारू नका
राशिस्थानी गुरू, राहू, त्यात संक्रांतीला सूर्याचे आगमन होईल. बुध, शुक्र खूश आहेत. मकर व्यक्तींच्या समस्या सुटत राहतील. त्यातून पुढचा प्रवास सुरू करता येईल. त्यामध्ये उत्साहित प्रतिसाद मिळणार आहे. तरीही शनी, मंगळाचा संघटित विरोध असेपर्यंत कसलाही धोका स्वीकारता येणार नाही. आणि सहकारी, अधिकारी, गिऱ्हाईक यांनाही दुखवू नका. प्रकृतीची पथ्ये सांभाळा. परमेश्वरी चिंतानातून आनंद मिळणार आहे.
दिनांक : १२, १३, १६, १७ शुभकाळ.
महिलांना : परिचित आणि स्पर्धा यांत सावध राहून यश मिळवावं लागेल.

उलाढाली सुरू ठेवा
व्ययस्थानातील गुरू-राहूचे अनिष्ट परिणाम बुधवारी सकाळी सूर्य राश्यांतर होताच कुंभ व्यक्तींच्या व्यवहारात प्रकर्षांने प्रचीतीस येत राहतील. नवे प्रस्ताव, अभिनव उपक्रम, अपरिचितांशी व्यवहार असले प्रकार टाळा. आणि शनी-मंगळाचं मिळणारं सहकार्य नियमित उलाढाली सुरू ठेवून प्रतिष्ठा सांभाळण्यात उपयोगात आणा. त्याचा लाभ व्यापारपेठ, राजकारण, कलाप्रांत यामध्ये मिळवता येईल. शनिवारच्या चंद्र-नेपच्यून नवपंचम योगापर्यंत शोधकार्ये सफलतेच्या मार्गावर आणता येतील. मारुतीची उपासना-आराधना मन:शांतीची ठरणार आहे.
दिनांक : १३, १४, १५ शुभकाळ.
महिलांना : झेपतील अशाच उपक्रमांत सहभागी व्हावे.

चिंता दूर होतील
लाभात गुरू, राहू, दशमात रवि-मंगळ. नवनव्या क्षेत्रांत मीन व्यक्ती प्रभाव निर्माण करतील. शुक्रवारच्या रवि-हर्षल शुभयोगाच्या आसपास प्रयत्न-कृतीच्या समन्वयातून कर्तृत्व उजळून काढणारी सफलता मिळेल. त्यात व्यापारपेठ, राजकारण, साहित्य, शिक्षण, क्रीडा प्रांत, विज्ञानशोध यांचा समावेश होऊ शकेल. षष्ठातील शनीमुळे आरोग्य आणि शत्रूंनी सफल संधींना रोखू नये यासाठी बंदोबस्त करणे आवश्यक आहे. शनिवारच्या चंद्र-शुक्र नवपंचम योगामुळे चिंता दूर होतील. यश निश्चित होईल.
दिनांक : ४ ते ७ शुभ काळ.
महिलांना : शुभकार्ये ठरतील. प्रवास होतील.