Leading International Marathi News Daily                                  शुक्रवार, १६ जानेवारी २००९
प्रादेशिक

(सविस्तर वृत्त)

‘सत्यम’वरील दीपक पारेख यांची नियुक्ती रद्द करण्याची मागणी
मुंबई, १५ जानेवारी/ खास प्रतिनिधी

 
हजारो कोटी रुपयांचा घोटाळा उघडकीस आलेल्या सत्यम कॉम्प्युटर्सच्या संचालक मंडळावर एचडीएफसीचे अध्यक्ष दीपक पारेख यांची अध्यक्ष म्हणून करण्यात आलेली नियुक्ती रद्द करण्याच्या मागणीबरोबरच या घोटाळ्याची सीबीआय मार्फत चौकशी करण्याची मागणी आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी आज येथे केली. याबाबत लवकरच आपण पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सत्यम कॉम्प्युटर्स या हैदराबाद येथील आय.टी. कंपनीत आर्थिक घोटाळा होत असल्याची माहिती मुंबईचे चार्टर्ड अकाऊंटंट शेखर वैष्णव यांनी दिल्यानंतर ८ मे २००३ रोजी लोकसभेत सत्यमच्या घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी आपण केली होती. तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या एनडीए सरकारकडे ही मागणी केली होती. मात्र त्यांनी याबाबत कोणतीच चौकशी केली नाही. त्यानंतर सेबीच्या अध्यक्षांना पत्र पाठवून चौकशी करण्याची मागणी केली व त्याची प्रत वाजपेयी व तेव्हाचे अर्थमंत्री जसवंत सिन्हा यांना पाठवली होती. त्यांनीही कोणतीच कारवाई केली नाही, असे रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. सरकारने त्यावेळीच चौकशी केली असती तर सत्यमचे मारिलगा राजू यांना सात हजार कोटी रुपयांची चोरी करता आली नसती, असेही आठवले यांनी सांगितले.
हैदराबाद येथील आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीत राजू यांच्या नातेवाईकांच्या नावावर ३० ते ४० कोटी रुपयांची रक्कम वेगवेगळ्या बँकांमध्ये राजू यांच्या नातेवाईकांच्या नावे ठेवण्यात आल्याचे उघड झाले होते. यातील सात कोटी रुपयांची रक्कम ‘एचडीएफसी’च्या हैदराबाद येथील खात्यात जमा करण्यात आली असून एवढी मोठी रक्कम दीपक पारेख यांना माहित असल्याशिवाय जमा होणे शक्य नसल्याचे सांगून यासाठीच एचडीएफसीचे अध्यक्ष पारेख यांची सत्यमवर केलेली नियुक्ती रद्द केली पाहिजे, अशी आपली मागणी असल्याचे आठवले म्हणाले.