Leading International Marathi News Daily                                  शुक्रवार, १६ जानेवारी २००९
प्रादेशिक

(सविस्तर वृत्त)

कॉपी सापडल्यास पर्यवेक्षक व केंद्र चालकावरही कडक कारवाई
दहावी-बारावीच्या परीक्षेत अंमलबजावणी
तुषार खरात
मुंबई, १५ जानेवारी

 
परीक्षेमध्ये कॉपी करणारा विद्यार्थी शिक्षणाधिकाऱ्यांना सापडल्यास त्या वर्गावरील पर्यवेक्षक तसेच केंद्रचालकावरही कडक कारवाई करण्याचा निर्णय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतला आहे. फेब्रुवारी-मार्चमध्ये होणाऱ्या दहावी बारावींच्या परीक्षांमध्ये या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार असल्याचे शिक्षण मंडळाच्या विभागीय सचिव बसंती रॉय यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.
आपल्याच शाळेतील विद्यार्थी परीक्षा देत असल्यास त्या वर्गावरील पर्यवेक्षक बऱ्याचदा विद्यार्थ्यांना कॉपी करण्यास प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षपणे मदत करतात. एकमेकांच्या उत्तरपत्रिका पाहून तसेच चिटोऱ्या काढून अनेक विद्यार्थी लिखाण करतात. हे प्रकार नजरेसमोर घडत असतानाही पर्यवेक्षक त्याकडे कानाडोळा करतात. काही वेळा पर्यवेक्षक वर्गात थांबून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांवर बारीक लक्ष ठेवण्याऐवजी दरवाजाबाहेर अथवा खिडकीबाहेर पाहत बसतात. अनेकदा हे पर्यवेक्षक इतर कर्मचाऱ्यांशी गप्पा मारत बसतात. पर्यवेक्षकांच्या या दुर्लक्षामुळे विद्यार्थ्यांना कॉपी करण्याची संधी मिळते. असे प्रकार घडू नयेत त्यामुळे आम्ही आता पर्यवेक्षक व केंद्रचालकालाही जबाबदार धरणार आहोत, असे रॉय म्हणाल्या. भरारी पथके अथवा शिक्षणाधिकाऱ्यांनी दिलेल्या अचानक भेटीत कॉपी करणारे विद्यार्थी आढळल्यानंतर ही कारवाई केली जाणार आहे. कर्तव्यात हयगय केल्याचा ठपका या शिक्षकांवर ठेवला जाईल. यापूर्वी परीक्षा केंद्रावर मास कॉपी झाल्यास संबंधित पर्यवेक्षक व केंद्रचालकावर कारवाई केली जात होती. आता मात्र एखादा विद्यार्थी जरी कॉपी करताना सापडल्यास ही कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी कॉपी करू नये म्हणून कडक उपाययोजना करणाऱ्या काही शाळा मुंबईत प्रसिद्ध आहेत. अशा शाळांमधील परीक्षा केंद्र मिळाल्यास विद्यार्थी कॉपी करण्याचे धैर्य दाखवत नाही. पण अनेक शाळा कॉपी रोखण्यासाठी गंभीर उपाययोजना करीत नाहीत. त्यामुळेच पर्यवेक्षक व केंद्रचालकांवर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे रॉय म्हणाल्या.