Leading International Marathi News Daily                                  शुक्रवार, १६ जानेवारी २००९
विविध

ज्येष्ठ चित्रपट निर्माते व दिग्दर्शक तपन सिन्हा कालवश
कोलकाता, १५ जानेवारी/पी.टी.आय.

‘काबुलीवाला’, ‘एक डॉक्टर की मौत’सारखे अभिजात चित्रपट बनविणारे आणि सर्वसामान्य नागरिकाची दु:खे आपल्या कलाकृतींमधून तरलपणे हाताळणारे ज्येष्ठ बंगाली चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक तपन सिन्हा यांचे येथे दीर्घ आजाराअंती वृध्दापकाळाने येथे निधन झाले. ८४ वर्षांंच्या सिन्हा यांना चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च मानला गेलेल्या दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरविण्यात आले होते. रवींद्रनाथ टागोर यांच्या कथेवर आधारित ‘काबुलीवाला’, ‘उपहार’, ‘क्षुधित पाषाण’, ‘जिंदेर बंदी’, ‘लौह कपाट’, ‘एक डॉक्टर की मौत’, लहान मुलांसाठी ‘सफेद हाथी’ या चित्रपटांमधून त्यांनी ज्या पध्दतीने कथानक हाताळले त्यामुळे त्यांना ‘मास्टर स्टोरी टेलर’ असे संबोधले जात असे. त्यांनी ‘काबुलीवाला’ची निर्मिती बंगालीमध्ये केली..

मुंबईवरील हल्ला ही भारताच्या संयमाचीच परीक्षा
लष्करप्रमुखांची स्पष्टोक्ती

नवी दिल्ली, १५ जानेवारी/पी.टी.आय.

मुंबईवर अतिरेक्यांनी केलेला हल्ला म्हणजे आमच्या संयमाचीच परीक्षा असून आमचा भूभाग आणि नागरिक यांच्या सुरक्षिततेसाठी आम्हाला सर्व पर्याय खुले आहेत, असे स्पष्ट प्रतिपादन लष्करप्रमुख जन. दीपक कपूर यांनी आज केले.
जवान व अधिकाऱ्यांसमोर ६१ व्या लष्कर दिन सोहळ्यात ते बोलत होते. ते म्हणाले, आमच्या शेजारी देशांमधील आव्हानांचा आमच्या सुरक्षेलाही धोका पोहोचण्याची शक्यता आहे.

‘सत्यम’ला बेल-आऊटसाठी शासनाकडून आर्थिक मदत नाही
नवी दिल्ली, १५ जानेवारी/पी.टी.आय.

आपल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनखर्चासाठी सत्यमचे ज्येष्ठ अधिकारी राम मायनामपती यांनी सरकारकडे १५० कोटींची आर्थिक मदत मागितली असली तरी केंद्रसरकारने सध्या समस्यांच्या गर्तेत सापडलेल्या सत्यमला मदत करण्यास नकार दिला आहे. अर्थात सत्यममधील कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या वाचविण्यासाठी काहीही मदत करण्याची तयारी मात्र सरकारने दर्शविली आहे. सत्यमला आर्थिक मदत मिळण्यासंबंधी जो काही निर्णय घ्यायचा आहे तो आता नव्या संचालक मंडळाने घ्यावयाचा आहे. कंपनीला त्यांनी केलेल्या घोटाळ्यातून बाहेर काढण्यासाठी सरकार प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष काहीही मदत करणार नाही असे केंद्रीय उद्योग राज्यमंत्री अश्विनीकुमार यांनी येथे सांगितले.

भारताच्या पुराव्यांवर पाकिस्तान आठवडय़ात प्रतिक्रिया देणार
इस्लामाबाद, १५ जानेवारी/पी.टी.आय.

मुंबई हल्ल्याबाबत भारताने सादर केलेल्या पुराव्यांवर पाकिस्तान आठवडय़ाभरात अधिकृत प्रतिक्रिया देईल, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याचा हवाला देऊन पाकिस्तानच्या ‘द नेशन’ या वृत्तपत्राने म्हटले आहे. भारताकडून सादर करण्यात आलेले पुरावे अपुरे व अविश्वासार्ह असून मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा तपास उभय देशांनी एकत्रितपणे करावा, अशी मागणी पाकिस्तानने तयार केलेल्या अहवालात मांडली आहे.

‘स्लमडॉग’वर अमिताभची टीका
नवी दिल्ली, १५ जानेवारी/वृत्तसंस्था

‘गोल्डन ग्लोब’ मिळविण्याच्या आधीपासूनच जगभरातून कौतुकाचा विषय बनलेल्या ब्रिटिश दिग्दर्शक डॅनी बॉयल यांच्या ‘स्लमडॉग मिलियनर’ चित्रपटावर भारताच्या दारिद्य्राचे वाईट चित्रण केल्याचा आरोप करत ‘बीग बी’ अमिताभ बच्चन यांनी आपल्या ब्लॉगमधून टीका केली आहे. अमिताभ यांनी पॅरिसहून लिहिलेल्या आपल्या ‘ब्लॉगपोस्ट’मध्ये म्हटले आहे, की ‘स्लमडॉग मिलियनर’मध्ये अत्यंत विदारक आणि घाणेरडे असे तिसऱ्या जगातील राष्ट्र म्हणून भारताचे चित्रण केले आहे. ते कोणाही भारतीयाच्या भावना दुखावणारे ठरू शकते. मात्र हे लक्षात घेतले पाहिजे की ज्या विदारक गोष्टी या चित्रपटात दाखविण्यात आल्या आहेत, त्या कोणत्याही प्रगत देशातदेखील असू शकतात. भारतीय लेखकाच्या मूळ कल्पनेवर हा चित्रपट बेतण्यात आला असून, पाश्चिमात्यांनी त्याचे चित्रपटीय रूपांतर केल्यामुळे स्लमडॉगला कलात्मक चित्रपट म्हणून जागतिक मान्यता मिळाली असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. अमिताभ बच्चन यांनी पुढे म्हटले आहे की, भारतीय सिनेमाच्या जगभरातील प्रसाराबाबतच्या बदलत्या प्रवाहावरही त्यांनी आपल्या ब्लॉगवरून चर्चा केली. सत्यजित राय यांनी भारतीय सिनेमाला जगाच्या नकाशावर नेऊन ठेवल्यानंतर पलायनवादी आणि व्यावसायिक म्हणून ओळखला जाणारा भारतीय सिनेमा अनेक वर्षे जगाच्या नजरेत आपले स्थान निर्माण करण्यासाठी लढत आहे. येथील प्रेक्षकांनी मोठय़ा प्रमाणावर उचलून धरलेल्या चित्रपटांची बॉलीवूडपलीकडील जगात दखलही घेतली जात नाही. बॉलीवूडचे पलायनवादी दिग्दर्शक,फॅन्टसी, भपकेबाजपणा यावर भर देत असल्यामुळे कान, बर्लिन आणि व्हेनिस चित्रपट महोत्सवांमध्ये कोणताही प्रभाव पाडू शकत नाही. मात्र यात सध्या अत्यंत वेगाने बदल होत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

मायावतीच्या सरकारवर खंडणीखोरीचा आरोप; हजारो काँग्रेस कार्यकर्त्यांना अटक
लखनऊ, १५ जानेवारी / पी.टी.आय.

देणगीच्या नावाखाली मायावतीच्या नेतृत्वाखालील सरकार लोकांच्याकडून खंडणी उकळत असल्याचा आरोप करीत कॉँग्रेसच्या हजारो कार्यकर्त्यांनी आज अटक करवून घेतली. मुख्यमंत्री मायावती यांच्या वाढदिवसानिमित्त हे कार्यकर्ते निदर्शने करीत होती. प्रदेश कॉँग्रेसचे अध्यक्ष रिटा बहुगुणा यांच्या नेतृत्वाखाली ही निदर्शने करण्यात आली. मायावती यांच्या वाढदिवसानिमित्त पक्षासाठीच्या देणगीचे कारण देत प्रशासन तसेच आमदार आणि बसपा कार्यकर्त्यांकर्ते सामान्य नागरिकांकडून खंडणी वसूली करीत असल्याचा आरोप अखिल भारतीय कॉँग्रेस समितीचे महासचिव तसेच राज्याचे प्रभारी अध्यक्ष दिग्विजय सिंग यांनी येथे पत्रकारांशी बोलताना केला. याबाबतचे ठोस पुरावे आपल्याकडे असल्याचेही त्यांनी सांगितले. ही खंडणी वसूली नसून पक्षासाठी देणगी घेण्यात येत असल्याचे मायावती यांनी सांगितले असले तरी त्यामध्ये अजिबात तथ्य नसल्याचे स्पष्ट करीत सिंग म्हणाले सामान्य नागरिकांकडून जबरदस्तीने पैसे घेण्यात आले असून त्याला देणघी नसून खंडणी उकळणे म्हणतात. राज्यात पहिल्यांदाच असा प्रकार होत असून त्यामध्ये प्रशासन आघाडीवर आहे. सरकारनेच लोकांना लुटायचे म्हणजे अजबच असल्याची मल्लिनाथी करीत ते म्हणाले हा प्रकार यापुढे आम्ही होऊ देणार नाही. प्रदेश कॉँग्रेसच्या अध्यक्षा रिटा बहुगुणा यांच्या नेतृत्वाखाली आलेल्या हजारो कार्यकर्त्यांनी यावेळी मायावती यांच्या विरोधात जोरदार निदर्शने केली. ‘मायावती की साथी खुनी हत्ती’ अशा प्रकारच्या घोषणा यावेळी देण्यात आला. त्यानंतर या सर्वाना पोलीसांनी ताब्यात घेतले.

पाकिस्तान आठवडय़ानंतर तोंड उघडणार!
इस्लामाबाद, १५ जानेवारी/पी.टी.आय.

मुंबई हल्ल्याबाबत भारताने सादर केलेल्या पुराव्यांवर पाकिस्तान आठवडय़ाभरात अधिकृत प्रतिक्रिया देईल, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याचा हवाला देऊन पाकिस्तानच्या ‘द नेशन’ या वृत्तपत्राने म्हटले आहे. भारताकडून सादर करण्यात आलेले पुरावे अपुरे व अविश्वासार्ह असून मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा तपास उभय देशांनी एकत्रितपणे करावा, अशी मागणी पाकिस्तानने अहवालात मांडली आहे. हा अहवाल जवळपास पूर्णपणे तयार झाला असून, गृहमंत्रालय, परराष्ट्र खाते आणि गुप्तचर संस्थांच्या मदतीने त्यावर शेवटचा हात फिरविला जात आहे. पंतप्रधान आणि राष्ट्राध्यक्षांच्या संमतीनंतर आठवडय़ात तो भारताकडे सुपूर्द करण्यात येईल, असे या अधिकाऱ्याने म्हटले आहे. भारताने दिलेल्या पुराव्यांची सखोल चौकशी करण्यात आली आहे. त्याचबरोबर भारताने पुरावे सादर करावेत, माहिती नव्हे, अशी प्रतिक्रियाही पाकिस्तानकडून देण्यात आली होती .

‘लिट्टे’चा आणखी एक विमानतळ उद्ध्वस्त
कोलंबो, १५ जानेवारी / पी.टी.आय.

जाफनाच्या बहुतांश भागावर कब्जा केल्यानंतर श्रीलंकन लष्कराची आगेकूच सुरूच असून उत्तर श्रीलंकेतील तुंबळ संघर्षांनंतर लिट्टेच्या वापरातील पाचवा विमानतळ लष्कराने उध्वस्त केला. दरम्यान लिट्टेचा गड मानला जात असलेल्या मुलाईतिवू भागात लिट्टेच्या ४९ बंडखोरांचे मृतदेह आज लष्कराने दफन केले. संरक्षण सूत्रांनी उत्तर श्रीलंकेतील संघर्षांची माहिती देताना इरनामडू तलावाच्या पूर्वेला असलेला विमानतळ उध्वस्त केल्याचे सांगितले. विमानतळाची धावपट्टी १ हजार मीटर लांब आणि ५० मीटर रुंद होती. श्रीलंकेच्या लष्कराने लिट्टेच्या विरोधात सुरू केलेल्या मोहिमेला आंतरराष्ट्रीय स्तरावरूनही पाठिंबा मिळत आहे. संयुक्त राष्ट्रांचेही श्रीलंका सरकारने चालविलेल्या या मोहिमेवर बारीक लक्ष आहे.

उमा-शेखावत भेटीने भाजपात अस्वस्थता
नवी दिल्ली, १५ जानेवारी / पी.टी.आय.

माजी उपराष्ट्रपती भैरोसिंग शेखावत यांनी लोकसभेची निवडणूक लढवल्यास भारतीय जनशक्तीचा त्यांना पाठिंबा राहील, अशी घोषणा पक्षाच्या अध्यक्षा उमा भारती यांनी आज केली. उमा भारतींनी आज नवी दिल्लीत शेखावत यांच्याशी अर्धा तास चर्चा केली. या चर्चेदरम्यान भारतीय जनशक्ती शेखावत यांच्या पाठिशी असल्याची ग्वाही उमा भारतींनी शेखावत यांना दिली. ही लढाई शेखावत कुठवर जारी ठेवणार हे जाणून घेण्यासाठी आपण त्यांची भेट घेतली, असे उमा भारतींनी भेटीनंतर पत्रकारांना सांगितले. उभय नेत्यांच्या भेटीने भाजपात अस्वस्थता पसरली आहे. भैरोसिंग शेखावत यांच्याशी हातमिळवणी करणार का, अशी पृच्छा केली असता त्या म्हणाल्या, उमा म्हणजे पार्वती आणि भैरो म्हणजे शिव. मंदिरात जर गेलात तर शिव-पार्वती एकाच गाभाऱ्यात असतात. त्यामुळे आम्ही एकत्र आहोत.

फिलिपाइन्समध्ये नऊ संशयित दहशतवादी पकडले
कोटाबाटू(फिलिपाईन्स), १५ जानेवारी/पी.टी.आय.

अल् काईदाशी संबंध असलेल्या ‘जेमा इस्लामिया’ या इस्लामी दहशतवादी संघटनेच्या नऊ दहशतवाद्यांना दक्षिण फिलिपाईन्सच्या विविध भागात टाकण्यात आलेल्या धाडीत पकडण्यात आल्याचे, फिलिपाईन्सच्या लष्कराने स्पष्ट केले.डिसेंबरमध्ये या भागात करण्यात आलेल्या बॉम्बस्फोटांच्या मालिकेत वापरण्यात आलेल्या स्फोटकांसारखीच स्फोटके या संशयितांकडून हस्तगत करण्यात आली आहेत. या दहशतवाद्यांची प्राथमिक चौकशी करण्यात येत असून, ते इस्लामी राष्ट्रांतून आले आहेत का, याबाबत अद्याप माहिती उपलब्ध झाली नसल्याचे लष्कराने म्हटले आहे. मंगळवार आणि बुधवारी मिंडानौ बेटावरील अवांग भागात या संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात आली.