Leading International Marathi News Daily                                  शुक्रवार, १६ जानेवारी २००९
विविध

(सविस्तर वृत्त)

मुंबईवरील हल्ला ही भारताच्या संयमाचीच परीक्षा
लष्करप्रमुखांची स्पष्टोक्ती
नवी दिल्ली, १५ जानेवारी/पी.टी.आय.

 
मुंबईवर अतिरेक्यांनी केलेला हल्ला म्हणजे आमच्या संयमाचीच परीक्षा असून आमचा भूभाग आणि नागरिक यांच्या सुरक्षिततेसाठी आम्हाला सर्व पर्याय खुले आहेत, असे स्पष्ट प्रतिपादन लष्करप्रमुख जन. दीपक कपूर यांनी आज केले.
जवान व अधिकाऱ्यांसमोर ६१ व्या लष्कर दिन सोहळ्यात ते बोलत होते. ते म्हणाले, आमच्या शेजारी देशांमधील आव्हानांचा आमच्या सुरक्षेलाही धोका पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा शक्तींवर करडी नजर ठेवण्याची गरज आहे. पाकिस्तानसोबतचे सर्व प्रश्न शांततापूर्ण मार्गाने सोडविण्याची आमचीही इच्छा आहे. मात्र त्याचबरोबर दहशतवादाविरोधातील लढय़ासाठी आम्हाला सर्व पर्याय खुले आहेत. सरकार जी कामगिरी सोपवेल ती पार पाडण्यास लष्कर समर्थ आहे.
जागतिक मंदीची तीव्रता वाढत असली तरी लष्करासाठीच्या आर्थिक तरतुदीत सरकार कोणतीही कपात करणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे जवानांनीदेखील आपल्याला मिळणाऱ्या साधनसामग्रीचे मोल जाणले आणि जपले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
सीमेपलीकडील दहशतवादाप्रमाणेच जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी कारवाया तसेच ईशान्य भारतातील अस्थिरता, नक्षलवादी चळवळ अशा देशांतर्गत अतिरेकी कारवायांचे आव्हान मोठे आहे.
सर्व सरकारी यंत्रणा या आव्हानाचा मुकाबला करीत आहेत, असे त्यांनी नमूद केले. लष्कराने कडेकोट बंदोबस्त ठेवल्याने तसेच दहशतवादी हल्ल्यांना जराही वाव मिळणार नाही याची दक्षता घेतल्याने जम्मू आणि काश्मीरमधील निवडणुका शांततेत पार पडल्या, याकडे त्यांनी लक्ष वेधले. आसाम, मणिपूर व नागालँडमधील हिंसाचार आटोक्यात आणण्यातही लष्कराला यश आले आहे. नक्षलवादविरोधी कारवाईत लष्कर थेट सहभागी नसले तरी अन्य सरकारी यंत्रणांना आम्ही प्रशिक्षण व धोरणात्मक सहकार्य देत आहोत, असेही ते म्हणाले.

काश्मीरमध्ये ८०० अतिरेकी
अखनूर : जम्मू आणि काश्मीरमध्ये होणाऱ्या घुसखोरीवर २००४ पासून चांगलेच नियंत्रण आले असले तरी सुरक्षाविषयक विविध यंत्रणांनी घेतलेल्या आढाव्यानुसार या राज्यात सध्या ६०० ते ८०० अतिरेकी सक्रिय आहेत. लष्कराच्या उत्तर विभागाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल पी. सी. भारद्वाज यांनी ही माहिती आज दिली. अनेक कडवे अतिरेकी व म्होरके मारले गेल्याने दहशतवादी गटांमध्ये मोठय़ा प्रमाणात निराशा पसरली आहे, असेही त्यांनी सांगितले. मुंबईवरील हल्ल्यानंतर जगभर उमटलेली तीव्र प्रतिक्रिया लक्षात घेता पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील अतिरेक्यांच्या प्रशिक्षण छावण्यांमध्ये घट झाली आहे काय, असे विचारता ते म्हणाले, परिस्थितीत कोणताही बदल झालेला नाही. छावण्यांच्या जागा केवळ बदलल्या जातात. संख्या तेवढीच राहाते.