Leading International Marathi News Daily                                  शुक्रवार, १६ जानेवारी २००९
व्यक्तिवेध

‘माझ्या गायनावर अनेकांचे प्रभाव आहेत, असे मला वाटते. सगळय़ा घराण्यांचे चांगले संगीत मला नेहमीच भावते, पण माझ्यापुरता विचार केला तर एखाद्या घराण्यापेक्षा एखाद्या गायकाची शैली माझ्या गायनावर प्रभाव टाकते. त्यामुळे हेतुत: मी कोणत्या एका शैलीतच गाईन असे घडत नाही. माझे संगीत रसिकांना आनंद देणारे असावे, त्यांना रागाचा मूड माझ्या गायनातून प्रतीत व्हावा, याकडे मी जास्त लक्ष देतो. आजकालच्या जमान्यात ध्वनिमुद्रित संगीताचा एवढा मोठा साठा सहज उपलब्ध असताना माझ्याबाबत जे घडले, ते कुणाही कलावंताच्या बाबत घडू शकते.’ पंडित उल्हास कशाळकर यांचे हे विचार त्यांची सांगीतिक दृष्टी स्पष्ट करण्यास पुरेशी आहे. संगीत नाटक अकादमीने त्यांना पुरस्कार देऊन त्यांचा जो गौरव केला आहे, तो त्यांच्या या संगीताकडे बघण्याच्या दृष्टिकोनाचाही आहे, असे म्हणावे

 

लागेल. शास्त्रीय संगीतात कोणताही कलाकार पुढे येऊ लागला, की त्याला या घराण्यांच्या ‘लेबल’शिवाय रसिकांसमोर जाताच येत नसे, अशी परिस्थिती अगदी वीस-पंचवीस वर्षांपूर्वीपर्यंत होती. माध्यमांच्या क्रांतीनंतर घराणे हे केवळ नावापुरते उरते की काय, अशी शंका आता व्यक्त होऊ लागली आहे. घराणे म्हणजे तरी काय, तर राग मांडणीची एक विशिष्ट सौंदर्यवादी शैली! किराणा घराण्यात आलापीला प्राधान्य, तर ग्वाल्हेर घराण्यात राग मांडणीच्या तत्त्वाला महत्त्व! जयपूर घराण्यात लयीच्या अंगाचा ठसठशीत पुरावा, तर आग्रा घराण्यात सांगीतिक ज्ञानाला अधिक महत्त्व. पण असे असले तरी या सगळय़ा घराण्यांच्या भिंती जागतिकीकरणाच्या रेटय़ात हळूहळू पुसल्या जाऊ लागल्या आहेत. तरीही घराण्याच्या मूळ शैलीशी पूर्ण फारकत घेऊन स्वत:ची नवी शैली निर्माण करणारे कलावंत आजही विरळाच आहेत. उल्हास कशाळकर यांनी ग्वाल्हेर गायकीचे शिक्षण घेतले, असे जरी त्यांचा ‘बायोडाटा’ सांगत असला तरी त्यांनी त्या शैलीत स्वत:ची वेगळी उपज मिसळली आहे. ही उपज वेगळी असली तरी त्यांनी मूळ शैलीचा आधार मात्र सोडलेला नाही. गजाननबुवा जोशी, राम मराठे आणि त्यांचे पिताश्री यांच्याकडून संगीताचे शिक्षण त्यांनी घेतले, पण बदलत्या काळाच्या खाणाखुणा वेळीच समजणाऱ्या थोडय़ा कलावंतांमध्ये त्यांची गणना अशासाठी करायची की त्यांनी आपले गायन रसिकाभिमुख केले. भारतीय अभिजात संगीताच्या क्षेत्रात दिगंत कीर्ती मिळवणाऱ्या सगळय़ाच कलावंतांनी त्यांच्या गुरूची झेरॉक्स होण्याचे नाकारले आणि त्यांनी स्वप्रतिभेने गुरूकडून मिळालेल्या ज्ञानात नवी भर घातली. कशाळकरही नेमके हेच करत आहेत. संगीताकडे बघण्याची त्यांची दृष्टी नव्या जगाचा वेध घेणारी आहे. आकाशवाणीवर संगीत विभागात अधिकारी म्हणून काही काळ काम केल्यानंतर ते संगीत रीसर्च अकादमीमध्ये गुरू म्हणून दाखल झाले. देशभरातील सगळय़ा संगीत सभांमध्ये आपली कला त्यांनी सादर केली आहे. त्यांचे संगीत कार्यक्रमांचे दौरे आज वेगाने सुरू आहेत. गायन केवळ रंजक न होता, त्यात नवा विचार व्यक्त व्हायला हवा, असा त्यांचा प्रयत्न असतो. एकविसाव्या शतकात त्यांनी मांडलेला विचार संगीताचा वारसा पुढे नेण्यासाठी महत्त्वाचा आहे. त्यांच्या मते घराणी म्हणजे पिंजरे नव्हेत. नव्या जगात संगीत हा व्यवसायाचे रूप धारण करू लागल्यावर लहान वयातच कलावंत बनण्याची इच्छा असणारे खूपजण पुढे येतात. परंतु अभिजात संगीतात कामगिरी करण्यासाठी कलावंताने पुरेसा वेळ दिला पाहिजे. वयाच्या चाळिशीपर्यंत कलावंताने स्वत:ला घडविणे हेच श्रेयस्कर असते. कलावंत म्हणून जी कालात्मक लढाई करावी लागते, तिला पर्याय नाही, असे त्यांचे मत आजच्या कलावंतांनी समजून घ्यायला हवे. त्यांना मिळालेला पुरस्कार त्यांच्या या कलात्मक आणि व्यावहारिक जाणिवांच्या संगमाला आहे, असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही.