Leading International Marathi News Daily                                  शुक्रवार, १६ जानेवारी २००९
विशेष

(सविस्तर वृत्त)

हमारा बजाज
 
स्वातंत्र्यचळवळीत पाळेमुळे असलेला आणि प्रामुख्याने महाराष्ट्रात प्रकल्प असलेल्या परंतु देशव्यापी अस्तित्व असलेल्या बजाज उद्योग समूहाची नववर्षांच्या प्रारंभीच फाळणीअखेर सर्वसंमतीने मान्य झाली आणि गेली सहा वर्षे सुरू असलेल्या वादावर पडदा पडला. अंबांनी बंधुंमधील फाळणी याहून कमी वेळात म्हणजे साडेतीन वर्षांत झाली होती. त्या तुलनेत बजाज समूह आकारमानाने लहान असूनही यातील मतभेद संपुष्टात यायला सहा वर्षांचा कालावधी लागला. आता बजाज समूह दोन विभागात म्हणजे राहुल बजाज आणि शिशिर बजाज यांच्यात विभागला गेला आहे. बजाज समूहातील कंपन्या कशा प्रकारे विभागून घ्यायच्या हा एक मोठा प्रश्न होता, त्यामुळेच उभयतातील वाटणी व्हायला विलंब लागला होता; परंतु आता ही विभागणी पूर्ण झाली आहे. देशातील सर्वात मोठी साखर उत्पादन कंपनी बजाज हिंदुस्थानवर आता पूर्णत: शिशिर बजाज यांचा ताबा असेल. या कंपनीत असलेला राहुल बजाज यांचा २९.६ टक्के वाटा शिशिर बजाज यांच्या नावे हस्तांतरित केला जाईल. बजाज हिंदुस्थानप्रमाणे बजाज कन्झ्युमर केअर ही कंपनीदेखील शिशिर बजाज यांच्याकडे येणार आहे. बजाज समूह म्हणून यापुढे राहुल बजाज यांचा समूह ओळखला जाईल. या समूहाच्या ताब्यात बजाज ऑटो, बजाज इलेक्ट्रिकल्स, बजाज फिन सव्‍‌र्हिस, मुकंद लि., बजाज होल्डिंग्ज अ‍ॅण्ड इन्व्हेस्टमेंट, हक्र्यिुलस हॉइस्ट या कंपन्या असतील.
महात्मा गांधींचे जवळचे सहकारी व स्वातंत्र्यसेनानी जमनालाल बजाज यांनी बजाज समूहाची स्थापना केली. जमनालालजींचे नातू हे राहुल बजाज. तसे पाहता बजाज समूह भरभराटीस आला राहुलजींच्या कालखंडात. जमनालाल बजाज यांना कमलनयन बजाज व रामकृष्ण बजाज हे दोन मुलगे होते. कमलनयन यांना दोघे चिरंजीव एक राहुल आणि दुसरे शिशिर. रामकृष्ण बजाज यांना शेखर, मधुर व नीरज अशी तीन मुले. समूहाची मुख्य होल्डिंग कंपनी बजाज सेवाश्रममध्ये रामकृष्ण व कमलनयन यांचा प्रत्येकी ५० टक्के वाटा होता. तिसऱ्या पिढीकडे हा वाटा चालून आल्यावर कमलनयन यांची मुले राहुल व शिशिर यांना यातील प्रत्येकी २५ टक्के वाटा मिळाला. तर शेखर, मधुर व नीरज यांच्या वाटय़ाला प्रत्येकी १६.६७ टक्के वाटा आला. राहुल बजाज हे बजाज ऑटो ही कंपनी पाहत होते. तर मधुर बजाज हेदेखील या कंपनीत लक्ष घालीत. बजाज हिंदुस्थान शिशिर यांच्याकडे, बजाज इलेक्ट्रिकल्स शेखर यांच्याकडे तर मुकंद नीरज यांच्याकडे होती. बजाज समूहाची ही तिसरी पिढी सक्रिय काम करीत होती, तोपर्यंत कधी प्रश्न उद्भवला नाही. मात्र चौथी तरुण पिढी कंपन्यांमध्ये सक्रिय झाल्यावर प्रश्न उद्भवणे स्वाभाविकच होते. प्रामुख्याने शिशिर बजाज यांचे चिरंजीव कुशाग्रा यांना प्रत्येकाचे कंपन्यांचे होल्डिंग्ज व जबाबदाऱ्या याबाबत स्पष्ट मत पाहिजे होते. बजाज ऑटोच्या वित्तीय सेवा कंपनीतील समूहातील सदस्यांचा वाटा कसा असेल, याबाबत स्पष्टीकरण पाहिजे होते. २००० मध्ये कुशाग्रा यांनी सर्वात प्रथम याबाबत प्रश्न उपस्थित केला. यातून शेवटी राहुल व शिशिर बजाज यांनी यातून समूहाची विभागणी व्हावी, अशी मागणी केली.
२००२ मध्ये शिशिर बजाज यांनी आपल्याला बजाज सेवाश्रम कंपनीच्या अध्यक्षपदावरून हाकलण्याचा डाव आखल्याचा आरोप राहुल बजाज यांच्या दिशेने बोलून केला. हा प्रश्न एवढा चिघळला की शिशिर बजाज यांनी कंपनी लॉ बोर्डाकडे धाव घेतली. अखेर या दोघांनी हा प्रश्न एकत्रितरीत्या बसून सोडवावा, असे सुचविले. शेवटी २००३ मध्ये या पाचही चुलत भावंडांमध्ये समझोता करण्याचे ठरले. परस्परांना भरपाई कशी द्यावी, याचा आराखडा आखण्याचे ठरले. यानुसार, बजाज सेवाश्रममधील वाटय़ाची भरपाई म्हणून शिशिर बजाज यांना सुमारे ५०० कोटी रुपये देण्याचे ठरले. परंतु यात पुढे काहीच घडले नाही. या समझोत्यानुसार बजाज हिंदुस्थानचा संपूर्ण वाटा शिशिर बजाज यांना देण्यात येणार नव्हता. समूहाची होल्डिंग कंपनी बजाज सेवाश्रमकडे बजाज हिंदुस्थानचे काहीच समभाग नव्हते. अन्य दोन कंपन्या जमनालाल सन्स व बचीराज अ‍ॅण्ड सन्सकडे बजाज हिंदुस्थानचे २८ टक्के समभाग होते. कुशाग्रा यांना बजाज हिंदुस्थानची १०० टक्के मालकी पाहिजे होती. शेवटी यातून काहीच निष्पन्न निघाले नाही आणि बजाज समूहातील मतभेद वाढले.
दरम्यानच्या काळात म्हणजे सुमारे एक वर्षांपूर्वी राहुल बजाज यांनी आपल्या ताब्यातील बजाज ऑटो व अन्य वित्तीय कंपन्यांची फेररचना करून आपल्या दोन मुलांना वारसदार करून टाकले. राजीव बजाज यांना बजाज ऑटोचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी केले, तर बजाज फिनसव्‍‌र्हच्या व्यवस्थापकीय संचालकपदी संजीव बजाज यांना नियुक्त केले.
आता बजाज समूहातील झालेली वाटणी सर्वमान्य आहे. त्यामुळे आता यात काही मतभेद उपस्थित होण्याची शक्यता नाही. शिशिर बजाज समूहाला बजाज हिंदुस्थान ही कंपनी पाहिजे होती, ती मिळाली आहे. या वाटणीनंतर यांचा या कंपनीतील भांडवली वाटा ३१.४७ टक्क्यांवर जाईल. बजाज समूहातील आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे, बजाज यांची तरुण पिढी आता समूहात कार्यरत झाली आहे; परंतु मंदीने आता डोके वर काढले असताना नवीन पिढीकडे सूत्रे आली आहेत. सध्याच्या स्थितीत समूहातील प्रत्येक कंपनीपुढे आवासून अनेक प्रश्न उभे आहेत. उलाढाल, नफा घसरत आहेत. आर्थिक मंदीचा बजाज ऑटोला जबरदस्त फटका बसला आहे. बजाज हिंदुस्थान कंपनीने आक्रमकरीत्या वाटचाल सुरू केली आहे. बजाज समूहाच्या आता विभागणीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता त्यामुळे प्रत्येक समूहाने आपल्या वाटचालीचा आराखडा तयार करून त्या दृष्टीने वाटचाल सुरू करणार आहे. या समूहाच्या पाठीशी मोठा इतिहास आहे. आजवरच्या पिढीने विश्वासार्हता कमावली आहे. नवीन पिढीच्या हाती सूत्रे जात असताना दोन्ही बजाज समूह आता एका नव्या वळणावर येऊन ठेपला आहे.
Prasadkerkar73@gmail.com

गॉसिप कॉर्नर
जागतिक बँकेने बंदी घातली असली तरी विप्रो या आय. टी. कंपनीला विशेष काही फरक पडलेला नाही. ना ही कंपनी आपले मनोधैर्य खचली नाही. आता विप्रोने युरोप व आशियातील तीन आय. टी. इन्फ्रास्ट्रक्चर कंपन्या ताब्यात घेण्याचे ठरविले आहे. डिसेंबर महिन्यातच त्यांनी १२७ दशलक्ष डॉलर खर्च करून सिटी टेक्नॉलॉजिस ही कंपनी खरेदी केली होती. आता नव्याने खरेदी करण्यात येणाऱ्या कंपन्यांचा सौदा किती कोटी रुपयांचा असेल हे अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी हा व्यवहार अंतिम टप्प्यात असल्याचे समजते. सिटी टेक्नॉलॉजिसच्याच किमतीएवढाच हा सौदा असेल. या कंपन्या ताब्यात आल्यावर विप्रोची अधिक आक्रमकतेने वाटचाल युरोप व अमेरिकेत होईल. इन्फ्रास्ट्रक्चर व्यवस्थापन सेवा या झपाटय़ाने वाढणाऱ्या क्षेत्रात विप्रोने आक्रमकरीत्या वाटचाल सुरू केली असून, या कंपन्या ताब्यात आल्यावर त्यांचा या उद्योगातील वाटा वाढेल. विप्रोकडे या क्षेत्रात १५ हजार कर्मचारी आहेत. हे क्षेत्र नव्याने विकसित होत असून, गेल्या वर्षी ४७ टक्क्यांनी वाढले. आता या तीन कंपन्या ताब्यात आल्यावर विप्रो इन्फ्रास्ट्रक्चर सेवा क्षेत्रातील आघाडीची कंपनी होईल.