Leading International Marathi News Daily                                  शुक्रवार, १६ जानेवारी २००९
व्यापार - उद्योग

शहीदांबाबत कृतज्ञतेची सारस्वत बँकेची आगळी वेगळी कृती -जयंत पाटील
व्यापार प्रतिनिधी: आपत्कालीन परिस्थिती येते तेव्हा सुरुवातीला मदतीचा ओघ सुरू होतो, पण काही काळ जाताच साऱ्यांना त्याचा विसर पडतो. अशावेळी कृतीपूर्वक सहानुभूती व्यक्त करण्याची आगळीवेगळी कृती सारस्वत बँकेने केली, अशा अभिनंदनपर शब्दात राज्याचे गृहमंत्री जयंत पाटील यांनी सारस्वत बँकेबाबत कृतज्ञता व्यक्त केली. मुंबईवरील दहशतवाद्यांच्या हल्ल्यात शहीद पोलिसांपैकी पाच जणांच्या कुटुंबियांना सारस्वत बँकेत नोकरी देण्याची योजना प्रत्यक्षात आणताना, पोलीस महासंचालनालयात झालेल्या कार्यक्रमात जयंत पाटील यांच्या हस्ते लाभार्थीना नोकरीचे पत्रही सोपविण्यात आले. या कार्यक्रमाला सारस्वत बँकेचे अध्यक्ष एकनाथ ठाकूर, उपाध्यक्ष किशोर रांगणेकर यांच्यासह बँकेचे ज्येष्ठ पदाधिकारी त्याचप्रमाणे राज्य गुप्तवार्ता विभागाचे प्रमुख डी. शिवानंदन व अन्य पोलीस अधिकारी उपस्थित होते. अपुऱ्या साधनसामग्रीसह दहशतवाद्यांना सामोरे जात प्राणाची आहुती देणाऱ्या शहीद पोलिसांच्या कृतीस तोड नाही आणि त्यांचे शौर्य काळात ओघात कायम टिकणारे आहे, अशा शब्दात ठाकूर शहीदांना अभिवादन केले. शहीदांसाठी फूल ना फुलाची पाकळी या नात्याने काही करण्याचा विचार सुरू असताना सारस्वत बँकेत नोकरी देण्याचा निर्णय आपण घेतल्याचे त्यांनी सांगितले. हल्ल्यात शहीद झालेल्या १८ पोलिसांच्या वारसांना नोकरी देण्यास सारस्वत बँक कटिबद्ध आहे, असे उपाध्यक्ष रांगणेकर यांनी स्पष्ट केले. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक तुकाराम ओंबळे यांची विवाहित मुलगी पवित्रा चिकणे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब भोसले यांचा मुलगा सचिन, पोलीस शिपाई अरुण चित्ते यांची पत्नी मनिषा आणि पोलीस शिपाई अंबादास पवार यांची पत्नी कल्पना यांना सारस्वत बँकेत कार्यालयीन सहाय्यक म्हणून सामावून घेण्यात आले आहे. पोलीस शिपाई (रेल्वे) मुरलीधर चौधरी यांची मुली प्रियांकाला बँकेत लिपिक पदावर घेण्यात आले आहे

आयएमटेक्स २००९ प्रदर्शन; ६०० कोटींच्या उलाढालीची अपेक्षा
व्यापार प्रतिनिधी: आयएमटेक्स आणि टूलटेक २००७ मधील तब्बल सहा हजार दशलक्ष रुपयांची व्यावसायिक कंत्राटे आणि ५० हजार दशलक्ष रुपयांच्या उलाढालीमुळे लाभलेल्या उत्तम प्रतिसादानंतर आता आयएमटेक्स २००९च्या आयोजनातून नवे शिखर गाठण्यासाठी इंडियन मशीन टूल्स मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन (आयएमटीएमए) सज्ज झाली आहे. मशीन टूल्स आणि उत्पादनक्षेत्रातील सर्व समस्यांचे उत्तर देणारे आयएमटेक्स-२००९ हे दक्षिण आणि दक्षिण-पूर्व आशियातील एकमेव भव्य प्रदर्शन या वेळी २२ ते २८ जानेवारी २००९ दरम्यान भारताच्या मशीन टूल्स इंडस्ट्रीचे कोठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बंगलोर शहरात भरविण्यात येणार आहे.

व्यापार संक्षिप्त
‘बायर’तर्फे वैद्यक व्यावसायिकांसाठी मॉनिटरिंग सिस्टीम

व्यापार प्रतिनिधी : ‘बायर डायबेटिस केअर’ने त्याच्या नावीन्यपूर्ण अशा ‘ए१सीनाऊ प्लस’ या पोर्टेबल हातात धरून कार्य करणाऱ्या मीटरवर आधारित अशा वैद्यकीय व्यावसायिकांसाठी ग्लायसेटेड हिमोग्लोबिनकरता असलेले यंत्र बाजारपेठेत आणले आहे. या यंत्रामुळे ग्लायसेटेड हिमोग्लोबिन या दीर्घकालीन शर्करेवर ताबा मिळवणाऱ्या महत्त्वपूर्ण निष्कर्षांपर्यंत पोहोचता येणार आहे. पेजरच्या आकाराचे ‘ए१सीनाऊ प्लस’ या यंत्रामध्ये एकदाच वापरता येणारे आणि नष्ट करता येऊ शकणारे असे टेस्ट कार्टिजेस असून त्यामुळे आता आरोग्य व्यावसायिकांना ‘ए१सी’ची चाचणी करणे अतिशय सोपे होणार आहे. यामुळे आता वैद्यकीय क्षेत्रातील मान्यताप्राप्त अशा घटकांची चाचणी करणे सोपे जाऊन शर्करेवर नियंत्रण मिळवणे आणखी सोपे जाईल. या ए१सीनाऊ प्लसमुळे आता व्यावसायिकांना त्यांच्या कार्यालयातच ए१सीचे निष्कर्ष घेणे सोपे होईल व त्याचबरोबर अनेक वेळा रक्त देण्याची गरज राहणार नाही. इतर चाचण्यांमध्ये याकरता सतत रक्त घेऊन वेळखाऊ प्रक्रियांना सामोरे जावे लागते ते येथे टाळता येऊ शकेल.

‘सोमा’ला ‘फ्रेट कॉरिडॉर’ प्रकल्पातील प्रमुख कंत्राट
व्यापार प्रतिनिधी: सोमा एंटरप्रायझेस लिमिटेड या इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (डीएफसीसीआयएल) तर्फे सुरू असलेल्या वेस्टर्न फ्रेट कॉरिडॉर प्रकल्पाअंतर्गत ५४ महत्त्वपूर्ण पूल बांधण्याचे कंत्राट मिळविण्याची घोषणा केली आहे. ६०५.१५ कोटी रुपयांच्या या प्रकल्पाअंतर्गत वैतरणा आणि उतरण या दरम्यान असणाऱ्या अंदाजे २०० कि.मी.चे काम त्यांना मिळाले असून हा रस्ता महाराष्ट्रातील वसईपासून ते गुजरातमधील भरूच या टप्प्यातील आहे. ‘सोमा’ने या आधीच या कार्याला सुरुवात केली असून ते काम ३० महिन्यांच्या कालावधीत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. डीएफसीसीआयएल ही एक रेल्वे मंत्रालयाने तयार केलेली विशेष संस्था असून या संस्थेतर्फे डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर प्रकल्पांच्या योजना आणि विकास, आर्थिक तरतूद, बांधकाम देखभाल आणि कार्य पाहिले जाते.

‘युनिटी इन्फ्रोप्रोजेक्ट्स’ला फोर्ब्सचे सर्वोत्तम मानांकन
व्यापार प्रतिनिधी: आघाडीची इंजिनीयरिंग आणि बांधकाम व्यवसायातील कंपनी युनिटी इन्फ्राप्रोजेक्ट्स लिमिटेडने फोर्ब्स एशियाकडून सर्वोत्तम मानांकन पटकावले आहे. एक अब्ज डॉलरखालील उलाढाल असलेल्या आशिया खंडातील लघू व मध्यम आकाराच्या अव्वल २०० कंपन्यांमध्ये सर्वोत्तमतेचा बहुमान युनिटीने मिळविला आहे. या भारतीय कंपनीच्या गुणवत्ता आणि क्षमता यावर विशेष शिक्कामोर्तब करणारे गौरवोद्गार फोर्ब्सचे उपाध्यक्ष ख्रिस्तोफर फोर्ब्स यांनी काढले. त्यांच्याच हस्ते हा पुरस्कार युनिटी इन्फ्राप्रोजेक्ट्सचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक किशोर अवर्सेकर आणि उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अभिजीत अवर्सेकर यांनी स्वीकारला.

‘अपाची आरटीआर १६०’ आता रियर डिस्क ब्रेकसह
व्यापार प्रतिनिधी: टीव्हीएस मोटर कंपनीने मोटारसायकलीमधील आपल्या महत्त्वाच्या मोटारसायकल विभागात ‘अपाची आरटीआर १६० आरडी’ दाखल करत असल्याची घोषणा केली आहे. ‘अपाची आरटीआर १६० आरडी’ आता २०० मिमी रियर पेटल डिस्क ब्रेकसह उपलब्ध होणार आहे. दाखल झाल्यापासून अपाची आरटीआरने आपल्या सर्वोत्तम पॉवर आणि कामगिरीच्या माध्यमातून भरघोस यश मिळविले आहे. रेसिंग थ्रॉटल रिस्पॉन्स वर उल्लेखीत कसोटय़ांवर एक मैलाचा दगड असल्यानेच हे शक्य झाले आहे. २०० मिमी पेटल रियर डिस्क ब्रेक दाखल करून ‘अपाची आरटीआर’ने आपल्या कामगिरीमध्ये एक नवीन पैलू जोडला असून त्यातून अतुलनीय अशी ब्रेक कामगिरी ग्राहकांना दिली जाणार आहे.