Leading International Marathi News Daily                                  शुक्रवार, १६ जानेवारी २००९
राज्य

ठाणे जिल्ह्यात सोमवारपासून पाणीकपात
दिलीप शिंदे
ठाणे,१५ जानेवारी

कृष्णा लवादाला बगल देऊन अतिरिक्त पाणी उचलण्याचे परिणाम या वर्षीसुद्धा जनतेला भोगावे लागणार असून उन्हाळ्यातील तीव्र पाणीटंचाई कमी करण्यासाठी येत्या सोमवारपासून ठाणे जिल्ह्यात ७ टक्के पाणीकपात लागू केली जाणार आहे. त्याचबरोबर मुंबई-ठाण्यातील पोशीर, शाई आदी धरणांची कामे मार्गी लावण्यासाठी जलसंपदा मंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली वरिष्ठ अधिकाऱ्यांची सुकाणू समिती स्थापन करण्यात आली आहे. उल्हास नदीच्या खोऱ्यातून मंजूर कोटय़ापेक्षा अतिरिक्त पाणी उचलण्याचा फटका ठाणे जिल्ह्याला बसल्याने पाटबंधारे विभागाने गेल्या वर्षी महापालिका, नगरपालिका, एम.आय.डी.सी., स्टेम यांच्या मंजूर कोटय़ामध्ये १४ टक्क्यांची पाणीकपात केली होती.

विकासाचा अभावच
सोलापूर जिल्ह्य़ात साखर कारखानदारीतील प्रश्नांव्यतिरिक्त भारनियमनामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यातच डाळिंबावरील तेल्या रोग व द्राक्षांवरील डावनी रोगामुळे शेतकऱ्यांची कोटय़वधींची हानी झाली. जिल्ह्य़ाच्या सर्वागीण विकासासाठी नेत्यांतील उदासीनता दूर होऊन सर्व पक्षांतील नेत्यांनी एकत्र येऊन प्रयत्न केल्यास या जिल्ह्य़ाचा विकास दूर नाही. त्यासाठी गरज आहे राजकीय इच्छाशक्तीची.

पोटातून काढला २५ किलोचा टय़ूमर
कर्करोगाने ग्रस्त महिलेला जीवनदान

चंद्रपूर, १५ जानेवारी/ प्रतिनिधी

जिवती तालुक्यातील कागबन येथील एका आदिवासी महिलेच्या पोटातून २५ किलो वजनाचा टय़ुमर काढण्यात गडचांदूर येथील डॉ. विजय कळस्कर व चंद्रपूरचे शल्य चिकित्सक डॉ. अमल पोद्दार यांना यश आले. गेल्या काही वर्षांपासून कर्करोगाने ग्रस्त महिलेला जीवनदान मिळाले. आदिवासी भागातील डॉक्टारांनी निस्वार्थभावनेने ही शस्त्रक्रिया पार पाडून नवा पायंडा घातला आहे.
माणिकगड पाहाडावरील कागबन येथील अयू रामा सिडाम(३८) हिला मागील तीन वर्षांपासून पोटाचा त्रास होता. पोट मोठे होऊ लागल्याने ती गरोधर असावी, असा अंदाज वर्तविला जाऊ लागला.

संपन्न शेतकऱ्यांचे स्वप्न साकार करा - भुजबळ
जालना, १५ जानेवारी/वार्ताहर
कृषी क्षेत्रात नवनवीन संशोधन करून येणाऱ्या नव्या अडचणी व संकटांवर मात करण्याचे कार्य बियाणे कंपन्या व संशोधकांनी करावे. शेतकऱ्यांकडे भरपूर पैसा असल्याचे स्वप्न तुम्ही व आम्ही मिळून साकार करूया, असे आवाहन उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले. बेजो-शीतलच्या भाजीपाला विक्रेता व उत्पादक शेतकऱ्यांच्या मेळाव्यात श्री. भुजबळ बोलत होते. कृषी खात्याचे राज्यमंत्री सुरेश वरपूडकर या वेळी उपस्थित होते. अध्यक्षस्थानी उच्च शिक्षणमंत्री राजेश टोपे होते.

वरपूडकर-डॉ. केंद्रे पुन्हा एकदा आमने-सामने!
गोदाकाठी हिवाळ्यातही वातावरण तापले

प्रमोद साळवे
गंगाखेड, १५ जानेवारी

परभणी जिल्हा परिषदेच्या धारासूर गटाच्या पोटनिवडणुकीमुळे गोदाकाठच्या अकरा गावात ऐन हिवाळ्यात वातावरण तापले आहे. कृषी खात्याचे राज्यमंत्री सुरेश वरपूडकर आणि भारतीय जनता पक्षाचे नेते व नगराध्यक्ष डॉ. मधुसूदन केंद्रे पुन्हा एकदा आमने-सामने आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य गणपत भालके यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नंदकुमार भालके, भा. ज. प.च्या लक्ष्मीबाई रबदडे व अपक्ष अनिता शिंदे उमेदवार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने (कै.) भालके यांच्या चिरंजीवास पुन्हा संधी देऊन प्रत्येक गावासाठी एक जिल्हा परिषद सदस्य अशी ‘फिल्डिंग’ लावली आहे. यासाठी श्री. सुरेश वरपूडकर स्वत: मैदानात उतरले आहेत.

डॉक्टर महिलेवरील हल्ल्याप्रकरणी पतीविरुद्ध गुन्हा
कल्याण, १५ जानेवारी/वार्ताहर

डॉक्टर मृणाली लोखंडे यांच्यावर झालेला जीवघेणा हल्ला त्यांचे पती डॉक्टर मनु लक्ष्मण लोखंडे यांनी तीन लाखाची सुपारी देऊन केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यांच्या विरोधात महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर पोलिसांच्या निष्काळजीपणाचा फायदा घेत डॉक्टर मात्र फरार झाला आहे. डॉ. मृणाली लोखंडे व डॉ. मनु लक्ष्मण लोखंडे या दोघांचे पटत नव्हते. वारंवार भांडणे व्हायची. मृणालीच्या नातेवाईकांनी मनुला मारहाण केली.

पत्रकार हल्ले प्रतिबंधक समित्या सतर्क करणार
माहिती व जनसंपर्क राज्यमंत्र्यांनी ऐकली पत्रकारांची गाऱ्हाणी

अलिबाग, १५ जानेवारी/ प्रतिनिधी

पत्रकारांवर होणाऱ्या हल्ल्यांना प्रतिबंध करण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात असणाऱ्या पत्रकार हल्ले प्रतिबंधक समित्यांच्या बैठकाच होत नाहीत, हे गंभीर आह़े या समित्या सत्वर सतर्क करण्यासाठी उपाययोजना करण्यात येतील, असे आश्वासन माहिती व जनसंपर्क राज्यमंत्री राणा जगजितसिंह पाटील यांनी येथे पत्रकार परिषदेत बोलताना येथे दिले आह़े

गाभ्रीचा पाऊस, लेक याहोई चित्रपटांचा गौरव
पुणे, १५ जानेवारी/प्रतिनिधी

पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दिला जाणारा राज्य शासनाचा ‘संत तुकाराम उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट पुरस्कार’ सतीश मनवर दिग्दर्शित ‘गाभ्रीचा पाऊस’ चित्रपटाला, तर ‘प्रभात सवरेत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार’ मेक्सिको येथील फेरनॅन्डो इम्बॅकी यांच्या ‘लेक याहोई’ या चित्रपटाला मिळाला. चित्रपट क्षेत्रातील देश-विदेशातील प्रतिनिधींच्या उत्साही सहभागात आज महोत्सवाची सांगता झाली. या महोत्सवातील स्पर्धा विभागात आंतरराष्ट्रीय विभागात सुमारे ३०, तर मराठी चित्रपटांपैकी सात चित्रपट अंतिम फेरीमध्ये दाखल झाले होते. स्पर्धेचा निकाल आज समारोपाच्या कार्यक्रमात जाहीर करण्यात आला. इतर पुरस्कारार्थीची नावे पुढीलप्रमाणे (कंसात पुरस्काराचे नाव)- श्रीलंकेतील अबेटरे पॅसोलिनी दिग्दर्शित ‘मचान’ व फ्रान्स येथील लाऊरन्ट कॅन्टेन्टी दिग्दर्शित ‘द क्लास’ (परीक्षकांचा विशेष पुरस्कार). कझाकिस्तान येथील तुलपन चित्रपटातील नायक अस्काहात कुचेनचेरेकोव्ह (पीफ सवरेत्कृष्ट आंतरराष्ट्रीय अभिनेता). लेबनॉन येथील कॅरेमेल चित्रपटातील अभिनेत्री नदिन लाबकी (पीफ सवरेकृष्ट आंतरराष्ट्रीय अभिनेत्री). कझाकिस्तानातील तुलपन चित्रपटाचे दिग्दर्शक सेर्जे डिव्होर्टसेव्ह (राज्य शासनाचा प्रभात सवरेत्कृष्ट आंतरराष्ट्रीय दिग्दर्शक), उत्कृष्ट दिग्दर्शक परेश मोकाशी, उत्कृष्ट अभिनेता किशोर कदम, उत्कृष्ट पटकथा सचिन कुंडलकर (अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ पुरस्कार). मराठी चित्रपट ‘घो मला असला हवा’ व ‘जोगवा’ (परीक्षकांकडून विशेष गौरव).

वाड्मय पुरस्कारांचे रविवारी वितरण
रत्नागिरी, १५ जानेवारी/खास प्रतिनिधी

राज्य शासनाच्या सांस्कृतिक संचालनालयातर्फे देण्यात येणाऱ्या मराठी वाङमयनिर्मितीच्या राज्य पुरस्कारांचा वितरण सोहळा रविवारी १८ जानेवारी रोजी येथे आयोजित करण्यात आला आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या समारंभामध्ये २००७-०८ या वर्षांत प्रकाशित झालेल्या विविध वाङमय प्रकारांच्या लेखकांना, प्रकाशकांना राज्य शासनातर्फे गौरविण्यात येणार आहे. तसेच या प्रसंगी विविध कोकणी लोककलाही सादर केल्या जाणार आहेत.येथील विवेक हॉटेलमागे मराठा मैदानावर होणाऱ्या या समारंभाला रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील तटकरे, साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक, राज्य सेन्सार बोर्डाचे अध्यक्ष फ. मुं. शिंदे, सांगलीच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. म. द. हातकणंगलेकर, रत्नागिरीचे नगराध्यक्ष मधुकर घोसाळे इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती देण्यात आली.

ग्राहकाला जाळ्यात ओढण्याचा मोह टाळा
नॅसकॉम’चा सल्ला
पुणे, १५ जानेवारी/खास प्रतिनिधी

माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील वाढत्या स्पर्धेमध्ये अधिकाधिक नफेखोरीच्या मागे लागून ग्राहकाला जाळ्यात ओढण्याचा मोह कंपन्यांनी टाळावा, असा सबुरीचा सल्ला ‘नॅसकॉम’ने दिला आहे. अशा प्रयत्नांमधून भारतीय आयटी उद्योगाची विश्वासार्हता धोक्यात येत आहे, असेही ‘नॅसकॉम’ने स्पष्ट केले आहे. सत्यम कंपनीमधील घोटाळ्याच्या पाश्र्वभूमीवर ‘नॅसकॉम’चे अध्यक्ष गणेश नटराजन यांनी आज ही माहिती दिली. नैतिकता सोडून नफा कमाविण्याचा मोह टाळण्याइतके देशातील आयटी उद्योग परिपक्व आहेत, असा विश्वास व्यक्त करून नटराजन म्हणाले की, ‘सत्यममधील प्रकरणाविषयी केंद्र सरकारने उचलेल्या पावलांचे आम्ही स्वागत करीत आहोत. कंपनीचे नुकतेच स्थापन झालेले संचालक मंडळ यापुढील काळात गुंतवणूकदार, ग्राहक आणि आयटी क्षेत्राचा विश्वास संपादन करण्यासाठी काम करतील, याची आम्हाला खात्री आहे.’ सत्यममधील प्रकारानंतर आंतरराष्ट्रीय आयटी उद्योगाचा भारतीय कंपन्यांवरील विश्वास कमी होणार नाही, याची खातरजमा करणे हा सध्याच्या घडीला आमचा प्राधान्याचा विषय आहे, असेही नटराजन म्हणाले.

संभाजीराव पाटील यांच्यासह सात जणांना शिल्पकला पुरस्कार
कोल्हापूर, १५ जानेवारी / प्रतिनिधी

शिल्पकला गौरव पुरस्कार समितीतर्फे देण्यात येणारे २००८ सालचे पुरस्कार समितीचे प्रभारी अध्यक्ष सतीशराज जगदाळे यांनी येथे जाहीर केले. २००८ च्या पुरस्कारात आर्किटेक्ट संभाजीराव पाटील यांच्यासह सातजणांचा समावेश आहे. उत्कृष्ट आर्किटेक्ट म्हणून संभाजीराव पाटील यांना पुरस्कार देण्यात आला आहे. गिरीष रायबागे यांना तर कोकणातील बांधकाम व्यावसायिक भूषण साटम यांनाही हा बहुमान देण्यात आला आहे. भालजी पेंढारकर सांस्कृतिक केंद्र, या इमारतीची निर्मिती करणाऱ्या आनंद पाटील यांनाही या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेआहे. त्यांना एक्सलन्स इन कन्स्ट्रक्शन इन पब्लिक बिल्डिंग या पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे. याबरोबरच सार्वजनिक बांधकाम विभागाचे ठेकेदार उत्तम कन्स्ट्रक्शनचे अजितसिंह देसाई यांच्याबरोबरच इलेक्ट्रिकल काँट्रॅक्टर मनोज सावंत यांना पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

वसई- दिवा रेल्वेची आणखी एक फेरी वाढविण्याची मागणी
नालासोपारा, १५ जानेवारी/वार्ताहर

वसईहून दिवा येथे जाणारी दुपारची गाडी तीन तास यार्डमध्ये उभी असते, ती तशी उभी न करता त्याची एक फेरी सुरू करावी, अशी मागणी जनता दल (से)तर्फे करण्यात आली आहे.
सतत आंदोलन छेडून, पाठपुरावा केल्यानंतर १६ वर्षांंपूर्वी दिवा-वसई मार्गावर येऊन जाऊन तीन फेऱ्या सुरू झाल्या, पण प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता या फेऱ्या अपुऱ्या असल्यामुळे या मार्गावर किमान बारा गाडय़ा वाढवाव्या, अशी मागणी गेल्या पाच वर्षांंपासून जनता दल रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांच्याकडे करीत होते. सततच्या पाठपुराव्यानंतर दुपारी एक गाडी गेल्या काही महिन्यांपासून सुरू झाली. ही गाडी सकाळी बोईसरहून निघते, ती ९.३० ला वसईत यार्डमध्ये येऊन उभी राहते आणि साडेबाराच्या सुमारास वसई- दिवा जाण्यासाठी प्लॅटफॉर्मवर येते. तीन तास ती यार्डमध्ये असते. ती तशी उभी न करता साडेनऊ वाजण्याच्या सुमारास वसई- दिवा पाठवावी, १२.३० पर्यंत ती पुन्हा वसईला येते, तेव्हा दुसरी फेरी पाठवावी, अशी मागणी जनता दल प्रदेश सरचिटणीस मनवेल तुस्कानो व प्रदेश अध्यक्ष प्रा. शरद पाटील यांनी केली आहे.

घरफोडीत ३६,५०० रुपयांचा ऐवज लंपास करून अज्ञात चोर फरार
खोपोली, १५ जानेवारी/वार्ताहर

बंद घराचा कडीकोयंडा उचकटून अज्ञात चोराने ३६ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. खालची खोपोली येथील इंदिरानगरमधील पाटील बिल्डिंगमध्ये अनंत गजानन मोहरे राहतात. सध्या त्यांचे व त्यांच्या कुटुंबियांचे वास्तव्य मुंबईमध्ये आहे. शनिवार- रविवारी व सुट्टीच्या दिवशी ते ब्लॉकमध्ये राहण्यासाठी येतात. सोमवारी (१२ जानेवारी) रात्री ११ ते मंगळवार (१३ जानेवारी) पहाटे पाचच्या कालावधीत अज्ञात चोराने मोहरे यांच्या कुलूपबंद ब्लॉकचा कडी-कोयंडा उचकटून घरात प्रवेश केला. घरातील कपाटाचे कुलूप तोडून कपाटातील एक सोन्याची चेन, एक सोन्याचा हार, चांदीची भांडी व रोख रक्कम असा एकूण ३६,५०० रुपयांचा ऐवज चोरून पोबारा केला.खोपोली पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात चोराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.