Leading International Marathi News Daily                                  शुक्रवार, १६ जानेवारी २००९
प्रादेशिक

(सविस्तर वृत्त)

नदीप्रदूषणाचा मासेमारीवरील नेमका परिणाम शोधण्यासाठी सर्वेक्षण
गोदावरीचे नमुने तपासण्यास सुरुवात
अभिजित घोरपडे
मुंबई, १५ जानेवारी

 
नद्यांच्या प्रदूषणाचा मासेमारीवर होणारा नेमका परिणाम शोधण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे गोदावरी नदीच्या पात्रात विशेष सर्वेक्षण करण्यात येत असून, त्याच्या आधारावर राज्यातील मासेमारीच्या संवर्धनासाठी प्रयत्न केला जाणार आहे. देशात पहिल्यांदाच अशाप्रकारचे व्यापक सर्वेक्षण हाती घेण्यात आले आहे.
नद्यांच्या पाण्याचा दर्जा आणि त्याचा माशांचे उत्पादन, माणसाच्या आरोग्यावर होणारा परिणाम याबाबत मोघमपणे बरेच बोलले जाते. पण नद्यांच्या प्रदूषणामुळे मासेमारीचे किती नुकसान झाले आहे, याची नेमकी माहिती अजून तरी उपलब्ध नाही. हीच माहिती या सर्वेक्षणाद्वारे मिळविण्यात येणार आहे. त्याचा वापर करूनच माशांच्या संवर्धनासाठी ठिकठिकाणी कोणते उपाय हाती घ्यायचे याचे नियोजन करण्यात येणार आहे. याच सर्वेक्षणाचा उपयोग करून नद्यांचे प्रदूषण करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांवर ते रोखण्यासाठी दबाव आणता येईल. त्यासाठी गोदावरी नदीच्या सर्वेक्षणासाठी पहिल्या टप्प्यातील बारा लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. हे सर्वेक्षण सुरू झाले असून, दोन वर्षांत पूर्ण होईल. पुढच्या टप्प्यात इतर नद्यांच्या प्रदूषणाचेसुद्धा सर्वेक्षण करण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी डॉ. अजय देशपांडे यांनी दिली.
नद्यांचे प्रदूषण ही राज्यातील पर्यावरणाची प्रमुख समस्या बनली आहे. त्यामुळे नद्यांच्या जैवविविधतेवर विपरित परिणाम झाला आहे. त्याचबरोबर माशांच्या उत्पादनावरही थेट परिणाम झालेला पाहायला मिळतो. अनेक नद्यांमध्ये माशांचे प्रमाण कमालीचे घटले आहे, त्यांच्या अनेक प्रजाती नष्ट झाल्या आहेत, केवळ प्रदूषित पाण्यात जगतील अशाच जाती शिल्लक राहिल्या आहेत. या सर्व परिणामांचा राज्यभर शास्त्रशुद्ध अभ्यास करण्यात येणार आहे. गोदावरीच्या सर्वेक्षणापासून त्याची सुरुवात होईल. गोदावरी नदीच्या उगमापासून ते ही नदी महाराष्ट्राची सीमा ओलांडेपर्यंत सुमारे १७ ठिकाणी तिच्या पाण्याचा दर्जा आणि तिथे मासेमारीवर झालेला परिणाम यांचा संबंध तपासण्यात येणार आहे. नाशिक शहरातील रामकुंड, तपोवन, हनुमान घाट, पुढे नाशिक जिल्ह्य़ातील सावेर, सायखेडा, निफाड, तसेच, औरंगाबाद, पैठण, जायकवाडी धरण, गोदावरीचा जालन्याजवळील भाग, परभणीतील ढालेगाव आणि नांदेड अशा विविध ठिकाणी हे सर्वेक्षण करण्यात येईल.
नदीच्या प्रत्येक ठिकाणची प्रदूषणाची स्थिती, त्याची कारणे व मासेमारीवर होणारे परिणाम यात वेगळेपण असल्याने प्रत्येक ठिकाणी हाती घ्यावयाचे उपायसुद्धा वेगळे असतात. या उपायांद्वारे ठिकठिकाणी मासेमारीच्या संवर्धनासाठी काय करायचे याचे नियोजन करण्यात येईल. नद्या वाहत्या राहाव्यात म्हणून धरणातून सतत काही पाणी (पर्यावरणीय प्रवाह) सोडायचे का, एकाच प्रकारची मासेमारी करायची का, ठिकठिकाणच्या परिस्थितीनुसार माशांच्या कोणत्या जाती वाढवाव्या, प्रदूषण टाळण्यासाठी काय करायचे अशा विविध गोष्टींबाबत निर्णय घेऊन माशांचे संवर्धन करणे शक्य होणार आहे.