Leading International Marathi News Daily                                  शुक्रवार, १६ जानेवारी २००९

स्टार-स्क्रीन पुरस्कार सोहळ्यात मराठी चित्रपटांमध्ये सवरेत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार ‘मेड इन चायना’ या पुरस्काराला मिळाला. सवरेत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार राजेश देशपांडे (धुडगूस) आणि अरूण नलावडे (बाई माणूस) यांना देण्यात आला तर सवरेत्कृष्ट अभिनेत्याच्या पुरस्काराने मकरंद अनासपुरे (दे धक्का) आणि सवरेत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्काराने शिल्पा नवलकरला (बाई माणूस) गौरविण्यात आले. या चित्रपटांची झलक वृत्तान्तच्या वाचकांसाठी..
मेड इन चायना
चित्रपटाच्या नावावर जाऊ नका. हा चित्रपट महाराष्ट्रातच घडत असून त्याचा विषय ‘सेझ’ हा आहे. या पहिल्याच दिग्दर्शकीय प्रयत्नाविषयी सांगताना संतोष देशपांडे यांनी सागितले की, ‘स्पेशल इकॉनॉमिक झोन’ ही मूळ संकल्पना चीनमधील आहे. ‘मेड इन चायना’ चित्रपटाच्या कथेविषयी सांगताना ते म्हणाले की, गावची जमीन ‘सेझ’साठी आरक्षित करण्याचा प्रस्ताव असतो. या प्रस्तावामुळे त्या गावातील शेतकऱ्यांमध्ये रोष पसरतो. बऱ्यापैकी उत्पन्न असणारे आणि सामान्य शेतकरी या प्रस्तावाविरोधात लढा द्यायचे ठरवितात. दरम्यान या चित्रपटात एक खूनही होतो, तोही चिनी बनावटीच्या रिव्हॉल्वरने होतो. त्याचप्रमाणे या चित्रपटातील एक पात्र चिनी तत्त्वज्ञानाच्या विचारांचे असते. चिनी वस्तू, फेंगशुई इत्यादी सर्व गोष्टींना त्याला भुरळ घातलेली असते. सध्याच्या परिस्थितीवर भाष्य करत दिग्दर्शकाने या चित्रपटात एक सामाजिक-राजकीय थरारनाटय़ दाखविले आहे. मार्च महिन्यात हा चित्रपट महाराष्ट्रभर प्रदर्शित करणार असल्याचे संतोष कोल्हे यांनी ‘वृत्तान्त’ला सांगितले.
बाई माणूस
कविता महाजनलिखित यांचे ‘ब्र’ या पुस्तक प्रचंड गाजले. ‘ब्र’ या कादंबरीवर आधारितच ‘बाई माणूस’ हा चित्रपट आहे. अरूण नलावडे यांचा हा पहिलाच दिग्दर्शकीय प्रयत्न. एकीकडे स्त्रियांना अनेक क्षेत्रात आरक्षण देण्यात आले आहे तर दुसरीकडे दरवेळी पुरुषी अहंकाराने तिचे खच्चीकरणही करण्याचा प्रयत्न होत आहे. ‘बाई माणूस’या चित्रपटात एका स्त्रीची घुसमट दाखविण्यात आली आहे. रुबाबदारपणावर भाळून लग्न केल्यानंतर पती त्या पत्नीच्या व्यक्तिस्वातंत्र्यावरच गदा आणतो आणि त्यामुळे त्यांच्यात सतत खटके उडू लागतात. याचे पर्यवसान त्यांच्या घटस्फोटात होते. यामुळे खचलेली ही स्त्री एका सेवाभावी संस्थेत काम करू लागते. कामाच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या गावा-खेडय़ात हिंडताना तिला ठिकठिकाणी पुरुषी अहंकाराची जाणीव पदोपदी होत राहते. स्त्रीला वास्तव आयुष्यात कराव्या लागणाऱ्या भावनिक आणि व्यावहारिक संघर्षांचे चित्रण ‘बाई माणूस’मध्ये प्रभावीपणे दाखविण्यात आले आहे. शिल्पा नवलकरच्या उत्तम अभिनयामुळे या चित्रपटाने एक वेगळी उंची गाठली आहे. हा चित्रपट एप्रिलच्या सुमारास महाराष्ट्रात प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.
धुडगूस
यावर्षी स्क्रीन पुरस्कारांमध्ये गौरविण्यात आलेल्या चित्रपटापैंकी तीन चित्रपट नवोदित दिग्दर्शकांचे आहेत. ‘धुडगूस’ हाही राजेश देशपांडे यांचा पहिलाच चित्रपट. लग्नानंतर नववराला सीमेवरून बोलावणे येते आणि दुर्दैवाने त्याचा मृत्यू होतो. या घटनेनंतर नव्या नवरीला सासरच्या आणि माहेरच्या माणसांकडून नाकारले जाते. अशातच तिला शासनाकडून २५ लाख रुपयांची मदत जाहीर होते आणि माहेरची व सासरची माणसे या मुलीला आपापल्या बाजूकडे खेचण्याचा प्रयत्न करतात. माणसांचा स्वार्थी स्वभाव, पैशाच्या लोभापायी माणूस किती नीच पातळी गाठू शकतो याचे चित्रण ‘धुडगूस’ चित्रपटात दाखविण्यात आले आहे. या मल्टिस्टारर चित्रपटाला महाराष्ट्रभर चांगला प्रतिसाद मिळाला. अलीकडेच पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपटमहोत्सवातही ‘वेगळ्या वाटेवरचा मराठी चित्रपट’ या विभागात ‘धुडगूस’ दाखविण्यात आला आणि तेथील प्रेक्षकांनीही या चित्रपटाची प्रशंसा केली.
दे धक्का
गेल्या वर्षांत बॉक्स ऑफिसवर हॉऊसफुल्लचे बोर्ड लावणारा मराठी चित्रपट. मकरंद अनासपुरेने या चित्रपटात एका मेकॅनिकची भूमिका केली आहे. महत्त्वाकांक्षी मेकॅनिकच्या भूमिकेत खास ‘अनासपुरे टच’ पाहायला मिळतो. या चित्रपटातील प्रत्येक पात्राचे काही ना काही स्वभाववैशिष्टय़ आहे. मुलीने रिअ‍ॅलिटी शोमध्ये सहभागी व्हावे म्हणून सर्व कुटुंबच गावाकडून मुंबईला यायला निघते आणि त्या दरम्यान घडणाऱ्या घडामोडींनी भरलेला ‘दे धक्का’ प्रेक्षकांनाही सुखद धक्का देऊन गेला. मकरंद अनासपुरेची शिवाजी साटम आणि सिद्धार्थ जाधव यांच्यासोबतची केमिस्ट्रीही या चित्रपटात चांगलीच रंगली आहे. अचूक टायमिंग, भाषेचा लहेजा यांचा वापर करत मकरंद अनासपुरेने साकारलेला ‘दे धक्का’मधील मेकॅनिक प्रेक्षकांच्या मनावर छाप ठेवून गेला.
प्रतिनिधी

महागायिका!
‘तू शास्त्रीय संगीत शिक’ असा सल्ला मला प्रत्येकजण देऊ लागला. मात्र गुरूंची गाणे शिकविण्याची फी पाहिल्यानंतर छातीत धडकीच भरायची.’
‘वैशाली अपने पती से बहुत प्यार करती है.. वो एक बहुत ही अच्छी लडकी है.. ‘सारेगमप’का अंतिम विजेता उसे ही होना चाहिये..'!, असे वैशाली माडेबद्दल जेव्हा हिमेश रेशमिया बेंबीच्या देठापासून जोरजोरात किंचाळून सांगत असतो तेव्हा समोर बसलेल्या प्रत्येक व्यक्तीला चीड येत असते. काय हा हिमेश वैशालीबद्दल सतत सांगत असतो.. ही स्पर्धा गाण्यांची आहे की तुमच्या व्यक्तिमत्वाची.. हिमेशचा हा ‘स्टंट’ तर नाही ना.. असे असंख्य प्रश्न अनेकजण एकमेकांना विचारत असतात. खारतळे, तालुका भातकुली, जिल्हा अमरावती या शे-पाचशे लोकवस्तीच्या एका छोटय़ाशा खेडय़ातून या मायानगरीत आलेल्या वैशालीला जेव्हा प्रत्यक्ष भेटण्याचा योग येतो आणि तिच्या आतापर्यंतच्या आयुष्याचे जेव्हा एकेक कंगोरे समोर येतात तेव्हा मात्र अक्षरश: आपण हादरून जातो.

चॉइस इज युवर्स; अक्षयची अ‍ॅक्शन, दीपिकाचा डबल रोल.. अजून काय पाहिजे
‘चांदनी चौक..’ चा प्रोमो बघून वाटेल की, ही अक्षयकुमारचे आत्मचरित्र आहे की काय, पण या चित्रपटात अक्षयकुमारने एका खानसाम्याची भूमिका केली आहे. एवढेच काय ते त्याच्या आयुष्याशी साम्य. बाकी सर्वच काल्पनिक कथाच आहे. एका साध्या खानसाम्याला मार्शल आर्ट तज्ज्ञ समजून चीनमध्ये घेऊन जातात आणि मग या चित्रपटाची कथा घडते. मोठय़ा पडद्यावर प्रथम कुंग-फू ही कला सादर करणाऱ्या सर जॉर्डन यांनी या चित्रपटात काम केले आहे. अक्षयच्या म्हणण्याप्रमाणे प्रथमच एका भारतीय चित्रपटाचे चित्रीकरण चीनच्या भींतीवर पार पडले आहे. अक्षय कुमार एवढे मोठे नाव असल्याने दिग्दर्शकाचे नाव चर्चेत नाही. ‘कल हो ना हो’ आणि ‘सलाम ए इश्क’ हे दोन चित्रपट नावावर असणाऱ्या निखिल अडवाणीने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. यापैकी पहिला चित्रपट प्रेक्षकांनी उचलला असला तरी परिक्षकांनी त्याला झोडपले आणि दुसऱ्याला प्रेक्षक आणि समीक्षक या दोघांनीही सपशेल नाकारले.

एक अविस्मरणीय ‘शंकरजयकिशन’ संगीत रजनी
११ जानेवारी रोजी यशवंत नाटय़मंदिरात झालेली शंकरजयकिशन संगीत रजनी ही गग संगीत रसिकांना अविस्मरणीय पर्वणीच ठरली. शंकरजयकिशनजींच्या १९४८ ते ७० या कालखंडातील अवीट गोडीच्या संगीत रचना सादर करून कलाकारांनी रसिकांची वाहवा मिळविली. ‘बरसात’मधल्या ‘जिया बेकरार है’ या गीताने सुरुवात झालेल्या मृदुलाच्या गाण्यासह कार्यक्रमात ‘जंगली’, ‘अनाडी’, ‘यहुदी’, ‘बरसात’, ‘दाग’ अशा एकाहून एक प्रसिद्ध गगातील अप्रतिम गीते सादर होत असताना रसिकांना त्यांच्या कॉलेजच्या दिवसांत हा कार्यक्रम घेऊन गेला आणि या आठवणींचा खजिना गवसल्याचा आनंद त्यांना मिळाला.श्रीकांत नारायण यांनी ‘एहेसान तेरा होगा’, ‘आरजू’तील ‘छलके तेरी आँखोंसे’, ‘ब्रह्मचारी’तील ‘दिल के झरोकों मे’, ‘इव्हिनिंग इन पॅरिस’मधील ‘अकेले अकेले’ अशी लाजवाब गीते नेहमीच्या सहजतेने आणि तितक्याच ताकदीने सादर केली. मृदुला दाढे जोशीचे, इतर अनेक गीतांबरोबर बहार आणत ‘पान खाये सैंया हमारो’ खास नौटंकी पद्धतीचे गीत विशेष वाहवा मिळवून गेले आणि वन्स मोअर घेतला.

‘रोडिज’:‘अंदर की बात’
अलीकडेच अक्षय कुमारने ‘एमटीव्ही रोडिज हेल डाऊन अंडर’ला हिरवा कंदिल दाखविला. यंदाचे रोडिज एवढे कठीण असणार आहे की, गेल्या वर्षीचे रोडिज त्यापुढे अगदीच लिंबू-टिंबू वाटेल, अशी प्रतिक्रिया खुद्द एमटीव्हीचे क्रिएटिव्ह हेड आशीष पाटील यांनी व्यक्त केली. तरुणाईच्या मनावर कब्जा केलेल्या या कार्यक्रमाच्या पडद्यामागे अनेक गमतीदार गोष्टी घडल्या होत्या. ‘रोडिज’ या नावापासून ते रघुने परिक्षकाच्या खुर्चीत बसण्यापर्यंत प्रत्येक घटकामागे काही ना काही प्रसंग घडलेला आहे. ‘रोडिज’च्या ‘अंदर की बात’ खास वृत्तान्तच्या वाचकांसाठी..
१ . या कार्यक्रमाचे सुरुवातीचे नाव ‘रोडिज’ नसून ‘सात साथ’ होते. या कार्यक्रमाचे नाव काय असावे यासाठी एमटीव्हीच्या कार्यालयात अंतर्गत स्पर्धा घेण्यात आली होती. त्या स्पर्धेतील विजेते नाव होते ‘रोड राज’. या कार्यक्रमासाठी जुळवाजुळव करताना एमटीव्हीची टीम ‘रोडिज’ असेच नाव घेत असे. सरतेशेवटी हेच नाव नक्की करण्यात आले.
२. रघु राम हा ‘रोडिज १’ साठी कॅमेरामन आणि संकलक (एडिटर) होता!!! रोडिजच्या दुसऱ्या पर्वात तो कॅमेऱ्यासमोर आला. त्यासाठी अपरिहार्य असेच कारण होते. त्यांच्या सेटवर रघुशिवाय दुसऱ्या कोणालाही हिंदी बोलता येत नव्हते.
.‘रोडिज १’ ही स्पर्धा नव्हतीच आणि रणविजय हा ‘रोडिज १’ चा विजेता नव्हताच. केवळ त्याच्या लोकप्रियतेमुळे सर्वाचा तसा समज झाला होता.
. ‘रोडिज १’ मधील रोडिज आठवतात? या कार्यक्रमामुळे त्यांची मैत्री एवढी घट्ट झाली होती की, कार्यक्रम संपल्यानंतर ते सर्व मुंबईत एकत्र आले होते आणि चक्क रघुच्या घरी वास्तव्यास होते. त्यावेळी रघु जवळजवळ घराबाहेरच होता कारण टोनी नेहमी रघुची बॉक्सर घालून घरभर फिरत असे.
५. रोडिजच्या पहिल्या पर्वानंतर दोन महिन्यांनी रणविजय भारतीय सैन्यात भरती होणार होता. पण रणविजयने मनोरंजन क्षेत्रात प्रयत्न करावा अशी कल्पना त्यावेळी राजीवने (रघुचा जुळा भाऊ) मांडली होती. या घटनेनंतर बरोब्बर पाच वर्षांनी ‘हेल डाऊन अंडर’मध्ये राजीवने सहभागी व्हावे हे रणविजयच्या डोक्यातून आलेले पिल्लू होते.
. त्यांच्या सेटवर बरेचदा ‘रोडिज स्टाईल’ स्पर्धा होत असतात. त्यात पंजा लढविण्याच्या स्पर्धेत मात्र रणविजयच अजूनही बाजी मारतो.
.रघुने २००१ साली एमटीव्हीमध्ये नोकरी मिळण्यासाठी अर्ज केला होता पण त्यावेळी तो नकारण्यात आला होता.
. छायादिग्दर्शक अक्षय राजपूत दिल्लीहून मुंबईला आला होता, त्यावेळी तो रघु आणि राजीवच्या घरी राहत होता. काही दिवसांनी रघु बेकार झाल्यावर अक्षयनेच रघुला आसरा दिला होता.
.आतापर्यंत केवळ रोडिज दिव्या (पर्व १)अशी एक स्पर्धक झाली, जिला निर्मात्यांनी स्पर्धेबाहेर काढले होते.
१०.‘रोडिज साँग’ची कल्पना ऑर्कूटवरून आली होती. एका कम्युनिटीवर काही तरुण त्यांचे स्वत:चे ‘रोडिज अँथम’ करण्याच्या प्रयत्नात होते. कोणतेही मानधन न घेता ‘अग्नि’ या बँडने हे गाणे स्वरबद्ध केले होते. रघुने हे गाणे लिहिले आणि ‘नेचर बाबा’ने चित्रीत केले. इतके कष्ट करून तयार केलेल्या या गाण्याच्या टेप्स ‘नेचरबाबा’ने कुठेतरी हरविल्या.
११.आठ देशांमध्ये रोडिजचे कॉपीराईट आहेत. भारतातून अनुकरण होऊन इतर देशात वापरला गेलेला रोडिज हा पहिलाच कार्यक्रम आहे. पाकिस्तानमधील एआरवाय नेटवर्कने याचे कॉपीराईट हक्क विकत घेतले आहेत.
प्रतिनिधी

‘भूमिका फिल्म फेस्टिव्हल’ फेब्रुवारीत
आय.सी.एल. कॉलेजच्या प्राचार्य डॉ. जयश्री डाऊ आणि बी. एम. एम. शाखेच्या प्रमुख डॉ. कमला राजीव यांच्या विश्वासाने आणि सहकार्याने या ‘भूमिका’ फिल्म फेस्टिव्हलला एक वेगळेच महत्त्व प्राप्त झाले आहे. यंदाच्या पाचव्या वर्षीही जल्लोषात विष्णूदास भावे नाटय़गृहात २, ३ आणि ४ फेब्रुवारीस पाहावयास मिळेल. मुंबईच्या बहुतेक महाविद्यालयांमध्ये अनेक फेस्टिव्हल्स होत असतात. फेस्टिव्हल म्हटलं की, कॉलेजमध्ये सर्वाचीच मजा असते, धमाल असते. परंतु नवी मुंबईत होणाऱ्या आय.सी.एल. मोतीलाल झुनझुनवाला महाविद्यालयाचा ‘भूमिका’ फेस्टीव्हल त्याहून खूपच आगळावेगळा असतो. सिनेमा म्हटलं की, सर्वाच्या मनात विचार येतो की, बिग बजेट फिल्मचे स्क्रिनिंग. परंतु भूमिका फिल्म फेस्टिव्हल हे मास मीडियाच्या विद्यार्थ्यांना एक व्यासपीठ आहे. आपले कौशल्य सर्वापुढे आणण्याची संधी यानिमित्ताने मास मीडियाच्या विद्यार्थ्यांना मिळते. महाविद्यालयीन स्तरावरील अनेक लघुपट, जाहिरातपट, माहितीपट, अॅनिमशनपट अशा सर्व प्रकारच्या चित्रपटांचे प्रदर्शन भूमिका फेस्टीव्हलमध्ये केले जाते. या सर्व चित्रपटांमधून प्रत्येकी तीन सवरेत्कृष्ट चित्रपट निवडून पारितोषिक देण्यात येईल, अशी माहिती आयोजकांनी दिली आहे.
भूमिका फिल्म फेस्टिव्हलला इतके महत्त्व प्राप्त झाले आहे की, आय.सी.एल.च्या बी.एम.एम. शाखेच्या विद्यार्थ्यांनी ओपन कॅटेगिरी सुरू केली आहे. यामध्ये बी. एम. एम. व्यतिरिक्त विद्यापीठातील अन्य शाखेच्या विद्यार्थ्यांनी बनविलेले चित्रपटही ‘भूमिका’ फेस्टीव्हलमध्ये पाठवता येतील. यावेळचे वैशिष्टय़ म्हणजे आतापर्यंत राष्ट्रीय पातळीवर असलेले भूमिका फेस्टीव्हल यंदापासून आंतरराष्ट्रीय स्तरावर भरविले जाणार आहे, अशी माहिती स्वप्नेश म्हात्रे यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे. या फेस्टीव्हलमध्ये आपले चित्रपट दाखविण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्वप्नेश म्हात्रे यांच्याशी मो. क्र. ९८२०८१८४८५ वर संपर्क साधावा. तसेच www.bhumika.tv अथवा bhumika.filmfestival@gmail.com या ई-मेलवरही संपर्क साधता येईल.
प्रतिनिधी