Leading International Marathi News Daily                                  शुक्रवार, १६ जानेवारी २००९
प्रादेशिक

(सविस्तर वृत्त)

शाहरूख, उर्मिला मातोंडकर यांना सुरक्षा रक्षक बोर्डाच्या नोटिसा
समर खडस
मुंबई, १५ जानेवारी

 
किरण फेम किंग खान शाहरूखला आता महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक बोर्डाच्या नोटीशीला उत्तर द्यावे लागणार आहे. शेराच्या टायगर एजन्सीला सुरक्षा रक्षक बोर्डाची परवानगी नसतानाही शाहरूख खानने या एजन्सीचे सुरक्षा रक्षक भाडय़ाने घेतल्याने महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक नोकरीचे नियमन व कल्याण कायद्यानुसार शाहरूख खान हा कारवाईस पात्र ठरल्याचे बोर्डाच्या अधिकाऱ्याने सांगितले. तसेच ही कारवाई थांबावी यासाठी एक बडे राजकीय प्रस्थ सध्या दबाव आणत असल्याचेही विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, टायगर एजन्सीचे सुरक्षा रक्षक यापुढे भाडय़ाने घेणे शक्य होणार नसल्याचे बॉलीवूडमधील सगळ्याच बडय़ा धेंडांच्या लक्षात आल्याने त्यांनी आता टायगर एजन्सीला याबाबत कळविले आहे. त्यामुळे टायगरचे विलीनीकरण शेराच्या नातेवाईकाच्याच एका मोठय़ा खाजगी सुरक्षा एजन्सीत करण्याचे ठरले असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. काही काळापुरते टायगरचे विलीनीकरण या नव्या एजन्सीत करून बॉलीवूडमधील बडय़ा सिताऱ्यांना सध्या देण्यात येत असलेल्या सुरक्षेत कुठेही खंड पडू देण्यात येणार नाही, असे टायगरच्या एका मोठय़ा अधिकाऱ्याने लोकसत्ताशी बोलताना सांगितले. दरम्यान टायगर एजन्सीवर व त्या अनुषंगाने बॉलीवूडम्मधील बडय़ा सिताऱ्यांवरील कारवाईचा हा बडगा थांबावा यासाठी काँग्रेसमधील एक अमराठी बडा राजकीय नेता प्रयत्नशील असल्याचेही समजते.
बोर्डाच्या निरीक्षकांनी आज मुंबईत विविध ठिकाणी धाडी घालून टायगर एजन्सीचे सुरक्षा रक्षक कुठे कुठे पुरविले जातात याची माहिती काढली असता बॉलीवूडमधील शाहरूख खानबरोबर उर्मिला मातोंडकर हिनेसुद्धा टायगर एजन्सीची सुरक्षा घेतली असल्याचे स्पष्ट झाले आहे. बॉलीवूडमधील आणखीही काही बडे सितारे व दिग्दर्शकही टायगर एजन्सीची सुरक्षा घेत असल्याची माहिती सुरक्ष रक्षक बोर्डाच्या निरिक्षकांना मिळाली असून उद्या संबंधितांनी बोर्डाला याबाबतची माहिती द्यावी, असे त्यांना सांगण्यात आले आहे.
या नोटीशीला येत्या सात दिवसांमध्ये उत्तर न दिल्यास दंड किंवा तुरुंगवास किंवा दोन्ही शिक्षांसाठी हे बडे सितारे पात्र ठरू शकतात. टायगर एजन्सीचा मालक व सलमान खानचा व्यक्तिगत सुरक्षा रक्षक शेरा यालादेखील विविध कलमांखाली नोटीस बजावण्यात आली असून त्याच्यावर तसेच त्याच्या एजन्सीवर कारवाईची तयारी बोर्डाने सुरू केली आहे.