Leading International Marathi News Daily                                  शुक्रवार, १६ जानेवारी २००९
विविध

(सविस्तर वृत्त)

‘सत्यम’ला बेल-आऊटसाठी शासनाकडून आर्थिक मदत नाही
नवी दिल्ली, १५ जानेवारी/पी.टी.आय.

 

आपल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनखर्चासाठी सत्यमचे ज्येष्ठ अधिकारी राम मायनामपती यांनी सरकारकडे १५० कोटींची आर्थिक मदत मागितली असली तरी केंद्रसरकारने सध्या समस्यांच्या गर्तेत सापडलेल्या सत्यमला मदत करण्यास नकार दिला आहे. अर्थात सत्यममधील कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या वाचविण्यासाठी काहीही मदत करण्याची तयारी मात्र सरकारने दर्शविली आहे. सत्यमला आर्थिक मदत मिळण्यासंबंधी जो काही निर्णय घ्यायचा आहे तो आता नव्या संचालक मंडळाने घ्यावयाचा आहे. कंपनीला त्यांनी केलेल्या घोटाळ्यातून बाहेर काढण्यासाठी सरकार प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष काहीही मदत करणार नाही असे केंद्रीय उद्योग राज्यमंत्री अश्विनीकुमार यांनी येथे सांगितले.
सरकार सत्यमला काही बेल-आऊट पॅकेज देण्याच्या मताचे आहे काय असे विचारता अश्विनीकुमार म्हणाले की, सत्यम कंपनीवर नियुक्ती करण्यात आलेल्या नव्या संचालक मंडळाने खरे तर हा निर्णय घ्यावयाचा आहे. या संचालक मंडळाने सर्व जबाबदाऱ्या सांभाळून जो काही निर्णय घेतला असेल त्याच्याशी निगडित जे काही सरकारने करणे आवश्यक आहे ते सरकार करील. कारण या आय टी क्षेत्रातील चांगल्या कंपनीमधील नोकऱ्या वाचविणे ही काळाची गरज आहे. सत्यमचे भागभांडवल व त्याचा नावलौकिक आणि कर्मचारी वर्ग अबाधित राहील यासाठी सरकार आपल्याकडून आवश्यक ती मदत जरूर करेल, असेही त्यांनी नि:संदिग्धपणे सांगितले. सत्यममध्ये उघड झालेल्या घोटाळ्यामुळे एकेकाळी भारताच्या आयटी क्षेत्रात प्रगतीचा खास दाखला देण्यासाठी ज्या सत्यमचे नाव घेतले गेले जायचे त्यास धक्का लागता कामा नये अशी सरकारची इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्रसरकार सत्यम कंपनीला सध्याच्या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी काही आर्थिक मदत करण्याचा विचार आहे अशी आज दिवसभर हवा पसरली होती, मात्र पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी त्यात फारसा रस दाखविला नाही. दरम्यान, सत्यममध्ये निर्माण झालेले प्रश्न सोडविण्यासाठी इन्फोसिसचे विद्यमान संचालक मंडळ काही प्रयत्न करणार नाही, या कंपनीचा प्रश्न याच कंपनीवर नियुक्त झालेले संचालक मंडळ सोडवेल असे इन्फोसिसचे प्रमुख नारायणमूर्ती यांनी सांगितले. नवे संचालक दीपक पारेख यांनी सांगितले की, कंपनी आपली मालमत्ता विकून काही निधी जमा करू शकते व आपल्या समस्यांवर मात करण्याच्या अनुषंगाने वाटचाल करू शकते. सत्यमच्या अखत्यारीत असलेल्या मालमत्ता बाजारात विकून निधी जमा करता येईल.