Leading International Marathi News Daily
शनिवार, १७ जानेवारी २००९
  नवी पालवी, नवी तकाकी
  ध्यास पूर्णचंद्राचा!
  कार्य संस्कृती
  कोण म्हणतं टक्का दिला?!
  विज्ञानमयी
  लग्न करताय? हो.. नाही.. नको.. हवं.. माहीत नाही!
  दुपट्टा क्वीन
  दहशतवादाचा माहितीकोश
  निरीक्षणाचे क्षण
  पुरे झालं फुलं वाहणं!
  फेशन आणि रिझोल्यूशन
  प्रतिसाद
  शून्याहून निळे तरी..
  तरुणाईची स्पंदनं
  माडिया गोंडांचे विवाहविधी
  सह-अनुभूती मानवतेची
  मैत्री पूर्वाचलाशी!

दापोलीतील महिला बचत गटांनी सहा दिवसांच्या पालवी कृषी उत्सवात सहभागी झालेल्या हजारो अतिथींची रसना तृप्त केली. ५० हून अधिक महिला बचत गटांनी ही जबाबदारी कुशलतेने पार पाडली.
दररोज दोनशे किलो भात, दहा हजार पोळ्या, एक हजार मोदक, साठ किलो पिठाच्या आंबोळ्या, मत्स्याहारींसाठी सुरमई फ्राय, कोळंबी मसाला, पापलेट, सामिषप्रेमींसाठी चिकन वडे आणि सशाचं मटणसुद्धा! शिवाय, हे सगळं थेट चुलीवरून तुमच्या ताटात! विश्वास नाही ना बसत? पण दापोलीच्या बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठामध्ये आयोजित ‘पालवी कृषी उत्सवात’ हे अनुभवायला मिळत होते. या उत्सवाच्या निमित्ताने दापोली तालुक्यातील स्त्री शक्ती एकवटली. आणि आपल्या संघटित सामर्थ्यांचा अभूतपूर्व आविष्कार घडवत त्यांनी महोत्सवामध्ये आलेल्या हजारो अतिथींचं केवळ उदरभरण नव्हे, तर जिभेचे चोचलेही मन:पूर्वक पुरवले.
राज्यातील कृषी विद्यापीठांतर्फे दरवर्षी भरविण्यात येणारा कृषी तंत्रज्ञान सप्ताह आयोजित करण्याची संधी यंदा दापोली विद्यापीठाला मिळाली होती. १ ते ६ जानेवारी या काळात विद्यापीठाच्या विस्तीर्ण परिसरात हा महोत्सव भव्य स्वरूपात साजरा झाला, पण त्याची पूर्वतयारी गेल्या वर्षी सप्टेंबर- ऑक्टोबरपासून सुरू झाली होती. अशा तऱ्हेच्या उपक्रमामध्ये इतर बाबींप्रमाणेच दररोज येणाऱ्या काही हजार मंडळींच्या भोजन व निवासाची सुखदायी व्यवस्था करणं, हे एक मोठं आव्हान असतं. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय मेहता आणि विस्तार शिक्षण संचालक डॉ. ए. जी. पवार यांनी तालुक्यातील महिला बचत गटांवर विश्वास टाकला आणि दापोली तालुका भरारी महिला बचत गट महासंघाच्या शैला अमृते यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील पन्नासाहून जास्त बचत गटांच्या महिला शब्दश: पदर खोचून उभ्या ठाकल्या.
कृषी विद्यापीठामध्ये डॉ. पवार आणि अन्य अधिकाऱ्यांबरोबर नियोजनासाठी बैठका सुरू झाल्या. महोत्सवात कोणत्या खाद्यपदार्थाचे स्टॉल्स मांडायचे, दुपारची भूक भागू शकेल अशा मर्यादित आहाराची (बिझनेस लंच) व्यवस्था कशी करायची, या पदार्थासाठी कच्चा माल कुठून आणायचा, कोणत्या महिला गटांनी कोणते पदार्थ बनवायचे, या पदार्थाचे दर काय ठेवायचे- एक ना अनेक मुद्दे निघत गेले. त्यानुसार चोख नियोजन होत गेलं. आणि प्रत्यक्ष महोत्सवाच्या वेळी कुठेही कसलीही गडबड, गोंधळ न
 
होता सारं ठरल्यानुसार पार पडलं. अतिथींनी तृप्तीची ढेकर दिली आणि आयोजकांनी समाधानाची!
सलग सहा दिवस चाललेल्या या महोत्सवातील भोजन व अल्पोपाहाराची संपूर्ण जबाबदारी महिला बचत गटांनी एकत्र येऊन यशस्वीपणे पेलण्याच्या या अनोख्या उपक्रमाबाबत बोलताना शैला अमृते म्हणाल्या, ‘‘मी गेली २५ वर्षे उत्कर्ष महिला मंडळ या संस्थेमार्फत तालुक्यातील महिलांना संघटित करून आर्थिकदृष्टय़ा स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने विविध उपक्रम राबवत आहे. साक्षरता मोहिमेपासून खाद्यपदार्थ आणि फळप्रक्रिया उद्योगांच्या प्रशिक्षणापर्यंत अनेक बाबींचा त्यामध्ये समावेश आहे. महिलांमध्ये आरोग्यविषयक जागृती निर्माण करण्याकडेही आम्ही लक्ष देत आलो आहोत. सुमारे पाच वर्षांपूर्वी तालुक्यामध्ये महिला बचत गटांची बांधणी आम्ही सुरू केली आणि त्यातून आता पन्नासपेक्षा जास्त बचत गटांचा मिळून तालुका पातळीवरील महासंघ झाला आहे. या गटांमधील महिलांना सिंधुदुर्ग, कोल्हापूर, वारणानगर, तुळजापूर, पंढरपूर इतकंच नव्हे, तर मुंबई- बंगलोपर्यंत नेऊन अर्थार्जनासाठी तिथे चाललेले विविध उपक्रम मी दाखवत आले आहे. त्यातून या महिलांचा आत्मविश्वास वाढला. आपणही अशा प्रकारे छोटे छोटे व्यवसाय सुरू करून दोन पैसे गाठीला बांधावेत, ही ऊर्मी निर्माण झाली आणि त्याचाच आविष्कार ‘पालवी’ महोत्सवाच्या निमित्ताने घडला.’’
‘‘या महोत्सवासाठी विद्यापीठाने आमच्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरवण्याची मोठी नैतिक जबाबदारी होती आणि माझ्या महिलांनी ती समर्थपणे निभावली’’, असं अभिमानानं सांगून शैलाताई म्हणाल्या, ‘‘दुपारच्या वेळी भूक भागेल इतका मसाले भात व भाजी-पोळी, असा मोजका आहार आम्ही सलग पाच दिवस पुरवला आणि सुमारे पस्तीस हजार लोकांनी त्याचा लाभ घेतला. त्यासाठी आठ ते दहा बचत गटांच्या महिला पहाटे पाच वाजल्यापासून संध्याकाळी सहा-सात वाजेपर्यंत राबल्या. हे गट दिवसाला प्रत्येकी दीड-दोन हजार पोळ्या सहज करायचे. त्यापैकी एका गटाने तर तीन हजारापर्यंत मजल मारली. भाजी बनवण्यासाठी दररोज साठ-सत्तर किलो बटाटे लागायचे. आमच्या महिला पहाटे आल्याबरोबर हे बटाटे उकडत टाकायच्या.
खुद्द शैलाताईंनी आपला ‘उजवा हात’ म्हणून वर्णन केलेल्या अश्विनी वैद्य या उपक्रमाच्या पूर्वतयारीबाबत बोलताना म्हणाल्या, ‘‘बचत गटांची निवड, वैविध्यपूर्ण खाद्यपदार्थासाठी आवश्यक ते नियोजन, काही खास पदार्थ बनवण्याचं प्रशिक्षण इत्यादींना गेल्या सप्टेंबर महिन्याच्या अखेरपासूनच आम्ही सुरू केलं. स्टॉल्सची स्वच्छता कशी राखायची हे त्यांना सांगितलं. पोळी-भाजी बनवणाऱ्या महिलांसाठी एप्रन आणि कॅप देऊन त्यांना व्यावसायिक दटष्टिकोन दिला. विद्यापीठ आणि जिल्हा बँकेच्या अधिकाऱ्यांनी
मदतीचा हात पुढे केला. त्यामुळे या महिलांना आणखी हुरूप आला. आपापल्या बचत गटाच्या बँकेतील खात्यातून पैसे काढून पदार्थासाठी आवश्यक माल त्यांनी खरेदी केला आणि रोजच्या रोज मिळणाऱ्या पैशातून दैनंदिन खर्च भागवला. गेल्या महिन्यात पुण्यामध्ये झालेल्या ‘भीमथडी’ जत्रेत आमच्या बचत गटांचे सहा स्टॉल्स होते. तिथे पापड, लोणची, मसाले, हातसडीचे तांदूळ इत्यादी पदार्थ हातोहात खपले. उकडीच्या मोदकांना तर प्रचंड मागणी होती, तो अनुभव गाठीला असल्यामुळे इथे नियोजन करणं सोपं गेलं. तरीसुद्धा अखेरच्या दिवसांत दापोलीतील किराणा दुकानदारांचाही माल संपला. त्यामुळे एस. टी.तून कंडक्टरांच्या मदतीने खेडहून माल आणावा लागला. या व्यतिरिक्त दापोली शहरापासून ५ किलोमीटर परिसरात २० ठिकाणी आमच्या बचत गटांनी पाहुण्यांसाठी रास्त दरात भोजन व निवासाची सोय केली. त्याही उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाल्याचं वैद्य यांनी नमूद केलं.
कृषी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. पवार गेली दोन वर्षे सातत्याने या गटांना कृतिशील पाठिंबा व प्रोत्साहन देत आले आहेत. तरीसुद्धा एवढय़ा प्रतिष्ठेच्या कार्यक्रमाची जबाबदारी या गटांवर सोपवणं काहीसं जोखमीचं होतं. या संदर्भात बोलताना डॉ. पवार म्हणाले की, कोकणात गावोगावी रोजगार निर्माण करण्यामध्ये कृषी पर्यटन हा उपक्रम अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. त्याचप्रमाणे एखाद्या धंदेवाईक हॉटेल चालवणाऱ्यापेक्षा बचत गट जास्त प्रामाणिकपणे लुबाडणूक न करता आणि कौटुंबिक आस्थेवाईकपणाने पाहुण्यांचं आदरतिथ्य करतात, असं माझं निरीक्षण आहे, म्हणूनच त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवली. अर्थात याला गेली सुमारे दोन वर्षे आम्ही जाणीवपूर्वक आयोजित करत असलेले मेळावे, मार्गदर्शन, प्रशिक्षण कार्यक्रमांची पाश्र्वभूमी आहे. खाद्यपदार्थाच्या किंवा निवास व्यवस्थेच्या दर्जाबाबत जागरूक राहून व्यावसायिक दृष्टिकोन जोपासण्यासाठी आम्ही या गटांना सतत प्रवृत्त केलं. त्यांच्या निवासव्यवस्थेची सचित्र किंवा चित्रफितींसह माहिती पाहुण्यांना उपलब्ध करून दिली. त्यामुळे चांगला प्रतिसाद मिळाला.
बचत गटांच्या महिलांमध्येही या यशामुळे नवा उत्साह संचारला आहे. किसान महोत्सवासारख्या बाहेरगावच्या महोत्सवासाठी त्यांच्याकडे विचारणा होऊ लागली आहे. पण या संपूर्ण उपक्रमाच्या सूत्रधार शैला अमृते किंवा अश्विनी वैद्य एवढय़ावर समाधानी नाहीत. बाजारपेठेतील शो केसमध्ये टिकाव धरण्यासाठी पारंपरिक कोकणी मेव्याबरोबरच काही वेगळ्या वाटा चोखाळण्याची गरज त्यांना तीव्रपणे जाणवत आहे. त्यासाठी राजस्थानात उदयपूपर्यंत या महिलांना नेऊन तिथलं कापडावरचं नक्षीकाम शिकवण्यासारखे अभिनव उपक्रम त्यांच्या मनात घोळत आहेत. बचत गटाच्या महिलांची तर मन:पूर्वक साथ आहेच, पण कृषी विद्यापीठाप्रमाणे अन्य संबंधित यंत्रणांनीही या ज्योतींना साथ देण्याची गरज आहे.
सतीश कामत
pemsatish@yahoo.co.in

शैला अमृते दापोली तालुक्यातील महिला बचत गटांना एकत्र करून त्यांना मोठी स्वप्ने साकार करायला प्रोत्साहन देत आहेत. शैला अमृते मूळच्या मुंबईकर. खार उपनगरात राहणाऱ्या. त्यांचे पती अरविंद अमृते भारतीय आयुर्विमा महामंडळात डेव्हलपमेंट ऑफिसर होते. १९७७ मध्ये हे दांपत्य मुंबई सोडून दापोलीतील गव्हे गावात राहायला आले. सुरुवातीची काही र्वष भाडय़ाच्या जागेत काढली. मग १९८४ मध्ये त्यांनी १० एकराचा एक डोंगराळ भाग विकत घेतला. आणि हिरव्या बोटांच्या अरविंद अमृते यांनी आज त्या जागेत हिरवं बन फुलवलंय. अनेक नवे पथदर्शक प्रयोग त्यांनी केले आहेत. त्यांची नर्सरी आज अनेक अभ्यासकांना व पर्यावरणप्रेमींना खुणावत आहे. या प्रकल्पाला शैलाताईंची समर्थ साथ आहेच. अमृते नर्सरीत आता त्यांचा मुलगा आशीष याच्या पुढाकाराने कृषी पर्यटनाचा देखणा प्रयोग साकारलाय. तिथे पर्यटनाला येणाऱ्या अतिथींनाही शैलाताईंच्या आदरातिथ्याचा लाभ मिळतो. त्यांच्या हातच्या पुरणपोळ्या, मोदक, माशाचं कालवण असे रुचकर पदार्थ शैलाताई स्वत: बनवतात. शिवाय वेलकम ड्रिंक, पापड-लोणची हेही सारं त्यांच्याच बचत गटातील महिलांनी बनवलेलं असतं.
एकीकडे नर्सरी वसवत असताना शैलाताईंना गावातील कष्टकरी महिलांची स्थिती पाहून त्यांच्यासाठी काहीतरी करण्याची उर्मी दाटून आली. त्यांची स्थिती सुधारण्याच्या दृष्टीने त्यांनी बहुविध प्रकारे काम सुरू केलं. या मातांना पोलिओ डोसचे महत्त्व समजावून सांगणं, मुलांना नियमित शाळेत पाठवायला लावणं, कुटुंब नियोजनाचा प्रसार करणं, दारूबंदीसाठी प्रेरित करणं- असं विविधांगी काम त्यांनी सुरू केलं. त्यातूनच पुढे गावातल्या काही महिलांना त्या स्वत:च्या नर्सरीत काम देऊ लागल्या. पुढे शैलाताईंनी त्यांना फळप्रक्रिया करण्याचं प्रशिक्षण दिलं. त्यातून ‘आशीष फूड प्रॉडक्टस्’ हा उद्योग सुरू झाला. काजूगर, कोकम, आवळा, करवंद यांची सरबतं बनू लागली. पापड, लोणची, पीठं तयार होऊ लागली. १९८६ मध्ये त्यांचा उत्कर्ष महिला संघ आकाराला आला. आता या महिला संघातर्फे विविध विकास कामं सुरू आहेत. बालवाडी, बालकांसाठी छंद-वर्ग, संस्कार-वर्ग, गावकऱ्यांसाठी आरोग्य शिबिरं असं बरंच काही. पुढे बचतगटांची संख्या वाढली, तसा शैलाताईंनी बचतगटांचा महासंघ बांधला. बचतगट अधिक उद्यमशील केले. त्यांना विपणनाचं तंत्र शिकवलं. या कार्याची दखल घेऊन शैला अमृते यांना गेल्या वर्षीचा अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जाणारा तीन लाख रुपयांचा ‘जानकीदेवी बजाज पुरस्कार’ इंडियन र्मचटस चेंबरच्या लेडीज विंगतर्फे प्रदान करण्यात आला. योगायोगाने या पुरस्काराचा यंदाचा वितरण सोहळा अलीकडेच मुंबईत पार पडला. या वेळच्या विजेत्या यल्लमा येलावार यांच्याबद्दलचा लेख पुढील शनिवारच्या ‘चतुरंग’ पुरवणीत वाचायला मिळेल.
प्रतिनिधी