Leading International Marathi News Daily                                  शुक्रवार, १६ जानेवारी २००९

(सविस्तर वृत्त)

नाशिकरोडमध्ये आजपासून ऋतुरंग महोत्सव
प्रतिनिधी / नाशिक

 
नाशिकची सांस्कृतिक ओळख करून देणारा महोत्सव म्हणून ऋतुरंग महोत्सवाची ओळख निर्माण झाली असून नव्या वर्षांला सामोरे जातांना प्रत्येकाच्या मनात लपलेली निराशा दूर सारत कडू आठवणींना बगल देत नवे संकल्प, नव्या उमेदीने हसत सामोर जा, असा संदेश देणारा एक महोत्सव म्हणून ऋतुरंगचे आगळे महत्व आहे. यंदा महोत्सवाचे सातवे वर्ष असून कार्यक्रमाचे आकर्षण ग्लिम्पसेस ऑफ इंडिया, डॉ. सलील कुलकर्णी आणि संदीप खरे या जोडगोळीचा ‘आयुष्यावर बोलु काही’, ‘तालरंग’ हे कार्यक्रम असून १६ ते १८ जानेवारी या कालावधीत नाशिकरोड येथील बिटको महाविद्यालयाच्या प्रांगणात हा महोत्सव होणार आहे.
आरोग्य राज्यमंत्री डॉ. शोभा बच्छाव यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. ग्लिमसेस् ऑफ इंडिया या कार्यक्रमात ‘तिरंगा एक रंग अनेक’ ही संकल्पना घेऊन भारतातील विविध प्रांतांच्या लोकनृत्याचा आविष्कार नृत्यालिका मुंबई ही संस्था सादर करणार आहे. यामध्ये मॉरिशसच्या यशस्वी दौऱ्यानंतर सुबल सरकार यांची कन्या किशुपाल व सहकारी यांचा चमु लोकगीते, लोकनृत्य यांची सुरेल गुंफण घेऊन येत आहे.
१७ जानेवारी रोजी डॉ. सलील कुलकर्णी आणि संदीप खरे या जोडीचा ‘आयुष्यावर बोलु काही’ हा कार्यक्रम होईल. या जोडीने या कार्यक्रमाच्या माध्यमातून कविता व संगीताचा एक अनोखा प्रयोग केला आहे. ज्यामुळे त्यांचे नाव मराठी माणसांच्या मनामनात पोहचले. महोत्सवाची सांगता १८ जानेवारी रोजी तालरंग कार्यक्रमाने होईल. यामध्ये संगीताच्या दुनियेत साईड ऱ्हिदम किंग म्हणून परिचित असेलेले दीपक बोरकर हे आपली कला सादर करणार आहेत. गेली चाळीस वर्षे तालवाद्यांच्या सोबतीने संगीताची वाटचाल ते करीत आहेत. त्यांच्याकडे सुमारे पाच हजार तालवाद्यांचा संग्रह आहे. संगीत क्षेत्रात या तालवाद्यांना खूप महत्व आहे. गाण्याला खुमारी येते ती साईड ऱ्हिदममुळे आणि म्हणूनच त्या वाद्यांचे महत्व पटवून देण्यासाठी कार्यक्रमात अप्पा वाढावकर यांच्या संगीत नियोजनात गाजलेली हिंदी-मराठी गीते सादर होतील. प्रसिध्द चित्रपट अभिनेता पुष्कर श्रोत्री कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहे. याशिवाय ॠतुरंग परिवाराने वर्षभर रसिकांना नाविण्यपूर्ण कार्यक्रम देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी वार्षिक सभासदत्व नोंदणी सुरू आहे. ॠतुरंगच्या प्रवेशिका मिळवण्यासाठी किंवा अधिक माहितीसाठी निलेश मुळे (९४२२२५३६९०) किंवा ॠतुरंग कार्यालय, देहभानु मेन्शन, बाफना ज्वेलर्स शेजारी नाशिक- पुणेरोड, नाशिकरोड येथे संपर्क साधावा.