Leading International Marathi News Daily                                  शुक्रवार, १६ जानेवारी २००९

(सविस्तर वृत्त)

बलात्काराच्या तक्रारीवरून ‘फरशीवाले बाबा’ला अटक
वार्ताहर / त्र्यंबकेश्वर

 
देशभरातील हजारो रुग्णांना जडीबुटी औषधांची भुरळ पाडून आपला दबदबा निर्माण करण्यात यशस्वी झालेल्या येथील रघुनाथ जाधव ऊर्फ फरशीवाले बाबा उर्फ देवबाप्पा ओझरखेडकर महाराज यास उपचारासाठी आलेल्या महिलेवर बलात्कार केल्याच्या संशयावरून गुरूवारी त्र्यंबकेश्वर पोलिसांनी अटक केली.
या खळबळजनक घटनेमुळे केवळ बाबांच्या भाविक व रुग्णांमध्येच नव्हे तर सर्वसामान्यांमध्येही खळबळ उडाली आहे. विज्ञानयुगात रुग्णाच्या डोक्यावर फरशी ठेवून रोगाचे निदान तसेच उपचार करण्याची विचित्र पद्धत संशयित बाबाने स्वीकारली होती. असाध्य रोगावर उपचार घेण्यासाठी मध्य प्रदेशातून आलेल्या महिलेवर बाबाने २००५ मध्ये बलात्कार केल्याचे पोलिसांकडे दाखल तक्रारीत म्हटले आहे.
त्र्यंबकेश्वरपासून दोन किलोमीटरवर असलेल्या तळवाडे परिसरातील देवबाप्पा आश्रमधाम येथे ही घटना घडल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. मध्य प्रदेशातील एक महिला उपचारासाठी २००५ मध्ये फरशीवाले बाबा यांच्या नाशिक जिल्ह्य़ातील आश्रमात गेली असताना हा प्रकार घडला, असे तक्रारीत म्हटले आहे. ज्यावेळी पहिल्यांदा ती आश्रमात आली तेव्हा आजार बरा करण्याचे आमिष दाखवून बाबांनी जाळ्यात ओढले. गुंगीचे औषध देऊन बलात्कार करण्यात आला. नंतर वर्षभराच्या कालावधीचे औषध देऊन परत पाठविण्यात आले. बाबाच्या सल्ल्यानुसार वारंवार औषधे घेऊनही काही फरक पडला नाही. त्यामुळे आपण पुन्हा आश्रमात आलो. याविषयी बाबाकडे जाब विचारला असता बाबाने गुंगीचे औषध देत विनयभंग करण्याचा प्रयत्न केला, अशी तक्रार महिलेने केली आहे. बाबाच्या तावडीतून कशीबशी सुटका करून घेत महिलेने त्र्यंबकेश्वर पोलीस ठाणे गाठले आणि फरशीवाले बाबाविरुद्ध तक्रार दिली. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस पथकाने गुरूवारी पहाटे संशयित बाबाला ताब्यात घेतले. या घटनेची माहिती पसरताच त्याच्याकडून उपचार घेणाऱ्या रुग्णांमध्ये खळबळ उडाली.
त्र्यंबकेश्वर लगतच्या जंगल परिसरात वास्तव्यास असणाऱ्या फरशी बाबाने कथित जडीबुटीच्या उपचारांनी भल्याभल्यांना आकर्षित केले होते. सुमारे १६ वर्षांंपूर्वी त्याने या भागात बस्तान बसविले. प्रारंभीचा अपवाद वगळता आतापर्यंत त्याच्याकडे रुग्णांची अक्षरश रिघ लागत असे. केवळ स्थानिक नव्हे तर देशभरातील आजाराने हतबल झालेल्या रुग्णांचा बाबाकडे विशेष ओढा असल्याचे दिसून आले. राजकारणी, उच्चशिक्षित अशा समाजातील बहुतांश घटकांचा त्यात समावेश होता. या ठिकाणी रुग्णाची तपासणी करण्याची पद्धत वेगळी होती. प्रत्येकाच्या डोक्यावर फरशी ठेवून बाबा आजाराचे निदान करीत असे. या माध्यमातून आजार निश्चित झाला की सशुल्क वेगवेगळ्या औषधींची विक्री केली जात असे. या उपचार पद्धतीचा देशभरात चांगलाच गवगवा झाल्यामुळे आठवडय़ातील उपचाराच्या विशिष्ट दिवशी रुग्णांच्या वाहतुकीसाठी एस. टी. महामंडळाला खास बसेसची व्यवस्था करण्याची वेळ आली.
दर बारा वर्षांनी नाशिक व त्र्यंबकेश्वर नगरीत भरणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी देशभरातील लाखो भाविक या तीर्थस्थळांना भेट देण्यासाठी येत असतात. त्याचा बारकाईने विचार करून बाबाने आश्रमासाठी या जागेची निवड केली असण्याचा तपास यंत्रणेला संशय आहे. कारण, त्यामुळे अधिकाधिक प्रसिद्धी मिळून देशभरातील रुग्ण उपचार घेण्यासाठी आश्रमात येतील, असे गृहितक मांडण्यात आले असावे. वैद्यकीय उपचाराचा कोणताही अधिकृत परवाना नसलेल्या बाबाचे जंगलातील हे उपचार केंद्र अर्थात रुग्णालय राजरोसपणे अव्याहतपणे सुरू होते. संबंधित महिलेच्या तक्रारीनंतर फरशीवाले बाबाचा पर्दाफाश झाल्याची प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली.