Leading International Marathi News Daily                                  शुक्रवार, १६ जानेवारी २००९

(सविस्तर वृत्त)

निमा कार्यशाळेतील सूर; जागतिक बाजारपेठेत निर्यातीला मोठी संधी
नाशिक / प्रतिनिधी

 
जागतिकीकरणामुळे जग हे एक व्यापारी खेडे बनले असून आज आपल्या उत्पादनाला जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही बाजारपेठ उपलब्ध आहे. ही एक मोठी संधी असली तरी यावेळी प्रत्येकाने आपल्याला अनेक परकीय देशांकडून स्पर्धेला सामोरे जावे लागणार आहे हे लक्षात घ्यावे, असे प्रतिपादन नाशिक विभागाचे उत्पादन तथा सीमाशुल्क आयुक्त ए. के. दास यांनी केले.
भारत सरकारच्या सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग विभागातर्फे आणि महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अ‍ॅण्ड अ‍ॅग्रिकल्चर आणि नाइस यांच्या संयुक्त विद्यमाने येथे आयोजित निर्यात कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर निमाचे माजी अध्यक्ष निशिकांत अहिरे, महाराष्ट्र चेंबरचे वरिष्ठ उपाध्यक्ष दिग्विजय कपाडिया, नाईसचे उपाध्यक्ष शहाबुद्दीन शेख आणि निलिमा पाटील उपस्थित होत्या. जागतिक बाजारपेठेत अजूनही भारताचा एक टक्क्य़ांपर्यंतचा वाटा आहे. त्यामुळे या क्षेत्रात प्रगतीला प्रचंड वाव आहे. परंतु, निर्यात क्षेत्रात पाऊल टाकताना बऱ्याच गोष्टींना महत्व देणे गरजेचे आहे. यात गुणवत्ता, वेळेचे बंधन, सादरीकरण आणि शासकीय बाबींची पूर्तता यांचा समावेश होतो. भारताच्या निर्यातीत वृद्धी व्हावी यासाठी भारत सरकार विशेष प्रयत्नशील असून उत्पादन तथा सीमाशुल्क विभागाचेही आता अतिशय सहकार्याचे धोरण आहे, असे दास म्हणाले. आजच्या काळात अशा कार्यशाळांची गरज असून कोणालाही याबाबतीत मार्गदर्शन हवे असल्यास विभागाचे दरवाजे त्यास कायम खुले आहे, असे आश्वासन त्यांनी दिले.
कापडिया यांनी निर्यात करताना मागणी तसा पुरवठा या तत्वावर भर देवून बाजारपेठ पाहणी, अभ्यास, उत्तम उत्पादनाची निवड, त्यासाठी उच्च प्रतीचा कच्चा माल, अद्ययावत उत्पादन प्रक्रिया, अचूक उत्पादन ही तत्वे जोपासली पाहिजेत, असे सांगितले. ऑर्डरप्रमाणे मालाचा पुरवठा करताना नमुन्याप्रमाणे माल असला पाहिजे आणि वेळेतच त्याची पूर्तता केली पाहिजे, पॅकींगलाही आजच्या जगात खूप महत्व आहे, असे त्यांनी सांगितले. निशिकांत अहिरे यांनी पूर्वीच्या काळी निर्यात मार्गदर्शनासाठी कोणतेही साधन नव्हते, परंतु आजच्या तंत्रज्ञान आणि जागतिकीकरणाच्या काळात प्रत्येकाने कायम तत्पर राहून संधीचा फायदा घ्यावा असे आवाहन केले. आता सरकारचाही निर्यातदाराभिमुख दृष्टीकोन आहे. सरकारकडून बऱ्याच प्रमाणात उत्तेजनार्थ योजना राबविल्या जात आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे भारतासारख्या प्रगतीशील देशाकडे सर्व विश्वाची नजर आहे. त्यामुळे आजच्या मंदीच्या काळातही जागतिक बाजारपेठेत भारताला खूप संधी उपलब्ध आहेत. परकीय गुंतवणूक, सेझ या अनेक बाबींमुळे निर्यातक्षेत्राच्या भरभराटीला खूप वाव आहे, असे ते म्हणाले. एम. एस. एम. ई. चे सराफ यांनी विभागाच्या योजनांची तसेच निर्यात कार्यशाळेच्या अभ्यासक्रमाची माहिती दिली. सूत्रसंचालन दिवाण यांनी तर मान्यवरांचा परिचय चेंबरच्या महिला समितीच्या अध्यक्षा निलिमा पाटील यांनी करून दिला. कार्यक्रमास चेंबरचे कार्यकारिणी सदस्य बबनराव चौरे, सुरेंद्रनाथ बुरड, उद्योग समितीचे अध्यक्ष राजेंद्र छाजेड आदी मान्यवर उपस्थित होते.