Leading International Marathi News Daily                                  शुक्रवार, १६ जानेवारी २००९

पुरस्काराचा मानकरी आमिरच; अक्षयकुमारची प्रांजळ कबुली
तारे-तारकांच्या अदाकारीने रंगला नोकिया स्टार स्क्रीन पुरस्कार सोहळा

प्रतिनिधी

‘प्रेक्षकांनी आणि स्क्रीनच्या वाचकांनी ‘सिंग इज किंग’मधील भूमिकेसाठी सवरेत्कृष्ट अभिनेता म्हणून माझी निवड केली असली तरी संपूर्ण २००८ सालात गाजलेला आणि खऱ्या अर्थाने सवरेत्कृष्ट अभिनेत्याचा मान फक्त आमिर खानलाच मिळायला हवा, आमिर हाच या पुरस्काराचा खरा मानकरी आहे, अशा शब्दांत अक्षय कुमारने लोकप्रिय सवरेत्कृष्ट अभिनेत्याचा मान स्वीकारला. १५ व्या नोकिया स्टार-स्क्रीन पुरस्कार सोहळ्याला अक्षय कुमारच्या वक्तव्याने चार चाँद लागले. लोकप्रिय सवरेत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार स्वीकारतानाही ऐश्वर्या रायने ‘मी हा पुरस्काकर केवळ माझ्या भूमिकेसाठी नाही तर ‘जोधा-अकबर’चे निर्माते, दिग्दर्शक, तंत्रज्ञ अगदी संपूर्ण टीमला मिळालेला हा गौरव आहे आणि म्हणूनच हा पुरस्कार मी स्वीकारतेय’, असे सांगितले.

‘इंडियन आयडॉल’मध्ये सोनू निगम
प्रतिनिधी

या आठवडय़ातील इंडियन आयडॉलचा भाग स्पर्धकांसाठी खासच ठरला. कारण होते. सोनू निगमची उपस्थिती! ‘मला आपल्या घरी आल्यासारखंच वाटतंय’, अशी प्रतिक्रिया सोनूने या कार्यक्रमात येऊन व्यक्त केली. बराच काळ इंडियन आयडॉलपासून लांब राहून अचानक या सेटवर आल्यावर सोनू निगमने प्रत्येक स्पर्धकाची भेट घेतली आणि त्यांना योग्य ते मार्गदर्शन केले. स्पर्धकांबरोबर तो गायला, संगीताच्या तालावर पाय थिरकवले, एवढय़ावरच न थांबता आपले आवडते गायक उदीत नारायण आणि अनु मलिक यांची त्याने नक्कलही केली! इतर रिअ‍ॅलिटी शोबरोबर सोनू काम करत असला तरी इंडियन आयडॉल हे नक्कीच त्याला सगळ्यात जास्त प्रिय आहे. ‘गायक आणि संगीतकार यांना एकाच व्यासपीठावर आणून त्यांना इतर सेलिब्रेटींजच्या बरोबरीनेच प्रसिद्धी देण्याचे व माध्यम आणि मनोरंजन यांना एकत्र आणण्याचे पहिले पाऊल इंडियन आयडॉलने केले आहे.

राज ठाकरे यांनी दाखविला 'ट्रेलर'
प्रतिनिधी
२६ नोव्हेंवरच्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर झालेली टीका, उत्तर भारतीयांची वाढती घुसखोरी, सरकारी कार्यालयातील उत्तर भारतीयांची बोगस कामे आणि महाराष्ट्रात साजरे होणारे दिन यासंदर्भात २४ जानेवारी रोजी ठाण्यातील सभेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे कोणत्या प्रकारे आक्रमक आणि मराठी तरुणांना पेटविणारी भूमिका मांडणार आहेत, याचे ट्रेलर आजच्या गडकरी रंगायतनमधील नवनिर्माण गौरव सोहळ्याच्या कार्यक्रमातून दिसली. नवनिर्माण करिअर अ‍ॅण्ड रिसर्च अकादमी या संस्थेतर्फे सामाजिक-राजकीय, कला-क्रीडा, शैक्षणिक, पत्रकारिता आणि पर्यावरण या क्षेत्रातील सहा मान्यवरांना 'नवनिर्माण गौरव-२००९' या पुरस्काराने गौरविण्यात आले. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते 'लोकसत्ता'चे उपनिवासी संपादक चंद्रशेखर कुलकर्णी,पर्यावरणप्रेमी अरुण जोशी, आमदार संजय केळकर, शहनाईवादक शैलेश भागवत, राष्ट्रकुल खेळातील सुवर्णपदक विजेती श्रद्धा घुले, मुख्याध्यापक हरिश्चंद्र भोये यांना स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

टॅक्सी चालक-मालकांना ओळखपत्र देण्यात टाळाटाळ
कैलास कोरडे

विदेशांतील टॅक्सींच्या धर्तीवर शहरातील प्रत्येक टॅक्सीमध्ये परवानाधारक अथवा चालकांचे फोटो ओळखपत्र असावे अशी मागणी प्रदीर्घ काळापासून होत आहे. फ्लीट टॅक्सींसाठी परिवहन विभागाने याप्रकारची ओळखपत्र सक्तीची केली आहेत. मात्र प्रवाशांच्या दृष्टीने ही गोष्ट अत्यंत सोयीस्कर ठरणारी असली तरी काळ्या-पिवळ्या व कूल कॅब टॅक्सींसाठी या प्रकारची फोटो ओळखपत्र देण्यात मात्र टाळाटाळ केली जात आहे. शहरातील प्रत्येक टॅक्सीमध्ये पिवळ्या अक्षरात टॅक्सी परवाना क्रमांक आणि वाहन क्रमांक या गोष्टी लिहिणे क्रमप्राप्त आहे.प्रत्येक टॅक्सी चालकाकडे टॅक्सी बॅज व ड्रायव्हिंग लायसन्स असणेही अत्यावश्यक आहे. मात्र या गोष्टींवरून प्रवाशांना टॅक्सी चालविणारी व्यक्ती टॅक्सीची मालक आहे की चालक, हे स्पष्ट होत नाही.

ज्ञानयोगी
डॉ. प. वि. वर्तक यांचा अमृत महोत्सवी नागरी सत्कार अध्यात्म संशोधन मंदिर, मुंबईतर्फे उद्या १७ जाने. २००९ रोजी सायं. ५ वाजता, ब्राह्मणसेवा मंडळ, भवानीशंकर रोड, दादर, मुंबई- २८ येथे आयोजित केला आहे. तसेच १८ जाने. २००९ रोजी सकाळी १० वाजता मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, नायगाव, दादर (पूर्व), मुंबई १४ येथे कृतज्ञता सत्र आयोजित केलेले आहे. त्यानिमित्ताने..
वेदात नमूद आहे की, ब्रह्म हे सर्वज्ञ व सर्वविद् आहे. सर्वज्ञ म्हणजे सर्व काही जाणणारे. सर्वविद् म्हणजे सर्वत्र असणारे. म्हणूनच ज्ञानाच्या सर्व शाखांचा अभ्यास करणे म्हणजेच ब्रह्म अभ्यासणे. वैद्यकशास्त्राच्या सर्व शाखा, चित्रकला, मल्लविद्या, इतिहास, भूगोल, खगोलविज्ञान, ज्योतिषशास्त्र, तर्कशास्त्र, संस्कृत, गणित, अध्यात्मशास्त्र, योगशास्त्र इत्यादी सर्व विषय डॉ. प. वि. वर्तक यांनी अभ्यासिले आहेत. या सर्वामुळे ते ब्रह्मर्षी म्हणून प्रसिद्ध पावले आहेत.

किल्ले माहुली महोत्सव
सह्य़ाद्रीमधील डोंगरभटकंतीला एक प्रेरणादायक परिमाण लाभले आहे, ते म्हणजे तेथील दैदीप्यमान इतिहासाच्या खाणाखुणा जपणाऱ्या गडकिल्ल्यांमुळे. शिवपूर्वकालापासूनच सह्य़ाद्रीच्या डोंगररांगावर गडकिल्ल्यांची निर्मिती झाली. आज जरी त्याचे तटबुरुज ढासळले असले तरीही त्यांचा इतिहास आपल्याला साद घालतो आणि मग दुर्गप्रेमींचा ओघ पुनश्च या गडकोटांकडे वळतो. असाच काहीसा प्रकार घडला आहे तो शहापूरनजीकच्या माहुली किल्ल्याबाबतीत. या किल्ल्यावर ३५० वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेने शहापूरकरांना साद दिली आणि मग १०, ११ जानेवारीस याच घटनेच्या निमित्ताने येथे ‘किल्ले माहुली महोत्सव’च साजरा करण्यात आले होते.

बोगनवेलीच्या अनेकविध प्रकारांचे प्रदर्शन
‘गो ग्रीन’ या नर्सरीतर्फे बोगनवेलीच्या विविध प्रकारांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनात १३ हून अधिक प्रकारातील बोगनवेली पाहता तसेच विकत घेता येणार आहेत. या प्रदर्शनात बेगम सिकंदर (पांढरा ते नाजूक गुलाबी रंगांतरण), ब्लॉण्डी (पिवळसर झाक असलेला गुलाबी), चेरी ब्लॉसम (हलका गुलाबी, वैविध्यपूर्ण), चित्रा (पांढरा ते लाल रंगांतरण), डॉ. भाभा (नारिंगी गुलाबी, रंगीबेरंगी), डॉ. राव (लालसर गुलाबी, रंगीबेरंगी), फॉर्मोसा (जांभळट, लालसर), ग्लाब्रा (गडद जांभळा), लेडी मेरी (पिवळा), महारा (गर्द गुलाबी, रंगीबेरंगी), महात्मा (गर्द गुलाबी), मेरी पामर (शुभ्र गुलाबी), पिंक सुप्रीम (गर्द गुलाबी, रंगीबेरंगी), रोझव्हिल्स डिलाइट (ऑरेंज डबल), शुभ्रा (शुभ्र), थिम्मा (दुहेरी रंगसंगतीचा), टॉर्च ग्लो (गुलाबी), त्रिनिदाद (मॉव्ह.)तसेच १३ पेक्षा जास्त प्रजातींची झाडे ठेवण्यात आली आहेतआकाशीची निळाई, धरित्रीचा आधार, डोंगरदऱ्यांचा विस्तार, गर्द वनराई आणि पाण्याची अथांगता, सजावटीचे किती मार्ग आपल्याला विधात्यानं दिले आहेत? या सर्व दैवी रचनेचाच एक भाग म्हणजे बोगनवेल! जी दगडाधोंडय़ांच्या आधाराने वर जाते, गडकिल्ल्यांना धरून खाली उतरते, आपल्या लखलखीत रंगांनी जमिनीचा पट रंगविते, दुष्काळातही तग धरते आणि सर्व ऋतूंत फुलून आपलं विश्व सजविते.

डॉल्फिनच्या नेटवर्कचा झाला खेळखंडोबा
प्रतिनिधी

मुंबई महानगर टेलिफोन निगमची डॉल्फिन ही भ्रमणध्वनी (मोबाइल) सेवा बुधवारी रात्रीपासून अचानक कोलमडून पडली. गुरुवारी दुपारनंतर ती सुरू झाली असली तरी ती पूर्णत: सुरू न झाल्यामुळे डॉल्फिन धारकांची प्रचंड पंचाइत झाली. मात्र, त्याचवेळी डॉल्फिनधारकांना कंपनीच्या वतीने आम्ही अंधेरी (प.) वर्सोवा आणि महालक्ष्मी येथे नव्या साइट सुरू केल्याचे संदेश पाठवून त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. गेल्या काही दिवसांपासून डॉल्फिनचे नेटवर्क मुंबईत सातत्याने बंद पडत आहे. याबाबात डॉल्फिनच्या ग्राहक कक्षाकडे विचारणा केली असता या नेटवर्कचे ‘अपग्रेडेशन’ सुरू आहे, असे सांगण्यात येत होते. मात्र ठराविक क्षेत्रामध्ये डॉल्फिनचे नेटवर्क पूर्णत: बंद होत असल्याचे निदर्शनास आणून दिल्यावरही लवकरच त्यावर उपाय शोधण्यात येईल, असे सरकारी छापाचे उत्तर देण्यात येत होते. मुंबईतल्या अनेक भागांमध्ये नव्या साइट सुरू करण्यात आल्या असून त्याबाबत सातत्याने त्याचे संदेश पाठवून ग्राहकांना हैराण करण्यात येत होते. काल रात्री १० वाजल्यापासून मुंबईतल्या पूर्व उपनगरामध्ये असणाऱ्या डॉल्फिनधारकांचे भ्रमणध्वनी बंद पडले. वारंवार प्रयत्न करूनही ते सुरू होत नव्हते. सकाळपासून मात्र मुंबईतल्या सगळ्याच डॉल्फिनधारकांना त्याचा अनुभव आला. यामुळे नेमके काय होत आहे, हे कळायलाही मार्ग नव्हता. त्याचवेळी पश्चिम उपनगरामध्ये आणि दक्षिण मुंबईमध्ये नव्या साइट सुरू केल्याचे संदेश पाठविण्याची तत्परता डॉल्फिनकडून दाखविण्यात येत होती. यामुळे ग्राहक प्रचंड हैराण झाले होते. दुपारी पावणेचार वाजण्याच्या सुमारास डॉल्फिनची सेवा पूर्ववत झाल्याचे सांगण्यात आले, तरीही सायंकाळी उशीरापर्यंत ती सेवा सुरळीत झाली नव्हती.