Leading International Marathi News Daily                                  शुक्रवार, १६ जानेवारी २००९
विविध

(सविस्तर वृत्त)

भारताच्या पुराव्यांवर पाकिस्तान आठवडय़ात प्रतिक्रिया देणार
इस्लामाबाद, १५ जानेवारी/पी.टी.आय.

 

मुंबई हल्ल्याबाबत भारताने सादर केलेल्या पुराव्यांवर पाकिस्तान आठवडय़ाभरात अधिकृत प्रतिक्रिया देईल, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याचा हवाला देऊन पाकिस्तानच्या ‘द नेशन’ या वृत्तपत्राने म्हटले आहे.
भारताकडून सादर करण्यात आलेले पुरावे अपुरे व अविश्वासार्ह असून मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा तपास उभय देशांनी एकत्रितपणे करावा, अशी मागणी पाकिस्तानने तयार केलेल्या अहवालात मांडली आहे.
हा अहवाल जवळपास पूर्णपणे तयार झाला असून, गृहमंत्रालय, परराष्ट्र खाते आणि गुप्तचर संस्थांच्या मदतीने त्यावर शेवटचा हात फिरविला जात आहे. पंतप्रधान आणि राष्ट्राध्यक्षांच्या संमतीनंतर आठवडय़ात तो भारताकडे सुपूर्द करण्यात येईल, असे या अधिकाऱ्याने म्हटले आहे.
भारताने दिलेल्या पुराव्यांची सखोल चौकशी करण्यात आली आहे. त्याचबरोबर भारताने पुरावे सादर करावेत, माहिती नव्हे, अशी प्रतिक्रियाही पाकिस्तानकडून देण्यात आली होती .
हे पुरावे अपुरे असून, विश्वासार्ह नसल्याचे पाकिस्तानने आधीच जाहीर केले आहे. संयुक्त मोहिमेद्वारे हल्ल्याची चौकशी करावी हा सर्वात उत्तम पर्याय असल्याचे या अधिकाऱ्याने म्हटले आहे.
पुरावे अपुरे असल्याचे पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांनी मंगळवारी संसदेत जाहीर केले होते. त्यावर परराष्ट्र मंत्री प्रणब मुखर्जी यांनी टीकास्त्र सोडले आहे. दरम्यान, भारताने हल्ल्याच्या संयुक्त चौकशीचा पाकिस्तानचा प्रस्ताव स्वीकारावा, असे आणखी एका पाकिस्तानी अधिकाऱ्याने म्हटले आहे. मुंबईवर झालेल्या हल्ल्याकडे पाकिस्तान गांभीर्याने पाहत नसते, तर अशा प्रकारचा प्रस्तावच भारताकडे दिला गेला नसता. जागतिक समुदायाने त्याबाबत हस्तक्षेप करावा, अशी मागणीही या अधिकाऱ्याने केली.