Leading International Marathi News Daily                                  शुक्रवार, १६ जानेवारी २००९

ठाणे-भिवंडीतील वकिलांमध्ये वादाची ठिणगी
ठाणे/प्रतिनिधी : ठाणे जिल्ह्याचे विभाजन करण्याचा निर्णय गेल्या २० वर्षांपासून प्रलंबित असताना ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाच्या त्रिभाजनाचा विषय सध्या ठाणे जिल्ह्यात गाजतो आहे. जिल्हा न्यायालयाचे विभाजन करून भिवंडी येथे अतिरिक्त जिल्हा सत्रन्यायालयाची स्थापना करण्यावरून ठाणे व भिवंडी वकील संघटनांत वादाची ठिणगी पडली आहे. ठाण्यातील वकिलांनी नुकतेच बेमुदत कामबंद आंदोलनाचे टोकाचे हत्यार वापरून विभाजनाचा निर्णय स्थगित करण्यास भाग पाडले. तर झालेल्या निर्णयाची अंमलबजावणी व्हावी यावर ठाम असलेल्या भिवंडीतील वकिलांनी आपले आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इरादा व्यक्त करून, भिवंडीच्या महापौरांसह प्रतिष्ठित नागरिकांनाही त्यात उतरवण्याचा निर्णय घेतल्याने या प्रश्नाला सार्वजनिक स्वरूप येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

स्थायी समिती सदस्यांच्या फेरनेमणुका करण्याचे शासनाचे आदेश
कल्याण/प्रतिनिधी- कल्याणडों िबवली महापालिकेतील स्थायी समिती सदस्यांच्या पक्षीय बलानुसार नव्याने नेमणुका करण्याचे आदेश शासनाने काल पालिका प्रशासनाला दिले आहेत. दोन दिवसापूर्वीच ‘वृत्तान्त’ने ‘लालफितीमुळे झालाय कल्याण-डोंबिवली पालिकेचा कारभार ठप्प’ अशा आशयाचे वृत्त प्रसिध्द केले होते. महापौर रमेश जाधव यांनी शासनाचे आदेश आले असल्याचे मान्य केले. या वृत्ताची दखल मुख्यमंत्री कार्यालयाने घेऊन तात्काळ स्थायी समितीच्या आठ सदस्यांची पक्षीय बलानुसार फेरनेमणूक करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. हा आदेश देताना नाशिक महापालिकेच्या एका न्यायालयीन निर्णयाचा आधार घेण्यात आला आहे.

समाजावरच राष्ट्राची सुरक्षा - शेकटकर
ठाणे/प्रतिनिधी

अमेरिका कितीही इशारे देत असली तरी ती पाकिस्तानवर कधीच आक्रमण करणार नाही. दहशतवादाचा बंदोबस्त भारतालाच करावा लागेल. समाज सजग झाला तरच देशाची अंतर्गत सुरक्षा मजबूत होईल, त्यासाठी लोकांनी आपल्या घर- शहरापासूनच सुरक्षिततेबाबत जागृत व्हायला हवे, असे प्रतिपादन निवृत्त ले. जनरल दत्तात्रय शेकटकर यांनी केले.
रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानमालेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार प्रशांत दीक्षित होते. राष्ट्रीय सुरक्षा आणि सामाजिक जबाबदारी याविषयी बोलताना ते पुढे म्हणाले, जगात आज सगळीकडे दहशतीचे वातावरण असून सामान्य माणसेच त्याला जबाबदार आहेत. माणूसच माणसाला मारतोय. राष्ट्राची भौगोलिक सीमा सुरक्षित तर ते राष्ट्र सुरक्षित, अशी पूर्वीची परिस्थिती होती. मात्र आता परिस्थिती बदलली आहे. १९६५ व ७१ च्या युद्धात पाकिस्तानचा पराभव झाला, तेव्हा भारताशी प्रत्यक्ष आक्रमणाची चूक केल्यास आणखी शकले होतील, अशी जाणीव इतर राष्ट्रांशी पाकिस्तानला करून दिली.

‘लोकसेवा समितीचा आदर्श इतर संस्थांनीही घ्यावा ’
डोंबिवली/वार्ताहर

‘कोकणवासीयांची संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकसेवा समितीने अल्पावधीतच मिळवलेले यश निश्चितच वाखाणण्याजोगे आहे. दशावतार, कोकण महोत्सव, वैद्यकीय शिबीर, गोरगरीब मुलांना शैक्षणिक मदत आदी समाजोपयोगी उपक्रम राबवून लोकसेवा समितीने समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे. त्यांचा हा आदर्श इतर संस्थांनीही घ्यावयास हवा’, असे प्रतिपादन कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती रवींद्र चव्हाण यांनी केले. लोकसेवा समितीच्या दशकपूर्ती सोहळ्यात ते बोलत होते.

थ्री इन वन परफॉर्मन्स..
ठाणे/प्रतिनिधी

झी मराठी वाहिनीवरील सारेगमप, एकापेक्षा एक आणि हास्यसम्राट या रिअ‍ॅलिटी शोज् सध्या लोकप्रिय आहेत. या मालिकांच्या यशाने गीत, नृत्य आणि हास्य कलांचा अंतर्भाव असणाऱ्या कार्यक्रमांना भारतीय प्रेक्षक मग ते शहरी असोत वा ग्रामीण भरभरून प्रतिसाद देतात हे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. तसेच या कार्यक्रमामुळे लहान-मोठे नृत्यगीत आणि मिमिक्री सादर करणाऱ्या कलावंतांनाही बरे दिवस आले आहेत. विविध ठिकाणी या तिन्ही कार्यक्रमांचे मिश्रण असणाऱ्या लाइव्ह परफॉर्मन्सना हल्ली प्राधान्य दिले जाऊ लागले आहे.

ठाण्यात रेल्वे टर्मिनस; डावखरेंचा विरोध
कल्याण/वार्ताहर:कल्याण टर्मिनसचा प्रस्ताव फेटाळून ठाण्यात टर्मिनस करण्याचा प्रयत्न झाल्यास कल्याण-डोंबिवलीमधील नागरिकांच्या हितासाठी आपण तो यशस्वी होऊ देणार नाही, असा इशारा विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे यांनी दिला आहे. ठाणे-पनवेल लोकल सेवेच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री अशोक चव्हाण शुक्रवारी ठाण्यात आले होते. त्यावेळी शिवसेनेचे खासदार आनंद परांजपे यांनी ठाण्यात रेल्वे टर्मिनस करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलवावी, अशी मागणी केली. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत चव्हाण यांनी लवकरच बैठक बोलाविण्याचे आश्वासन दिल्यानंतर कल्याण-डोंबिवलीमधील प्रवाशांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटली आहे. दिवंगत खासदार प्रकाश परांजपे यांनी सातत्याने ठाणे टर्मिनसचा आग्रह धरला. निवडणुकीआधी कल्याण टर्मिनस व नंतर ठाणे असा प्रकार त्यांचे चिरंजीव खासदार आनंद परांजपे यांनी केला. कल्याण-डोंबिवलीकरांच्या मतांवर निवडून यायचे व त्यानंतर त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचे हा पायंडा त्यांनीही सुरूच ठेवला असून. येथील मतदारांच्या रेल्वे प्रश्नांकडे दुर्लक्षकेलेआहे.लोकसभेच्यापोटनिवडणुकीच्य वेळी डेक्कन क्वीन, प्रगती एक्स्प्रेसला कल्याणला थांबा देऊ, अशी वल्गना परांजपे यांनी केली होती. निवडून आल्यावर मात्र आश्वासनाचा विसर पडला आहे. कुठलेही आंदोलन न करता हे शक्य नसल्याचे ते आता सांगू लागले आहेत.

पोलिसांच्या मुलांसाठी व्यवसाय मार्गदर्शन
ठाणे/प्रतिनिधी

आयसीआयसीआय बँक लिमिटेड आणि ठाणे पोलीस आयुक्तालय यांच्या संयुक्त विद्यमाने पोलिसांच्या मुलांसाठी ‘व्यवसाय मार्गदर्शन कार्यशाळा आणि कलमापन चाचणी’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दोन दिवसांचा हा कल्याणकारी कार्यक्रम १० जानेवारी रोजी सुरू झाला होता. ठाण्याचे पोलीस आयुक्त अनिल ढेरे यांनी या कार्यक्रमाचे उद्घाटन केले, तर सहआयुक्त प्रशांत बुर्डे यांच्या हस्ते कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. मुलांना आपली बुद्धिमत्ता व क्षमतेला साजेसा व्यवसाय किंवा क्षेत्र निवडण्यासाठी मदत व्हावी व त्यांच्यात जागरुकता निर्माण व्हावी, यादृष्टीने या व्यवसाय मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात अंबरनाथ, बदलापूर, कल्याण, भिवंडी इत्यादी भागांतून आलेल्या १५० हून अधिक विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. बुद्धिमापन चाचणी देण्यास मुलांमध्ये प्रचंड उत्साह आढळला, तसेच पालकांनीही मुलांना मार्गदर्शन करण्याचा आनंद मनमुराद लुटला. चाचणीनंतर समुपदेशक व मुलांमध्ये तपशीलवार चर्चा झाली. या चर्चेत मुलांची बलस्थाने व त्रुटींवर प्रकाश टाकण्यात आला.

‘शिवीगाळ न करता कार्यकर्त्यांची गाडी सोडविली ’
डोंबिवली/प्रतिनिधी

पालिकेच्या अतिक्रमण विभागाने पकडलेली माझ्या कार्यकर्त्यांची गाडी मी कोणतीही शिवीगाळ, धक्काबुक्की न करता पालिकेच्या आवारातून सुरक्षा रक्षकांबरोबर चर्चा करून सोडवून नेली. यावेळी पालिकेच्या वरिष्ठांशी संपर्क साधला पण ते उपलब्ध झाले नाहीत, असा खुलासा नगरसेवक सुदेश चुडनाईक यांनी केला आहे. दरम्यान, नगरसेवक म्हटला की कर्मचारी, अधिकारी सगळेच घाबरतात त्यामुळे हा विषय आम्हाला वाढवयाचा नाही. विषय वाढविला की आम्हाला नाहक त्रास होतो अशी माहिती पालिकेतील सूत्राने दिली.

आदिवासींचे प्रश्न सोडवा, ठाकूर संघटनेची मागणी
शहापूर/वार्ताहर : स्वातंत्र्याची ६० र्वष झाली तरी अजूनही आदिवासी दारिद्रय़ाचे जिणे जगत असून त्यांच्या प्रश्नांची शासनाने सोडवणूक करावी, अशी मागणी आदिवासी महादेव ठाकूर सेवा संघटनेचे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष गणपत शिद यांनी राज्याचे जलसंपदामंत्री अजित पवार यांच्याकडे नुकतीच केली आहे. शहापूर तालुक्यातील किन्हवली परिसरातील नांदगाव-टाकीपठार, खरीवली- कानडी- झापवाडी आपटेफाटा या रस्त्याचे डांबरीकरण करावे. शहापूर तालुक्याचे विभाजन करून किन्हवली तालुका करावा, किन्हवली हे शैक्षणिक केंद्र बनल्याने येथे आदिवासी मुलींचे वसतिगृह व्हावे, परिसरातील ८२ गावांची बाजारपेठ असलेल्या किन्हवली येथे बस डेपो व्हावा, किन्हवली-सांगाव मार्गावरील शाई नदीवरील पुलाची (कोचरे गावाजवळील) उंची वाढवावी, आदिवासींच्या मालाला बाजारपेठ मिळावी, याकरिता आदिवासी भवन व्हावे, व्यवसाय प्रशिक्षण केंद्र व लघुउद्योग सुरू करावेत, सातबारा उताऱ्यावरील लावलेला ३५ सेक्शन कायदा तात्काळ दूर करावा, आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.

टोरॅंटचे उज्ज्वल भिवंडी अभियान सुरू
भिवंडी/वार्ताहर

गेल्या तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये वीज वितरण व्यवस्था ड वर्गातून क श्रेणीत आणून टोरॅंट पॉवरच्या यशस्वी प्रयत्नामुळे सहा तासांचे विजेचे भारनियमन पावणेपाच तासांवर आणले. विजेची सुरक्षित व खात्रीलायक वितरण नेटवर्क हे टोरॅंट कंपनीची प्राथमिकता अवचितपाडा, गोविंदनगर, गणेश सोसायटी, गुलजारनगर, खान कंपाऊंड या ठिकाणी विद्युत रोहित्रांचे काम पूर्ण झाले असून, जनतेला कायदेशीर व सुरक्षित वीजजोडणी उपलब्ध करण्यासाठी उज्ज्वल भिवंडी अभियान सुरू केले आहे. ग्राहक चळवळ कामकाजाच्या वेळा वाढविण्यात आल्या आहेत. कल्याण नाका येथील ग्राहक सेवा केंद्र रात्री नऊपर्यंत उघडे ठेवण्यात येणार आहे, तसेच शनिवार व रविवार या दिवशीही ग्राहक सेवा केंद्र सुरू राहणार आहे. कल्याण नाका येथील ग्राहक सेवा केंद्र सोमवार ते शुक्रवार या काळात सकाळी आठ ते रात्री नऊपर्यंत, तर शनिवार रविवारी सकाळी ९.३० ते ४ या दरम्यान खुले राहणार आहे.