Leading International Marathi News Daily                                  शुक्रवार, १६ जानेवारी २००९

आनंदाचे डोही आनंद तरंग.. सध्याचा काळ संक्रमणाचा. स्थलांतरीत पक्षीही नेमके याच काळात नाशिक नजीकच्या नांदुरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात मोठय़ा प्रमाणावर येत असतात. याशिवाय जिल्ह्य़ाच्या पश्चिम पट्टय़ात असलेल्या पाणथळ जागांवर देखील या सुमारास पाणपक्ष्यांचे अस्तित्व दिसू लागते. एरवी सहसा दृष्टीस न पडणारे हंसवर्गीय पट्टकादंब (बार हेडेड गूज) सध्या वाघाड परिसरात दिसून येत आहेत. पाण्यावर स्वच्छंद विहार करणारे हे पट्टकादंब कॅमेराबंद केले आहेत, नेचर कॉन्झर्वेशन सोसायटी ऑफ नाशिकचे अध्यक्ष विश्वरूप राहा यांनी.

बलात्काराच्या तक्रारीवरून ‘फरशीवाले बाबा’ला अटक
वार्ताहर / त्र्यंबकेश्वर

देशभरातील हजारो रुग्णांना जडीबुटी औषधांची भुरळ पाडून आपला दबदबा निर्माण करण्यात यशस्वी झालेल्या येथील रघुनाथ जाधव ऊर्फ फरशीवाले बाबा उर्फ देवबाप्पा ओझरखेडकर महाराज यास उपचारासाठी आलेल्या महिलेवर बलात्कार केल्याच्या संशयावरून गुरूवारी त्र्यंबकेश्वर पोलिसांनी अटक केली. या खळबळजनक घटनेमुळे केवळ बाबांच्या भाविक व रुग्णांमध्येच नव्हे तर सर्वसामान्यांमध्येही खळबळ उडाली आहे. विज्ञानयुगात रुग्णाच्या डोक्यावर फरशी ठेवून रोगाचे निदान तसेच उपचार करण्याची विचित्र पद्धत संशयित बाबाने स्वीकारली होती. असाध्य रोगावर उपचार घेण्यासाठी मध्य प्रदेशातून आलेल्या महिलेवर बाबाने २००५ मध्ये बलात्कार केल्याचे पोलिसांकडे दाखल तक्रारीत म्हटले आहे. त्र्यंबकेश्वरपासून दोन किलोमीटरवर असलेल्या तळवाडे परिसरातील देवबाप्पा आश्रमधाम येथे ही घटना घडल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. मध्य प्रदेशातील एक महिला उपचारासाठी २००५ मध्ये फरशीवाले बाबा यांच्या नाशिक जिल्ह्य़ातील आश्रमात गेली असताना हा प्रकार घडला, असे तक्रारीत म्हटले आहे. ज्यावेळी पहिल्यांदा ती आश्रमात आली तेव्हा आजार बरा करण्याचे आमिष दाखवून बाबांनी जाळ्यात ओढले. गुंगीचे औषध देऊन बलात्कार करण्यात आला.

परिसंवाद, कथाकथनामुळे साहित्य संमेलनात बहार
वार्ताहर / नंदुरबार

जिल्ह्य़ातील पहिल्याच साहित्य संमेलनातील उद्घाटन सत्र कविवर्य ना. धों. महानोर यांनी गाजविल्यानंतर परिसंवाद, काव्य संमेलन, कथाकथन या कार्यक्रमांनीही साहित्य प्रेमींना खिळवून ठेवले. ‘माझ्या साहित्याच्या प्रेरणा’ या विषयावरील परिसंवादातून माणूस हाच साहित्याची प्रेरणा असल्याचा सूर निघाला. महानोर यांनी उद्घाटनाच्या सत्रात जिल्ह्य़ातील समस्या साहित्यिकांनी मांडण्याचे आवाहन करतानाच शेतकऱ्यांच्या वेदनाही प्रकर्षांने मांडल्या. त्यानंतर परिसंवादाचे सत्र सुरू झाले. या परिसंवादात मान्यवरांनी आपल्या साहित्याची प्रेरणा कोण, याविषयी मत प्रदर्शन केले. साहित्याची प्रेरणा वेगवेगळी असली तरी त्यांचे सूत्र माणुसच असतो. जीवनातील सुखदु:खासह विविध अनुभव, मनातील अस्वस्थता अशा अनेक गोष्टी साहित्य निर्मितीत येत असतात, असा सूर अनेकांनी आळवला. या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी डॉ. मु. ब. शहा होते. प्रा. अनिल सोनार, डॉ. विश्वास पाटील, उज्ज्वल कुलकर्णी, डॉ. पितांबर सरोदे, प्रा. जीवन जगदाळे, प्रा. नंदकुमार कुलथे यांनी परिसंवादात सहभाग घेतला. डॉ. पाटील यांनी जे पेरावे तेच उगवते, असे सांगितले.

‘द्वारका सर्कल’ हटवावे
नाशिक शहरातील वाहतुकीचा प्रश्न दिवसेंदिवस जटिल बनत आहे. नाशिक ‘वृत्तान्त’च्या माध्यमातून त्यावर वेळोवेळी प्रकाश टाकण्यात येतो. शहरातील नेहमीच गजबजलेल्या, वाहतूक कोंडीने त्रस्त असणाऱ्या काही विशिष्ट भागांबाबत नागरिकांच्या ज्या सूचना आहेत, त्यासाठीही ‘वृत्तान्त’चे व्यासपीठ नेहमीच खुले असते. या व्यासपीठावरून अॅड. दीपक बनकर यांनी द्वारका चौकातील वाहतूक व्यवस्थेविषयी केलेल्या सूचना.. शहराचा विचार केला तर द्वारका हा भाग सर्वाधिक गजबजलेल्या परिसरापैकी एक आहे, यात शंकाच नाही. पण, त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे येथे दोन महामार्ग एकमेकांना छेद देत असल्याने या भागातून जाणारी अवजड वाहने व त्यांची संख्या लक्षात घेता द्वारका परिसर वाहतुकीच्या दृष्टीने तेवढाच धोकादायकही आहे. त्यातच सध्या तेथे वाहतूक बेट व सिग्नल अशी दुहेरी यंत्रणा आहे. वाहतूक बेटामुळे दोन सिग्नलमधील अंतर वाढले आहे. त्यामुळे एका बाजुचा सिग्नल सुटल्यावर दुसऱ्या बाजुला पोहोचेपर्यंत दुसरा सिग्नल सुरू होतो. त्यामुळे वाहनधारक बुचकळ्यात पडतात. शिवाय, बेशिस्त वाहनधारकांवर वचक ठेवण्यासाठी परिसरात कायम दोन-तीन वाहतूक पोलीस तैनात ठेवावे लागतात. हे पाहता, सध्याचे वाहतूक बेट (सर्कल) हटविले गेल्यास दोन सिग्नलमधील अंतर कमी होऊ शकेल. शिवाय, तेथे एखाददुसरा पोलीस तैनात केला तरी वाहतूक नियंत्रणाचे काम भागू शकेल. त्याचप्रमाणे मुंबई-आग्रा महामार्गाला समांतर जे सव्र्हिस रोड बनविले आहेत, ते देखील द्वारका येथे येऊन मिळतात. विविध दिशेने वाहने तेथे एकत्र येत असल्याने वाहतूक व्यवस्थेचा एकच गोंधळ उडतो. हे लक्षात घेता, या सव्र्हिस रोडवरून होणाऱ्या वाहतुकीचे नियंत्रण योग्य तऱ्हेने होणे आवश्यक आहे. विशेषत: पायी चालत रस्ता ओलांडणाऱ्यांना खूप अडचणी येतात. कोणते वाहन कुठून कधी कसे येईल, ते सांगता येत नाही. त्यामुळे अपघाताची मोठी शक्यता निर्माण होते. त्यामुळे सर्कलपासून किमान ५०० फूट अंतरावर दोन्ही सव्र्हिस रोड बंद करून वाहतूक मुख्य रस्त्यास जोडणे आवश्यक आहे. तसेच या भागात तातडीने उड्डाण पूल साकारण्याचीही गरज आहे.

भाविकांची फसवणूक; ट्रॅव्हल्स संचालकाविरोधात तक्रार
वार्ताहर / वणी

तीर्थयात्रेला घेऊन जाण्याचे निमित्त करीत भाविकांकडून लाखो रूपये घेऊन पोबारा केलेल्या दिंडोरी तालुक्यातील धर्मराज ट्रॅव्हल्सच्या संचालकाविरोधात पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. लोखंडेवाडीतील हरिश गावंडे या धर्मराज ट्रॅव्हल्सच्या संचालकाने नाशिक जिल्ह्य़ातील विविध गावांमध्ये वृध्द भाविकांना तीर्थयात्रेला नेण्याचे निमित्त करीत दहा हजारांपासून लाख रूपयांपर्यंत जमा केले होते. एक जानेवारीचा मुहुर्तही यात्रेसाठी ठरला होता. परंतु गाडीच आली नाही. गावंडेही कुटुंबासह घरी नसल्याचे दिसून आले. त्यामुळे दिंडोरी, वणी तसेच देवळासह अन्य ठिकाणच्या पोलीस ठाण्यांमध्ये धाव घेऊन फसविले गेल्याची तक्रार दिली. वणी पोलीस ठाण्यात अरविंद भुसाळ, उत्तम उफाडे यांनी तक्रार अर्ज दिला आहे. पिंपळगाव बसवंत येथील किराणा दुकानाचे मालक रितेश खाबिया यांनी गावंडे यांना पकडून देणाऱ्यास अथवा माहिती देणाऱ्यास पाच हजार रूपयांचे बक्षीसही जाहीर केले आहे. गावंडे हा पाऊण कोटीपेक्षा अधिक रूपये जमा करून फरार झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

विभागीय सहनिबंधकपदी यमपल्ले
प्रतिनिधी / नाशिक

मंत्रालयातील विशेष कार्यकारी अधिकारी बी. एस. यमपल्ले यांनी नाशिक विभागीय सहनिबंधक म्हणून स३त्रे स्वीकारली आहेत. एम. ए. मोरे यांची मुंबई येथे यंत्रमाग महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती झाल्याने त्यांच्या जागी यमपल्ले हे आले आहेत. सहकारी संस्थांच्या गैरप्रकारांची चौकशी करून त्यांच्याविरूध्द कायदेशीर कारवाई करण्याचा मनोदय यमपल्ले यांनी व्यक्त केला असला तरी त्यांच्यासमोर आव्हान मोठे आहे. बडय़ा कर्जदारांविरूध्द कारवाई होत नसल्याने ठेवीदारांचे पैसे देण्यासाठी पैसा आणायचा कुठून, असा प्रश्न पतसंस्था संचालकांकडून उपस्थित करण्यात येत आहे. अशा परिस्थितीत यमपल्ले कोणती भूमिका घेतात, याकडे ठेवीदारांचेही लक्ष लागून आहे.

लाडशाखीय वाणी मंडळातर्फे गुणगौरव सोहळा
नाशिक / प्रतिनिधी
आजच्या बदलत्या सामाजिक परिस्थितीत विद्यार्थी घडविण्याची जबाबदारी गुरूजनांएवढीच पालकांची असल्याने स्वयंपूर्ण व सक्षम पाल्य घडविण्यासाठी पालकांनी आपली मानसिकता बदलून आजचा विद्यार्थी उद्याचा बलशाली नागरिक बनविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन मालेगाव येथील डॉ. भालचंद्र येवला यांनी केले. ताहाराबाद येथील लाडशाखीय वाणी समाज मंडळाच्या वतीने आयोजित विद्यार्थी व धन्वंतरींच्या उपासक गुणगौरव सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी व्यापारी हेमंत नेरकर हे होते. प्रास्तविक वाणी समाज मंडळाचे अध्यक्ष सचिव कोठावदे यांनी केले. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. सुभाष ढोमणे, डॉ. अनिल भोकरे, डॉ. मनोज दशपुते, डॉ. मिलींद कोतकर, डॉ. रमाकांत शिरोडे, डॉ. जगदीश दामणे आदी मान्यवर उपस्थित होते. ताहाराबाद येथील महाराष्ट्र प्रदेश एनएसयुआयचे सरचिटणीस सचिन कोठावदे, बागलाण तालुका भाजपाचे खजिनदार बाळकृष्ण ब्राह्मणकर, ताहाराबाद सोसायटीचे संचालक काशिनाथ ढोणे, राजासागर पतसंस्थेचे उपाध्यक्ष प्रकाश केले, संचालक रमेश नेरकर, एकता पतसंस्थेचे संचालक निलेश घरटे, शरद ढोमणे, ताहाराबाद केंद्रात दहावीत प्रथम आलेली विद्यार्थिनी अर्चना शिरोडे यांचा विशेष सत्कार झाला. ४५ गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र, पेन देऊन सन्मानित करण्यात आले. सूत्रसंचालन अर्चना शिरोडेने केले तर आभार निलेश घरटे यांनी मानले

लोकशाहीदिनी येणाऱ्या समस्यांचे त्वरित निराकरण करण्याचे निर्देश
नाशिक / प्रतिनिधी

लोकशाही दिनाबद्दल जनतेमध्ये विश्वासार्हता वाढत असून या व्यासपीठावर येणाऱ्या समस्यांचे तात्काळ निरसन करून अधिकाऱ्यांनी सामाजिक व प्रशासकीय बांधिलकी जोपासावी हाच नवीन वर्षांचा संकल्प असल्याचे प्रतिपादन नाशिक विभागाचे अप्पर आयुक्त सुभाषचंद्र येवले यांनी येथे विभागीय महसूल कार्यालयात आयोजित लोकशाही दिन कार्यक्रमात केले. यावेळी जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता न. ल. गवळे, विभागीय समाजकल्याण अधिकारी लक्ष्मीकांत महाजन, उपायुक्त ओमप्रकाश देशमुख, भूमी अभिलेख विभागाचे उपसंचालक मुळे, उपजिल्हाधिकारी प्रज्ञा बडे, पोलीस उपायुक्त सुभाष निलेवाड आदी उपस्थित होते. लोकशाही दिनात एकूण २१ अर्ज दाखल करण्यात आले. त्यात महिला अर्जदारांचे प्रमाण जास्त आहे. यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय धुळे एक, जळगाव तीन, नाशिक व अहमदनगर दोन, नंदुरबार एक, पोलीस आयुक्त कार्यालय तीन, जामनेर नगरपालिका एक, नाशिक महानगरपालिका चार, विभागीय सहकारी संस्था नाशिक दोन, जिल्हा परिषद अहमदनगर एक, उपसंचालक भूमी अभिलेख नाशिक एक, असे अर्ज दाखल करण्यात आले. आतापर्यंत विभागीय लोकशाही दिनात एकूण ३७० तक्रार अर्ज दाखल झाले असून यापैकी ३५१ अर्ज निकाली काढण्यात आले असून ११ अर्ज प्रलंबित आहेत. उर्वरित तक्रारींचा निपटारा लवकरात लवकर करण्याची सूचनाही अप्पर आयुक्त येवले पाटील यांनी यावेळी केली.

सत्यशोधक छत्रपती ज्ञानपीठाचे आवाहन
नाशिक / प्रतिनिधी

सत्यशोधक क्रांतिजोती तसेच संविधान प्रज्ञाज या दोन्ही परीक्षा नऊ ऑगस्ट रोजी होणार असून विद्यार्थ्यांनी त्यात मोठय़ा संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन सत्यशोधक छत्रपती ज्ञानपीठाने केले आहे. सत्यशोधक ज्ञानपीठ गेल्या १५ वर्षांंपासून पुरोगामी अभ्यासक्रमावर परीक्षा घेत आहे. सत्यशोधक क्रांतिजोती परीक्षेसाठी महात्मा जोतीराव फुले व क्रांतिजोती सावित्रीबाई फुले यांचे संपूर्ण अखंड-काव्य ग्रंथ तर संविधान प्रज्ञाज परीक्षेसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या ‘खरेखुरे संविधान’ या ग्रंथाचा अभ्यासक्रमात समावेश आहे. एक व्यक्ती एकावेळी अनेक परीक्षा देवू शकते. परीक्षांना बसण्यासाठी शिक्षण अथवा वयाची अट नाही. सर्व परीक्षा अखंड सुरू असल्याने कोणत्याही वर्षी, कोणत्याही परीक्षेपासून सुरूवात करून पदवी मिळवता येते. तीन परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर सत्यशोधक पदवी, पाच परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर सत्यबोधी तर दहा परीक्षेनंतर सत्यशोधक प्रबुद्ध पदवी मिळते, अशी माहिती शोभाताई देवरे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. या संदर्भात अधिक माहिती व नाव नोंदणीसाठी आनंद ए-२, आकाशवाणी केंद्रामागे, गंगापूर रोड, नाशिक ४२२०१३ या पत्त्यावर अथवा ९४२२७-८८५४६ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

गैरमार्गाने मालमत्ता जमविणाऱ्या सेवानिवृत्त विद्युत कर्मचाऱ्यास अटक
नाशिक, १५ जानेवारी / प्रतिनिधी

ज्ञात उत्पन्नाच्या स्त्रोतापेक्षा गैरमार्गाने मालमत्ता जमविल्याच्या आरोपाखाली येथील विद्युत वितरण कंपनीतील सेवानिवृत्त लिपीक शंकर ताडगे यास आज सरकारवाडा पोलिसांनी अटक केली. ताडगे हे लिपीक म्हणून कार्यरत असताना नऊ ऑगस्ट १९७६ ते ३१ डिसेंबर २००३ या कालावधीत त्यांनी अवैध प्रकारे जमीन, प्लॉट, बंगला, वाहने अशी एकूण ३१ लाख ४६ हजार ५३१ रूपयांची मालमत्ता जमा केली. त्यांना पत्नी शोभा ताडगे यांनीही मदत केल्याचे उघड झाले. सरकारवाडा पोलीस ठाण्यात त्यांच्याविरूध्द आज गुन्हा दाखल करण्यात आला आहे.