Leading International Marathi News Daily                                 शुक्रवार, १६ जानेवारी २००९

.. म्हणे सचिन, लारा ‘ग्रेट’ नाहीत
आयसीसीची सार्वकालीन ‘ग्रेट’ यादी वादाच्या भोवऱ्यात
नवी दिल्ली, १५ जानेवारी/पीटीआय

कसोटी क्रिकेटमधील शंभर सार्वकालीन महान फलंदाजांची यादी जाहीर करून आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने नव्या वादाला तोंड फोडले आहे. सचिन तेंडुलकर, ब्रायन लारा यांच्यासारख्या महान खेळाडूंना पहिल्या वीस खेळाडूंमध्येही स्थान न मिळाल्यामुळे ही यादी वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. सुनील गावसकरला देण्यात आलेले वीसावे स्थान हीच भारतीय चाहत्यांना दिलासा देणारी बाब आहे. आयसीसीने ही यादी खेळाडूंच्या महानतेचे परिमाण नाही असे जाहीर करून सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे. मणिंदर सिंगने ही यादी म्हणजे एक विनोद असल्याचे म्हटले आहे. कोत्या मनोवृत्तीच्या आयसीसी अधिकाऱ्यांनी अशी यादी जाहीर करण्याचे थांबवावे. १२ हजारावर कसोटी धावा काढणाऱ्या सचिन तेंडुलकरचे यादीत नाव आघाडीला नसावे याला काय म्हणावे असा सवालही मणिंदरने केला आहे.मात्र आयसीसीने यादीतील क्रमवारी त्या त्या खेळाडूंचे पूर्ण चित्र उभे करीत नाही, असेही म्हटले आहे. ही क्रमवारी कशी ठरविली याबाबत माहिती देताना आयसीसीने म्हटले आहे. सरासरी ७०० गुण कारकिर्दीत असणाऱ्या सर्वच खेळाडूंना वरचे स्थान मिळाले आहे. क्रिकेटरसिकांनी खेळाडूंच्या हंगामी शिखरस्थानापेक्षा संपूर्ण कारकिर्दीतील उंचीच्या मोजमापाबाबत समाधानी असावे, असेही आयसीसीने म्हटले आहे.

‘सत्यम’ घोटाळ्यात ‘इ-फ्रॉडस्’ची शक्यता?
नीरज पंडित
मुंबई, १५ जानेवारी

देशातील आजवरचा सर्वात मोठा कॉर्पोरेट घोटाळा म्हणून संबोधण्यात आलेला ‘सत्यम कॉम्प्युटर सव्‍‌र्हिसेस’च्या घोटाळ्यामागचे रहस्य नेमके काय आहे, याचा शोध घेण्याचा सर्वच स्तरावरून प्रयत्न होत आहे. त्याचवेळी या घोटाळ्याला ‘इ-फ्रॉडस्’च्या माध्यमातून चालना मिळाल्याचा संशय सायबर तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे. ‘सत्यम कॉम्प्युटर सव्‍‌र्हिसेस’च्या १९९४ ते २००४ या सार्वाधिक भरभराटीच्या काळात देशाभरात सायबर क्राइमच्या संदर्भात नोंदविण्यात आलेल्या एकूण तक्रारींपैकी ३५ टक्के तक्रारी आंध्र प्रदेश पोलिसांकडे नोंद झाल्या आहेत. या तक्रारींमध्ये मुख्यत: सरकारी वेबसाइट तसेच वित्तीय संस्थांच्या वेबसाइटमध्ये झालेल्या हॅकिंगच्या तक्रारींचा समावेश आहे.

‘रेडिरेकनर’मध्ये १० टक्के कपातीचा प्रस्ताव
मुख्यमंत्री लवकरच निर्णय घेणार

पुणे, १५ जानेवारी / खास प्रतिनिधी

मंदीच्या लाटेमुळे जमीन व सदनिका खरेदी-विक्रीच्या व्यवहारात मोठय़ा प्रमाणावर घट झाल्याने ‘रेडिरेकनर’मध्ये साधारणत: दहा टक्क्यांनी कपात करण्याचा प्रस्ताव नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने मुख्यमंत्र्यांना सादर केला आहे. या प्रस्तावावर येत्या पंधरवडय़ात निर्णय अपेक्षित असून त्यामुळे सदनिकांचे दर कमी होण्यास मदत होणार आहे. जागतिक मंदीचे परिणाम गेल्या सहा महिन्यांपासून जाणवू लागले आहेत. गेल्या तीन महिन्यांत तर अनेक उद्योगांना प्रत्यक्ष मंदीचे चटके बसले आहेत. याचा परिणाम बांधकाम क्षेत्रावर झाला आहे. जमिनीचे व्यवहार तसेच सदनिका खरेदी-विक्रीचे व्यवहार ठप्प झाले आहेत. सदनिकांची मागणी घटल्याने अनेक बांधकाम व्यावसायिकांनी सदनिकांचे दर कमी केले आहेत.

‘कर्नल’ वेंगसरकर यांची नवी ‘इनिंग्ज’?
लोकसभेसाठी राजकीय पक्षांकडून उमेदवारी ?

केदार दामले
मुंबई, १५ जानेवारी

भारतीय क्रिकेट संघाच्या निवड समितीचे माजी अध्यक्ष, शंभरहून अधिक कसोटी सामने खेळलेले विख्यात फलंदाज, क्रिकेटची पंढरी असलेल्या ‘लॉर्डस’ मैदानावर सलग तीन शतके ठोकून आगळावेगळा विक्रम करणारे ‘कर्नल’ म्हणजेच दिलीप वेंगसरकर हे आता नव्या मैदानात ‘स्टान्स’ घेण्याची शक्यता आहे. आगामी निवडणुकीसाठी वेंगसरकर यांना राज्यातील दोन प्रमुख राजकीय पक्षांकडून उमेदवारीबाबत विचारणा करण्यात आल्याने आता ‘कर्नल’ लोकसभेच्या मैदानात नवी ‘इनिंग्ज’ सुरू करणार का याविषयी औत्सुक्य आहे.

लोकसत्ताच्या ‘नोंदवही’ची नोंद घेत सहा रस्त्यांचे भूमिपूजन
शहादा, १५ जानेवारी / वार्ताहर

नंदुरबार जिल्ह्य़ाच्या अक्कलकुवा तालुक्यातील बामणी-डनेल या अतिदुर्गम भागातील गावांच्या दुरावस्थेचा सचित्र लेखाजोखा ‘लोकसत्ता’च्या ‘नोंदवहीतून..’ मांडला गेल्यानंतर दोन दशकाहून अधिककाळ निद्रिस्त राजकीय नेते खळबळून जागे झाले तर प्रशासकीय यंत्रणा अक्षरश: हादरली. त्यातूनच मग कधीकाळी मंजूर असलेल्या नऊ पैकी सहा रस्त्यांच्या कामाचे भूमीपूजनही अवघ्या दुसऱ्याच दिवशी झाले. भविष्यात या रस्त्यांमुळे नर्मदा काठावरील अतिदूर्गम भागातील उपेक्षित गावे जगाच्या संपर्कात आणि मुख्य प्रवाहात येण्याची आशा निर्माण झाली आहे. तथापि, पिंपरपाडा ते अलिविहीर रस्ता दुरुस्तीच्या मागणीवरून स्थानिक आदिवासींच्या रोषामुळे लोकप्रतिनिधींच्या ताफ्याला रस्त्यातच तब्बल दोन घेरावात अडकून पडावे लागले. लेखी आश्वासनानंतरच या सर्व मंडळीची सुटका होवू शकली व ते सर्व मोलगीकडे रवाना झाले.

कुत्रे वाचवा!
पामेला अँडरसनची पालिका आयुक्तांना गळ
मुंबई , १५ जानेवारी / प्रतिनिधी

हॉलिवूडची ‘बे वॉच’ फेम मादक फटाकडी पामेला अँडरसन उर्फ पॅम चक्क मुंबईत अवतरण्याची शक्यता असून तिची मोहीम असणार आहे ती मुंबईतील कुत्र्यांचे प्राण वाचविण्याची. कुत्र्यांना मारु नये, यासाठी ‘पॅम’ मुंबई पालिकेचे आयुक्त डॉ. जयराज फाटक यांची भेट घेणार असून या भेटीबाबत पालिकेच्या वर्तुळात औत्सुक्य निर्माण झाले आहे. मुंबई उच्च न्यायालयाने भटके कुत्रे मारण्याची पालिकेला परवानगी दिल्यानंतर आता या कुत्र्यांचे काय होणार या चिंतेने सध्या पॅमला झोप लागत नाही, अशी चर्चा आहे. त्यामुळे तिने थेट पालिका आयुक्त डॉ. जयराज फाटक यांनाच पत्र लिहून कुत्र्यांना मारू नका, अशी प्रेमळ विनंती केली आहे. ‘प्लेबॉय’ या आंतरराष्ट्रीय मासिकामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या पॅमने आयुक्तांना भेटण्याची इच्छाही व्यक्त केली आहे. मात्र जगभरातील तरुणांच्या काळजाचे ठोके चुकविणाऱ्या या कमनीय अभिनेत्रीचा प्रभाव आयुक्तांवर मात्र नाही. आपल्या देशातील कायद्यानुसारच कुत्र्यांवर कारवाई होणारच, असे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. ‘पेटा’ या संस्थेची सदस्य असलेल्या पॅमने कुत्र्यांना मारण्यापेक्षा त्यांचे निबीर्जीकरण करणेच फायद्याचे आणि परिणामकारक असल्याचे आयुक्तांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.

मायावतींच्या सरकारवर खंडणीखोरीचा आरोप
लखनऊ- देणगीच्या नावाखाली मायावतीच्या नेतृत्वाखालील सरकार लोकांच्याकडून खंडणी उकळत असल्याचा आरोप करीत कॉँग्रेसच्या हजारो कार्यकर्त्यांनी आज अटक करवून घेतली. मुख्यमंत्री मायावती यांच्या वाढदिवसानिमित्त हे कार्यकर्ते निदर्शने करीत होती. प्रदेश कॉँग्रेसचे अध्यक्ष रिटा बहुगुणा यांच्या नेतृत्वाखाली ही निदर्शने करण्यात आली. मायावती यांच्या वाढदिवसानिमित्त पक्षासाठीच्या देणगीचे कारण देत प्रशासन तसेच आमदार आणि बसपा कार्यकर्त्यांकर्ते सामान्य नागरिकांकडून खंडणी वसूली करीत असल्याचा आरोप अखिल भारतीय कॉँग्रेस समितीचे महासचिव तसेच राज्याचे प्रभारी अध्यक्ष दिग्विजय सिंग यांनी येथे पत्रकारांशी बोलताना केला. याबाबतचे ठोस पुरावे आपल्याकडे असल्याचेही त्यांनी सांगितले.

सॉफ्टवेअर अभियंत्याची अमेरिकेत हत्या
हैदराबाद, १५ जानेवारी / पीटीआय

कोटय़वधींच्या घोटाळ्यात अडकलेल्या ‘सत्यम कॉम्प्युटर’ मध्ये अमेरिकेमध्ये कार्यरत असलेल्या अक्षय विशाल या सॉफ्टवेअर अभियंत्याची बुधवारी अज्ञाताकडून हत्या झाल्याने येथे एकच खळबळ माजली आहे. अक्षयच्या पायात गोळी लागली असून त्याच्या शरीरावर अन्यत्र माराचे व्रणही दिसत असल्याचे त्याचे वडील लक्ष्मण मूर्ती यांनी सांगितले. ही घटना अमेरिकेतील लिटल रॉक अरकांस येथे घडली असून हल्लेखोराने गोळी झाडण्यापूर्वी जबर मारहाण केल्याने अक्षयच्या शरीरावर अनेक जखमा दिसत होत्या.
हा हल्लेखोर आफ्रिकन असावा तसेच त्याने अक्षयकडे काही पैशांची मागणी केल्याचा संशय व्यक्त होते आहे. पैशाची मागणी धुडकावल्याने या हल्लेखोराने पहिल्यांदा अक्षयला जबर मारहाण करून त्याच्या पायावर गोळी मारली त्यामुळे यकृतामध्ये बिघाड झाल्याने अक्षयचा मृत्यू झाला. अक्षय हा २००५ पासून अमेरिकेत सॉफ्टवेअर अभियंता म्हणून काम करीत होता. भारतीय अभियंत्याची अमेरिकेत हत्या होण्याच्या प्रमाणात वाढ होत असून यापूर्वी अर्पणा जिग्ना, डी. सोमय्या, विक्रम रेड्डी यांची वेगवेगळ्या पध्दतीने हत्या झाली आहे.

सत्यम कॉम्प्युटरच्या कर्मचाऱ्याची आत्महत्या
चेन्नई, १५ जानेवारी/पीटीआय

हजारो कोटी रुपयांचा घोटाळा झाल्यामुळे सत्यम कॉम्प्यटर या कंपनीची अवस्था अत्यंत बिकट बनली आहे. अशा स्थितीत आपल्यालाही नोकरी गमवावी लागेल अशी भीती वाटल्याने सत्यम कॉम्प्युटरमधील एक कर्मचारी विश्व वेंकटेशन याने आज आत्महत्या केली.विश्व याचे वय २३ वर्षे असून तो मुळचा सालेमचा रहिवासी आहे. रुग्णालयात उपचार सुरू असताना तो मरण पावला. या महिन्याच्या प्रारंभी सत्यम कॉम्प्युटरमधील आर्थिक घोटाळा उघडकीस आल्यानंतर विश्व वेंकटेशनने या आधीही आत्महत्येचा प्रयत्न केला होता पण तो अयशस्वी ठरला होता.

महाराष्ट्र केसरी संजय पाटील यांची हत्या
कराड, १५ जानेवारी / वार्ताहर

महाराष्ट्र केसरी युवा मल्ल संजय तुकाराम पाटील यांच्यावर दोन अज्ञात तरुणांनी बेछूट गोळीबार करून त्यांचा खून केल्याची घटना आज दुपारी पावणेचार वाजण्याच्या सुमारास कराडलगतच्या मलकापूर येथे घडली. हल्लेखोर फरार असून, या घटनेने मलकापूर, कराड, आटके या गावांसह तालुक्यात तणावाचे वातावरण आहे. दरम्यान, पोलिसांनी २५ किलोमीटर अंतरात नाकेबंदी केली आहे. अमरावतीचे कुस्ती मैदान जिंकून १९९२ मध्ये महाराष्ट्र केसरी किताब पटकावणारे संजय पाटील आटकेकर ४२ वर्षांचे होते. त्यांच्यामागे आई, पत्नी, दोन मुले, पै. धनाजी पाटील हा भाऊ असा परिवार आहे. नुकत्याच झालेल्या कराड शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सत्तांतर घडवत भरघोस मताधिक्याने ते विजयी झाले होते. संजय पाटील यांच्या निधनाचे वृत्त समजताच अवघ्या कुस्ती क्षेत्रावर शोककळा पसरली असून, पश्चिम महाराष्ट्र हादरला आहे.

निवडणुकांचे पडघम वाजायला सुरूवात झाली आहे..
उमेदवारांच्या नावांचे झेंडे देखील फडकायला लागले आहेत..
कालचे 'घरभेदे' उद्याचे 'आधारस्तंभ' भासायला लागले आहेत..
जातीपातींची नवी समीकरणे आकाराला येऊ लागली आहेत..
एकीकडे विद्यमान आघाडय़ा बिघडायला लागल्या आहेत,
तर दुसरीकडे नव्या आघाडय़ा जन्म घेताना दिसू लागल्या आहेत..
आघाडी कितवी म्हणावी..
तिसरी, चौथी, पाचवी... की दहावी..
असा प्रश्न पडावा, असं सभोवतालचं वातावरण आहे..
वाट पाहिली जात्येय ती फक्त निवडणूक आयोगाकडून घोषणा होण्याची..

बदलत्या लोकसभा मतदारसंघ क्षेत्रांचा वेध आम्ही वर्षभर घेतोच आहोत..
पण आता आम्हाला हवा आहे, तुमचा अंदाज..
तो सुद्धा तीन सोप्या प्रश्नांच्या उत्तरांमधून..
तुम्ही इतकंच करायचं..
सोबतच्या तीन प्रश्नांची उत्तरं लिहिलेलं कुपन आमच्याकडे लगेच भरून पाठवायचं..

अचूक उत्तरांना बक्षिसं आहेतच..
पण अचूक उत्तरं देणाऱ्या निवडक वाचकांना
त्यांचं या अंदाजांमागचं विश्लेषणवजा मनोगत आमच्याकडे पाठवायची, आम्ही ते प्रसिद्धही करणार आहोत..

१) कोण होईल पुढचा पंतप्रधान?
-------------------------------------------

२) कुठल्या राजकीय पक्षांची आघाडी सरकार बनवू शकेल?
--------------------------------------------

३) सरकार एकपक्षीय नसेल, तर सर्वाधिक जागा मिळविणारा पक्ष कोणता असेल?
--------------------------------------------

नाव-----------------------------------------
पत्ता-----------------------------------------
दूरध्वनी--------------------------------------

या तीन प्रश्नांची उत्तरे १५ फेब्रुवारीपर्यंत आमच्याकडे पाठवायची आहेत..
आमचा पत्ता
‘तुमची लोकसभा’, लोकसत्ता, एक्स्प्रेस टॉवर्स, पहिला मजला, नरिमन पॉईंट, मुंबई ४०० ०२१

 

लोकसत्ता दिवाळी अंक २००८


प्रत्येक शुक्रवारी


दिवाळी २००८