Leading International Marathi News Daily                                  शुक्रवार, १६ जानेवारी २००९
प्रादेशिक

(सविस्तर वृत्त)

‘दि.बां’च्या मतपरिवर्तन प्रवासाचा रौप्यमहोत्सव पवारांच्या उपस्थितीत
मुंबई, १५ जानेवारी/प्रतिनिधी

 
बरोबर २५ वर्षांपूर्वी १६ जानेवारी १९८४ रोजी जासई येथे सिडकोला जमीन देण्याच्या विरोधात आंदोलन सुरू झाले. त्याचे नेतृत्व शेकापचे ज्येष्ठ नेते दि. बा. पाटील यांच्याकडे होते. शेतकऱ्यांच्या जमिनी देण्यास असलेल्या विरोधाचा स्फोट झाला. रस्ता रोकोला हिंसक वळण लागले. गोळीबारात पाचजण मरण पावले.. आता त्याच रायगड जिल्ह्यात रिलायन्सच्या सेझ प्रकल्पाला जमिनी देण्याकरिता काही राजकीय नेते विरोध करीत असले तरी दि. बा. पाटील मात्र किफायतशीर नसलेल्या शेतीत अडकून न राहता सेझ प्रकल्पाकरिता जमिनी देणाऱ्यांना दिलेले पॅकेज स्वीकारण्याची भूमिका घेत आहेत. दि.बांच्या या भूमिकेचे स्वागत करण्याकरिता जासई येथेच उद्या आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हजर राहणार आहेत.
सिडकोला जमीन देण्याच्या विरोधातील आंदोलनाला २५ वर्षे पूर्ण होत असल्याने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाच्या पाश्र्वभूमीवर पाटील यांनी काही वृत्तपत्रांकडे सेझ प्रकल्पाच्या हिताची भूमिका घेतली आहे. सिडको जेव्हा जमीन घेत होती तेव्हा वसंतदादा पाटील मुख्यमंत्री होते. त्यावेळी जमिनीकरिता ४० हजार रुपयांचा भाव देण्याची दि. बां.ची मागणी होती तर सरकारने २७ हजार रुपये भाव दिला होता. सध्या सेझ प्रकल्पात शेतकऱ्यांना बाजारभावानुसार भरपाई, प्रकल्पग्रस्तांच्या कुटुंबातील एकाला नोकरी व विकसीत जमिनीपैकी साडेबारा टक्के जमीन परत देण्याचे पॅकेज जाहीर झाले आहे. शेतीकरिता सध्या प्रतिकूल परिस्थिती असून सेझकरिता जमिनी दिल्यानंतर मिळणारे उत्पन्न शेतकऱ्यांच्या कुटुंबांना चरितार्थ चालविण्याकरिता निश्चित पुरेसे असल्याचे मत दि. बांनी व्यक्त केले आहे. कोकणात तसेच राज्यात येणाऱ्या प्रत्येक प्रकल्पाला विरोध केला तर विकास होणे शक्य नाही, अशी भूमिका राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, मुख्यमंत्री अशोक चव्हाण, ऊर्जामंत्री सुनील तटकरे हे सातत्याने मांडत असताना आता त्यांना दि. बांच्या रुपाने एका जुन्याजाणत्या व लढवय्या नेत्याचीही साथ लाभली आहे.