Leading International Marathi News Daily                                  शुक्रवार, १६ जानेवारी २००९
प्रादेशिक

(सविस्तर वृत्त)

‘युती तुटली तरी चालेल, सेनेची दादागिरी खपवून घेऊ नका’
मुंबई, १५ जानेवारी / खास प्रतिनिधी

 
एकवेळ शिवसेनेबरोबरची युती तुटली तरी चालेल, पण कोणत्याही स्थितीत लोकसभेच्या जागावाटपाबाबत शिवसेनेतर्फे आणण्यात येत असलेला ‘फिफ्टी - फिफ्टी’चा दबाव झुगारून टाका, असा आग्रह भाजपच्या कार्यकर्त्यांकडून भाजपा नेत्यांना होत आहे. विशेषत: शिवसेनेत उदयाला आलेल्या नव्या नेत्यांची दादागिरी जराही खपवून घेऊ नका, असे भाजपच्या राज्यभरातील कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत घडलेल्या भाजपच्या एका ज्येष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितले की, बाळासाहेब ठाकरे आणि स्व. प्रमोद महाजन यांनी वर्षांनुवर्षे एकसंध ठेवलेली युती अधिक मजबूत ठेवण्याची जबाबदारी केवळ भाजपची नाही. गोपीनाथ मुंडे, नितीन गडकरी या भाजपच्या महाराष्ट्रातील लोकनेत्यांबरोबर कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी चर्चा न करता शिवसेनेतील नव्या नेत्यांना चर्चेला पाठवणे म्हणजे एका प्रकारे भाजपला दिली जात असलेली अपमानास्पद वागणूक असून त्याबाबत भाजपत प्रचंड असंतोष आहे.
गोपीनाथ मुंडेंसारखा नेता हा जनसंघर्षांतून तयार झालेला नेता असून त्यांच्याबरोबर हेतूपुरस्सर शिवसेनेतील अलीकडच्या पदाधिकाऱ्यांना बोलणी करण्यासाठी पाठवणे हे अति होत असून युती तुटली तरी चालेल, आपण स्वबळावर वाटचाल करू, असा राज्यभरातील भाजप कार्यकर्त्यांचा दबाव भाजप नेत्यांवर येत आहे.
शिवसेनेच्या दबावतंत्राला थेट उत्तर देण्याबाबत राज्यभरात वातावरण तयार होत असून गेल्या वेळी याच मानसिकतेतून भाजपने ‘एकला चलो रे’ या मोहिमेची आखणी केली होती. खरे तर २००९ साली युती आणि २०१४ साली ‘एकला चलो रे’ ही भाजपची रणनीती स्व. प्रमोद महाजन यांनीच ठरविली होती, असे भाजपच्या या नेत्याने स्पष्ट केले.
युती तुटली तरी भाजप आपल्या ताकदीवर लोकसभेत आणि विधानसभेतही लक्षणीय यश मिळवू शकेल, असा विश्वास व्यक्त करीत हा नेता म्हणाला की, शिवसेनेची बरीचशी मते मनसे खाणार आहे, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे शिवसेनेने भाजपला मानाची वागणूक दिली नाही तर युतीच्या कार्यकर्त्यांत संभ्रमाचे वातावरण तयार होऊन आगामी सत्तेचा घास युतीच्या तोंडाशी येऊन अकस्मात राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या तोंडात जाईल आणि पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा होईल.
अलीकडेच मुंबई भाजप अध्यक्ष गोपाळ शेट्टी यांनी प्रसारमाध्यमांकडे भाजपच्या मुंबईतील संभाव्य उमेदवारांची नावे जाहीर केल्याबद्दल शिवसेनेकडून तीव्र आक्षेप घेण्यात आला होता. मात्र विरोधी पक्षनेते रामदास कदम हे गुहागरातून आपली उमेदवारी आधीच जाहीर करीत आहेत, आपले मोठे फलक लावून विधानसभा निवडणुकीची पूर्वतयारी करीत आहेत त्यांचे कान शिवसेना कार्याध्यक्ष का उपटत नाहीत, असा सवाल भाजपच्या या नेत्याने केला.