Leading International Marathi News Daily                                  शुक्रवार, १६ जानेवारी २००९
प्रादेशिक

(सविस्तर वृत्त)

साहित्य संमेलनाध्यक्ष निवडणुकीचा आज निकाल
*्ल मतदानाचे एकूण प्रमाण कमी
*्ल सकाळी दहा वाजता मतमोजणीस सुरुवात
*आनंद यादव आणि शंकर सारडा यांच्यात लढत
मुंबई, १५ जानेवारी / प्रतिनिधी

 
येत्या २० ते २२ मार्च या कालावधीत महाबळेश्वर येथे होणाऱ्या ८२ व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीचा निकाल उद्या जाहीर होणार आहे. संमेलनाध्यक्षपदासाठी मतदान करण्याचा आज शेवटचा दिवस होता. महामंडळाच्या सुमारे ७९२ मतदारांमधून संमेलनाध्यक्षाची निवड होणार आहे. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. आनंद यादव आणि ज्येष्ठ समिक्षक व लेखक प्रा. शंकर सारडा या दोघांमध्ये ही निवडणूक झाली. झालेल्या मतदानाचे एकूण प्रमाण कमी असल्याने त्याचा फायदा डॉ. यादव की सारडा यापैकी कोणाला होतो, त्याकडे सर्व साहित्य वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
या निवडणुकीसाठी टपालाद्वारे किंवा साहित्य मंडळाच्या औरंगाबाद येथील कार्यालयात प्रत्यक्ष जाऊन मतदान करायचे होते. आज सकाळी अकरा वाजेपर्यंत सुमारे ४४५ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. यंदाच्या निवडणूक प्रक्रियेत एकूण मतदान कमी प्रमाणात झाले असल्याचे महामंडळाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.
उद्याच्या निकालाच्या पाश्र्वभूमीवर डॉ. आनंद यादव यांच्या निवासस्थानी त्यांच्याशी वारंवार संपर्क साधला परंतु ते प्रतिक्रियेसाठी उपलब्ध झाले नाहीत. तर शंकर सारडा ‘लोकसत्ता’शी बोलताना म्हणाले की, निकाल आता अगदी जवळ आला असून माझ्याकडून जेवढे प्रयत्न करणे शक्य होते, ते मी केले आहेत. आता उद्या काय होईल, ते सांगता येत नाही. लोकशाही प्रक्रियेनुसार आपण संमेलनाध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी निवडणूक प्रक्रिया स्वीकारली आहे. त्यामुळे जो निकाल लागेल तो आपल्याला मान्य असेल.निवडणुकीत मतदान करणारे मतदार सर्वत्र विखुरलेले असून काही जणांना मतपत्रिका न मिळणे, मतदान पत्रिकेवर चुकीचे पत्ते असणे असे काही प्रकार झाले असल्याचेही सारडा म्हणाले.दरम्यान या निवडणुकीसाठी निवडणूक अधिकारी म्हणून डॉ. चंद्रदेव कवडे यांनी काम पाहिले आहे. उद्या सकाळी महामंडळाच्या औरंगाबाद येथील कार्यालयात सकाळी दहा वाजता मतमोजणीस सुरुवात होणार असून दुपारी एक वाजेपर्यंत निवडणुकीचा निकाल जाहीर होईल, अशी माहिती अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी दिली.