Leading International Marathi News Daily                                  शुक्रवार, १६ जानेवारी २००९
विशेष

स्वातंत्र्यचळवळीत पाळेमुळे असलेला आणि प्रामुख्याने महाराष्ट्रात प्रकल्प असलेल्या परंतु देशव्यापी अस्तित्व असलेल्या बजाज उद्योग समूहाची नववर्षांच्या प्रारंभीच फाळणीअखेर सर्वसंमतीने मान्य झाली आणि गेली सहा वर्षे सुरू असलेल्या वादावर पडदा पडला. अंबांनी बंधुंमधील फाळणी याहून कमी वेळात म्हणजे साडेतीन वर्षांत झाली होती. त्या तुलनेत बजाज समूह आकारमानाने लहान असूनही यातील मतभेद संपुष्टात यायला सहा वर्षांचा कालावधी लागला. आता बजाज समूह दोन विभागात म्हणजे राहुल बजाज आणि शिशिर बजाज यांच्यात विभागला गेला आहे. बजाज समूहातील कंपन्या कशा प्रकारे विभागून घ्यायच्या हा एक मोठा प्रश्न होता, त्यामुळेच उभयतातील वाटणी व्हायला विलंब लागला होता; परंतु आता ही विभागणी पूर्ण झाली आहे. देशातील सर्वात मोठी साखर उत्पादन कंपनी बजाज हिंदुस्थानवर आता पूर्णत: शिशिर बजाज यांचा ताबा असेल. या कंपनीत असलेला राहुल बजाज यांचा २९.६ टक्के वाटा शिशिर बजाज यांच्या नावे हस्तांतरित केला जाईल. बजाज हिंदुस्थानप्रमाणे बजाज कन्झ्युमर केअर ही कंपनीदेखील शिशिर बजाज यांच्याकडे येणार आहे. बजाज समूह म्हणून यापुढे राहुल बजाज यांचा समूह ओळखला जाईल. या समूहाच्या ताब्यात बजाज ऑटो, बजाज इलेक्ट्रिकल्स, बजाज फिन सव्‍‌र्हिस, मुकंद लि., बजाज होल्डिंग्ज अ‍ॅण्ड इन्व्हेस्टमेंट, हक्र्यिुलस हॉइस्ट या कंपन्या असतील.

नंदुरबार-धुळ्यातील पवनऊर्जा अक्षय्य?
समाजातील काही ऐश्वर्य संपन्न बडय़ा मंडळींचा ‘पवन ऊर्जा निर्मिती’ हा निव्वळ नफा कमविण्याचा धंदा राहिलेला नाही, तर तो पवन ऊर्जेच्या नावाखाली राजरोस चालविला जाणारा एक गोरखधंदाही असल्याचे अलीकडेच सिन्नर मध्ये अशाच काही तथाकथित प्रसिद्ध कंपन्यांच्या विरोधात झालेल्या कारवाईतून पुढे आले आहे. नाशिकचे जिल्हाधिकारी सेतुराम चोक्कलिंगम यांनी या प्रकरणी प्रचलीत महसुली कायद्याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करणाऱ्या वा अशा काही चालबाज कंपन्यांच्या कटकारस्थानांमध्ये सहेतूक सहभागी असलेल्या महसूल यंत्रणेतील सहा सरकारी मुलाजींमावर निलंबनाची कारवाई केली. अनियमितता, महसुली कायद्याचे उल्लंघन, शेतकऱ्यांची झालेली फसवणूक, उद्योग विकास आयुक्तांच्या अटी-शर्तीचा झालेला भंग याची गंभीर दखल घेत या जिल्हाधिकाऱ्यांनी उशिरा का होईना कारवाईचा बडगा तरी उगारला, पण सिन्नरच्याही आधी ज्या धुळे व नंदुरबार जिल्ह्य़ांमध्ये अशास्वरुपाचे मेगा प्रोजेक्ट उभे राहात असताना उपरोक्त त्रुटींबाबत प्रचंड ओरड होवूनही तेथील प्रशासनाने मात्र त्याकडे पूर्णत: कानाडोळा करण्याची भूमिका अंगीकारली. परिणामी एका बाजुला सिन्नरमध्ये कारवाई होत असताना नंदुरबार-धुळ्यातील पवन ऊर्जा अक्षय्य कशी, हा प्रश्न आता डोके वर काढू लागला आहे.

सीमेपलीकडचे सारेगमप..
समस्त मराठी जनमानसात आज ‘बाल’गंधर्वामुळे सारेगमपचे सूर निनादत आहेत. भारतीय संगीताचा भविष्यकाळ उज्ज्वल आहे, याचाच हा प्रत्यय आहे. त्याचवेळी सीमेपलीकडे अगदी प्रतिकूल परिस्थितीत सुरू असलेली स्वरसाधनाही तितकीच हृदयाला स्पर्श करणारी आहे. १९४७ मध्ये भारत आणि पाकिस्तानची फाळणी झाली. त्याचा सर्वाधिक फटका बसला हिंदुस्तानी संगीताला. आग्रा, जयपूर, बनारस, ग्वाल्हेर अशी भारतीय गावांशी जोडलेली संगीतघराणी आणि श्री, कलावती, बागेश्री यासारख्या रागांची परंपरा धर्माधिष्ठीत पाकिस्तानच्या भूमीत टिकविणे हे मोठेच आव्हान होते. फाळणीनंतर बडे गुलाम अली खाँ पाकिस्तानातील आपल्या कसुर या गावी स्थायिक झाले. ‘रेडिओ पाकिस्तान’वर त्यांचं गाणं होई. नंतर नंतर मात्र त्यांना ‘हिंदू’ राग गायला मनाई करण्यात आली. खाँसाहेबांनी सरळ आपलं घरदार सोडलं आणि ते भारतात परतले. १९६८ मध्ये हैदराबाद येथे अखेरचा श्वास घेईपर्यंत त्यांनी हिंदुस्तानी संगीताशी असलेली एकतानता तोडली नाही. सीमेपलीकडची सांगीतिक पडझड मात्र वेगात होती. इस्लामीकरणाच्या नादात अनेक रागांची नावे बदलली गेली, बंदिशीच्या ओळी बदलल्या गेल्या. १९८६ मध्ये अहमद बशीर यांनी ‘द मुस्लिम’ या दैनिकातील लेखात लिहिल्याप्रमाणे ‘जमुनातीर मेरे कृष्ण मुरारी’ हा मुखडा ‘रावी के पार मियाँ अब्दुल की बारी’ असा झाला! सतार हे भारतीय वाद्य ठरल्याने त्यावर बंदी होती. इतक्या प्रतिकूल परिस्थितीतदेखील तानसेनांची आणि कानसेनांची साधना सुरूच होती. १९७२ मध्ये राष्ट्रीय कला परिषद स्थापन झाली आणि सतारवरील बंदी उठली. इस्लामाबाद, कराची, लाहोरमध्ये शास्त्रीय संगीताचे वर्ग हळुहळू खुले झाले. सीमेपलीकडील या स्वरसाधनेचा मागोवा ‘ख्यालदर्पण’ या युसूफ सईद यांच्या लघुपटात मनोज्ञपणे आला आहेच तसेच मनिषा टिकेकर यांच्या ‘अ‍ॅक्रॉस द वाघा’ (कुंपणापलीकडील देश) या पुस्तकातूनही आला आहे. सईद यांच्या लघुपटात लाहोरच्या अलिया रशीद या दृष्टीहीन तरुणीचीही कथा आहे. ही मुलगी धृपद शिकण्याच्या ओढीने भारतात गुंदेचा बंधूंकडे कशी आली, सांस्कृतिक भेदांवर स्वरांनी कशी मात केली, त्याचे हे चित्रण डोळसांनाही दृष्टी देणारे ठरावे. दुबईत जन्मलेली अलिया लाहोरला रहात होती. तेथे ती शास्त्रीय संगीत शिकतही होती पण धृपद शिकायची ओढ तिला स्वस्थ बसू देईना. कारगिल युद्धाने उभय देशांतील संबंध विकोपाला गेले असतानाही ती निराश झाली नाही. अखेर महत्प्रयासाने भोपाळच्या उमाकांत व रमाकांत गुंदेचा यांच्या गुरुकुलाचे दरवाजे तिच्यासाठी उघडले गेले. मुस्लिमधर्मीय अलिया जैनपंथीय गुंदेचा यांच्या घरी चार वर्षे राहिली. गुरूशिष्य परंपरेचे तिने निष्ठेने पालन केले. स्वरसृष्टीतील अद्वैताचाच हा साक्षात्कार आहे. देश म्हणजे निर्जीव भूभाग मानून जमिनीच्या तुकडय़ाबरोबर माणसाची मनं तोडणारी फाळणी बडे गुलाम अली खाँसाहेबांनाही नामंजूर होती. ‘जर प्रत्येक घरातला किमान एक मुलगा शास्त्रीय संगीत शिकता तर भारताची फाळणी झालीच नसती,’ असे उद्गारही त्यांनी काढले होते! आज सीमेच्या अलीकडे आणि पलीकडे उमटणारे सारेगमपाचे सूर विराट संगीतसृष्टीचा हा मनं जोडणारा अनाहद नादच जणू आळवित आहेत..
उमेश करंदीकर