Leading International Marathi News Daily                                  शुक्रवार, १६ जानेवारी २००९
प्रादेशिक

मुंबई हल्ल्यामागे लष्कर-ए-तय्यबाच - डेव्हिड मिलिबंड
मुंबई, १५ जानेवारी/प्रतिनिधी

मुंबईवरील हल्ल्यामागे लष्कर-ए-तय्यबा ही दहशतवादी संघटना असून ती पाकिस्तानातून या कारवाया करते. ब्रिटनमधील अनेक दहशतवादी कारवायांची पाळेमुळेही पाकिस्तानमध्येच आढळतात. त्यामुळे पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांचा कणा तेथील सरकारने मोडून काढावा व ही कारवाई त्वरित करावी, असे पाकिस्तानला ब्रिटनने बजावले आहे. पाकिस्तानमध्ये सक्रिय असलेल्या दहशतवादी संघटनांच्या कारवाया त्या देशाच्याच मुळावर येऊ शकतात याची तेथील नेत्यांना जाणीव आहे, असे ब्रिटनचे परराष्ट्रमंत्री डेव्हिड मिलिबंड यांनी आज येथे सांगितले. मुंबईवरील हल्ल्याच्या सूत्रधारांना पकडून त्यांच्यावर पाकिस्तानमध्येच खटले चालवू या त्या देशाने व्यक्त केलेल्या मताला ब्रिटनचा पाठिंबा आहे असेही ते म्हणाले. पाकिस्तानची न्यायव्यवस्था पूर्णपणे सक्षम आहे.

शाहरूख, उर्मिला मातोंडकर यांना सुरक्षा रक्षक बोर्डाच्या नोटिसा
समर खडस
मुंबई, १५ जानेवारी

किरण फेम किंग खान शाहरूखला आता महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक बोर्डाच्या नोटीशीला उत्तर द्यावे लागणार आहे. शेराच्या टायगर एजन्सीला सुरक्षा रक्षक बोर्डाची परवानगी नसतानाही शाहरूख खानने या एजन्सीचे सुरक्षा रक्षक भाडय़ाने घेतल्याने महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक नोकरीचे नियमन व कल्याण कायद्यानुसार शाहरूख खान हा कारवाईस पात्र ठरल्याचे बोर्डाच्या अधिकाऱ्याने सांगितले. तसेच ही कारवाई थांबावी यासाठी एक बडे राजकीय प्रस्थ सध्या दबाव आणत असल्याचेही विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, टायगर एजन्सीचे सुरक्षा रक्षक यापुढे भाडय़ाने घेणे शक्य होणार नसल्याचे बॉलीवूडमधील सगळ्याच बडय़ा धेंडांच्या लक्षात आल्याने त्यांनी आता टायगर एजन्सीला याबाबत कळविले आहे.

नदीप्रदूषणाचा मासेमारीवरील नेमका परिणाम शोधण्यासाठी सर्वेक्षण
गोदावरीचे नमुने तपासण्यास सुरुवात

अभिजित घोरपडे
मुंबई, १५ जानेवारी

नद्यांच्या प्रदूषणाचा मासेमारीवर होणारा नेमका परिणाम शोधण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे गोदावरी नदीच्या पात्रात विशेष सर्वेक्षण करण्यात येत असून, त्याच्या आधारावर राज्यातील मासेमारीच्या संवर्धनासाठी प्रयत्न केला जाणार आहे. देशात पहिल्यांदाच अशाप्रकारचे व्यापक सर्वेक्षण हाती घेण्यात आले आहे. नद्यांच्या पाण्याचा दर्जा आणि त्याचा माशांचे उत्पादन, माणसाच्या आरोग्यावर होणारा परिणाम याबाबत मोघमपणे बरेच बोलले जाते.

कॉपी सापडल्यास पर्यवेक्षक व केंद्र चालकावरही कडक कारवाई
दहावी-बारावीच्या परीक्षेत अंमलबजावणी

तुषार खरात
मुंबई, १५ जानेवारी

परीक्षेमध्ये कॉपी करणारा विद्यार्थी शिक्षणाधिकाऱ्यांना सापडल्यास त्या वर्गावरील पर्यवेक्षक तसेच केंद्रचालकावरही कडक कारवाई करण्याचा निर्णय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतला आहे. फेब्रुवारी-मार्चमध्ये होणाऱ्या दहावी बारावींच्या परीक्षांमध्ये या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार असल्याचे शिक्षण मंडळाच्या विभागीय सचिव बसंती रॉय यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.

साहित्य संमेलनाध्यक्ष निवडणुकीचा आज निकाल
*्ल मतदानाचे एकूण प्रमाण कमी
*्ल सकाळी दहा वाजता मतमोजणीस सुरुवात
*आनंद यादव आणि शंकर सारडा यांच्यात लढत
मुंबई, १५ जानेवारी / प्रतिनिधी
येत्या २० ते २२ मार्च या कालावधीत महाबळेश्वर येथे होणाऱ्या ८२ व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीचा निकाल उद्या जाहीर होणार आहे. संमेलनाध्यक्षपदासाठी मतदान करण्याचा आज शेवटचा दिवस होता. महामंडळाच्या सुमारे ७९२ मतदारांमधून संमेलनाध्यक्षाची निवड होणार आहे. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. आनंद यादव आणि ज्येष्ठ समिक्षक व लेखक प्रा. शंकर सारडा या दोघांमध्ये ही निवडणूक झाली. झालेल्या मतदानाचे एकूण प्रमाण कमी असल्याने त्याचा फायदा डॉ. यादव की सारडा यापैकी कोणाला होतो, त्याकडे सर्व साहित्य वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

गोपीनाथ मुंडे पळपुटे - माणिकराव पाटील
मुंबई, १५ जानेवारी/ खास प्रतिनिधी

राज्य सहकारी बँक ही कायमच शेतकरी व जिल्हा बँकांच्या मागे ठामपणे उभी राहात आली आहे. २००५ साली शेतकऱ्यांना ६०० कोटी रुपये कर्ज उपलब्ध करून देणारी शिखर बँक आज ३००० कोटी रुपये कर्ज उपलब्ध करून देत आहे. मात्र बँकिंगची काडीचीही माहिती नसलेले गोपीनाथ मुंडे बँकेवर वारेमाप आरोप करत असून त्यांना चर्चेसाठी बोलावले असता मुंडे यांनी पळपुटेपणा केला, असा जोरदार प्रतिहल्ला राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष माणिकराव पाटील यांनी आज चढवला.
शेतकऱ्यांसाठी राज्य सहकारी बँक कर्ज उपलब्ध करून देत नसल्यामुळे २८ लाख शेतकऱ्यांना कर्ज मिळत नसल्याचा मुंडे यांचा आरोप खोडसाळपणाचा व त्यांचे बँकिंग क्षेत्रातील अज्ञान उघडे करणारा असल्याचे पाटील यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले. मुंडे यांचे म्हणणे आहे की त्यांनी माझ्याकडे भेटीसाठी वेळ मागितली व मी ती त्यांना दिली नाही. मुंडे खोटे बोलत आहेत. मी त्यांना दूरध्वनी करून आपल्याकडे भेटण्यासाठी येऊ का, असेही विचारले होते. आज सकाळी साडेदहा वाजता ते भेटीसाठी येणार होते. त्यानंतर त्यांनी तीन वाजता येतो असे सांगितले. नंतर आज येता येणार नाही, पुढील आठवडय़ात वेळ घेऊन येतो, असे सांगितले.
दरम्यान, बँकेचे खरे स्वरुप उघडे केल्यामुळेच माणिकराव पाटील आपला संताप व्यक्त करत असल्याचा दावा गोपीनाथ मुंडे यांनी केला आहे.

‘बीएमएम’चा अभ्यासक्रम मराठीतून
मुंबई , १५ जानेवारी / प्रतिनिधी

मुंबई विद्यापीठाचा ‘बॅचलर इन मास मिडिया’ (बीएमएम) हा अभ्यासक्रम आता मराठीतूनही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ‘बीएमएम’च्या इंग्रजी अभ्यासक्रमाचा मराठी भाषेत अनुवाद करण्याची प्रक्रियाही तातडीने सुरू करण्यात आली आहे. आज एका बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. कुलगुरू डॉ. विजय खोले, विविध वृत्तपत्रांतील पत्रकार, अभ्यासमंडळातील सदस्य व विद्यापीठातील अन्य उच्चपदस्थ या बैठकीला उपस्थित होते. इंग्रजी भाषेतील ‘बीएमएम’मध्ये महाराष्ट्राशी निगडीत असलेला नवा विषय सामाविष्ट करण्याचा निर्णयही घेण्यात आला. सध्या इंग्रजीतून शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना मराठीतून उत्तरपत्रिका लिहिण्याची तसेच प्रकल्प सादर करण्याची परवानगी विद्यापीठातर्फे आधीच देण्यात आली आहे.

‘ती’ भेटणार आयुक्तांना!
मुंबई , १५ जानेवारी / प्रतिनिधी

हॉलिवूडची ‘बे वॉच’ फेम मादक फटाकडी पामेला अँडरसन उर्फ पॅम चक्क मुंबईत अवतरण्याची शक्यता असून तिची मोहीम असणार आहे ती मुंबईतील कुत्र्यांचे प्राण वाचविण्याची. कुत्र्यांना मारू नये, यासाठी पॅम मुंबई पालिकेचे आयुक्त डॉ. जयराज फाटक यांची भेट घेणार असून या भेटीबाबत पालिकेच्या वर्तुळात औत्सुक्य निर्माण झाले आहे. पॅमची एक झलक मिळावी, यासाठी अनेकांनी आज पालिकेच्या कार्यालयात या संभाव्य भेटीबाबत चौकशी केल्याचे समजते.
मुंबई उच्च न्यायालयाने भटके कुत्रे मारण्याची पालिकेला परवानगी दिल्यानंतर आता या कुत्र्यांचे काय होणार या चिंतेने सध्या पॅमला झोप लागत नाही, अशी चर्चा आहे. त्यामुळे तिने थेट पालिका आयुक्त डॉ. जयराज फाटक यांनाच पत्र लिहून कुत्र्यांना मारू नका, अशी प्रेमळ विनंती केली आहे. मात्र तरुणांच्या काळजाचे ठोके चुकविणाऱ्या या कमनीय अभिनेत्रीचा प्रभाव आयुक्तांवर नाही. कायद्यानुसारच कुत्र्यांवर कारवाई होणारच, असे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.

नऊ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या
मुंबई, १५ जानेवारी / प्रतिनिधी

राज्य शासनाने नऊ सनदी अधिकाऱ्यांच्या आज बदल्या केल्या. औरंगाबादचे विभागीय आयुक्त दिलीप बंड यांची बदली पुण्याचे विभागीय आयुक्त म्हणून तर बी. एस. मुंडे यांची औरंगाबादचे विभागीय आयुक्त म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
राज्य लघुउद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे यांची बदली आदिवासी विकास विभागाचे अप्पर आयुक्त या पदावर करण्यात आली आहे. त्यांच्या जागी आर. डी. देवकर यांची बदली करण्यात आली आहे. नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रावण हर्डिकर यांची बदली नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी तर सध्या नांदेडमध्ये मुख्य अधिकारीपदी कार्यरत असलेले परिमल सिंग यांची बदली नंदुरबारला करण्यात आली आहे. यवतमाळ जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी धीरज कुमार यांची नियुक्ती नागपूरचे अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून करण्यात आली आहे. औरंगाबाद आयुक्तपदी नवीन सोनी यांची नेमणूक करण्यात आली आहे.

‘शिवाजी पार्कवर सभा होणारच’
मुंबई, १५ जानेवारी / प्रतिनिधी

शिवाजी पार्कवर राजकीय पक्षांच्या सभा आणि इतर कार्यक्रमांना परवानगी देऊ नये, ही मागणी आज पालिका आयुक्त जयराज फाटक यांनी फेटाळून लावली. शिवाजी पार्कवर खेळासाठी प्राधान्य देण्यात येते तसेच इथे सभाही होणार, असे फाटक यांनी स्पष्ट केले. राजकीय सभांसाठी शिवाजी पार्क देण्यात येते, त्यात बदल होणार नाही, असे आयुक्त म्हणाले. वर्षांला सर्वसाधणारपणे ११ दिवस हे मैदान सभांना देण्यात येते. वर्षांला इथे ३० कार्यक्रम होत असतात. शिवाय महाराष्ट्रदिन, महापरिनिर्वाणदिन आणि सरकारचे काही कार्यक्रम इथेच होणार, असे आयुक्तांनी स्पष्ट केले.

बसपाच्या तिकीटावर लढण्याचा प्रश्नच नाही - डॉ. अख्तर रिझवी
मुंबई, १५ जानेवारी/प्रतिनिधी

आपण राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव असून पक्षाशी कायम एकनिष्ठ आहोत. त्यामुळे आपला बहुजन समाज पक्षाच्या
तिकिटावर उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचा प्रश्नच येत नाही, असा खुलासा अख्तर रिझवी यांनी या संदर्भात प्रसिद्ध झालेल्या वृत्तासंदर्भात केला आहे. आपण निवडणूक लढविणार किंवा नाही हा पूर्णपणे वेगळा मुद्दा असला तरीही बसपा या पक्षातून निवडणूक लढविण्याचा प्रश्नच येत नाही. बसपच्या दिल्ली वा मुंबईतील कोणत्याही नेत्यांशी आपण या आधी किंवा सध्या कुठल्याही प्रकारचा संपर्क साधलेला नाही, असेही रिझवी यांनी स्पष्ट केले आहे.