Leading International Marathi News Daily                                  शुक्रवार, १६ जानेवारी २००९
प्रादेशिक

(सविस्तर वृत्त)

मुंबई हल्ल्यामागे लष्कर-ए-तय्यबाच - डेव्हिड मिलिबंड
मुंबई, १५ जानेवारी/प्रतिनिधी

 
मुंबईवरील हल्ल्यामागे लष्कर-ए-तय्यबा ही दहशतवादी संघटना असून ती पाकिस्तानातून या कारवाया करते. ब्रिटनमधील अनेक दहशतवादी कारवायांची पाळेमुळेही पाकिस्तानमध्येच आढळतात. त्यामुळे पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांचा कणा तेथील सरकारने मोडून काढावा व ही कारवाई त्वरित करावी, असे पाकिस्तानला ब्रिटनने बजावले आहे.
पाकिस्तानमध्ये सक्रिय असलेल्या दहशतवादी संघटनांच्या कारवाया त्या देशाच्याच मुळावर येऊ शकतात याची तेथील नेत्यांना जाणीव आहे, असे ब्रिटनचे परराष्ट्रमंत्री डेव्हिड मिलिबंड यांनी आज येथे सांगितले. मुंबईवरील हल्ल्याच्या सूत्रधारांना पकडून त्यांच्यावर पाकिस्तानमध्येच खटले चालवू या त्या देशाने व्यक्त केलेल्या मताला ब्रिटनचा पाठिंबा आहे असेही ते म्हणाले. पाकिस्तानची न्यायव्यवस्था पूर्णपणे सक्षम आहे. पाकिस्तानी वकिलांनी आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी दिलेला लढाही सर्वाच्या स्मरणात असेलच अशी पुस्तीही त्यांनी पुढे जोडली.
मुंबईवरील हल्ल्याच्या सूत्रधारांना पाकिस्तानने आमच्या स्वाधीन करावे अशी मागणी भारताने केली होती. त्या पाश्र्वभूमीवर मुंबई हल्ल्यामागील सूत्रधारांवर पाकिस्तानमध्येच खटले चालविले जावेत अशी भूमिका मिलिबंड यांनी बुधवारी नवी दिल्लीत मांडली होती. तसेच या हल्ल्यामागे पाकिस्तान सरकार किंवा त्यांच्या यंत्रणेचा हात आहे असे वाटत नाही, असे वक्तव्य केले होते. त्यामुळे मिलिबंड मुंबईकरांना केवळ सहानुभूती दाखविण्यासाठी शहरात आलेले नाहीत ना, असा तिरकस प्रश्न एका पत्रकाराने विचारला. त्याला उत्तर देताना ब्रिटनचे परराष्ट्रमंत्री डेव्हिड मिलिबंड यांनी आपल्या पूर्वीच्याच भूमिकेची री ओढली.
२६ नोव्हेंबर रोजी दहशतवाद्यांनी ताज हॉटेललाही लक्ष्य केले होते. या पाश्र्वभूमीवर ताजच्या नव्या इमारतीत मिलिबंड यांचे भाषण हा महत्त्वपूर्ण प्रसंग होता. ‘मुंबईवरील हल्ला व दहशतवादाविरोधातील लढा’ या विषयावर डेव्हिड मिलिबंड यांनी विचार मांडले. या भाषणानंतर पत्रकार व उपस्थितांच्या प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली.
मिलिंबड गेले दोन दिवस भारतात असून, या दौऱ्यात त्यांनी नवी दिल्लीत अनेक नेत्यांशी चर्चा केली. त्यासंदर्भात ते म्हणाले की, मुंबईवरील हल्ल्याच्या सूत्रधारांवर पाकिस्तानने त्वरित कारवाई केली पाहिजे ही भारताची आग्रही मागणी असल्याचे आपल्याला या चर्चेतून दिसले. मुंबईवरील हल्ल्यामागे लष्कर-ए-तय्यबाचा हात असल्याचे ब्रिटनने जाहीरपणे सांगितलेले आहे. ही दहशतवादी संघटना पाकिस्तानातून सक्रिय असून, मुंबई हल्ल्याच्या सूत्रधारांवर त्वरित कारवाई करावी अशीच ब्रिटनचीही भूमिका आहे व तसे पाकिस्तान सरकारला सांगण्यातही आले आहे. लष्कर-ए-तय्यबाची पाळेमुळे पाकिस्तान सरकारने खणून काढण्याची गरज आहे. मुंबई हल्ल्यानंतर परस्परांवर आरोप करीत बसणे योग्य नाही. त्यापेक्षा भारत व पाकिस्तानने सहकार्याची भूमिका घ्यावी व हल्ल्यामागील सूत्रधारांवर कारवाई करावी, असे दोन्ही देशांच्या नेत्यांशी चर्चा करताना मी सुचविले आहे. हा मार्ग काहीसा अवघड पण अधिक प्रभावी आहे.
काबूलमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटानंतर पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी पाकिस्तानचे अध्यक्ष झरदारी यांच्याशी चर्चा करून मोठी राजकीय दूरदृष्टी दाखविली. काश्मीरमधूून दोन्ही देशांत व्यापार सुरू करण्यासंदर्भातील करार केला होता. हे अत्यंत योग्य पाऊल होते, असे गौरवोद्गार काढून डेव्हिड मिलिबंड यांनी सांगितले की, गेल्या वर्षभरात पाकिस्तानमध्ये दहशतवादी कारवायांमध्ये दोन हजार लोक मारले गेले आहेत. पाकिस्तानमध्ये सक्रिय असलेल्या दहशतवादी संघटनांच्या कारवाया या त्याच देशाच्या मुळावर येऊ शकतात याची तेथील नेत्यांना जाणीव आहे. दहशतवादाविरुद्ध लढण्याचा हा प्रवास भारत व पाकिस्तानला स्वत:च्या बळावरच करायचा आहे. या प्रवासात ब्रिटन व अन्य मित्रराष्ट्रांची त्यांना नक्की साथ लाभेल.
अमेरिकेमध्ये ११ सप्टेंबर २००१ रोजी झालेल्या हल्ल्यानंतर दहशतवाद सुरू झाला असे नाही. त्यानंतर ‘दहशतवादाविरुद्धचा लढा’ (वॉर ऑन टेरर) हा शब्द वापरला जाऊ लागला. या शब्दामध्ये दहशतवादामुळे निर्माण झालेला धोका व त्याविरुद्ध लढण्यासाठी एकजुटीने उभे राहाण्याची गरज स्पष्ट होते. ‘वॉर ऑन टेरर’ ही संकल्पना चुकीची व दिशाभूल करणारी आहे. त्यामुळे हा शब्दप्रयोग करणे गेल्या काही वर्षांपासून ब्रिटनने सोडून दिले आहे. ओसामा बिन लादेन व अल काईदा यांच्याविरोधात लढणे म्हणजेच दहशतवादाचा मुकाबला करणे अशी संकल्पना होत चालली आहे. मात्र दहशतवाद म्हणजे कोणती एक संस्था वा विचारसरणी नव्हे ती एक क्रूर खेळी आहे.
मुंबईवरील हल्ल्यानंतरही भारताने संयमी भूमिका घेतली. या हल्ल्यामागील सूत्रधारांवर त्वरित कारवाई करावी अशी मागणी भारताने पाकिस्तानकडे केली असे आपल्या भाषणात सांगून डेव्हिड मिलिबंड म्हणाले की, आपल्या कारवायांनी जागतिक घडामोडींवर प्रभाव पाडण्याचा दहशतवाद्यांचा मनसुबा भारताने उधळून लावला. मुंबईतील हल्ल्यानंतर काही तासांतच येथील नागरिकांनी आपले नित्य व्यवहार पुन्हा सुरू केले. लंडनमध्ये २००५ साली झालेल्या बॉम्बस्फोटानंतर तेथील नागरिकांनीही असेच धैर्य दाखविले होते भारत किंवा ब्रिटनसाठी दहशतवादी कारवाया या काही नव्या नाहीत. नवी दिल्लीत २०१० साली होणारे कॉमनवेल्थ गेम्स व लंडन येथे २०१२ साली आयोजिलेल्या ऑलिम्पिक स्पर्धा यांमध्ये दहशतवादी कारवायांचा उपसर्ग होऊ नये म्हणून आम्ही सुरक्षा व्यवस्था अधिकाधिक कडक करणार आहोत. दहशतवाद्यांच्या हल्ल्यामध्ये हौतात्म्य प्राप्त झालेले दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे, अशोक कामटे, विजय साळसकर तसेच अन्य पोलिसांच्या शौर्याला व मुंबईकरांच्या असीम धैर्याला ब्रिटनचे परराष्ट्रमंत्री डेव्हिड मिलिबंड यांनी आपल्या भाषणात सलाम केला. या भाषणाआधी टाटा ग्रुपचे प्रमुख रतन टाटा यांनी डेव्हिड मिलिबंड यांचे स्वागत केले.