Leading International Marathi News Daily                                  शुक्रवार, १६ जानेवारी २००९

(सविस्तर वृत्त)

मंदीच्या संकटावर भारताची लवकरच मात- डॉ. गोविलकर
नाशिक / प्रतिनिधी

 
जागतिक आर्थिक मंदीमुळे परदेशातून भारतात येणारी कामे कमी झाली, त्यामुळे भारतात रोजगारीचे प्रमाण कमी होत असल्याचे स्पष्ट करतानाच सरकार अर्थव्यवस्थेत खेळते भांडवल वाढविण्यासाठी उपाययोजना करीत असल्याने लवकरच भारत मंदीच्या संकटातून बाहेर पडेल असा आशावाद अर्थतज्ज्ञ डॉ. विनायक गोविलकर यांनी व्यक्त केला.
येथील के. टी. एच. एम. महाविद्यालयातील वाणिज्य शाखेच्या वतीनेआयोजित 'विचार मंथन 'या व्याख्यानमालेत ‘जागतिक आर्थिक मंदीस सामोरे जाण्यासाठीच्या उपाययोजना’ या विषयावर गोविलकर बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाणिज्य विभागप्रमुख प्रा. बी. बी. पगार हे होते.
अमेरिकेतील आर्थिक मंदीची तीन कारणे सांगताना त्यांनी अमेरिकेतील बँकांनी अपुरे तारण घेऊन मोठय़ा प्रमाणावर गृह कर्जाचे वाटप केल्याने बँका बुडाल्या. अमेरिकेने युध्द सामग्री, दारूगोळा व दारू उत्पादन यावर जास्त भर दिला असून देशाच्या भरभराटासाठी आवश्यक साधन संपत्तीच्या उत्पादनाकडे कमी लक्ष दिलेले आहे. अमेरिकेतील सेवकांना निवृत्ती वेतन सरकार देत नसून संबंधीत उद्योगावरच ते देण्याचा बोजा असतो. त्यामुळे त्यांच्या उत्पादन वस्तुंच्या किंमती जास्त असतात. या कारणामुळे मालास उठाव कमी मिळतो, असे गोविलकर यांनी सांगितले.
भारतात मंदी येण्याचे प्रमुख कारण म्हणजे परदेशी गुंतवणूकदारांनी भारतात केलेली गुंतवणूक काढण्यास सुरुवात केली हे होय. भारतातील पैसा बाहेर गेला व लोकांची खरेदी क्षमता कमी झाली. परदेशातून भारतात येणारी कामे कमी झाल्याने भारतातील रोजगाराचे प्रमाण कमी झाले. आपल्या देशाची एकूण निर्यात ०.९ टक्के इतकी असल्याने ती नैसर्गिक वस्तु व प्रगत तांत्रिक वस्तुंची असल्याने निर्यातीवर जास्त परिणाम झालेला नाही, असेही ते म्हणाले.
यावेळी उपप्राचार्य एस. सी. पाटील, प्रा. यु. बी. पाटील आदींसह प्राध्यापक व विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
मकर राशीत सूर्याचे संक्रमण- हिरे
मकरसंक्रातीला सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो. या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरु होते व दक्षिणायान संपते. मकर राशीत सूर्याचे संक्रमण म्हणून मकरसंक्रात सण साजरा केला जातो, अशी माहिती के. टी. एच. एम. महाविद्यालयात मकरसंक्रात व भूगोलदिनानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात प्रा. प्रमोदकुमार हिरे दिली.
१४ जानेवारी रोजी सूर्याचे किरण मकरवृत्तावर अधिकतम लंबरूप पडतात म्हणून दक्षिण गोलार्धात तीव्र उन्हाळा असतो. याच काळात उत्तर गोलार्धात तिरकस किरण पडतात.
मकरसंक्रातीपासून सूर्याचे तिळातिळाने उत्तरेकडे उत्तर गोलार्धात सरकण्यास सुरुवात होते आणि तिळातिळाने तापमानात वाढ होत जाते. उत्तर गोलार्धात मकरसंक्रातीपासून उन्हाळ्यास सुरुवात होते, असेही ते म्हणाले. मकरसंक्राती सणाला भारतीय संस्कृतीत अनन्यसाधारण महत्व असल्याचे मत प्राचार्य डॉ. व्ही. बी. गायकवाड यांनी व्यक्त केले.
इतिहासात नव्या विश्लेषणाची गरज- निकम
इतिहासात नव्या विश्लेषणाची नितांत गरज असल्याचे प्रतिपादन पुणे विद्यापीठातील सामाजिकशास्त्रे व मानसनीती विभागाचे अधिष्ठाता तथा शिरुर महाविद्यालयाचे प्राचार्य नंदकुमार निकम यांनी केले. के. टी. एच. एम. महाविद्यालयात इतिहास विभागाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात त्यांनी व्याख्यान दिले. इतिहासातून सोशल इंजिनिअरींग, टाइम मॅनेजमेंट, इव्हेंट मॅनेजमेंट, टीमवर्क यासारख्या गोष्टी आढळून येत असल्याचे स्पष्टीकरण त्यांनी केले. इतिहासातील शिवाजी महाराजांची आग्रा भेट व सुटका, शाहिस्तेखानावरील स्वारी, सुरतेची लूट, जिंजीवरील विजय अशा घटनांमधून महाराजांचे विशेष गुण दिसून येतात. ज्या राज्यकर्त्यांना हे जमले त्यांची राज्ये विस्तार पावली आणि ज्यांना जमले नाही, त्यांची राज्ये मोडकळीस आली ही साक्ष आपल्याला इतिहासातून मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. श्रीवास्तव अध्यक्षस्थानी होते. प्रास्ताविक इतिहास विभाग प्रमुख डॉ. स्नेहल सोनवणे यांनी केले. या कार्यक्रमासाठी समाजशास्त्र विभागप्रमुख प्रा. सुनंदा पाटील, राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. प्रतिभा पाटील आदींसह विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.