Leading International Marathi News Daily                                  शुक्रवार, १६ जानेवारी २००९

(सविस्तर वृत्त)

‘कर्नल’ वेंगसरकर यांची नवी ‘इनिंग्ज’?
लोकसभेसाठी राजकीय पक्षांकडून उमेदवारी ?
केदार दामले
मुंबई, १५ जानेवारी

 
भारतीय क्रिकेट संघाच्या निवड समितीचे माजी अध्यक्ष, शंभरहून अधिक कसोटी सामने खेळलेले विख्यात फलंदाज, क्रिकेटची पंढरी असलेल्या ‘लॉर्डस’ मैदानावर सलग तीन शतके ठोकून आगळावेगळा विक्रम करणारे ‘कर्नल’ म्हणजेच दिलीप वेंगसरकर हे आता नव्या मैदानात ‘स्टान्स’ घेण्याची शक्यता आहे. आगामी निवडणुकीसाठी वेंगसरकर यांना राज्यातील दोन प्रमुख राजकीय पक्षांकडून उमेदवारीबाबत विचारणा करण्यात आल्याने आता ‘कर्नल’ लोकसभेच्या मैदानात नवी ‘इनिंग्ज’ सुरू करणार का याविषयी औत्सुक्य आहे.
मुंबईवर दहशतवादी हल्ला झाल्यानंतर जनतेमध्ये राजकीय नेत्यांबद्दल तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. दक्षिण मुंबईत काढण्यात आलेल्या मेणबत्ती मोर्चाला मिळालेला प्रतिसाद पाहता राजकीय नेत्यांबद्दल जनतेमध्ये किती चीड आहे, तेही उघड झाले. त्यामुळे स्वच्छ प्रतिमा असलेल्या आणि राजकारणाच्या बाहेरील व्यक्तीचा लोकसभा निवडणुकीसाठीचा उमेदवार म्हणून शोध घेण्याचा जवळपास सर्वच राजकीय पक्षांचा प्रयत्न सुरू आहे.
वेंगसरकर हे मूळचे दादरकर आणि मराठी असल्याने त्यांची उमेदवारी जनतेला अपील होईल, असा अंदाज बांधून एका राजकीय पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी त्यांना उमेदवारीबाबत विचारणा केली. मात्र दादरमध्ये ‘कर्नल’ यांना जोरदार प्रतिसाद मिळण्याची शक्यता असली तरी ते चेंबूर आणि धारावीत आपला प्रभाव कितपत पाडू शकतील, त्याबद्दल साशंकता व्यक्त करण्यात येत आहे.
वेंगसरकर यांना एका पक्षाकडून विचारणा झाल्याची कुणकुण लागल्यानंतर लगेचच राज्यात आणि केंद्रात सत्तेवर असलेल्या पक्षाच्या मुंबईतील एका ज्येष्ठ खासदारानेही वेंगसरकर यांच्याशी संपर्क साधला. मात्र त्यामुळे वेंगसरकर यांची पंचाईत झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. याच मतदारसंघातून सपाने शबाना आझमी यांना तिकीट देण्याचा विचार सुरू केला आहे. वेंगसरकर आणि शबाना आझमी हे दोन उमेदवार रिंगणात उतरल्यास ते विविध वाहिन्यांसाठी रंगतदार ठरेल, अशी चर्चाही सुरू झाली आहे.
या सर्व बाबींमुळे आता ‘कर्नल’ हे ‘डेक्कन चॅलेंजर्स’ ठरणार की ‘राजस्थान रॉयल’ होणार हे येणारा काळच ठरविणार आहे. एक मात्र नक्की ही ज्या दोन्ही राजकीय पक्षांनी वेंगसरकर यांना उमेदवारीबाबत विचारणा केली आहे त्या पक्षांना आपलेच सरकार केंद्रात येणार असल्याची खात्री आहे. तसे झाल्यास ‘कर्नल’ यांच्याकडे नवे केंद्रीय क्रीडामंत्री म्हणून दोन्ही पक्ष पाहत आहेत. या संदर्भात वेंगसरकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे खासदार गुरूदास कामत यांनी उमेदवारीबाबत विचारणा केल्याचे मान्य केले. मतदारसंघ कोणता याबाबत मात्र त्यांनी काहीही भाष्य केले नाही.