Leading International Marathi News Daily                                  शुक्रवार, १६ जानेवारी २००९

रस्ते, पाणी, सार्वजनिक वाहतुकीला आयुक्तांकडून प्राधान्य
महापालिकेचे अंदाजपत्रक २,६८० कोटींचे आयुक्तांच्या अंदाजपत्रकातून..

पुणे, १५ जानेवारी/प्रतिनिधी
नव्या कामांना तरतूद नाही, सुरू असलेल्या कामांनाच निधी
सर्व सेवा-सुविधांसाठीच्या करामध्ये वाढीचा प्रस्ताव
तलाव, स्मारके, भवने, कमानी या राजकीय कामांना फाटा
नवी पदे वा भरती नाही, गरज पडल्यास कंत्राटी कर्मचारी घेणार
रस्ते, सार्वजनिक वाहतूक, पाणीपुरवठा आणि मैलापाणी शुद्धीकरण या योजनांना प्राधान्य देणारे दोन हजार ६८० कोटी रुपयांचे अंदाजपत्रक महापालिका आयुक्तांनी आज स्थायी समितीला सादर केले. अंदाजपत्रकात सर्व सेवांच्या करात वाढ सुचविण्यात आली असून शहरी गरिबांसाठी ९१० कोटी, रस्ते व सार्वजनिक वाहतुकीसाठी १९८ कोटी, तसेच महिला कल्याणासाठी ११२ कोटींची स्वतंत्र तरतूद ही अंदाजपत्रकाची वैशिष्टय़ आहेत. स्थायी समितीच्या खास सभेत आज आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांनी समितीचे अध्यक्ष श्याम देशपांडे यांना सन २००९-१० चे अंदाजपत्रक सादर केले. हे अंदाजपत्रक २,६८० कोटींचे असून त्यात सर्वाधिक तरतूद भांडवली व विकासकामांवर (१५६८ कोटी, ५९ टक्के) करण्यात आली आहे. आगामी वर्षांत महापालिकेला मंदीचा फटका बसणार असल्यामुळे कोणतेही नवे प्रकल्प आयुक्तांनी प्रस्तावित केलेले नाहीत. फक्त जे चालू प्रकल्प ८० टक्क्य़ांपर्यंत पूर्ण झाले आहेत, अशा प्रकल्पांसाठीच तरतूद करण्यात आली आहे. सेवकवर्ग खर्चातही कपात करण्यात आली असून सेवकवर्गावर ४०६ कोटी इतकी तरतूद करण्यात आली आहे. तसेच उत्पन्न वाढविण्यासाठी सर्वसाधारण कर वगळता पाणीपट्टी, अग्निशमन, पथ, शिक्षण, पाणी आदी सर्व सेवांच्या करांमध्ये वाढ प्रस्तावित करण्यात आली आहे. ही वाढ १७ ते १८ टक्के इतकी आहे.

लाखिया, तळवलकर यांना ‘मधुरिता सारंग स्मृती सन्मान’
पुणे, १५ जानेवारी/प्रतिनिधी

ज्येष्ठ कथक नृत्यांगना मधुरिता सारंग यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा ‘मधुरिता सारंग स्मृती सन्मान’ यंदाच्या वर्षी ज्येष्ठ कथक नृत्यांगना कुमुदिनी लाखिया व ज्येष्ठ तबलावादक पंडित सुरेश तळवलकर यांना जाहीर झाला आहे. ‘मधुरिता सारंग स्कूल ऑफ कथक’ आणि महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या ‘रेणुका स्वरूप इन्स्टिटय़ूट ऑफ करिअर कोर्सेस’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात २६ जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजता आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या सभागृहात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ व्हायोलिनवादक पंडित प्रभाकर जोग आणि अध्यक्षस्थानी ज्येष्ठ अभिनेते चित्तरंजन कोल्हटकर, तसेच विख्यात पखवाजवादक भवानीशंकर हे उपस्थित राहतील, अशी माहिती मधुरिता संस्थेच्या समन्वयक सुरेखा पेंडसे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. या वेळी स्वाती रानडे, अर्चना संजय, हर्षिता जोशी आदी उपस्थित होते.

‘म्हाडा’च्या वसाहतींना अडीच चटईक्षेत्र निर्देशांक मंजूर; दुपटीने लाभ मिळणार
‘म्हाडा’च्या पुण्यातील बहुतांश वसाहतींचे बांधकाम एक चटईक्षेत्र निर्देशांकाप्रमाणे झाले आहे. अल्प उत्पन्न गट, मध्यम उत्पन्न गट व उच्च उत्पन्न गटातील नागरिकांसाठी म्हाडाने सदनिका बांधल्या आहेत. या सदनिका साडेतीनशे चौरस फुटांपासून सातशे चौरस फुटांपर्यंत आहेत. अडीच चटईक्षेत्र निर्देशांक लागू झाल्यावर संबंधित वसाहतींना शिल्लक जागेत वाढीव बांधकाम करून खोल्या वाढविता येऊ शकतील. त्यामुळे ‘म्हाडा’च्या सदनिकांच्या किमतीही दुपटीने वाढतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

संशोधिका डॉ. ग्रुडम कॉव्‍‌र्हिनस यांच्या मारेक ऱ्यास जन्मठेप
पुणे, १५ जानेवारी/प्रतिनिधी

डेक्कन कॉलेजच्या पुरातत्त्व विभागातील ज्येष्ठ संशोधिका आणि मूळच्या जर्मनीच्या डॉ. ग्रुडम कॉव्‍‌र्हिनस (वय ७२, रा. लिबर्टी सोसायटी, पुणे) यांची मालमत्ता हस्तगत करण्याच्या उद्देशाने त्यांचा खून झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या गाजलेल्या खून खटल्यातील आरोपी इखलाख फकीर मोहंमद शेख (वय २६, रा. मंगळवार पेठ) याला अतिरिक्त सत्र न्यायाधीश बी. डी. कापडणीस यांनी जन्मठेपेची शिक्षा आज सुनावली.
यासंदर्भात डॉ. फारूख वाडिया (वय ६८, रा. येरवडा) यांनी ही फिर्याद दिली होती. शेख याच्यासह सहआरोपी झालेला मोहंमद शफी महंमद याकूब शेख (वय २७, रा. नाना पेठ) याला निर्दोष सोडण्यात आले. सरकार पक्षाच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील अ‍ॅड. नीलिमा वर्तक यांनी केलेला युक्तिवाद, मालमत्ता हस्तगत करण्यासाठी केलेला खून, त्याचे पुरावे, वैद्यकीय तपासणीच्या अहवालाच्या आधारे न्यायालयाने आरोपी इखलाख शेख यास शिक्षा सुनावली.

गोदाम उभारणीसाठी पंचवीस टक्के अनुदान
पुणे, १५ जानेवारी / प्रतिनिधी

केंद्र शासनाच्या ग्रामीण योजनेंतर्गत शेतकरी, सहकारी संस्था, खासगी गुंतवणूकदार यांना महापालिकेच्या क्षेत्राबाहेर गोदामे उभारणीसाठी पंचवीस टक्के अनुदान देण्याची योजना सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती कृषी पणन मंडळाचे विभागीय व्यवस्थापक अरविंद वीरकर यांनी दिली. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ आणि जयपूरच्या राष्ट्रीय कृषी विपणन संस्थेच्या वतीने ग्रामीण गोदाम योजना कार्यक्रमांतर्गत पुणे जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. यावेळी बाजार समिती, साखर कारखाने, फळे-भाजीपाला उत्पादक सहकारी संस्था, शेतकरी सोसायटय़ांचे प्रतिनिधी तसेच शेतक री यांनी सहभाग घेतला. अध्यक्षस्थानी जिल्हा बाजार समितीचे उपसचिव सुरेश शेवाळे होते. शिबिरात पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक रमेश शिंगटे, नाबार्डचे व्ही. जी. भट, अन्नधान्य वितरण अधिकारी प्रदीप पाटील, बाजार समितीचे प्रशासक बी. जे. देशमुख, प्रकल्प व्यवस्थापक डी. एम. साबळे, सहायक व्यवस्थापक ए. ए. औताडे आदींची उपस्थिती होती. देशाच्या ग्रामीण भागात गोदामांचे जाळे निर्माण झाल्यास लहान शेतकऱ्यांची शेतीमाल साठवणुकीची क्षमता वाढेल. शेतीमालास चांगल्या दराने विक्री करता येईल. कमी किं मतीमध्ये विकण्याचा शेतकऱ्यांचा कल कमी होईल.

‘ सामूहिक वनभूमी कार्यक्रमात पर्यावरणवाद्यांनी सहभागी व्हावे ’
पुणे, १५ जानेवारी/प्रतिनिधी

देशातील जंगलांमध्ये वृक्षतोड आणि तस्करी मोठय़ा प्रमाणावर होत असली तरी आदिवासींचे वास्तव्य असणाऱ्या भागातील जंगले त्यांच्यामुळे सुरक्षित आहेत. म्हणून पर्यावरणवाद्यांनी वनअधिकार कायद्याला विरोध न करता सामूहिक वनभूमी कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ माधव गाडगीळ यांनी केले. राष्ट्रीय जनवकालत अध्ययन केंद्रातर्फे आयोजित ‘वनअधिकार कायदा- संरक्षण कुणाचे? जंगलांचे, आदिवासींचे की प्राण्यांचे?’ या विषयावरील परिसंवादामध्ये गाडगीळ बोलत होते. या परिसंवादात सामाजिक कार्यकर्त्यां अ‍ॅड. सुरेखा दळवी आणि पर्यावरणाचे अभ्यासक, पत्रकार संतोष िशत्रे यांनीही सहभाग घेतला. अध्यक्षस्थानी दै. ‘सकाळ’चे संपादक यमाजी मालकर होते. याप्रसंगी संतोष िशत्रे यांनी वनअधिकार कायद्याला विरोध दर्शविताना त्यातील कायदेशीर त्रुटींवर बोट ठेवले. त्याचबरोबर आदिवासींच्या वन्यजीव गुन्हय़ातील वाढत्या सहभागाचा उल्लेख करून कायद्याला पािठबा देणाऱ्या स्वयंसेवी संस्थांच्या उद्देशाविषयी शंका उपस्थित केली. सुरेखा दळवी यांनी या कायद्याचे समर्थन करताना आदिवासी हा जंगलाचा राजा असून, त्यांना परंपरागत काही मूलभूत हक्क असल्याचे आग्रहपूर्वक नमूद केले. तसेच कायद्यान्वये जंगलाच्या सुरक्षिततेची जबाबदारी पंचायत समितीकडे आल्याबद्दल समाधान व्यक्त केले. मालकर यांनी जंगल ऱ्हासाचे प्रमुख कारण चुकीची विकासनीती असल्याचे सांगून परिस्थिती बदलण्यासाठी विकासाची व्याख्या बदलण्याची गरज व्यक्त केली. या वेळी माधव गाडगीळ लिखित आणि ‘लोकायत’ प्रकाशित ‘बहरू दे हक्काची वनराजी’ या पुस्तकाचे प्रकाशन मालकर यांच्या हस्ते करण्यात आले. सूत्रसंचालन प्र. न. लता यांनी केले, तर संपत काळे यांनी आभार मानले.

खाजगी बस बंदीबाबत आज निर्णय
पुणे, १५ जानेवारी/ प्रतिनिधी

खासगी प्रवासी बसला शहराच्या मध्यवर्ती भागात येण्यास बंदी करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी वाहतूक पोलिसांनी सुरू करून सुमारे ५० बसेसवर कारवाई केली. मात्र, वाहतूकदारांनी यास तीव्र विरोध केला. त्यामुळे याबाबतचा निर्णय घेण्यासाठी उद्या (शुक्रवारी) पोलीस आयुक्तालयात वाहतूकदारांची बैठक बोलाविण्यात आली आहे. खासगी प्रवासी बसला चांदणी चौकातून पौड रस्त्याकडे, शिवाजीनगरकडून विद्यापीठाकडे आदी शहराच्या मध्यवर्ती भागात येण्यास बंदी घालण्यात आली आहे. मध्यवर्ती भागात येणाऱ्या बसेसवर वाहतूक शाखेकडून कारवाई करण्यात आली आहे.या निर्णयावर येत्या २७ तारखेपर्यंत सूचना व हारकती मागविण्यात आल्या आहेत. बैठकीत ठरविल्यानुसार चांदणी चौक, बालेवाडीसह आदी ठिकाणी बस टर्मिनस तयार व्हावेत. त्यानंतरच कारवाई व्हावी, अशी भूमिका वाहतूकदारांनी व्यक्त केली.

‘वेदांच्या अभिमानापेक्षा संशोधन हवे’
पुणे, १५ जानेवारी/प्रतिनिधी

देशाला विज्ञानक्षेत्रात पुन्हा पूर्वीचा सुवर्णकाळ निर्माण करायचा असेल तर वेद पुराणांचा अभिमान बाळगण्यापेक्षा त्यावर समग्र संशोधन करून त्याचा उपयोग जगाच्या हितासाठी कसा करता येईल हे पाहिले पाहिजे, असे मत चेन्नईच्या श्री रामानुज मिशन ट्रस्टचे चतुर्वेदी स्वामी यांनी व्यक्त केले. इन्स्टिटय़ूट ऑफ एन्शिएंट इंडियन नॉलेज सिस्टीम्स या संस्थेतर्फे प्रथम वैदिक विज्ञान दिनाच्या निमित्ताने चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेचे संस्थापक सतीश कुलकर्णी यांनी स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी ११ जानेवारीला वैदिक विज्ञानदिन म्हणून साजरा करण्याचे ठरविले आहे.चतुर्वेदी म्हणाले , देशावरील आक्रमणानंतर आपली बरीच वैदिक संपदा नष्ट झाली असली तरी आपण त्याचे भांडवल करत बसण्यापेक्षा संशोधनावर अधिक भर दिला पाहिजे. प्राचीन विमानशास्त्र, कौटील्याचे अर्थशास्त्र, वेदकालीन मापनपद्धती, वैदिक गणित, सामवेद आणि संगीताचे गणितीय विश्लेषण, नॅनो टेक्नॉलॉजी आदी विषयांवरील शोधनिबंध या वेळी सादर करण्यात आले. चर्चासत्राचे उद्घाटन डॉ. वि. दा. कराड व डॉ. विजय भटकर यांच्या हस्ते करण्यात आले. डॉ. एन. जी. डोंगरे, डॉ. नरेन सेठ, डॉ. व्ही. एस. घोले, डॉ. पी.के. श्रीवत्स, डॉ. पी. के. श्रीमणी व डॉ. अंमळनेरकर यांनी सहभाग घेतला.

‘आयसीडब्ल्यूवायए’ चे अधिवेशन २९ ते ३१ जानेवारीदरम्यान
पुणे, १४ जानेवारी / प्रतिनिधी

दि इन्स्टिटय़ूट ऑफ कॉस्ट अ‍ॅन्ड वर्कस अकौंटट्ंस ऑफ इंडिया (आयसीडब्ल्यूवायए) या संस्थेचे पन्नासावे राष्ट्रीय अधिवेशन पुण्यात बालगंधर्व रंगमंदिर येथे २९ ते ३१ जानेवारीदरम्यान होत आहे. या अधिवेशनाचे उदघाटन केंद्रीय मंत्री प्रेमचंद गुप्ता आणि केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत होणार आहे. तीन दिवसीय अधिवेशनात चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी जागतिक आर्थिक मंदीच्या कोंडीतून मार्ग कसा काढता येईल या विषयावरही मार्गदर्शन करण्यात येणार आहे. आयसीडब्ल्यूवायएच्या पश्चिम विभागाच्या वतीने हे अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती अधिवेशन समितीचे अध्यक्ष संजय भार्गवे, अशोक नवल आणि अमित आपटे यांनी दिली. ‘र्सवकष विकास कसा साधता येईल’, अशी अधिवेशनाची संकल्पना आहे. सध्यस्थितीतील आíथक समस्येवर मार्ग काढण्यासाठी मार्गदर्शन, पायाभूत सुविधांचा विकास, विशेष आर्थिक क्षेत्र (सेझ) आणि बँकिंग क्षेत्र या विषयांवर चर्चा केली जाणार आहे. समारोपास मुख्यमंत्री अशोक चव्हाण, तसेच अर्थमंत्री दिलीप वळसे पाटील उपस्थित राहणार आहेत.

ग्राहकाला जाळ्यात ओढण्याचा मोह टाळा ‘नॅसकॉम’चा सल्ला
पुणे, १५ जानेवारी/खास प्रतिनिधी

माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील वाढत्या स्पर्धेमध्ये अधिकाधिक नफेखोरीच्या मागे लागून ग्राहकाला जाळ्यात ओढण्याचा मोह कंपन्यांनी टाळावा, असा सबुरीचा सल्ला ‘नॅसकॉम’ने दिला आहे. अशा प्रयत्नांमधून भारतीय आयटी उद्योगाची विश्वासार्हता धोक्यात येत आहे, असेही ‘नॅसकॉम’ने स्पष्ट केले आहे. सत्यम कंपनीमधील घोटाळ्याच्या पाश्र्वभूमीवर ‘नॅसकॉम’चे अध्यक्ष गणेश नटराजन यांनी आज ही माहिती दिली. नैतिकता सोडून नफा कमाविण्याचा मोह टाळण्याइतके देशातील आयटी उद्योग परिपक्व आहेत, असा विश्वास व्यक्त करून नटराजन म्हणाले की, ‘सत्यममधील प्रकरणाविषयी केंद्र सरकारने उचलेल्या पावलांचे आम्ही स्वागत करीत आहोत. कंपनीचे नुकतेच स्थापन झालेले संचालक मंडळ यापुढील काळात गुंतवणूकदार, ग्राहक आणि आयटी क्षेत्राचा विश्वास संपादन करण्यासाठी काम करतील, याची आम्हाला खात्री आहे.’ सत्यममधील प्रकारानंतर आंतरराष्ट्रीय आयटी उद्योगाचा भारतीय कंपन्यांवरील विश्वास कमी होणार नाही, याची खातरजमा करणे हा सध्याच्या घडीला आमचा प्राधान्याचा विषय आहे, असेही नटराजन म्हणाले.

जुन्या पिढीतील पैलवान गुलाबराव काळे यांचे निधन
पुणे, १५ जानेवारी/प्रतिनिधी

पळसदेव ता. इंदापूर येथील जुन्या पिढीतील प्रसिद्ध पैलवान गुलाबराव मारुती काळे (वय-८९) यांचे वृद्धापकाळाने बुधवारी (१४ जाने.) निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे. १९४६ ते १९५६ च्या दशकात पुणे, सोलापूर, अहमदनगर आदी जिल्हय़ातील कुस्त्यांच्या जंगी मैदानात त्यांनी अनेक प्रेक्षणीय कुस्त्या केल्या. पळसदेव परिसरात सामाजिक कार्यातही ते नेहमी अग्रेसर होते. सन २००१ ते २००३ च्या दुष्काळात पळसदेव (काळेवाडी) येथे त्यांनी स्वत:च्या विहिरीतून गावाला स्वखर्चाने पाणी पुरवठा केला. जुन्या काळातील अनेक तंटय़ामध्ये त्यांनी गावातच न्यायनिवाडा केला. त्यांचा पळसदेव परिसरातील अनेक संस्थांचा निकटचा संबंध होता. त्यांच्या निधनामुळे पळसदेव बाजारपेठ बंद ठेवून ग्रामस्थांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांच्यावर पळसदेव (काळेवाडी) येथे शेकडो ग्रामस्थांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. पोलिस निरीक्षक शिवाजीराव काळे व दैनिक लोकसत्ताचे इंदापूरचे वार्ताहर तानाजी काळे यांचे ते वडील होत.

गाडगीळ यांचे निधन
पुणे, १५ जानेवारी/प्रतिनिधी

डेक्कन कॉलेज संस्कृत कोष विभागातील ज्येष्ठ निवृत्त संपादिका शारदा वसंत गाडगीळ (वय ७३) यांचे काल रात्री दीर्घकालीन आजाराने निधन झाले. १९५८ मध्ये डेक्कन कॉलेजातील संशोधकांनी प्रारंभ केलेली ‘भारतवाणी’ संस्कृतपत्रिका आणि त्यानंतर १९५९ मध्ये चालू झालेली ‘शारदा’ (सध्या वर्ष ५० वे) या दोन्ही संस्कृतपत्रिकांच्या संपादक मंडळावर त्यांनी सहकारी संपादिका म्हणून काम केले होते. संस्कृत आणि भाषाशास्त्र या दोन्हीवर त्यांचे प्रभुत्व होते. त्यांच्यामागे पती, एक मुलगा असा परिवार आहे.