Leading International Marathi News Daily                                  शुक्रवार, १६ जानेवारी २००९
क्रीडा

उत्तर प्रदेशपुढे मिशन इम्पॉसिबल
मुंबईपुढे जेतेपदाची औपचारिकता!

हैदराबाद, १५ जानेवारी/ वृत्तसंस्था

उत्तर प्रदेशला रणजी जेतेपदाचे स्वप्न साकारण्यासाठी शुक्रवारी, अखेरच्या दिवशी ५२५ धावांचे ‘मिशन इम्पॉसिबल’ची अग्नीपरीक्षा द्यावी लागणार आहे. परंतु मुंबई ३८ व्यांदा रणजी करंडकावर आपले नाव कोरणार हे जवळपास निश्चित समजले जात आहे. रोहित शर्माने पहिल्या डावाप्रमाणेच दुसऱ्या डावातही शतक झळकावित तर यष्टीरक्षक विनायक सामंतने कारकिर्दीतले पहिलेवहिले शतक पूर्ण करीत मुंबईला दुसऱ्या डावात सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली. पहिल्या डावात घेतलेल्या आघाडीच्या जोरावर सामन्याचे पारडे मुंबईच्या बाजूने आधीच झुकलेले असून उद्या निर्णायक विजयाच्या ईर्षेने उतरणाऱ्या मुंबईच्या नावावर शिक्कामोर्तब करण्याची औपचारिकता फक्त शिल्लक आहे.

बीसीसीआयची मवाळ भूमिका
मुंबई, १५ जानेवारी/क्री.प्र.

सचिन तेंडुलकरला आयसीसीच्या ऑलटाईम ग्रेटमध्ये पहिल्या २० जणांमध्ये स्थान न देण्यात आल्याबद्दल भारतात सर्वत्र विरोधाची लाट उसळली असताना भारतीय क्रिकेट बोर्डाने मात्र गुळमुळीत भूमिका स्वीकारली आहे. बीसीसीआयचे प्रवक्ते राजीव शुक्ला यांनी यासंदर्भात म्हटले आहे, ‘‘ती यादी आयसीसीची आहे. आम्हाला त्याच्याशी काहीही देणे-घेणे नाही. त्यामुळे त्याबद्दल आम्हाला काहीही बोलायचे नाही.’’ शुक्ला पुढे म्हणाले, ‘‘डॉन ब्रॅडमन यांनी आपल्या संघाला सचिनला स्थान दिले आहे. त्यामुळे सचिनला आणखी कोणत्याही क्रमवारीची गरज नाही.’’

एक्स्टेन्डेड टूर..
न्यूझीलंड दौऱ्यावर भारत आणखी एक कसोटी आणि ट्वेन्टी-२० सामना खेळणार

नवी दिल्ली, १५ जानेवारी/पीटीआय

भारताच्या न्यूझीलंड दौऱ्याची वाढीव कार्यक्रमपत्रिका आज भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि न्यूझीलंड क्रिकेट असोसिएशनने संमत केली. आणखी एक कसोटी आणि दुसऱ्या ट्वेन्टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्याचा या दौऱ्यात समावेश करण्यात आला आहे.ख्राइस्टचर्च येथे २५ फेब्रुवारीला होणाऱ्या ट्वेन्टी-२० सामन्याने भारताच्या न्यूझीलंड दौऱ्यास प्रारंभ होईल. वेलिंग्टन येथे दोन २७ मार्चला दुसरी ट्वेन्टी-२० लढत रंगणार आहे. एकदिवसीय मालिकेनंतर तीन कसोटी सामन्यांचे प्रयोजन करण्यात आले आहे. पाच एकदिवसीय सामन्यांपैकी पहिली लढत ३ मार्चला नॅपियर येथे तर पहिली कसोटी १८ ते २२ मार्चदरम्यान हॅमिल्टन येथे होईल.

मॅथ्यू हेडनच्या स्थानासाठी मार्क वॉची ह्य़ूजेसला पसंती
मेलबर्न, १५ जानेवारी / पीटीआय

आंतरराष्ट्रीय क्रिकेटला नुकताच रामराम ठोकणाऱ्या मॅथ्यू हेडनची संघातील जागा घेण्यास युवा सलामीवीर फिलिप ह्य़ूजेस सक्षम असल्याचे मत आज ऑस्ट्रेलियाचा माजी कसोटीपटू मार्क वॉने व्यक्त केले. पुढच्या महिन्यात दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघातील स्थानासाठी डावखुऱ्या फिल जॅक्वेसने त्याचा दावाही मजबूत केला असतानाच २० वर्षांचा जॅक्वेस हा मॅथ्यू हेडनचा उत्तराधिकारी म्हणून अगदी ‘फिट’ असून त्याला संघात स्थान देण्याचा जुगार ऑस्ट्रेलियन संघाला परवडण्यासारखा असल्याचेही मार्क वॉने म्हटले आहे.

नवमहाराष्ट्र, अंबिका, सुभाष उपान्त्य फेरीत दाखल
ओम भारत कबड्डी

मुंबई, १५ जानेवारी/क्री.प्र.

जोगेश्वरीच्या चेतना संघाची ओम भारत कबड्डी स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्यासाठी चाललेली धडपड पाचव्या दिवशी रोखली गेली. किरण देवाडिगाच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या नव महाराष्ट्र बोरिवली संघाने चेतनाचा ४०-३१ असा पराभव करून त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आणले. नव महाराष्ट्र संघ या विजयाबरोबर उपान्त्य फेरीत दाखल झाला.

असेच यश सातत्याने मिळविण्याची इच्छा - सोमदेव
नवी दिल्ली, १५ जानेवारी / वृत्तसंस्था

चेन्नई ओपन टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंत धडक मारणारा पहिला भारतीय टेनिसपटू सोमदेव देववर्मन याला एटीपी टूर स्पर्धेत भारताचा झेंडा सातत्याने फडकावण्याची इच्छा आहे. सोमदेवने चेन्नई ओपन टेनिस स्पर्धेत कालरेस मोया आणि क्रोएशियाच्या इवो कालरेवीचचा पराभव करून आपल्या दर्जाची चुणूक दाखविली होती. सोमदेवला त्याच्या या उत्कृष्ट खेळामुळे १५० गुण मिळाले असून त्यामुळे त्याचे क्रमवारीतील स्थानही उंचावले आहे. एटीपी स्पर्धात यापुढेही बडय़ा खेळाडूंना नमविण्याची उमेद सोमदेव बाळगून आहे.

सुमित घाडीगावकरच्या शतकामुळे रुपारेल विजयी
आंतरमहाविद्यालयीन क्रिकेट

मुंबई, १५ जानेवारी/क्री.प्र.

सुमित घाडीगावकरने १४ चौकारांच्या सहाय्याने फटकावलेल्या १०१ धावा आणि त्याला मधल्या फळीतील सर्वेश दामले (नाबाद ५८) व ऑफ स्पिनर दशवीर छावडा (१२ धावांत ३ बळी) यांनी दिलेली उत्तम साथ या जोरावरच रुपारेल महाविद्यालयाने एस्.पी. ग्रुप क्रिकेट अ‍ॅकेडमी आयोजित व अलाईड डिजिटल स्पोर्टस् फाऊंडेशन पुरस्कृत एकूण १ लाख रुपयांची बक्षिसे असलेल्या आंतर-महाविद्यालयीन स्पर्धेच्या (४० षटके) साखळी सामन्यात बंगाल क्लब (शिवाजी पार्क) येथील खेळपट्टीवर चेतना महाविद्यालयाने सहज पराभव केला.

आयपीलसाठी ऑस्ट्रेलियन खेळाडूंना हिरवा कंदील
मेलबर्न, १५ जानेवारी/पीटीआय

अनफिट आणि दुखापतग्रस्त खेळाडूंना वगळून बाकीच्या खेळाडूंना इंडियन प्रीमियर लीगच्या दुसऱ्या पर्वात खेळण्यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने हिरवा कंदील दाखविला आहे.
बेट्र ली (पायाचा घोटा), अ‍ॅण्ड्रय़ू सायमंड्स (गुडघा), शेन वॉटसन (पाठ) आणि पीटर सिडल (पाय) हे खेळाडू दुखापतीने पछाडले असून, या निर्णयामुळे ते आयपीएल स्पध्रेला मुकण्याची शक्यता आहे.आयपीएलमध्ये वेगवान गोलंदाजांना आठवडय़ात फक्त दोनदा चार षटके टाकावी लागतात, त्यामुळे ते त्रासदायक नसते, असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे जनसंपर्क व्यवस्थापक पीटर यंग यांनी सांगितले.

दम्बुलाला होणार पहिले दोन एकदिवसीय सामने
कोलंबो, १५ जानेवारी / पीटीआय

भारताच्या आगामी श्रीलंका दौऱ्यातील पाच एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या दोन लढती अनुक्रमे २८ व ३० जानेवारीला दम्बुलाला होणार असल्याचे आज निश्चित झाले. रणगिरी दम्बुला आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर या लढती रंगणार आहेत. भारताचा श्रीलंका दौऱ्याचा कार्यक्रम : २६ जानेवारी - कोलंबोत आगमन. २८ जानेवारी - पहिला एकदिवसीय सामना (दम्बुला), ३० जानेवारी - दुसरी लढत (दम्बुला), २ फेब्रुवारी - तिसरी लढत (प्रेमदासा), ५ फेब्रुवारी - चौथी लढत (प्रेमदासा), ८ फेब्रुवारी - पाचवी लढत (सिंहलिज), १० फेब्रुवारी - टी/२० (प्रेमदासा). ११ फेब्रुवारी - भारतात परत.

नदाल, जानकोव्हिक यांना अव्वल मानांकन
मेलबर्न, १५ जानेवारी/एएफपी

पुढील आठवडय़ात सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पध्रेसाठी जागतिक क्रमवारीतील प्रथम स्थानावरील राफेल नदाल आणि एलिना जानकोव्हिक यांना अव्वल मानांकन देण्यात आले आहे. टाचेच्या दुखापतीमुळे रशियाच्या निकोले डेव्हिडेन्कोने स्पध्रेतून माघार घेतली आहे, तर खांद्याच्या दुखापतीमुळे मारिया शारापोव्हा आपल्या गतविजेतेपदाचे रक्षण करू शकणार नाही. चीनच्या लि नानेही गुडघ्याच्या दुखापतीमुळे माघार घेतली आहे. द्वितीय मानांकनप्राप्त स्वित्र्झलडचा रॉजन फेडरर चौथ्या ऑस्ट्रेलियन जेतेपदाचे स्वप्न उराशी बाळगून आहे. याचप्रमाणे १४वे ग्रॅण्डस्लॅम विजेतेपद पटकावून अमेरिकेच्या पीट सॅम्प्रसच्या विक्रमाची बरोबरी करण्याचे उद्दिष्टही त्याने ठेवले आहे. सर्बियाचा नोव्हाक जोकोव्हिक आपले गतविजेतेपद टिकविण्याच्या इष्रेने उतरेल. जोकोव्हिकला तिसरे तर ब्रिटनच्या अ‍ॅन्डी मुरेला चौथे मानांकन लाभले आहे.नऊ वेळा ग्रॅण्डस्लॅम विजेत्या सिरिना विल्यम्सला महिला गटात दुसरे मानांकन देण्यात आले आहे, त्यानंतर दिनारा सफिना आणि एलिना देमेंतिवा यांचा क्रमांक लागतो.

आयपीलमधील सहभागासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा खेळाडूंना हिरवा कंदील
मेलबर्न, १५ जानेवारी/पीटीआय

अनफिट आणि दुखापतग्रस्त खेळाडूंना वगळून बाकीच्या खेळाडूंना इंडियन प्रीमियर लीगच्या दुसऱ्या पर्वात खेळण्यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने हिरवा कंदील दाखविला आहे. बेट्र ली (पायाचा घोटा), अ‍ॅण्ड्रय़ू सायमंड्स (गुडघा), शेन वॉटसन (पाठ) आणि पीटर सिडल (पाय) हे ऑस्ट्रेलियन खेळाडू दुखापतीने पछाडले असून, या निर्णयामुळे ते आयपीएल स्पध्रेला मुकण्याची शक्यता आहे.
आयपीएलमध्ये वेगवान गोलंदाजांना आठवडय़ाभरात फक्त दोनदा चार षटके टाकावी लागतात, त्यामुळे ते त्रासदायक नसते, असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे जनसंपर्क व्यवस्थापक पीटर यंग यांनी सांगितले. दक्षिण आफ्रिकेचे माजी महान क्रिकेटपटू बॅरी रिचर्डस् म्हणतात की, जर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आपल्या खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळण्यास मज्जाव केला तर बहुतांशी खेळाडू तो झुगारतील किंवा निवृत्तीचा मार्ग पत्करतील. आताच्या खेळाडूंना वेगाने मिळणारे डॉलर्स हवेच आहेत. चॉकलेटच्या दुकानातील बालकांप्रमाणे हे खेळाडू हावरट झाले आहेत, अशी टीकाही रिचर्डस् यांनी केली.

पाटपन्हाळे महाविद्यालयाची प्रणिता व चिपळूणचा अमित प्रथम
पाटपन्हाळे, १५ जानेवारी/क्री.प्र.

पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीच्या पटांगणात आयोजित दहाव्या जिल्हास्तरीय मॅरेथॉन स्पर्धेत चिपळूणचा अमित दवंडे व पाटपन्हाळे महाविद्यालयाची प्रणिता सावरटकर यांनी प्रथम पटकावला तर सांघिकमध्ये मुलांमधून खंडाळा हायस्कूल, रत्नागिरी तर मुलींमधून ओणी हायस्कूल, राजापूर यांनी यश संपादन केले. अमितने ३० कि.मी. अंतर १ तास ५८ मिनिटांत पूर्ण केले तर प्रणिताने २१ कि.मी. अंतर २ तासांत पूर्ण केले. पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटी असयोजित महाराष्ट्र राज्य हौशी अ‍ॅथलेटिक्स संघटन मान्यताप्राप्त पार पडलेल्या जिल्हास्तरीय मॅरेथॉन स्पर्धेचे उद्घाटन ऑल इंडिया अ‍ॅथलेटिक्स असोसिएशनचे उपाध्यक्ष, माजी खासदार सतीश प्रधान यांच्या हस्ते क्रीडा ध्वज फडकावून करण्यात आले. यावेळी आमदार भास्कर जाधव, पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष भालचंद्र चव्हाण, आमदार मधुकर चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चाटे, गुहागर आगार प्रमुख सय्यद, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. जी. जाधव, चिपळूणचे माजी सभापती रामदास राणे, सतीश शेठ, कमलेश प्रधान, सुनील नलावडे पंचायत समिती सदस्या सुजाता चव्हाण, पाटपन्हाळेच्या सरपंच रिझवाना सुभेदार, उपसरपंच प्रियांका चव्हाण आदी उपस्थित होते. या स्पर्धेमध्ये जिल्ह्य़ातील ११ हजार स्पर्धकांनी सहभाग घेतला.

सायना, भट पराभूत; दिजू-गट्टा उपान्त्यपूर्व फेरीत
कोरिया सुपर सीरिज बॅडमिंटन
सेऊल, १५ जानेवारी / पीटीआय

योनेक्स कोरिया सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेत आजचा दिवस भारतासाठी संमिश्र यश देणारा ठरला. भारताची अव्वल महिला बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिला दुसऱ्या फेरीत इंडोनेशियाच्या आद्रियान्ती फिरदासरीविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला. पुरुष एकेरीत सातव्या मानांकित पोलंडच्या झेमिस्लाव्ह वाचा याने भारताच्या अरविंद भटचा पराभव केला. मिश्र दुहेरीत व्ही. दिजू आणि ज्वाला गट्टा यांनी अव्वल मानांकित जोडीचा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली.आद्रियान्ती फिरदासरीने आज सायनाची झुंज १८-२१, २१-१८, २१-१२ गुणांनी मोडून काढली. कॅनडाच्या चारमिन रिडने पहिल्या फेरीत माघार घेतल्यामुळे दुसऱ्या फेरीत प्रवेश करणाऱ्या सायनाने आज आक्रमक सुरुवात करत पहिला गेम २१-१८ गुणांनीजिंकला. दुसऱ्या गेममध्ये फिरदासरीने सुरुवातीपासून वर्चस्व गाजवत सहा गुणांची आघाडी मिळवली. त्यानंतर सायनाला पिछाडी भरून काढण्यात अपयश आले. फिरदासरीने २१-१२ गुणांनी गेमजिंकत विजयावर शिक्कामोर्तब केले. पुरुष एकेरीच्या लढतीत भटने सुरुवातीचा गेम २१-११ गुणांनी सहजजिंकत आघाडी मिळवली पण, त्यानंतरचे दोन गेम पोलने २१-१४ व २३-२१ गुणांनी जिंकत तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. मिश्र दुहेरीत दिजू व गट्टा या भारतीय जोडीने इंडोनेशियाच्या विडियान्टो व लिलियाना नॅटसर जोडीची झुंज १०-२१, २१-१६, २१-९ गुणांनी मोडून काढली. उपांत्यपूर्व फेरीत त्यांना आठव्या मानांकित व्हिजया रेन्ड्रा व मेलिना जौहरी या जोडीच्या आव्हानाला सामोरे जावे लागले.

महाराष्ट्राच्या ज्युनियर संघाची रौप्य व कांस्यपदकाची कमाई
राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धा
मुंबई, १५ जानेवारी/क्री.प्र.

थोडुपुझ्झा, केरळ येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राच्या पुरुष व महिला गटातील ज्युनियर संघांनी अनुक्रमे स्पोर्टस् पिस्तुल व एअर पिस्तुल प्रकारात रौप्य व कांस्यपदक पटकावितो. स्पोर्टस् पिस्तुल प्रकारात विक्रांत घैसास, रुचित कपाडिया, प्रशांत मुंडे यांचा समावेश असलेल्या महाराष्ट्राच्या संघाने १६०१ गुणांसह रौप्य जिंकले. याच प्रकारात सेनादलाने वर्चस्व गाजविताना एकेरी व सांघिक अशी दोन्ही सुवर्णपदके पटकाविली.एअर पिस्तुल प्रकारात महाराष्ट्राच्या ज्युनियर महिलांना कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. राही सरनोबत, उपासना परसरामपुरिया व सोनाली परेराव यांनी १००० गुणांसह महाराष्ट्राला कांस्य जिंकून दिले. या प्रकारात पंजाबने एकेरी व सांघिक अशी दोन्ही सुवर्णपदके जिंकली.निकाल : स्पोर्टस् पिस्तुल- पुरुष ज्युनियर- एकेरी- १) हंबीर सिंग (सेनादल; ५७९), २) विजय सिंग (सेनादल; ५७५), ३) देवेंद्रसिंग (५७१; सेनादल), सांघिक : १) सेनादल (१७१५; हंबीरसिंग, संदीप भालोटिया, संदीप रोहिला), २) महाराष्ट्र (१६०१, विक्रांत घैसास, रुचित कपाडिया, प्रशांत मुंडे), ३) मध्य प्रदेश (१५७७; गौरव कुमार, सावरिया मलिक, संजय सिंग).एअर पिस्तुल- महिला ज्युनियर- एकेरी- १) लीना सिद्धू (पंजाब; ३८४), २) दीपिका पटेल (उत्तर प्रदेश; ३७६), ३) निकिता गुप्ता (पंजाब; ३७३), सांघिक- १) पंजाब (११२४; लीना सिद्धू, रुबी तोमर, शेफाली तोमर), २) उत्तर प्रदेश (१०९१, दीपिका पटेल, दीक्षा राजपूत, के. एन. नितू), ३) महाराष्ट्र (१०८०, राही सरनोबत, उपासना परसरामपुरिया, सोनाली परेराव).

संक्षिप्त क्रीडावृत्त
नदाल, जानकोव्हिक यांना अव्वल मानांकन

मेलबर्न: पुढील आठवडय़ात सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पध्रेसाठी जागतिक क्रमवारीतील प्रथम स्थानावरील राफेल नदाल आणि एलिना जानकोव्हिक यांना अव्वल मानांकन देण्यात आले आहे.टाचेच्या दुखापतीमुळे रशियाच्या निकोले डेव्हिडेन्कोने स्पध्रेतून माघार घेतली आहे, तर खांद्याच्या दुखापतीमुळे मारिया शारापोव्हा आपल्या गतविजेतेपदाचे रक्षण करू शकणार नाही.
द्वितीय मानांकनप्राप्त स्वित्र्झलडचा रॉजन फेडरर चौथ्या ऑस्ट्रेलियन जेतेपदाचे स्वप्न उराशी बाळगून आहे.

हॅटट्रिक हेच ध्येय- जॉन केलाई
मुंबई : गेली दोन वर्षे मी स्पर्धेमध्ये अव्वल येत असलो तरी हे वर्ष माझ्यासाठी फार महत्त्वाचे असेल, कारण या वर्षीची स्पर्धा जिंकल्यास मॅरेथॉनमध्ये हॅट्ट्रिक नोंदविणारा मी पहिला खेळाडू ठरू शकतो. आता माझ्यासमोर हॅट्ट्रिक हेच ध्येय असून त्यासाठी मी जोमाने तयारी करतोय, असे स्टॅण्डर्ड चार्टर्ड आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन गेली दोन वर्षे गाजविणारा केनियाचा धावपटू जॉन केलाई याने सांगितले.

पेस-लिपस्की आणि भूपती-नोएल्स उपान्त्य फेरीत
सिडनी: महेश भूपती आणि लिएण्डर पेस हे भारताचे दोन टेनिसस्टार वेगवेगळ्या स्पर्धेच्या उपान्त्य फेरीत पोहोचले आहेत. भूपतीने त्याचा सहकारी मार्क नोएल्सच्या साथीने येथील मेडीबॅंक आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेची तर पेसने त्याचा सहकारी स्कॉट लिपस्कीच्या साथीने ऑकलंड येथील हेनिकेन ओपनची उपान्त्य फेरीत प्रवेश केला आहे. भूपती-नोएल्स जोडीने सिमॉन अस्पेलीन आणि पावेल विझनेर यांना उपान्त्यपूर्व फेरीत ६-३, ६-२ अशी धूळ चारली. तर पेस-लिपस्की जोडीने निकोलस अल्माग्रो आणि इव्हान नवारो जोडीचा ७-५, ६-१ असा पराभव केला.

शिरोडकर स्पोर्ट्स क्लबची विजयी सलामी
मुंबई: हनुमान सेवा मंडळाच्यावतीने (लालबाग) मुंबई शहर कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने सुरू झालेल्या महिला गटाच्या कबड्डी स्पर्धेत डॉं शिरोडकर स्पोर्ट्स क्लबने दादरच्या सुर्य प्रतिष्ठानचा ४२-२५ असा १७ गुणांनी पराभव करीत विजयी सलामी दिली.सामन्याच्या पहिल्या सत्रात डॉं शिरोडकर स्पोर्ट्स क्लबने २७-६ अशी २१ गुणांची आघाडी घेत सामना जिंकण्याच्या दृष्टीने भक्कम पायाभरणी केली. दुसऱ्या सत्रात मात्र सुर्य प्रतिष्ठानने आक्रमक खेळ करीत डॉं शिरोडकर स्पोर्ट्स क्लबला १९-१५ असे पिछाडीवर टाकले, पण त्यांना पराभव मात्र टाळता आला नाही.