Leading International Marathi News Daily                                  शुक्रवार, १६ जानेवारी २००९
विविध

(सविस्तर वृत्त)

ज्येष्ठ चित्रपट निर्माते व दिग्दर्शक तपन सिन्हा कालवश
कोलकाता, १५ जानेवारी/पी.टी.आय.

 

‘काबुलीवाला’, ‘एक डॉक्टर की मौत’सारखे अभिजात चित्रपट बनविणारे आणि सर्वसामान्य नागरिकाची दु:खे आपल्या कलाकृतींमधून तरलपणे हाताळणारे ज्येष्ठ बंगाली चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक तपन सिन्हा यांचे येथे दीर्घ आजाराअंती वृध्दापकाळाने येथे निधन झाले. ८४ वर्षांंच्या सिन्हा यांना चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च मानला गेलेल्या दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरविण्यात आले होते. रवींद्रनाथ टागोर यांच्या कथेवर आधारित ‘काबुलीवाला’, ‘उपहार’, ‘क्षुधित पाषाण’, ‘जिंदेर बंदी’, ‘लौह कपाट’, ‘एक डॉक्टर की मौत’, लहान मुलांसाठी ‘सफेद हाथी’ या चित्रपटांमधून त्यांनी ज्या पध्दतीने कथानक हाताळले त्यामुळे त्यांना ‘मास्टर स्टोरी टेलर’ असे संबोधले जात असे. त्यांनी ‘काबुलीवाला’ची निर्मिती बंगालीमध्ये केली.. त्याच्या यशानंतर निर्माते व दिग्दर्शक बिमल रॉय यांनी हा चित्रपट हिंदीमध्ये केला होता.
रुग्णालयाच्या सूत्रांनी त्यांचे निधन न्युमोनियाच्या विकाराने झाल्याचे म्हटले आहे. त्यांच्या मागे एक पुत्र असून त्यांची अभिनेत्री पत्नी अरुंधती देवी यांचे १९९० मध्येच निधन झाले होते. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तरुण वयात चार्ल्स डिकन्स यांची ‘अ टेल ऑफ द टू सिटीज्’ ही कादंबरी व त्यावर तयार करण्यात आलेला चित्रपट पाहून ते प्रभावित झाले व त्यांनी चित्रपट क्षेत्रात येण्याचा निर्णय घेतला. विल्यम वायलर तसेच जॉन फोर्ड या अमेरिकी दिग्दर्शकांचे ते चिकित्सक अभ्यासक होते. सुरुवातीला बंगाली चित्रसृष्टीत त्यांनी एक तंत्रज्ञ म्हणून काम सुरू केले. पण पुढे संपूर्ण कारकीर्दीत त्यांनी ४१ चित्रपट तयार केले, त्यापैकी १९ चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता तसेच काहींचा लंडन, व्हेनिस, मॉस्को आणि बर्लिन येथे भरलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातही गौरव झाला होता. कोलकातामध्ये भौतिकशास्त्र विषयात मास्टर्स पदवी मिळविल्यानंतर १९४६ मध्ये असिस्टंट साऊंड रेकॉर्डिस्ट म्हणून त्यांनी न्यू थिएटर्समध्ये प्रवेश केला.
दोन वर्षांंनंतर तेथून ते कोलकाता मूव्हीटोन स्टुडियोमध्ये गेले व तेथेच त्यांना लंडनमध्ये पाइनवुड स्टुडियोमध्ये जाऊन शिक्षण घेण्याची संधी मिळाली. तेथे फेड्रिको फेलिनी, विट्टोरियो डि-सिका यांचे काम बघण्याची संधी त्यांना मिळाली. हार्ल्स क्रेटन यांच्यासारख्या दिग्दर्शकाच्या हाताखाली ते तंत्रज्ञ म्हणूनही तेथे काम करीत होते. या लंडन भेटीचा उपयोग त्यांनी चित्रपट कला व माध्यम शिकून घेण्यासाठी केला.
१९५४ मध्ये त्यांनी ‘अंकुश’ हा बंगाली चित्रपट बनविला. जमीनदाराच्या मालकीचा एक हत्ती ही या चित्रपटात एक मुख्य व्यक्तिरेखा होती व त्या काळाच्या अनुषंगाने हा चित्रपट एक धाडसी प्रयोग होता. पण व्यावसायिकदृष्टय़ा तो अयशस्वी ठरला.
‘उपहार’ आणि ‘टॉन्सिल’ हे त्यांचे नंतरचे दोन चित्रपट माफक यशस्वी ठरले, पण ‘काबुलीवाला’ या त्यांच्या चौथ्या चित्रपटाने त्यांना खूपच हात दिला. त्यानंतर त्यांनी कधी मागे वळून पाहिलेच नाही. ते साध्या सोप्या पध्दतीने कथा रंगवून ती आपल्या चित्रपटांद्वारे मांडत असत आणि त्यात सर्वसामान्य नागरिकाच्या दु:खाला वाचा फोडलेली असे. त्यामुळेच उत्तम कथा मांडणारा प्रभावी चित्रपट निर्माता म्हणून त्यांचा लौकिक होता.
‘काबुलीवाला’, ‘एक डॉक्टर की मौत’, ‘निर्जन सैकते’, ‘हाटे बाजारे’ आणि ‘आदमी और औरत’ हे त्यांचे चित्रपट ‘क्लासिक’ या सदरात गणले जातात. सत्यजित राय यांच्या ‘पाथेर पांचाली’च्या आधी ‘अंकुश’ची निर्मिती करून त्यांनी वास्तववादी चित्रपटांची मुहूर्तमेढ रोवण्याचा प्रयत्न केला होता. पण तोच अपयशी ठरला. त्यांच्या समकालिन इतर दिग्दर्शकांप्रमाणे त्यांच्या कामावर मात्र चर्चा कमी झाली.