Leading International Marathi News Daily                                  शुक्रवार, १६ जानेवारी २००९
प्रादेशिक

(सविस्तर वृत्त)

नांदेडमुळे शांतता धोक्यात येऊ शकते; लातूरकरांचा इशारा
मुंबई, १५ जानेवारी / खास प्रतिनिधी

 
नांदेडला विभागीय आयुक्तालय स्थापन करण्याचा निर्णय स्थगित करण्यासाठी राज्य सरकारला आदेश द्यावा, अशी विनंती लातूरमधील सर्वपक्षीय नेत्यांच्या शिष्टमंडळाने राज्यपाल एस. सी. जमीर यांच्याकडे आज केली. तज्ज्ञ समितीचा अहवाल येईपर्यंत हा निर्णय स्थगित करण्यात यावा अन्यथा आंदोलन सुरूच राहील व त्यातून काही अप्रिय घटना घडल्यास त्याला पूर्णत: राज्य सरकार जबाबदार असेल, असा इशारा देण्यात आला आहे.
नांदेडला विभागीय आयुक्तालय स्थापन करण्याच्या मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या निर्णयाच्या विरोधात लातूरमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी या निर्णयास तीव्र विरोध दर्शविला आहे.नांदेड विरुद्ध लातूर वादात आजी-माजी मुख्यमंत्र्यांमध्ये चांगलीच जुंपली आहे. नांदेडचा निर्णय स्थगित करण्यास मुख्यमंत्र्यांचा तीव्र विरोध आहे. नांदेडच्या विरोधात विलासरावांनी नवी दिल्लीत तक्रार केल्यानंतर काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी त्यावर सबुरीचा सल्ला उभयतांना दिला आहे. माजी गृहमंत्री शिवराज पाटील यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून त्यांचे मत जाणून घेतले. नांदेडच्या विरोधात लातूरमधील सर्वपक्षीय नेतेमंडळी एकत्र आली आहेत. सर्वपक्षीय नेत्यांच्या शिष्टमंडळाने राज्यपाल एस. सी. जमीर यांची भेट घेऊन नांदेडला विभागीय आयुक्तालय स्थापन करण्याच्या निर्णयास स्थगिती द्यावी, अशी मागणी केली. मुख्यमंत्री चव्हाण यांनी राजकीय फायद्यासाठी हा निर्णय घेतल्याचा आरोप राज्यपालांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आला आहे. तज्ज्ञ समिती नेमून विभागीय आयुक्तालयाबाबत निर्णय घेतला जावा. तोपर्यंत नांदेडचा निर्णय स्थगित करण्याची मागणी करण्यात आली आहे.