Leading International Marathi News Daily                                  शुक्रवार, १६ जानेवारी २००९

(सविस्तर वृत्त)

लोकसत्ताच्या ‘नोंदवही’ची नोंद घेत सहा रस्त्यांचे भूमिपूजन
शहादा, १५ जानेवारी / वार्ताहर

 
नंदुरबार जिल्ह्य़ाच्या अक्कलकुवा तालुक्यातील बामणी-डनेल या अतिदुर्गम भागातील गावांच्या दुरावस्थेचा सचित्र लेखाजोखा ‘लोकसत्ता’च्या ‘नोंदवहीतून..’ मांडला गेल्यानंतर दोन दशकाहून अधिककाळ निद्रिस्त राजकीय नेते खळबळून जागे झाले तर प्रशासकीय यंत्रणा अक्षरश: हादरली. त्यातूनच मग कधीकाळी मंजूर असलेल्या नऊ पैकी सहा रस्त्यांच्या कामाचे भूमीपूजनही अवघ्या दुसऱ्याच दिवशी झाले. भविष्यात या रस्त्यांमुळे नर्मदा काठावरील अतिदूर्गम भागातील उपेक्षित गावे जगाच्या संपर्कात आणि मुख्य प्रवाहात येण्याची आशा निर्माण झाली आहे. तथापि, पिंपरपाडा ते अलिविहीर रस्ता दुरुस्तीच्या मागणीवरून स्थानिक आदिवासींच्या रोषामुळे लोकप्रतिनिधींच्या ताफ्याला रस्त्यातच तब्बल दोन घेरावात अडकून पडावे लागले. लेखी आश्वासनानंतरच या सर्व मंडळीची सुटका होवू शकली व ते सर्व मोलगीकडे रवाना झाले.
सातपुडय़ाच्या पर्वत रांगांमध्ये वसलेल्या अनेक पाडय़ांपर्यंत पोहचायला रस्ते नसल्याने शासकीय यंत्रणा थेट सेवा देवू शकत नाही. त्यामुळे आरोग्य, शिक्षण, पिण्याचे शुद्ध पाणी यापासून अक्कलकुवा व धडगाव तालुक्याच्या अतिदुर्गम भागातील असंख्य पाडे वंचित राहतात. परिणामी कुपोषण, साथीचे रोग अशा समस्या त्यांना भेडसावत असतात. ‘बामणीची स्थिती आजही शरम वाटावी अशीच !’ ही ठळक नोंद घेताना अक्कलकुवा व धडगाव या दोन अतिदूर्गम तालुक्यांतील समस्यांचा नव्याने उहापोह केला होता. उपरोक्त सहा रस्त्यांची कामे पंतप्रधान ग्रामसडक योजनेंतर्गत सुरू करण्यात येणार असून त्यासाठी निधीही मंजूर आहे. त्यानुसार भगदरी - कंजाला ते मांडवा, पिंपळखुटा ते गमन, मांडवा ते सिंदुरी, प्रजिमा ते मोकस, प्रजिमा ते तोडीकुंड, सुरगस ते बालाघाट या सहा रस्त्यांचे भूमिपूजन गेल्या सोमवारी खा. माणिक होडल्या गावित व आ. अ‍ॅड. पद्माकर वळवी यांच्या हस्ते पार पडले. जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती सी. के. पाडवी, वाण्या कारभारी आदी उपस्थित होते. आदिवासींनी हा आनंद पेढे वाटून व्यक्त केला.