Leading International Marathi News Daily                                  शुक्रवार, १६ जानेवारी २००९

(सविस्तर वृत्त)

वाघ अभियांत्रिकीतर्फे ‘कर्मवीर एक्स्पो २००९’ स्पर्धा
प्रतिनिधी / नाशिक

 
अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांना आपल्या कल्पक गुणांना वाव मिळावा म्हणून येथील कर्मवीर काकासाहेब वाघ अभियांत्रिकी शिक्षण संशोधन संस्थेतर्फे ‘कर्मवीर एक्स्पो २००९’ या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सहा व सात मार्च रोजी दोन विभागात ही स्पर्धा होणार आहे.
इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर, आय. टी. आणि मेकॅनिकल, प्रॉडक्शन, केमिकल, सिव्हील या दोन विभागांमध्ये या स्पर्धेचे वर्गीकरण करण्यात आले आहे. दोन्ही विभागासाठी स्वतंत्र पारितोषिक योजना ठेवण्यात आली असून प्रथम विजेत्यांना ५० हजार, व्दितीय ३० हजार तर तृतीय २० हजार रूपये देण्यात येणार आहे. २००३ पासून संस्थेच्या वतीने दरवर्षी या स्पर्धेचे आयोजन करण्यात येते.
प्रारंभी ही स्पर्धा महाराष्ट्र, गुजरात व गोवा या राज्यांपुरती मर्यादित होती. परंतु स्पर्धेतील विद्यार्थ्यांचा सहभाग व उत्साह पाहून २००६ पासून ही स्पर्धा राष्ट्रीय पातळीवर आयोजित करण्यात येते. विद्युत अभियांत्रिकी विभाग, आई. ई. टी. यु. के. यांच्या सहकार्याने ही स्पर्धा आयोजित केली जाते. या स्पर्धेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ, प्राचार्य डॉ. केशव नांदूरकर, डॉ. बी. ई. कुशारे यांनी केले आहे. दरम्यान या स्पर्धेच्या वेबसाईटचे व पोस्टरचे प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे सर्व संचालक उपस्थित होते.