Leading International Marathi News Daily                                  शुक्रवार, १६ जानेवारी २००९
नवनीत

जी व न द र्श न
हलाल-हराम

 

आजपासून अंदाजे साडेतीन हजार वर्षांपूर्वी मोझेस (मूसा अलैहिस्सलाम) नावाचे एक प्रेषित होते. मोझेसना मुस्लिम, ख्रिस्ती आणि यहुदी धर्माचे अनुयायीदेखील मानतात. त्यांनी एकदा पाहिले, की एक गृहस्थ ईश्वरचरणी हात पसरवून अत्यंत अजिजीने दुवा मागत आहे. त्याच्या डोळय़ांतून अश्रुधारा वाहत आहेत. हे दृश्य पाहून प्रेषितांना एकप्रकारे आनंदही झाला की जगात ईश्वराला मानणारे आणि फक्त त्याच्याकडूनच मागणारे लोक अजून आहेत. त्यांनी मनापासून ईश्वराकडे प्रार्थना केली की, या इसमाच्या गरजा पुऱ्या होवोत. त्यांनी दुसऱ्या दिवशीही पाहिले की, आहे त्याच ठिकाणी तोच इसम त्याच स्थितीत दुवा मागत बसला आहे. त्याचे हात उंचावले आहेत आणि डोळय़ांतून अश्रुधारा वाहत आहेत. प्रेषितांना आश्चर्याचा धक्का बसला. त्याची प्रार्थना अद्याप मान्य न झाल्यामुळे त्यांना थोडी खंतही वाटली. परंतु नाईलाज. ते पुढे गेले. तिसऱ्या दिवशीदेखील प्रेषितांनी तेच दृश्य पाहिले. मागणाऱ्यांचे रडणे आणि त्याची स्थिती त्यांना अनावर झाली. त्यांना राहावले नाही. ते ईश्वराशी रास्त संवाद करू शकत होते. त्यांनी ईश्वराला प्रार्थना केली की, ‘हे अल्लाह! मी जर तुझ्या ठिकाणी असलो असतो तर त्याचे मागणे केव्हाचे स्वीकारले असते!!’
अल्लाहकडून प्रेषित मोझेसना उत्तर मिळाले. ‘‘माझ्या प्रिय प्रेषिता! दुवा मागता मागता याचे हात आभाळाला जरी खेटले आणि याच्या अश्रुधारांनी नदीचे जरी रूप घेतले तरी मी याची मागणी पूर्ण करणार नाही, कारण याच्या पोटात जो घास आहे तो हरामाच्या कमाईतून मिळविण्यात आलेला आहे, ज्यामुळे माझ्या चरणी त्याची एकही प्रार्थना स्वीकार होऊ शकत नाही.’’
निषिद्ध आणि वज्र्य वस्तूंमध्ये इस्लामने रिबा (व्याज)चा देखील समावेश केला आहे.
अनीस चिश्ती

कु तू ह ल
बंदिस्त तारकागुच्छ

खुल्या तारकागुच्छाप्रमाणेच बंदिस्त तारकागुच्छ अस्तित्वात आहेत का? त्यांचे वैशिष्टय़ काय आहे?
निरभ्र, काळोख्या रात्री द्विनेत्रीमधून आकाशात नजर फिरवली की अनेक धुरकट, अंधूक पुंजके दिसतात. या पुंजक्यांना ‘तारकागुच्छ’ असे म्हणतात. तारकागुच्छांचे दोन प्रकार आहेत. खुले तारकागुच्छ व बंदिस्त तारकागुच्छ. खुल्या तारकागुच्छातील ताऱ्यांची संख्या १० ते १००० असू शकते व यातील तारे दुर्बिणीमधून सुटे सुटे दिसू शकतात. आकाशातील काही पुंजके मात्र गोलाकार, धूसर व अंधूक दिसतात. चार अथवा सहा इंच व्यासाच्या दुर्बिणीमधूनही यातील तारे सुटे दिसत नाहीत. अशा गोलाकार पुंजक्यांना ‘बंदिस्त तारकागुच्छ’ असे म्हणतात. आकाशात खुल्या तारकागुच्छांच्या तुलनेत बंदिस्त तारकागुच्छांची संख्या बरीच कमी असून आकाशाच्या ठराविक भागात यांची दाटी झालेली दिसते. बंदिस्त तारकागुच्छ आपल्या सूर्यमालेपासून प्रचंड अंतरावर असून त्यांचे सरासरी अंतर ३० हजार प्रकाशवर्ष आहे. इतक्या दूर अंतरावर असूनही धूसर ठिपक्याप्रमाणे दिसणाऱ्या या तारकागुच्छांमध्ये १ लाख ते १० लाख तारे असतात.
दक्षिण आकाशातील नरतुरंग तारकासमूहात १६०३ मध्ये जोहान बायर या खगोलशास्त्रज्ञाने एका अंधूक दिसणाऱ्या ताऱ्याला ‘ओमेगा’ या ग्रीक मूळाक्षराने दर्शविले होते. दुर्बिणीचा शोध लागल्यानंतर काही वर्षांनी हा ओमेगा तारा प्रत्यक्षात एक धूसर, गोलाकार ठिपका म्हणजेच बंदिस्त तारकागुच्छ आहे हे स्पष्ट झाले. असे असले तरीही अजूनही हा बंदिस्त तारकागुच्छ ‘ओमेगा सेंटॉरी’ या नावाने आकाशनिरीक्षकांमध्ये सुप्रसिद्ध आहे. पृथ्वीपासून केवळ १७ हजार प्रकाशवर्ष अंतरावर असणाऱ्या ओमेगा सेंटॉरी तारकागुच्छाचे चार इंच व्यासाच्या दुर्बिणीमधूनही अत्यंत मनोहारी दर्शन होते.
आपल्या आकाशगंगेच्या केंद्राभोवती गोलाकार भागात बंदिस्त तारकागुच्छ पसरलेले आढळतात. आपली सूर्यमाला आकाशगंगेच्या केंद्रापासून एका कडेला ३० हजार प्रकाशवर्ष दूर असल्यानेच बहुतेक बंदिस्त तारकागुच्छ पृथ्वीवरून पाहिल्यास आकाशात दिसणाऱ्या आकाशगंगेच्या केंद्राच्या दिशेने दिसतात. याच दिशेला धनु तारकासमूह असून वृश्चिक, धनु या भागात अनेक बंदिस्त तारकागुच्छ दिसतात. बंदिस्त तारकागुच्छातील तारे साधारणपणे १० अब्ज वर्षे वयाचे असतात.
प्रदीप नायक
मराठी विज्ञान परिषद, विज्ञान भवन, वि. ना. पुरव मार्ग, शीव-चुनाभट्टी (पूर्व), मुंबई ४०००२२
दूरध्वनी - (०२२)२४०५४७१४ , २४०५७२६८

दि न वि शे ष
राणा अमरसिंह पहिला

महाराणा प्रतापचा मुलगा अमरसिंह याने मेवाडची गादी तर अबाधित राखलीच, पण अकबराचा मुलगा जहांगीरला पराभूत करून चितोडगडही जिंकून घेतला; पण वारंवारच्या मोगली आक्रमणांपुढे टिकाव लागेना. शहाजहानच्या फौजा धडकल्यावर त्याने तह केला, पण मोगलांच्या दरबाराची पायरी न चढता.. त्याचा मुलगा राजा कर्ण याला मात्र मोगलांची मनसबदारी स्वीकारावी लागली. न्यायासाठी प्रसिद्ध, जमीनसुधारणांमुळे शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या अमरसिंहने वानप्रस्थाश्रम स्वीकारला. १६ जानेवारी १६२३ ला त्याचे उदयपूरला निधन झाले.
संजय शा. वझरेकर

गो ष्ट डॉ ट कॉ म
सुनील बदलला

तिसऱ्या वर्गात शिकणाऱ्या अथर्वचा आज वाढदिवस होता. शेटय़ेसरांना ते ठाऊक होते. त्यांनी अथर्वला देण्यासाठी गोष्टींचे पुस्तक बॅगेत आहे का, त्याची खात्री करून घेतली आणि वर्गात प्रवेश केला. अथर्वचे वडील रिक्षा चालवायचे आणि आई शिवणकाम करायची. शेटय़ेसरांनी वर्गात वाटायला ग्लुकोज बिस्किटे आणली होती. वर्गाला उद्देशून सर म्हणाले, ‘बरं का मुलांनो, आज अथर्वच्या वाढदिवसानिमित्त हे गोष्टींचे पुस्तक आणि शुभेच्छा त्याला देऊया आणि सगळय़ांना बिस्किटे मिळतील.’
मुले खूश झाली. अथर्वला शुभेच्छा देऊन बिस्किटांचा चट्टामट्टा झाला. सरांचे सुनीलकडे लक्ष गेले. त्याने मात्र बिस्किटे न खाता बाकाच्या खालच्या कप्प्यात हळूच ठेवली होती. नंतर एकदा शुक्रवारनिमित्त शाळेत सगळय़ांना साखरफुटाणे वाटले. शेटय़ेसरांचे सुनीलकडे लक्ष होते. त्याने फुटाणे ठेवून दिले. कुणा मुलीने वाढदिवसाला लिमलेटच्या गोळय़ा वाटल्या, त्याही त्याने खाल्ल्या नाहीत. मग मात्र शेटय़ेसरांनी मधल्या सुटीत गुबगुबीत अंगाच्या, इस्त्रीचे कपडे घातलेल्या सुनीलला बोलावून कारण विचारले. नाक उडवून आढय़तेने सुनील म्हणाला, ‘मी फक्त कॅडबरी आणि क्रीमची बिस्किटेच खातो. गोळय़ा, फुटाणे नाही.’ सुनीलच्या घरची आर्थिक स्थिती उत्तम होती. वडील निष्णात सर्जन होते. आई बँकेत ऑफिसर होती. तो शाळेला रोज गाडीने येई व जाई. कधी कुणाला सोबत नेऊन सोडत नसे. शेटय़ेसर सुनीलला जवळ बोलावून म्हणाले, ‘बाळा, तू वर्गात येतोस तेव्हा इतरांच्या सारखाच एक असतोस. श्रीमंत-गरीब, उच्च-नीच शाळेत कुणी नसतो. सगळे सारखेच असतात. सारखा गणवेश एवढय़ासाठीच घालायचा, की आपण सगळे बरोबरीचे आहोत. एकमेकांसारखे आहोत, ही वृत्ती निर्माण व्हावी. एखाद्याने प्रेमाने दिलेल्या गोष्टीचा अव्हेर करणे ती देणाऱ्या व्यक्तीला अपमानास्पद असते. अरे, कुणीही प्रेमाने दिलेली गोष्ट उत्तमच असते. श्रीकृष्णाने नाही का सुदाम्याचे पोहे, तो राजा असूनही आनंदाने खाल्ले. पंडित नेहरू उच्चशिक्षणासाठी इंग्लंडला गेले तेव्हा त्यांच्या वडिलांनी फिरण्यासाठी गाडीची व्यवस्था केली, पण जवाहरलालजी ती गाडी वापरत नसत. मित्रांबरोबर पायीच फिरत. वेद, पुराण व इतर प्राचीन कथांमधून आपण काहीच नाही का शिकायचं? आपापसातले भेदभाव नाहीसे करून सगळय़ांशी समानतेने वागता आले तर शिक्षणाचा खरा उपयोग होईल.’ नंतर सर या विषयावर सुनीलशी कधी बोलले नाहीत. एकदा कधीतरी डबा खाताना सुनील मित्राच्या डब्यातली शेंगदाण्याची चटणी-भाकरी खाताना पाहून ते मंदपणे समाधानाने हसले. का ते मात्र इतरांना कळले नाही. वर्गातल्या प्रत्येकाशी समानतेने वागा. भेदभाव करू नका. आजचा संकल्प- तुमच्याबरोबरीचा वाटत नाही, असा वर्गातला विद्यार्थी किंवा शारीरिक व्यंग असलेला विद्यार्थी यांच्याशी ओळख वाढवा. हळूहळू मैत्री होईल.
ज्ञानदा नाईक
dnyanadanaik@hotmail.com