Leading International Marathi News Daily                                  शुक्रवार, १६ जानेवारी २००९

(सविस्तर वृत्त)

परिसंवाद, कथाकथनामुळे साहित्य संमेलनात बहार
वार्ताहर / नंदुरबार

 
जिल्ह्य़ातील पहिल्याच साहित्य संमेलनातील उद्घाटन सत्र कविवर्य ना. धों. महानोर यांनी गाजविल्यानंतर परिसंवाद, काव्य संमेलन, कथाकथन या कार्यक्रमांनीही साहित्य प्रेमींना खिळवून ठेवले. ‘माझ्या साहित्याच्या प्रेरणा’ या विषयावरील परिसंवादातून माणूस हाच साहित्याची प्रेरणा असल्याचा सूर निघाला.
महानोर यांनी उद्घाटनाच्या सत्रात जिल्ह्य़ातील समस्या साहित्यिकांनी मांडण्याचे आवाहन करतानाच शेतकऱ्यांच्या वेदनाही प्रकर्षांने मांडल्या. त्यानंतर परिसंवादाचे सत्र सुरू झाले. या परिसंवादात मान्यवरांनी आपल्या साहित्याची प्रेरणा कोण, याविषयी मत प्रदर्शन केले. साहित्याची प्रेरणा वेगवेगळी असली तरी त्यांचे सूत्र माणुसच असतो. जीवनातील सुखदु:खासह विविध अनुभव, मनातील अस्वस्थता अशा अनेक गोष्टी साहित्य निर्मितीत येत असतात, असा सूर अनेकांनी आळवला. या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी
डॉ. मु. ब. शहा होते. प्रा. अनिल सोनार, डॉ. विश्वास पाटील, उज्ज्वल कुलकर्णी, डॉ. पितांबर सरोदे, प्रा. जीवन जगदाळे, प्रा. नंदकुमार कुलथे यांनी परिसंवादात सहभाग घेतला. डॉ. पाटील यांनी जे पेरावे तेच उगवते, असे सांगितले. कुलथे यांनी वर्तमानपत्रातील लेखांचा संग्रह तसेच ज्येष्ठ साहित्यिकांचे मार्गदर्शन प्रेरणादायक ठरल्याचे सांगितले. जगदाळे यांनी प्रा. पुरुषोत्तम पाटील यांच्यासह अनेकांचे मार्गदर्शन उपयुक्त ठरल्याचे तर सरोदे यांनी जीवनातील बरेवाईट अनुभव तसेच चांगल्या माणसांच्या सहवासाने चांगली साहित्य निर्मिती होण्यास पोषक वातावरण असते, असे अनुभव कथन केले. सोनार यांनी प्रा. ना. स. फरांदे तसेच डॉ. मु. ब. शहा यांच्याकडून तसेच आयुष्यातल्या विविध प्रसंगात ज्या घटना समाजरचना विस्कटवितात, त्यावेळची अस्वस्थता प्रेरणादायक ठरली असे सांगितले. शहा यांनी समारोपात माणूस ही साहित्याची प्रेरणा असून माणसांसाठी जगणारे खरे साहित्यिक होतात. साहित्य आणि व्यक्ती यांना वेगळेपण नसते. जी साहित्य कृती माणसाच्या मनात घर करते तीच खरी साहित्य कृती होय, असे सांगितले. उज्ज्वल कुलकर्णी यांनी वयाच्या पंधराव्या वर्षी महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या आश्रमात शिकायला गेलेली आई प्रेरणास्त्रोत ठरल्याचे सांगितले. आयुष्यातील सुखदु:ख, अस्वस्थ करणारी वादळे, विविध कंगोरे असलेल्या व्यक्तींकडूनही प्रेरणा मिळत गेल्याचे ते म्हणाले.
परिसंवादानंतर कथाकथनाचा कार्यक्रमही रंगला. अध्यक्षस्थानी उज्ज्वल कुलकर्णी होते. अनघा जोशी, संजयकुमार शर्मा, निंबाजीराव बागूल, दिनकर मोरे, जयवंत देशमुख यांनी अहिराणी बाजेच्या तसेच समाज जीवनाच्या वेगवेगळ्या अंगांना उलगविडणाऱ्या कथा तसेच ग्रामीण कथा यावेळी सादर केल्या. श्रोत्यांच्या मनाचा ठाव घेणारे काही प्रसंग कथाकथन कार्यक्रमाची रंगत वाढवून गेले.