Leading International Marathi News Daily                                  शुक्रवार, १६ जानेवारी २००९

(सविस्तर वृत्त)

‘सत्यम’ घोटाळ्यात ‘इ-फ्रॉडस्’ची शक्यता?
नीरज पंडित
मुंबई, १५ जानेवारी

 
देशातील आजवरचा सर्वात मोठा कॉर्पोरेट घोटाळा म्हणून संबोधण्यात आलेला ‘सत्यम कॉम्प्युटर सव्‍‌र्हिसेस’च्या घोटाळ्यामागचे रहस्य नेमके काय आहे, याचा शोध घेण्याचा सर्वच स्तरावरून प्रयत्न होत आहे. त्याचवेळी या घोटाळ्याला ‘इ-फ्रॉडस्’च्या माध्यमातून चालना मिळाल्याचा संशय सायबर तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे.
‘सत्यम कॉम्प्युटर सव्‍‌र्हिसेस’च्या १९९४ ते २००४ या सार्वाधिक भरभराटीच्या काळात देशाभरात सायबर क्राइमच्या संदर्भात नोंदविण्यात आलेल्या एकूण तक्रारींपैकी ३५ टक्के तक्रारी आंध्र प्रदेश पोलिसांकडे नोंद झाल्या आहेत. या तक्रारींमध्ये मुख्यत: सरकारी वेबसाइट तसेच वित्तीय संस्थांच्या वेबसाइटमध्ये झालेल्या हॅकिंगच्या तक्रारींचा समावेश आहे. आंध्र प्रदेशमधील सुरक्षा व्यवस्थेपासून ते टेलिकम्युनिकेशनपर्यंतच्या सर्व लहानात लहान इ-सेवेच्या आऊटसोर्सिग चे कंत्राट १९९६पासून ‘सत्यम कॉम्प्युटर सव्‍‌र्हिसेस’कडेच आहे. यामुळे या संदर्भात दाखल झालेल्या तक्रारींमध्ये ‘सत्यम’तर्फे आऊटसोर्सिग करण्यात येणाऱ्या वेबसाइटच्या विरोधातील तक्रारींचा समावेश असण्याचे नाकारता येत नाही. पण नेहमीप्रमाणे आंध्र प्रदेशची शान, देशाची दुसरी सिलीकॉन व्हॅली, तसेच राज्याच्या ‘पोस्टर बॉय’च्या ‘इमेज’ला धक्का कसा बसवायचा हे कारण पुढे करुन या तक्रारींकडे दुर्लक्ष केल्याचे समजते. नागरिक तसेच राजकारणांच्या अमाप सहानुभूतीच्या बळावर ‘सत्यम’ने आपल्या प्रत्येक चोरीवर पांघरूण घालण्यात यश मिळविले.
‘इ-फ्रॉडस्’मध्ये विविध प्रकार मोडतात. मात्र बडय़ा कंपन्या मुख्यत: सलामी अ‍ॅटॅक, तसेच फायनानशिअल स्कॅमचा वापर करण्यात येतो. सलामी अ‍ॅटॅक म्हणजे एखाद्या वित्तीय संस्थेच्या वेबसाइटद्वारे होणाऱ्या ऑनलाइन व्यवहारात ग्राहकांच्या खात्यातील एक रुपयांपासून ते पाच रुपयांपर्यंतची रक्कम आऊटसोर्सिग करणाऱ्या कंपन्यांच्या अथवा हॅकिंग करणाऱ्यांच्या खात्यात जमा होईल अशी तरतूद एका विशिष्ठ सॉफ्टवेअरद्वारे करण्यात येते. लाखो-करोडो रुपयांचे व्यवहार करणाऱ्या लाखो ग्राहकांच्या आपल्या खात्यातून वजा झालेली पाच रुपयापर्यंतची रक्कम लक्षात न येण्याजोगी असते. आपल्या खात्यातून पैसे वजा झाल्याचे एखाद्या ग्राहकाच्या अगदीच लक्षात आले तरी ते ‘हिडन चार्जेस’च्या नावाखाली वजा करण्यात आल्याचे सांगण्यात येते. त्याचबरोबर अनेकदा फायनानशिअल स्कॅम करण्यात येतात. ऑन लाइन हवाला मार्केट तसेच नायजेरीयन फ्रॉडचा वापर करण्यात येतो. यात फेक इ-मेलद्वारे ग्राहकांकडून पैसे उकळण्यात येतात. त्या माध्यमातून कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी आपल्यासाठी नीधी (ब्लॅक मनी) उभारु शकते. बडय़ा कंपन्या अशा पैशांचा वापर अनेक रोख व्यवहारासाठी तसेच आपल्या उप कंपन्या स्थापन करण्यासाठी करतात. ‘सत्यम’ने स्थापलेल्या उप कंपन्या आणि इतर व्यवसायांसाठी या तंत्राचा वापर केला गेल्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे. सलामी अ‍ॅटॅक आणि फायनानशिअल स्कॅमच्या माध्यमातून कोणत्याही क्षणी फेक अकाऊंटद्वारे पैसा उभे करणे आऊटसोर्सिग करणाऱ्या आयटी कंपन्याना अब्रू नुकसानीचे असले तरी अवघड मात्र नसते. तसेच असे घोटाळे लवकर उघडकीस येणे भारतातील सध्याच्या सायबर सिक्युरिटीजचा विचार करता कठीण असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. देशभरात वाढत असलेल्या आयटी क्षेत्रातील अनेक कंपन्यांमध्ये अशा प्रकारचे घोटाळे होत असल्याची शक्यता नाकारता येत नाही.