Leading International Marathi News Daily                                  शुक्रवार, १६ जानेवारी २००९

महापालिकेच्या एक हजार कोटींच्या अर्थसंकल्पाला निधीची वानवा
जयेश सामंत

नवी मुंबई : शहरातील श्रीमंत महापालिकांमध्ये गणल्या जाणाऱ्या नवी मुंबई महापालिकेचा सन २००८-२००९ सालचा अर्थसंकल्प म्हणजे फुसका बार ठरला असून, मागील वर्षभरात आपल्या तिजोरीत सुमारे एक हजार कोटींची गंगाजळी उभी करण्याच्या बाता मारणाऱ्या महापालिका प्रशासनाला उत्पन्नाचे ‘टार्गेट’ पूर्ण करताना अक्षरश: फेस आला आहे. या वर्षभरात सुमारे ४०० कोटींचा निधी आपल्या झोळीत पडावा, यासाठी दिल्लीकडे डोळे लावून बसलेल्या प्रशासनाला जवाहरलाल नेहरू विकास योजनेंतर्गत अजून एकही रुपया पदरात पाडून घेता आलेला नाही. यात भर म्हणून की काय, एमएमआरडीएकडून अपेक्षित धरण्यात आलेल्या कर्जानेही महापालिकेस यावर्षी गुंगारा दिल्याने मागील वर्षीच्या सगळ्या योजना पुढच्या वर्षांत जशाच्या तशा मांडण्यावाचून आता आयुक्त विजय नाहटा यांना पर्याय राहिलेला नाही.

नेरुळच्या अग्निशमन दलास मंदीचे विघ्न
नवी मुंबई/प्रतिनिधी : नवी मुंबईतील सर्वात मोठे उपनगर म्हणून मागील काही वर्षांपासून झपाटय़ाने विकसित झालेल्या नेरुळ परिसरात अग्निशमन केंद्र उभारण्याचा प्रस्ताव पुन्हा एकदा रखडण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. या भागात अग्निशमन केंद्र उभारावे, यासाठी स्थानिक रहिवाशांचा दबाव दिवसागणिक वाढत असतानाही महापालिका आयुक्त विजय नाहटा यांनी जागतिक मंदीचे कारण पुढे करत या केंद्राचे नियोजित बांधकाम पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्याने आश्चर्य व्यक्त होऊ लागले आहे. विशेष म्हणजे, एरवी औद्योगिक परिसरातील अग्निशमन केंद्र आपल्या पदरात पडावे, यासाठी कमालीचा आग्रह धरणाऱ्या आयुक्तांनी आता अग्निशमन व्यवस्थेवर किती खर्च करावा, असा प्रश्न सर्वसाधारण सभागृहात उपस्थित केल्याने त्यांच्या एकूण भूमिकेविषयी प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

निवृत्तीवेतनातील अन्याय्यकारक तफावत दूर करण्याची मागणी
बेलापूर/वार्ताहर : सैन्यदलातील जवानांना निवृत्तीनंतर दिल्या जाणाऱ्या वेतनातील तफावत दूर करण्यात यावी, तसेच सहाव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन लागू करावे, यासाठी नवी मुंबईतील सर्व माजी सैनिकांनी दोन दिवसांचे लाक्षणिक उपोषण सीबीडीतील कोकण भवनसमोर गुरुवारपासून सुरू केले आहे. १९९६ मध्ये निवृत्त झालेल्या सैनिकांना पाच हजार ३००, तर २००६ साली निवृत्त झालेल्यांना आठ हजार रुपये निवृत्तीवेतन दिले जाते. निवृत्तीवेतनातील या फरकाच्या निषेधार्थ सैनिकांनी वारंवार आंदोलने केल्यानंतर २००४ साली राष्ट्रपतींनी वेतन निश्चिती करण्याचे संकेत दिले होते; मात्र ती कार्यवाही अद्याप न झाल्याने देशभरातील निवृत्त सैनिकांनी आता पुन्हा एकदा लोकशाही मार्गाने आंदोलन सुरू केले आहे. नवी मुंबईत २० हजार निवृत्त सैनिक राहात असून दिल्लीतील या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी दोन दिवसांचे लाक्षणिक उपोषण करत असल्याचे निवृत्त लेफ्टनंट कर्नल डी. पी. सिंह यांनी सांगितले.

‘राष्ट्र रक्षणासाठी सर्वांनी संघटित होणे आवश्यक’
बेलापूर/वार्ताहर : केवळ १० पाकिस्तानी अतिरेक्यांनी सव्वा कोटी जनतेस दोन दिवसांहून अधिक काळ वेठीस धरल्याने राष्ट्राला दहशतवादी कारवायांनी नामोहरम केल्याचे स्पष्ट झाले. हे दहशतवादी कारनामे नेस्तनाबूत करून राष्ट्र रक्षणासाठी सर्वांनी एकत्र येणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन हिंदू जनजागृती समितीचे मुंबई जिल्हा समन्वयक शिवाजी वटकर यांनी पत्रकार परिषदेत केले. समितीतर्फे राष्ट्र रक्षण व धर्म जागृतीसाठी नेरुळ (सारसोळे) मैदान येथे १७ जानेवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजता धर्मजागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
पाश्चिमात्य संस्कृतीच्या अंधानुकरणामुळे भारतीय संस्कृतीचा भारतीयांनाच विसर पडत चालला आहे. आपल्या महान संस्कृतीचे आचरण, सण, उत्सव शास्त्रशुद्ध पद्धतीने कसे साजरे करावेत, धर्मावरील आक्रमणांना विरोध करणे, दहशतवाद थोपविण्यासाठी सर्वांनी कसे प्रयत्न करावेत, धर्मावरील आक्रमणांना विरोध करणे व धर्माचरण कसे करावे, याचे महत्त्व सांगण्यासाठी ही सभा आयोजित केल्याचे वटकर यांनी सांगितले. या सभेला वक्ते म्हणून अखिल भारतीय सिंधी शिक्षा व साहित्य संघाचे अध्यक्ष प्रेम तोलानी, धर्मशक्ती सेनेचे विनय पानवळकर, सनातन संस्थेचे अभय वर्तक, हिंदू जनजागृती समितीचे रमेश शिंदे, दोपहरका सामनाचे संपादक प्रेम शुक्ल हे उपस्थित राहणार आहेत. जास्तीत जास्त राष्ट्रप्रेमींनी या सभेस उपस्थित राहावे, असे आवाहन वटकर यांनी केले आहे.

नवी मुंबई महापौर चषक क्रीडा स्पर्धेची आज सांगता
बेलापूर/वार्ताहर : नवी मुंबई महापालिकेच्या शिक्षण मंडळातर्फे आयोजित नवी मुंबई महापौर चषक शालेय क्रीडास्पर्धेस नवी मुंबईतील विविध शाळांनी सहभाग घेऊन उत्तम प्रतिसाद दिला. १३ जानेवारीपासून सुरू झालेल्या या क्रीडास्पर्धांची सांगता १६ जानेवारी रोजी होणार आहे. विद्यार्थ्यांच्या क्रीडागुणांना उत्तेजन व हक्काचे व्यासपीठ मिळावे यादृष्टीने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेच्या अंतिम फेरीचे उद्घाटन व पारितोषिक वितरण समारंभ महापौर अंजनी भोईर यांच्या हस्ते होणार आहे. नवी मुंबईत क्रीडाविषयक जाणीव जागृत होणे व क्रीडा संस्कृतीच्या संवर्धनासाठी मनपा शाळांतील क्रीडा शिक्षकांचे प्रशिक्षण शिबीर शिक्षण मंडळ व क्रीडा समितीच्या माध्यमातून आयोजित करण्यात आले होते. या वर्षीच्या स्पर्धा कोपरखैरणे येथील रा.फ. नाईक शाळा व सेंट मेरी शाळेच्या मैदानात भरविण्यात आल्या असून, यात मनपाच्या ६२ शाळांसह खासगी अनुदानित ५४ शाळांतील विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला आहे. शिक्षण मंडळाचे सभापती रवी अय्यर यांनी विभागस्तरावरील क्रीडास्पर्धांचे उद्घाटन केले. कबड्डी, खो-खो, लांब उडी, उंच उडी आदी विविध स्पर्धांमध्ये सुमारे दोन हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे. अंतिम स्पर्धा व बक्षीस वितरण रा.फ. नाईक शाळेत १६ जानेवारी रोजी ४ वाजता होणार आहे.

१९८४ चे शेतकरी आंदोलन; स्मृतिदिनानिमित्त पवार उरणमध्ये
उरण/वार्ताहर : उरण- जासई येथील १९८४ च्या शेतकरी आंदोलनाला १६ जानेवारी रोजी २५ वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने नामदेव घरत (चिर्ले), रघुनाथ ठाकूर (धुतूम), महादेव पाटील, केशव पाटील, कमळाकर तांडेल (सर्व पागोटे) या हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. महात्मा फुले सामाजिक प्रबोधन व परिवर्तन प्रतिष्ठान जासई यांच्या वतीने आयोजित कार्यक्रम लोकनेते दि.बा. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. याप्रसंगी हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यासाठी व उपस्थितांना मार्गदर्शन करण्यासठी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार, उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, ऊर्जामंत्री सुनील तटकरे उपस्थित
राहणार आहेत, तसेच ठाण्याचे पालकमंत्री गणेश नाईक, नांदेडचे पालकमंत्री रवींद्र पाटील, मृणाल गोरे, अहिल्याबाई रांगणेकर, सिडको अध्यक्ष नकुल पाटील, राजिप अध्यक्षा नीलिमा पाटील, नवी मुंबई महापौर अंजनी भोईर, ठाणे जिल्हा परिषद अध्यक्षा रेखा पष्टे, आमदार विवेक पाटील, आमदार मधुकर ठाकूर, रामशेठ ठाकूर व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.